इलॉन मस्क यांचे एक सुप्रसिद्ध वाक्य आहे “जेव्हा मी महाविद्यालयात होतो, तेव्हा मला या जगात बदल घडवून आणणार्या एखाद्या गोष्टीचा भाग व्हायचे होते. आता मीही तेच करत आहे.”
जगात बदल घडवून आणू शकणाऱ्या इलॉन मस्क यांच्या अशाच एका तंत्रज्ञानाबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
2024 च्या पहिल्याच आठवड्यात तीन जानेवारीला इलॉन मस्क यांच्या SpaceX या कंपनीची सहा स्टारलिंक सॅटॅलाइट्सची पहिली बॅच अवकाशात झेपावली. या सहा उपग्रहांबरोबरच आणखी पंधरा उपग्रह पृथ्वीच्या LEO (लो अर्थ ऑर्बिट) या कक्षेत पाठवले गेले. फाल्कन-९ हा प्रक्षेपक यासाठी वापरला गेला. संपूर्ण जगाचे लक्ष या घटनेने वेधून घेतले. नक्की काय आहे हे तंत्रज्ञान? आणि इतके महत्त्वाचे काय आहे त्यात? जाणून घेऊयात या लेखात!
स्टारलिंक Direct to cell म्हणजे काय?
स्पेसएक्सने प्रक्षेपित केलेल्या या उपग्रहांच्या सहाय्याने तुमच्या स्मार्टफोनवर सॅटेलाइट ब्रॉडबॅंड सिग्नल सरळ सरळ पोहोचवला जाईल. म्हणूनच या तंत्रज्ञानाला ‘डायरेक्ट टू सेल’ किंवा ‘डायरेक्ट मोबाईल’ (D2M) असे म्हणतात. खरे तर सध्याही या कंपनीतर्फे स्टारलिंक ही सॅटेलाइट इंटरनेट सेवा प्रदान केली जात आहे. परंतु आता या कंपनीने एक पाऊल पुढे टाकत तुमच्या स्मार्टफोनवर सॅटेलाइटच्या माध्यमातून मजकूर, आवाज, डेटा तसेच IOT सेवा देण्याची तयारी सुरू केली आहे.
स्टारलिंक डायरेक्ट टू सेल तंत्रज्ञान कसे काम करते?
अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ही सेवा म्हणजे स्पेसएक्स या कंपनीने अवकाशात पाठवलेला मोबाईल टॉवरच आहे. आपण सध्या आपल्या मोबाईल सिग्नलसाठी जमिनीवर उपलब्ध असलेल्या नेटवर्कवर अवलंबून आहे जे एका जिओस्टेशनरी उपग्रहाला (Geostationary satellite) जोडले गेले आहे. परंतु काही विशिष्ट ठिकाणी आपल्याला मोबाईल सिग्नल उपलब्ध नसणे, वेग कमी असणे तसेच किंमतीवरील मर्यादा इत्यादी गोष्टींचा सामना करावा लागतो. परंतु डायरेक्ट टू सेल तंत्रज्ञानामुळे मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसेल तरीही, कुठल्याही बाह्य जोडणी किंवा उपकरणाशिवाय इंटरनेट सेवा तसेच फोन करण्याची सुविधा तुम्हाला तुमच्या मोबाईल डिव्हाईसवर (उदाहरणार्थ स्मार्टफोन, टॅब्लेट इत्यादी) उपलब्ध होणार आहे. ही यंत्रणा लो अर्थ ऑर्बिटमधे (पृथ्वीच्या सर्वात जवळील उपग्रह कक्षा) मोठ्या संख्येने असलेल्या सॅटेलाईट्सच्या जाळ्यामुळे काम करते. मोठ्या प्रमाणावर असलेल्या सॅटेलाईट्सच्या मुळे मोबाईल सिग्नल पृथ्वीवर सर्वत्र पाठवणे या तंत्रज्ञानामुळे शक्य होणार आहे.
वर उल्लेख केल्याप्रमाणे सध्याही या कंपनीतर्फे स्टारलिंक ही सॅटेलाइट इंटरनेट सेवा प्रदान केली जात आहे. ही सेवा जिओस्टेशनरी (भूस्थिर) उपग्रहावर अवलंबून आहे. जिओस्टेशनरी उपग्रह हा पृथ्वीपासून सुमारे ३६००० किमी इतक्या दूर असतो. ही पृथ्वीपासून सर्वात दूर असलेली उपग्रह कक्षा आहे. एवढ्या अंतरामुळे डेटाच्या प्रवासाला खूप वेळ लागतो. कारण डेटाला सॅटेलाईट पर्यंत जाणे आणि तिथून परत येणे यासाठी जवळजवळ ३६०००+३६००० असा एकूण ७२००० किमी प्रवास करावा लागतो. जेव्हा खूप जास्त प्रमाणात डेटा पाठवण्याची आवश्यकता असते तेव्हा असा विलंब हे फार मोठे आव्हान असते. उदाहरणार्थ डेटा स्ट्रिमिंग, ऑनलाईन गेमिंग, व्हिडिओ कॉल आणि तत्सम क्रियाकलाप. परंतु स्टारलिंकची संपर्क यंत्रणा लो अर्थ ऑर्बिट मधे असलेल्या सॅटेलाईट्सच्या माध्यमातून चालणार आहे. हे सॅटेलाईट पृथ्वीपासून साधारण ५५० किमी अंतरावर असणार आहेत. हे अंतर तुलनात्मक दृष्ट्या बरेच कमी आहे. त्यामुळे डेटा पाठवण्यास होणारा विलंब टाळता येईल. डेटा विलंब सध्याच्या ६००+ मिलीसेकंदवरुन जवळपास २५ ते ६० मिलीसेकंद इतका कमी होईल.
स्टारलिंक डायरेक्ट टू सेलची वैशिष्ट्ये
- या अंतर्गत मजकूर, आवाज, डेटा
पाठवणे तसेच आयओटी (Internet Of Things) इत्यादी सेवा उपलब्ध होणार आहेत. सुरुवातीला फक्त मजकूर पाठवण्याची सुविधा उपलब्ध असेल. आवाज व डेटा पाठवणे आणि आयओटी या सेवा 2025 पासून उपलब्ध होणार आहेत.
- या सर्व सॅटेलाईट्सवर अत्यंत प्रगत असा eNodeB modem बसवला आहे. एकदा हे सर्व उपग्रह त्यांच्या कक्षेत स्थापित झाले की मग लेझरच्या सहाय्याने ते स्टारलिंकच्या लो अर्थ ऑर्बिट (LEO) उपग्रहांशी जोडले जातील. त्यामुळे संपूर्ण जगभर कनेक्टिव्हिटी मिळू शकेल. कारण हे स्टारलिंक उपग्रह त्यानंतर जगाच्या पाठीवर असलेल्या कुठल्याही स्मार्टफोनशी थेट संपर्क करून इंटरनेटची जोडणी करू शकतात.
- सध्या उपलब्ध असलेले LTE फोन यासाठी आपण वापरू शकतो. यासाठी कुठल्याही विशेष हार्डवेअर, फर्मवेअर किंवा ॲपची गरज नाही.
- ‘ही सेवा कुठे उपलब्ध होऊ शकेल?’
- याबाबत स्पेसएक्स या कंपनीच्या अधिकृत साइटवर लिहिले आहे,wherever you can see the sky
थोडक्यात, ही सेवा वापरणारा स्मार्टफोनधारक जगाच्या पाठीवर कुठेही मोबाईल कनेक्टिव्हिटीचा आनंद घेऊ शकतो. तुम्हाला दूरसंचार सेवा पुरवणारी कंपनी जर स्टारलींकची सेवा घेत असेल तर तुम्हालाही तुमच्या सध्याच्या स्मार्टफोनवर ही सेवा उपलब्ध होईल.
- डेटा विलंब २५ ते ६० मिलीसेकंद.
अगदी दुर्गम ठिकाणी तो १०० मिलीसेकंदपर्यंत जाऊ शकेल.
- डाऊनलोड वेग २० ते २२५ Mbps
- अपलोड वेग ५ ते २० Mbps
- ही सेवा 4G व 5G सेवांशी सुसंगत
आहे. त्यामुळे 4G किंवा 5G शी स्पर्धा अथवा त्यांना बदलून त्याची जागा घेणे असा या तंत्रज्ञानाचा उद्देश नाही. तसेच कमी असलेल्या बॅंडविड्थमुळे ते शक्यही नाही.
- या तंत्रज्ञानाचा मुख्य उद्देश
वापरकर्त्यांना दुर्गम ठिकाणी किंवा खेडेगावात वेगवान, उच्च गुणवत्तेचे कनेक्शन मिळावे हा आहे. या तंत्रज्ञानामुळे अशा भागांत अत्यंत जलद आणि विश्वसनीय अशी मोबाईल तसेच इंटरनेट सेवा उपलब्ध होऊ शकते.
- USA, ऑस्ट्रेलिया, कॅनडा,
न्यूझीलंड, जपान, स्विझरलँड, चिली, पेरू इत्यादी देशात स्टारलिंकशी भागीदारी केलेल्या कंपन्यांमार्फत सुरुवातीला ही सेवा उपलब्ध करण्यात येईल. कुठल्याही भारतीय भागीदार कंपनीचा उल्लेख स्टारलिंकने आपल्या वेबसाईटवर सध्या तरी केलेला नाही. परंतु नजिकच्या भविष्यात अशी भागीदारीस सरकारी मान्यता मिळण्याचे स्पष्ट संकेत आहेत.
भारतातील उपग्रह इंटरनेट सेवा –
नुकतेच भारतातील जिओ स्पेस फारबर या कंपनीने भारतातील काही निवडक भागांत अशी सेवा सुरू केली आहे. यामध्ये गुजरात येथील गीरचे राष्ट्रीय अभयारण्य, छत्तीसगढ येथील कोरबा, उडीसा येथील नवरंगपूर आणि असम येथील ओएनजीसी – जोरहाट यांचा समावेश आहे. भारतातील कानाकोपऱ्यात इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्याचे या कंपनीचे उद्दिष्ट आहे. ही कंपनी मिडीयम अर्थ ऑर्बिट (MEO) या मध्यम उपग्रह कक्षेत आपले उपग्रह स्थापित केले आहेत. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने या दोन्हीत काही मुलभूत फरक आहेत.
स्टारलिंक डायरेक्ट टू सेलपुढील संभाव्य अडचणी काय आहेत?
- ही स्पेसएक्सची अत्यंत महत्त्वकांक्षी
अशी मोहीम आहे. परंतु सद्यस्थितीतील वापरकर्त्यांची मागणी पुरविण्याच्या त्यांच्या क्षमतेबद्दल अनेकांना शंका आहे. याचे कारण त्यांची अत्यंत कमी बॅंडविड्थ.
- या मोहिमेमुळे अंतराळात प्रचंड
प्रमाणात कचरा निर्माण होणार आहे. त्याची विल्हेवाट लावण्याचा मोठाच यक्षप्रश्न निर्माण होणार आहे. स्पेसएक्सच्या म्हणण्यानुसार त्यांचे उपग्रह त्यांची कालमर्यादा संपली की त्या कक्षेतून बाहेर येतील. तशी यंत्रणा त्यांनी प्रत्येक उपग्रहात बसवली आहे. अर्थात अंतराळ कचरा आणि त्याची विल्हेवाट लावणे ही सध्या संपूर्ण जगापुढीलच मोठी डोकेदुखी आहे.
- कालमर्यादा संपलेले उपग्रह, त्यांचे
धातू व इतर कचरा खाली परत येताना पृथ्वीच्या वातावरणात जळल्यामुळे पृथ्वीच्या वातावरणावर मोठा परिणाम होऊ शकेल
- स्टार लिंक ला पृथ्वीच्या पाठीवर
सर्वत्र ही सेवा उपलब्ध करून द्यायची असल्याने त्यांनी आतापर्यंत एकूण ५१०० उपग्रह कक्षेत पाठवले आहेत. ही संख्या सतत वाढत रहाणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत स्पेसएक्स एकूण ४२००० उपग्रह अवकाशात पाठवणार आहे. एकाच कक्षेत प्रचंड संख्येने असणाऱ्या सॅटेलाईट्सची आपापसात किंवा दुसऱ्या अवकाशयानांशी टक्कर होऊ शकते.
- एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या
सॅटेलाईट्समुळे खगोलशास्त्रीय निरीक्षणांना बाधा पोहोचू शकते.
- उपग्रह इंटरनेटसाठी स्वच्छ आकाश
आवश्यक आहे. मुसळधार पाऊस किंवा वेगवान वारे यामुळे ही सेवा बाधित होऊ शकते. अशा परिस्थितीत इंटरनेटची सेवा खंडित होऊ शकते किंवा तिचा वेग कमी होऊ शकतो.
विशिष्ट भौगोलिक स्थितीमुळे सध्या ज्या भागात मोबाईलची सुविधा उपलब्ध नाही तेथे ती करून देणे हाच या तंत्रज्ञानाचा उद्देश आहे. आणिबाणीच्या परिस्थितीत जर जमिनीवरील पायाभूत सुविधा उपलब्ध नसतील तर तेव्हा हे तंत्रज्ञान उपयुक्त आणि तारक ठरेल. अशा परिस्थितीत अत्यावश्यक संसाधने पुरवण्याचे महत्त्वाचे काम D2M तंत्रज्ञानामुळे होऊ शकते. नैसर्गिक आपत्तीच्या काळात विश्वसनीय बातम्या, माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावणे शक्य होईल. कोरोना महामारीच्या काळात या गोष्टीची आवश्यकता सर्वांना पटली असेल.
कोरोना महामारीच्या काळात शाळा, महाविद्यालये बंद होती आणि शिक्षण दूरस्थ पद्धतीने चालू होते. पण दुर्गम खेड्यांमध्ये, जिथे मोबाईल सिग्नल पोहोचू शकत नाही, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अशा दुर्गम ठिकाणी आरोग्य, शिक्षण इत्यादी सेवा उपलब्ध करून देणे या तंत्रज्ञानामुळे शक्य होणार आहे. फक्त आपल्यापुढे असलेले प्रश्न स्पेसएक्स कसे हाताळते हाच कळीचा मुद्दा आहे.
काहीही असले तरी जागतिक संपर्काच्या दृष्टीने हा प्रकल्प म्हणजे एक मोठे पाऊल आहे असे म्हणायला हरकत नाही. या तंत्रज्ञानामुळे आपल्या संपर्क विश्वात मोठी क्रांती घडणार आहे याबद्दल शंका नाही. जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याची क्षमता असलेले हे तंत्रज्ञान आहे हे निश्चित!!!
तुम्हाला ही माहिती (what is starlink in marathi) कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.
धन्यवाद !
लेखिका – क्षितिजा कापरे
छान माहिती मिळाली. धन्यवाद!
अभिप्रायाबद्दल धन्यवाद
खूप माहितीपूर्ण लेख आहे. धन्यवाद.
अभिप्रायाबद्दल धन्यवाद
सखोल अभ्यास करून सोप्या भाषेतील लेख. तरीही अवघड विषय आहे हे जाणवते
धन्यवाद
अगदी सोप्या भाषेत, कोणालाही समजेल अशी उपयुक्त माहिती !
धन्यवाद
खूप छान माहिती !!बऱ्याच जणांना हा विषय अजून माहिती नसेल, त्यांना आता सोपा वाटला असेल 👌
धन्यवाद