अतुल,भैरवी, मंदार व समीर चौघेजण स्पेस प्रोजेक्ट वर काम करत होते. कॉलेजच्या सेकंड ईयर पासून या चौघांनी स्वतःचा एक सेटअप केला होता. अतुल ग्रहताऱ्यांमध्ये रमलेला जीव. BE (aerospace) घेऊन ISRO मध्ये काम करायची स्वप्न बघणारा. खूप लहानपणीच त्याने ग्रहताऱ्यांविषयी माहिती मिळवायला सुरुवात केली होती. सोनिया,त्याच्या आईला हा वेडा मुलगा आहे असे वाटत होते. पण त्याच्याबरोबर आता अजून तीन वेडे पण आले आहेत म्हणल्यावर तिला थोडेसे हायसे झाले.
अतुल खूपच लवकर बोलायला लागला. जेव्हा सगळी बाळे चांदोमामाची गोष्टी ऐकत झोपायची तेव्हा हा आमामा म्हणत त्याच्याकडे तासन्तास डोळे लावून बघायचा.
त्यादिवशी अतुल आनंदाने पळतच घरी आला ‘आई आई’ हाका मारत तो म्हणाला,” मी, भैरवी, मंदार, व समीर ज्या प्रोजेक्टवर काम करत होतो त्याचे समाधानकारक रिजल्ट मिळाल्यामुळे इस्रोने आम्हाला एक वर्षासाठी स्पेस मध्ये पाठवायचा निर्णय घेतला आहे. पुढचे दोन महिने आम्हाला ट्रेनिंग असेल व नंतर एक वर्षासाठी ते ऑनप्रोजेक्ट आम्हाला मंगळ ग्रहावर पाठवणार आहेत.” सुरुवातीला सोनियाला ही सर्व गंमतच वाटली. पण पुढचे दोन महिने सलग पहाटे उठून ही चौकडी इस्रो मध्ये जात होती. जसजसे त्यांचे ट्रेनिंग संपत आले सोनियाला काळजी वाटू लागली. अतुल अतिशय महत्त्वाकांक्षी व कामाच्या प्रती निष्ठावंत होता.सोनियाने अतुलला हर तऱ्हेने सांगायचा प्रयत्न केला पण तो ऐकायच्या मनस्थितीतच नव्हता. एवढ्या लहान वयात मिळालेली एवढी मोठी संधी अशी फुकट त्याला घालवायची नव्हती. शेवटी त्याच्या पालकांचा नाईलाज झाला.
चौघां मुलांच्या पालकांना इस्रोच्या ऑफिसमध्ये बोलवण्यात आले. एक वर्षाचे एग्रीमेंट सही करून द्यायचे होते. संभाव्य धोके समजावून सांगून त्यांनी पालकांकडून “नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट” घेतले. अखेर जाण्याचा दिवस उगवला. कधी नव्हे तर अतुलने देवाला साष्टांग नमस्कार केला आई-वडिलांच्या पायावर डोके ठेवले. स्वारी खूपच खुश होती. सगळ्या मुलांना see off करायला त्यांचे त्यांचे आई-वडील इस्रो स्पेस सेंटर मध्ये गेले होते. मुलांना गाईड करणाऱ्या Dr.नलिनीशी बोलून व मुलांची काळजी घ्या सांगून पालक घरी परतले.
एका भल्या मोठ्या स्पेसक्राफ्ट मध्ये अतुल, भैरवी, मंदार व समीर बसले. त्यांच्या गाईडने सर्व सूचना देऊन त्यांनी या वर्षभरात काय शोध लावायचा आहे त्याबद्दल एक फाईल चौघांच्या हातात दिली. “Good Luck my students. Keep in touch म्हणत गाईडने ऑटोमॅटिक बटन दाबले व स्पेसक्राफ्ट बंद झाले.“ आता थोड्यावेळातच स्पेसक्राफ्ट सुरू होणार होते. त्या आधी सगळ्यांनी स्पेसक्राफ्ट साठी विशिष्ट ड्रेस घातला, डोक्यावर भले मोठे हेल्मेट ,पायात बुट, डोळ्याला गॉगल, हातात हँड ग्लोव्हज आणि पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर.
अतुल स्पेसक्राफ्ट बघायला खूपच उत्सुक होता.कॅप्सुल सारखे लबुंळके दार बरेच मोठे होते त्या अंडाकृती दारातून आत जाताना लाल,हिरवा,पिवळा दिवे दिसत होते. आतल्या बाजूला अलार्म होते आणि ते विशिष्ट पद्धतीनी वाजत, त्याचे अर्थ एका फाईल मध्ये होते.तिथे चार छोटे क्युबिकल्स ,फोल्डिंग बेड,चार वॉशरूम्स ,एक छोटे किचन व एक छोटासा कॉमन एरिया, कॉकपिट मध्ये दोन लोकांची बसायची सोय खुर्चीच्या बाजूला सगळे कंट्रोल, एक मोठा स्क्रीन ,प्रत्येकाला वॉकीटाॅकी, वर्षभर पुरेल असे फ्रोजन पदार्थ, पाणी, ज्यूस व आवश्यकता पडली तर औषधे ठेवण्यात आले होते. अतिशय सुंदर कॉम्पॅक्ट व अद्यावत सोयींनी युक्त असे ते स्पेसक्राफ्ट होते.
इस्रोची पंधरा लोकांची टीम ग्राउंड वरून या चौघांना मदत करणार होती. Dr. नलिनी हा प्रोजेक्ट लीड करणार होती. गेली अनेक वर्ष ती मंगळावर सृष्टी होऊ शकते ह्या थिअरीवर काम करत होती. काही वर्षा पूर्वी तिने government ला सगळे प्रोजेक्ट सांगितले होते .जास्तीत जास्त machinery ,spare parts भारतीय बनावटीचे घ्यायचे ठरले होते त्यामुळे खर्चात बरीच बचत होणार होती. Dr. नलिनी तरुण ,हुशार मुलांच्या शोधात होती आणि भारतातील अनेक शाळांना भेटून विविध क्विझ , कॉम्पिटिशन ,निबंध स्पर्धा या सर्वातून तिने तिची एक टीम तयार केली होती.
अतुल पुण्याचा , भैरवी बंगलोर ,मंदार दिल्ली तर समीर यूपीचा होता. या सगळ्यांना शालेय जीवनापासून ती ओळखत होती. बऱ्याच वेळा “नव्याचे नऊ दिवस” असं म्हणत उत्साह नंतर कमी होतो, पण या चौघांच्या बाबतीत असे काही झाले नाही उलट त्यांची आकाशाप्रतीची ओढ ही वाढतच गेली.Dr .नलिनी सगळ्या टीमसहित स्क्रीन वरून या चौघांना सूचना देत होत्या.दोन सायरन झाल्यावर स्पेसक्राफ्ट मध्ये व इस्रो स्पेस सेंटर मध्ये पंतप्रधानांच्या बरोबर सर्वांनी राष्ट्रगीत म्हटले. “भारत माता की जय!”म्हटल्यावर पंतप्रधानांनी अनेक शुभाशीर्वाद व शुभेच्छा देऊन तिसरा व अंतिम सायरन वाजवला. All the best…Good luck..विजयीभव…नल्लाअथिस्तंम.. कमियाब हो…शुभेच्छा….एकच गलका उडाला….
अतुल,भैरवी,मंदार आणि समीरनी एकमेकांना मिठी मारली आणि आनंद व्यक्त केला.अनके वर्ष उराशी जपलेले स्वप्न आज साकार होणार होते.प्रत्येकाची वेगळी भावना होती.जय श्रीराम!…गणपती बाप्पा मोरया! उंदीरमामा की जय! जय मातादी!.. प्रत्येकानी आनंदात आरोळ्या ठोकल्या.3 2 1 स्पेसक्राफ्ट नी एक विशिष्ट सायरन दिला. खूप मोठा आवाज होत एक आगीचा लोळ हवेत उठला व काही क्षणार्धातच भारताचे जय-0009 उंच हवेत उडाले. इस्रो मध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. Dr. नलिनी,पंतप्रधान ,इस्रोची टीम साश्रुनयनांनी ते दृश्य पहात होते.
आता जय – 0009 अंदाजे सात महिन्याचा प्रवास करून मंगळ ग्रहावर पोचणार होते. पुढचे काही दिवस मंगळ ग्रहावर सृष्टी होऊ शकते का या शक्यते विषयी हे चौघे व इस्रोची १५ शास्त्रज्ञ, Dr.नलिनी अभ्यास करणार होते. मुख्य उद्देश प्राणवायू, ऊर्जा,पाणी, राहण्याच्या दृष्टीने पशुपक्षी, झाडे व मनुष्य यांना टप्प्याटप्प्याने घेऊन जाऊन समांतर पृथ्वी सारखेच एक विश्व बनवायचे हे खूपच ,धाडसी महत्त्वाकांक्षी स्वप्न हे सर्व बघत होते. काही वेळासाठी स्पेसक्राफ्ट ऑटोमोडवर ठेवून अतुल ,भैरवी ,मंदार व समीर एकमेकांशी गप्पा मारत बसले होते.
समीर थोडा घरच्या आठवणीने हळवा झाला होता. तसे पाहिले तर प्रत्येकालाच घरची आठवण येत होती.भैरवीने शक्कल लढवून म्हणाली “आपण सगळे आज इथे का आहोत?” हे एकमेकांबरोबर हितगुज करूया म्हणजे आपल्या सगळ्यांना बरे वाटेल .अतुल सांगायला लागला,”तो लहान असताना त्याचे आजोबा देवाघरी गेले, त्याला लहान वयात आजीने ते मंगळ ग्रहावर गेले असे सांगितले. तेव्हापासून एकदा तरी आजोबांना परत भेटावे या उद्देशाने तो आकाशाकडे तासंतास बघत बसायचा, पुढे मोठा झाल्यावर त्याला हे सर्व बाल सुलभ कल्पना होत्या हे समजले पण आकाश, तारे, ग्रह यांविषयीची उत्सुकता वाढतच गेली ”
भैरवी लहान असताना तिला तिची आत्या म्हणायची,” तू सुनीता विल्यम्स सारखी दिसते.” मग काय दिवस रात्र सुनिता विल्यम्स विषयी मनात विचार करत तिच्यासारखेच करिअर घडवायचे तिने ठरवले.”मंदारला देशासाठी सेवा करायची होती.फक्त सैन्यात जाऊनच देशाची सेवा होते असे नाही मग कुठली तरी वेगळी वाट म्हणून तो या क्षेत्राकडे वळाला.शाळेत असताना भूगोल हा समीरचा आवडीचा विषय होता. पुढे पुढे त्याला भौतीक शास्त्रातही रुची वाटू लागली. यूपीच्या छोट्या गावात शाळेने दहावी बारावीनंतर वेगवेगळ्या शैक्षणिक अभ्यासक्रमाविषयी माहिती देण्यासाठी एका संस्थेला बोलावले होते, त्यात समीरला इस्रो विषयी माहिती समजली. हा याच्या गावातला पहिला अंतराळवीर म्हणून कौतुकाला पात्र ठरला.
स्पेसक्राफ्टचा इस्रोशी सतत संपर्क होत असल्यामुळे दररोजच्या घडामोडी एकमेकांना माहीत होत्या व Dr. नलिनी मुलांना व्यवस्थित मार्गदर्शन करू शकत होत्या. आत्तापर्यंत अपेक्षेप्रमाणे सर्व व्यवस्थित चालू होते. मंगळ ग्रहाच्या कक्षेमध्ये जय -0009 ने प्रवेश केला व संपूर्ण इस्त्रो टीमने आनंद उत्सव साजरा केला. आज अनेक महिन्याच्या प्रवासानंतर मंगळ ग्रहावर स्पेसक्राफ्ट थांबणार होते.अतुल व भैरवी स्पेस क्राफ्ट मधून दोन विरुद्ध दिशांना जाऊन तिथल्या मातीचे, वातावरणाचे, पाणी आहे का?, प्राणवायूचे संशोधन करणार होते.
मंगळ ग्रहावर कायमच वादळे येतात त्यामुळे विशेष काळजी घेऊन या दोघांनी बाहेर पडावे असे Dr .नलिनींनी सांगितले.मंदार व समीर, अतुल व भैरवीला स्पेसक्राफ्ट मध्ये बसून बॅकअप देणार होते. सर्व टेक्निकल बाजू समीर सांभाळणार होता.स्पेसक्राफ्टचे दार काही सेकंदासाठीच उघडले जाणार होते. मंदार एका वेळेस अतुल व भैरवी यांना बाहेर पाठवून त्यांच्या संपर्कात राहणार होता व त्यांना लागणारी पूर्ण मदत करणार होता. Dr. नलिनी व बाकी टीमने सर्व सूचना देऊन स्पेसक्राफ्टला बॅकअप द्यायचे ठरले होते. या सर्व प्रोजेक्ट वर इस्त्रो प्रमाणे सर्व देशाची दृष्टी लागली होती. आज सर्व देश व विदेशातल्या सर्वांचे लक्ष जय-0009 च्या यशावर खिळले होते.
ठरल्याप्रमाणे समीरने दार उघडले. काही सेकंदातच अतुल व भैरवी स्पेसक्राफ्ट मधून बाहेर जाणार होते व मंदार या दोघांना पुढची मदत करणार होता पण अचानक काहीतरी बिघाड झाला व स्पेसक्राफ्ट मधून मंदार पण बाहेर फेकला गेला. सगळीकडे एकच गोंधळ उडाला. समीरला आता काही सुचत नव्हते.ठरल्याप्रमाणे त्यांनी काही सेकंदात स्पेसक्राफ्टचे दार बंद केले तो अतिशय घाबरून गेला. Dr. नलिनीला व पूर्ण इस्रोच्या टीमला पण ही परिस्थिती कशी हाताळावी ते समजेना. अतुल, भैरवी व मंदारकडे वॉकीटॉकी होते पण ते स्पेसक्राफ्ट अथवा इस्रो ऑफिशी संपर्क करू शकत नव्हते.
अनपेक्षित धक्का बसून मंदार बाहेर पडल्यामुळे अतुल व भैरवी पण गोंधळून गेले होते. आहे ही परिस्थिती मान्य करून थंड डोक्याने याच्यावर काहीतरी मार्ग काढायचा अतुलने मनोमन निश्चय केला.अतुलने सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली.भैरवी व मंदारला स्पेस सूट मध्ये असलेले सेफ्टी बेल्ट एकमेकांमध्ये गुंतवायचे व आता इथून पुढे तिघांनी एकत्र प्रवास करायचे असे ठरवले. त्याआधी त्या तिघांनी मिळून भारताचा तिरंगा ते उतरले त्या जागी फडकवला. राष्ट्रगीत म्हणून “भारत माता की जय!” असे अभिवादन करून अतुलने मंदार व भैरवीला त्याचा प्लॅन सांगितला. सुदैवाने त्या तिघांचा वॉकीटॉकीच्या साह्याने एकमेकांच्या संपर्कात होऊ शकत होते.
अचानक आलेल्या संकटावर मात करण्यासाठी तिघांनी एकमेकांच्या कमरेला बांधलेले सेफ्टी बेल्टच्या साह्याने तीन वेगवेगळ्या दिशांना जायचे. हे सेफ्टी बेल्ट साधारण पन्नास किलोमीटर पर्यंत लांब होते.प्रत्येकाच्या हातात घड्याळ असल्यामुळे त्यांनी ठराविक वेळेत झेंड्यापाशी परत यायचे ठरवले. मंगळ ग्रहावर वातावरण अतिशय थंड असते व लाल मातीची वाळवंटात जशी वादळे निर्माण होतात तशी वादळे झालीच तर वॉकीटॉकीजच्या साह्याने तिघांमध्ये संवाद साधायचे ठरले. आता प्रश्न होता समीरचा, जो एकटाच स्पेसक्राफ्ट मध्ये काय परिस्थितीत असेल हे माहीत नव्हते.पण एक दिलाश्याची गोष्ट म्हणजे Dr. नलिनी व इस्त्रो ऑफिसची टीम त्यांच्या संपर्क कायम असेल तर ते त्याला व्यवस्थित मार्गदर्शन करत असतील.
ठरल्याप्रमाणे तिघांनी तीन दिशा पकडल्या. भारताचा झेंडा ही परत भेटायची खुण त्यांनी निश्चित केली. भैरवी ज्या दिशेला चालत होती तिथे तिला पाण्याचा मोठा ओहळ अथवा नदीच्या खुणा दिसल्या, म्हणजेच काही अरब वर्षांपूर्वी मंगळ ग्रहावर पाण्याचे अस्तित्व होते याचे पुरावे मिळाले. मंदार ज्या दिशेने जात होता तिथे त्याला ,कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण सर्वात अधिक आहे ,लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, मिथेन यांचेही अस्तित्वाचे पुरावे मिळाले.मिथेन गॅस आहे म्हणजे इथे आपण इंधन बनवू शकतो या शक्यतेला पुष्टी मिळाली.
अतुल ज्या दिशेने जात होता तिथे अचानक वातावरणात बदल झाला. अतिशय जोराचे वादळ आले व तो एका खोल खड्ड्यात पडला. बर्फावरनं घसरत घसरत तो एका गुहेमध्ये शिरला. अचानक डोक्याला मार लागल्यामुळे थोडा वेळ तो बेशुद्ध अवस्थेत होता. जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा त्याला एका मोठ्या खुर्चीला बांधून ठेवले होते.त्याच्या आजूबाजूला कोणीतरी असल्याचे व हालचाली चालू आहेत असे जाणवले.
तो एकदम घाबरून गेला. अचानक त्याच्यासमोर साडेसहा सात फुटी धिप्पाड आकृती उभी होती. अतुल सारखा त्यांनी पण स्पेस सूट घातला होता. त्याची भाषा खूपच भिन्न होती. खाणा खुणा करून अतुलने त्याच्याबद्दल चौकशी करायचा प्रयत्न केला पण त्याला हे काही समजत नव्हते. “अमेरिकन, रशियन ,युरोपियन अशा कुठल्यातरी हा देशातला माझ्यासारखाच मंगळ ग्रहाच्या शोधावता आला नसेल ना?” पण काही केल्या अतुल त्याविषयी माहिती काढू शकत नव्हता.
त्या एलियन ने अतुलचे वॉकीटॉकी, हातातले घड्याळ ज्यामुळे स्पेसक्राफ्ट बरोबर संपर्क साधू शकत होता ते काढून घेतले होते. अतुल घसरून पडताना त्याचा सेफ्टी बेल्ट तुटला होता. तो संशयास्पदरीत्या अतुलकडे बघत होता. भाषेचा अडथळा आल्यामुळे एकमेकांचा विश्वास संपादन करण्यासाठी नजरेच्या भाषेतूनच ते बोलू लागले. एलियन कडे गुहेमध्ये संशोधनासाठी लागणारे अद्यावत सोयीने युक्त सगळे साहित्य होते. एकंदर अतुलच्या अंदाजाप्रमाणे हे एलियन संस्कृती आपल्यापेक्षा खूपच पुढारलेली होती. अतुलने हर प्रकारे संभाषण साधायचा प्रयत्न केला.
अतुलच्या घड्याळाच्या व एलियनच्या उपकरणांच्या फ्रिक्वेन्सी क्रॉस होत होत्या. काही वेळातच एलियन ने अतुलच्या उपकरणांची झडती घेऊन व सगळ्या गोष्टी decode करून हा पण मंगळ ग्रहावर संशोधन करण्यासाठी आला आहे याची त्याची खात्री पटली. अतुलचे हेतू एलियनला व त्याच्या संस्कृतीला त्रास द्यायचे नसून तो त्याच्यासारखाच एक संशोधक आहे हे लक्षात आल्यावर त्याला अतुल विषयीचा अभिमान वाटला झाला.
अतुलच्या घड्याळाच्या फ्रिक्वेन्सी व एलियनच्या मशीनच्या फ्रिक्वेन्सी यांच्यामध्ये क्रॉस कनेक्शन होत होते.अतुल पृथ्वीच्या संपर्कात येत होता. Dr. नलिनींना त्यांनी घडलेला प्रकार सांगून याबद्दल काही अधिक माहिती देऊ शकत असतील तर विचारले. इकडे मंदार व भैरवी अतुलची वाट पहात झेंड्यापाशी उभे होते. सुदैवाने त्यांचा संपर्क समीरशी होऊ शकला . काही वेळातच समीर स्पेसक्राफ्ट घेऊन अतुल व भैरवीला घेऊन परतीचा प्रवास करणार होता.
एलियन बरोबर अतुलने संवाद साधायचा प्रयत्न केला. Dr. नलिनींनी दिलेल्या माहितीप्रमाणे हा परग्रहावरचा एलियन असू शकतो. अनेक वर्षांपासून मंगळ ग्रहावर एलियन पण कायमच्या वास्तव्यासाठी काम करत होते. या एलियन ने अतुलला त्याच्या स्पेस क्राफ्ट पर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करायचे ठरवले. समीरशी फ्रिक्वेन्सी मॅच करून अतुलने त्याचे लोकेशन पाठवले. अतुल गुहेच्या बाहेर आला स्पेसक्राफ्ट समोर होते मंदार त्याला “लवकर आत ये” म्हणत होता अतुल स्पेस क्राफ्ट मध्ये शिरता शिरता त्यांनी मागे वळून हात हलवत एलियन कडे पाहिले….
आता वेध लागले होते ते पृथ्वीचे….परतीचा प्रवास हा खूपच आरामदायी व छान झाला. भारताच्या शिरपेचात अजून एक विजयाचे मोरपीस खुलून दिसले. ज्या गोष्टीसाठी अमेरिका ,चायना, रशिया, युरोप धडपडत होते ती गोष्ट भारतानी पहिल्याच प्रयत्नात करून दाखवली.
आज इस्रो, Dr.नलिनी, अतुल, भैरवी, मंदार, समीर व पूर्ण पंधरा लोकांची टीम कृतकृत्य झाली. देशातून विदेशातून अभिनंदनचे, कौतुकाचे ई-मेल, मेसेजेसचा जणू वर्षावच होत होता.अतुल, भैरवी, मंदार व समीर सुखरूप घरी आले म्हणून त्यांच्या त्यांच्या आई-वडिलांना खूपच आनंद झाला. पुढचे तीन आठवडे मुलांना एका विशिष्ट वातावरणात ठेवण्यात आले होते.
आज इस्त्रो ऑफिसमध्ये खूपच गडबड चालू होती. खुद्द पंतप्रधान ,सगळे रिपोर्टर, टीव्ही चॅनलवाले Dr. नलिनी व पूर्ण टीमचा इंटरव्यू व अनुभव कथन ऐकण्यासाठी जमले होते.Dr. नलिनीनी चारही मुलांचे खूप कौतुक करून अतुलला प्रत्यक्ष अनुभव कथन करण्याची संधी दिली.अतुलने सर्वांचे आभार मानून मंगळ ग्रहाविषयी त्यांनी केलेला अभ्यास व “मानवाला राहण्यास योग्य वातावरण आहे का?” या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती देण्यास सुरुवात केली. अजून पन्नास शंभर वर्षानंतर मंगळ ग्रहावर एक पूर्ण वस्ती होऊ शकते या शक्यतेला पुष्टी देणारे हे सर्व पुरावे सकारात्मक दृश्य जगासमोर दाखवत होते. सोनिया अतुलकडे कौतुकाने,अभिमानाने बघत होती.
सगळ्यात शेवटी अतुल म्हणाला,” अजून सखोल अभ्यास करण्यासाठी अशाच नवनवीन मोहिमा काढून अजून अभ्यासपूर्ण माहिती आपण गोळा करू शकतो “सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट व कौतुकाचा वर्षाव केला..अतुल मात्र एक वेगळाच मनस्थितीत होता.
एलियनने अतुलला गुहेच्या बाहेर काढताना अस्पष्ट आवाज ऐकू आला,”अंतू अंतू” अतुल स्पेस क्राफ्ट मध्ये शिरता शिरता त्यांनी मागे वळून पाहिले…. त्याला झालेला भास होता की सत्य ? एकदा तरी आजोबांना भेटू हे उराशी बाळगलेले स्वप्न… मग ते एलियन का माझे आजोबा? या संभ्रमातच अतुल नवीन मोहिमेच्या तयारीला लागला.
सौ वृषाली पुराणिक,पुणे.
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
ही सायन्स फिक्शन कथा तुम्हाला कशी वाटली,ते नक्की कळवा.आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.
धन्यवाद !
Mast 👌
धन्यवाद.
विज्ञान कथा लिहिणे अजिबात सोपे नाही…u need lot of research and knowledge…. good attempt.. keep it up 👍👏
खूप खूप धन्यवाद.
आपल्या प्रतिक्रियेमुळे नवीन लिखाणाला ऊर्जा मिळाली.
कथा नेटकी, मांडली आहे. चौघांचे वेगवेगळे उद्देश ऐकताना/ वाचताना पुसटशी कल्पनाही नव्हती की शेवट काय असेल. सर्व छान छान असे वाटत असताना अतुलच्या शेवटच्या विचाराने मनाची पकड घेतली. आजोबा की एलियन? ह्या विचारावर वाचकांना आणून सुंदर परिणाम साधला आहे.
वृषाली, कथा सुरेख जमली आहे. अनेक शुभेच्छा
सौ. जयश्री देशपांडे.
खूप खूप धन्यवाद.
आपल्या प्रतिक्रियेमुळे नवीन लिखाणाला ऊर्जा मिळाली
खूपच सुंदर कथा, मस्त 👌🏼👌🏼