वळणाचं पाणी
किती धुरकट झालाय हा आरसा! कि सगळ्या आठवणीच धुरकट झाल्यात! कितीही पुसला तरी डाग जातच नाहीयेत. तसेही म्हणतात ना, शरीराच्या जखमा बऱ्या होतात पण मनावर उमटलेले ओरखडे कायम राहतात. आज हे काय सारखं मनात येतंय? का मन सारखं भरकटतंय? जुन्या आठवणी दाटून येताहेत! लहानपणी जरा आरशात डोकावले तरी आजी सारखी हिणवायची, ”वळणाचं पाणी.” तेव्हा अर्थ कळायचा नाही. पण आजीचे बोल ऐकून आई मात्र मिटून घ्यायची स्वत:ला! तशीही ती अबोलच! बाबा ऐकून न ऐकल्यासारखे करायचे आणि शेतात निघून जायचे. मग रात्री आईची मुसमुस ऐकू यायची. गाढ झोपेमुळे शब्द ऐकू यायचे नाहीत पण बाबा आईला समजावत असायचे. मिटमिट्या डोळ्यांनी एव्हढेच पाहिलेले स्मरते.
“सुजे, ए सुजे, अगं पोरीला शाळेत धाडायचीय कि नाय! काय बसून राहिलीय म्हशीसारखी!”, नवरा गरजला तशी सुजाता भानावर आली! पटकन आवरून पोळ्या लाटायला घेतल्या. “आये, आज शाळेत जास्तीचे वर्ग घेणार आहेत. गणिताचे सर! यायला उशीर होईल.” लेक गळ्यात पडत म्हणाली. तशी सुजाता नखशिखांत शहारली. नवराही थबकला. पण ऐकले न ऐकल्या सारखे करून बाहेर पडला. बाईकला किक मारून पोरीला आवाज दिला, “रोहिणी, चल लवकर. मलाही शाळेला उशीर होतोय.”
सुजाताने पोळीभाजीचा डबा लेकीच्या दप्तरात भरला आणि मायेने चेहऱ्यावरून हात फिरवला. अलाबला घेतली. सासूचे लक्ष होतेच. “काळजी घे गो पोरीची! नाहीतर आहेच वळणाचं पाणी!” सरसरून कांटा आला सुजाताच्या अंगावर! सासूकडे पाठ फिरवून पटकन न्हाणीघरात शिरली. कडकडीत गरम पाण्याचा तांब्या डोक्यावर घातला. नसा नसा मोकळ्या झाल्या! पण मन पुन्हा भूतकाळात शिरू लागले.
सुजाताचे नुकतेच दहावीचे वर्ष सुरू झाले होते. यंदा चांगल्या मार्कांनी पास होऊन दाखवायचेच या जिद्दीने सुजाता शाळेत जाऊ लागली. तशी ती अभ्यासात फारशी चांगली नव्हतीच कधी. पण स्पोर्ट्स मध्ये मात्र कायम अग्रेसर असायची. दिसायला फार देखणी नसली तरी उफाड्याची होती. चार जणांचे लक्ष वेधून घेणारी होती. खेळामुळे अभ्यासाकडे थोडे दुर्लक्षच होत होते. अशातच शाळेने दहावीसाठी जास्तीचे अभ्यासवर्ग सुरू केले. मुले शाळेतून घरी येऊन जेवून पुन्हा शाळेत जाऊ लागली. त्यातच सुजाताही होती.
सहामाहीला मार्क कमी पडल्यामुळे इतिहासाच्या जाधव मास्तरांनी सुजाताला घरी शिकवणीसाठी यायला सांगितले. खरे तर तिला सर्वच विषयात मार्क्स अगदीच कमी होते. पण जाधव सरांनी दिलेल्या खास वागणुकीने ती मोहरली. सगळ्या वर्गात फक्त आपल्यालाच स्पेश्यल शिकवणी! नक्कीच आपण कुणीतरी खास आहोत. मैत्रिणींमध्येही भाव वधारला. सगळ्या, “काय मंग सूज्जा, इतिहासात पहिली येणार! नवा इतिहास घडणार! मज्जाच मज्जा!” म्हणून चिडवत असत.
जाधव सर तरुण होते पण दिसायला हॅंडसम तर मुळीच नव्हते. वर्णही काळा सावळाच. बेताची ऊंची आणि बेताचीच अंगकाठी! एकूण अनाकर्षकच! पण नवीनच घेतलेल्या यामाहा वरून फिरायचे. त्यातून फारच लाघवी आणि मधाळ बोलायचे. सुजाताशी तर खासच! आठवड्यातून दोनदा होती शिकवणी. परंतु हळू हळू सुजाता रोजच शिकवणीला जाऊ लागली…सुजाच्या वागणुकीतला बदल आजीने बरोब्बर हेरला. “एव्हढा काय मोठ्ठा इतिहास शिकून राहिली गं तू!” आजी विचारत होती. ती पुन्हा पुन्हा सुनेला म्हणू लागली,” बघ बाई, शेत नीट राख! नाहीतर वळणाचं पाणी वळणावरच जाईल.” सुजाता फणकाऱ्याने आजीला विचारायची, “काय सारखं वळणाचं पाणी.. वळणाचं पाणी म्हणत असतीस गं! वळणाचं पाणी म्हणजे असते काय सांग तरी एकदा..!” आई मूग गिळून गप्प बसायची. आजी मानेला झटका देऊन कामाला लागायची. सुजाता उदास मनाने शिकवणीला जायची.
सरांच्या घरी मात्र वातावरण एकदम बदलून जायचे. सरांचे घर गावाबाहेर वाडीत होते. छान प्रशस्त होते. घरात माणसेही अगदी कमी. फक्त सरांची म्हातारी आई आणि एक धाकटा भाऊ. तो ही बऱ्याचदा घरात नसायचा. कॉलेजात जातो म्हणायचा आणि आई सतत वाडीत..
एव्हढा सुंदर, प्रशस्त बंगला… सरांचे बाइक वरुन हिरोसारखे फिरणे. आणि हा एकांत….सुजाताच्या मनावर हळू हळू गारुड फिरू लागले. पुढे पुढे सुजाता शाळेतून परस्परच त्यांच्या बाइक वरुन घरी शिकवणीला जाऊ लागली. मैत्रिणी हेवा करू लागल्या तशी सुजातालाही आसमान ठेंगणे वाटू लागले. सरांबरोबरचा एकांत हवा हवासा वाटू लागला. सुजाताच्या फेऱ्या अधिकच वाढू लागल्या तशी सर आणि सुजाताची जवळीकही वाढू लागली.
सुजातावर चढलेली मोहिनी मैत्रिणींना कळायला वेळ लागला नाही. त्यांनी तिला सावध करायचा पुरेपूर प्रयत्न केला. पण आता सुजाता सरांच्या पूर्णपणे कह्यात शिरली होती. आणि ती चांगले वाईट, भला बुरा विचार करायच्या पलिकडे गेली होती. एके दिवशी मात्र सुजाता भानावर आली. “काय गो सुजे, महिना कधीचा झाला, अजून पाळी कशी नाय आली”? आजीच्या या प्रश्नाने सुजाता हेलपाटली. खरेच आपल्या लक्षात कसे नाही आले! “अभ्यासाचे टेंशन असेल गं आज्जे”, एव्हढे म्हणून तीने वेळ मारून नेली आणि धावतच शाळा गाठली. दहावीच्या प्रिलिम्स सुरू झाल्या होत्या. जाधव सर फारच गडबडीत होते. सुजाताला पाहून नंतर भेटू अशी खूण करून वर्गावर गेले. आज सुजाताचे कशातच लक्ष नव्हते. कधी एकदा शाळा सुटते आणि सर भेटतात असे झाले होते. खूपच घाबरली होती ती. सर्वप्रथम सरांच्या कानावर घालू. ते मोठे आहेत. शिक्षणाने आणि अनुभवाने सुद्धा. आणि प्रेमळही किती आहेत. तेच समजावतील आपल्याला पुढे काय आणि कसे ते! सरांवरच्या विश्वासाने सुजाता सावरली. शाळा सुटल्यावर नेहमी प्रमाणे सरांबरोबर त्यांच्या घरी गेली. सरांच्या खोलीत गेल्यावर सर्वप्रथम सरांनी मिठीत घेतले. हळुवार मायेने आणि प्रेमाने पाठीवरून हात फिरवू लागले तसे सुजाताला रडू कोसळले. सरांनी हनुवटी वर करून कारण विचारले तशी सुजाता मुसमुसत सरांच्या कुशीत शिरली आणि आपली पाळी नाही आली अजून या महिन्याची असे सांगितले. सर झटकन दूर झाले. थोडा वेळ बावरले. मात्र ‘या वयात पी. सी. ओ. डी. नाहीतर पी. सी. ओ. एस. मुळे अनेकदा पिरियडस इररेग्युलर होतात’ असे उगाचच विज्ञानाच्या भाषेत सांगून सारवासारव केली. मोठे मोठे शब्द ऐकून सुजाताची खात्रीच पटली. एव्हढे शिकलेले आपले सर सांगताहेत म्हणजे तसेच असेल म्हणून निश्चिंत झाली.
यापुढे सरांचे वागणे मात्र बदलले. सर तिला टाळू लागले. इतर विषयांच्या अभ्यासातही लक्ष दे म्हणत मार्ग बदलू लागले. सुजाता मैत्रिणींबरोबरच घरी येऊ लागली. तोवर प्रिलिम्स आटोपल्या. आता बोर्डाची परीक्षा होई पर्यन्त शाळेला सुट्टीच होती. सर्व अभ्यासक्रम शिकवून झाला होता. मुलांनी फक्त भरपूर पेपर्स सोडवून सराव करणे अपेक्षित होते. पण सुजाताच्या आयुष्यात वेगळाच पेपर येऊन पडला होता. दोन महीने उलटले तरी पाळी येईचना. आजीची नजर सतत तिला निरखत होती आणि सुजाता कासावीस होत होती. अखेर मैत्रिणीच्याच सल्ल्याने सुजाताने आजीला पाळी आल्याचे खोटेच सांगितले. नेहमी प्रमाणे तीने पाळीची कापडंही उगाचंच धुऊन वाळत घातली. आजीचा जीव शांत झाला. आता अजाण सुजातालाही सुटका झाल्यासारखे वाटले. तोवर बोर्ड परिक्षाही आटोपली सुजाताही निश्चिंत होती. दर महिन्याला खोटेच पाळी आली सांगायची आणि कापडं धुवायची. शाळा संपली त्यामुळे जाधव सरांचे भेटणेही पूर्णपणे थांबले होते. तसेही ते तिला टाळतच होते. गावात येता जाता समोर समोर भेट झाली तर ओळखही दाखवत नव्हते. त्याचेही निरागस सुजाताला काहीच वाटले नाही. कारण तिचेही त्यांच्यावर प्रेम असे नव्हतेच. प्रेमभावना समजण्या एव्हढी ती सुजाण नव्हतीच. फक्त निसर्गाच्या भावनेला मात्र तीने ‘ओ’ दिली आणि तीच तिच्या सर्वनाशाला कारण ठरली.
दहावीचा रिझल्ट येई पर्यन्त सुजाताचे पोट बरेच मोठे दिसू लागले. आजीच्या पारखी नजरेला ते बरोब्बर समजले. आई आणि आजीच्या प्रश्नांना सुजाता टाळू लागली. पाचवा महिना लागला होता. पोट झाकताही येईना. झाकून तरी किती झाकणार? त्यातच तिला पोटात काहीतरी हालतेय असे जाणवू लागले. गावातल्या अनुभवी मैत्रिणींनी ताबडतोब जिल्ह्यातल्या मोठ्या डॉक्टरांकडे जायला सांगितले. आता मात्र तिचा नाईलाज झाला. तीने हळूच आधी आईला सांगितले, “पोटात जड जड लागतेय.” पोरीला ट्यूमर झाले कि काय म्हणून आईच्या पोटात गोळा आला. आता नक्कीच ऑपरेशन करावे लागेल, खर्चाची हातमिळवणी कशी करायची या चिंतेत दर महिन्याला पोरीला पाळी तर येतेय म्हणजे ट्यूमरच असेल या खात्रीने आईने बाबांना सांगितले. दोघेही पोरीला घेऊन जिल्ह्यातल्या डॉक्टर कडे गेले. तपासणी करताच कळाले पोरी गरोदर आहे. घात झाला. आई ऊर बडवून घेऊ लागली. बाप कपाळावर हात मारून आकांत करू लागला. “पोरी, काय करून बसलीस!” म्हणून रडू लागला. आता मात्र सुजाताचा धीर खचला. आईने “कोण” एव्हढे विचारताच सुजाताने पटकन सांगून टाकले, “जाधव सर”.
आई बाबांनी आकांत मांडला. मान खाली घालून जाधव मास्तरच्या घरी गेले. सुजाताला पदरात घ्या म्हणून विनवू लागले. तशी जाधव मास्तरांची म्हातारी तडतडू लागली. नासलेली पोरी मी सून म्हणून खपवून घेणार नाही म्हणून कडाडली. हे पाप माझ्या पोराच्या गळ्यात का? तीने अजून कुठे कुठे तोंड काळे केले नसेल कशावरून? म्हणून हाकलून दिले. प्रेमळ, लाघवी, विश्वासू अशी जाधव सरांची मूर्ती आता बदलली. आणि त्यांनीही “तो मी नव्हेच” चा पवित्रा घेतला. आता मात्र सुजाताचे आणि आई बाबांचे ही तोंडचे पाणी पळाले.
रडत तिघेही घरी आले. कपाळ बडवून घेऊ लागले. नशिबाला दोष देऊ लागले. आजीच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. “अखेर वळणाचे पाणी वळणावरच गेले.”
अख्ख्या गावात कळाले ‘जाधव मास्तरने पोरी नासवली.’ सुजाताच्या भावकितलेही गोळा झाले. तोवर दहावीचा रिझल्ट लागला. सुजाता नापास झाली होती. निसर्गाच्या परीक्षेत पास झालेली सुजाता शालान्त परीक्षेत मात्र नापास झाली होती. गरोदर असल्यामूळे तिला मारणे, फटकावणेही अशक्य होते. मास्तरला मनवण्याचा प्रयत्न सुरू झाला. पण मास्तर ठाम राहिला. हे मूल माझे नाहीच. मी का या दहावी नापास मुलीशी लग्न करू म्हणून अडून राहिला. शेवटी सर्वानुमते निर्णय घेतला. मुल पाडायचे. पण डॉक्टरांनी मना केले. वीस आठवडे उलटून गेले आहेत. आता अबॉरशन करता येणार नाही. कायद्याने गुन्हा आहे म्हणू लागले. म्हणजे मुल वाढवणे क्रमप्राप्तच आहे. बाळाचा पिता कन्फर्म करण्यासाठी डी.एन.ए. टेस्टचा पर्याय आहे पण तो खर्चीक आहे, असेही सांगितले. आता मात्र भावकी चिडली. गावकऱ्यांनीही साथ दिली. पोरीशी लग्न कर नाहीतर घरावर मोर्चा आणू म्हणून मास्तराला धमकावले. शाळेनेही दबाव आणला. पोलिस केस तर होईलच पण नोकरीही जाईल या भीतीने मग मात्र जाधव मास्तरने मान तुकवली. सुजाताशी लग्न केले. सतराव्या वर्षीच अल्लड गरोदर सुजाता जाधव मास्तरच्या घरचे माप ओलांडली. संसार म्हणजे काय कळायच्या आधीच नावडती बायको, नावडती सून हेच नशीब म्हणून आयुष्यभर कपाळावर मिरवत राहिली. तसेही मास्तर काही देखणा नव्हताच. पण शिकलेला आणि शाळेची नोकरी म्हणून अपेक्षा जास्तीच्या होत्या. महामूर्ख मुलगी म्हणून बायकोला हिणवत राहिला. सासू म्हणवणारी मास्तरांची म्हातारी सुद्धा ही काय बदनाम धोंड गळ्यात पाडून घेतली म्हणून रोज करवादायची.
यथावकाश सुजाताला पोरगा झाला. परिस्थिती थोडी निवळली. झालेल्या प्रकरणामुळे उडालेला धुरळा हळूहळू खाली बसला. गावातले जीवन पूर्वपदावर येऊ लागले. सुजाला दुसरी मुलगी झाली. बाळंतपणासाठी माहेरी आलेली सुजाता थोडी सुखावली होती. या वेळी निश्चिंत मनाने माहेरपण अनुभवत होती. त्यातच खाष्ट सासू नाईलाजास्तव का होईना बाळंतविडा घेऊन आली. नुकतेच जेवण आटोपून मंडळी सैलावली. सासूचे आणि आजीचे माहेरचे नाते एकच निघाले म्हणता दोघींच्या गप्पा फारच रंगल्या. अचानक आजीच्या तोंडून निघालेच, “बयो जप गं, नाहीतर हे ही वळणाचे पाणी वळणावरच जायचे.” आता मात्र सुजाताने कान टवकारले. म्हातारी सासू सुद्धा थट्टेचा आव आणून खोदून खोदून विचारू लागली. तसे आजीने सुनेकडे पाहून म्हटले, “जा गो चाय कर उलीसा. घसा सुकलाय आमचा.” सुजाताची आई स्वयंपाक खोलीत वळताच म्हातारी उचकटलीच, ”अगो, काय सांगू छबू तुला! ही माजी सून पण लग्नाआधीच गरुदर राहिली व्हती.” हे ऐकून सुजाताच्या सासूने लाडू तोंडात घालायला केलेला ‘आsss’ तसाच राहिला. घशात अडकलेला घास पाण्याच्या घोटाबरोबर गिळून विचारले, “म्हणजे?” तशी रंगात आलेल्या म्हातारीने स्टोरी सांगायला सुरुवात केली.
माज्या पोराचे हिच्या आईबरोबर लगीन तर जमलं, साखरपुडाही झाला पण लग्नाला काही मुहूर्त मिळंना. काहीना काही विघ्न येतंच राहिली. कधी सूतक तर कधी सुयेर, कधी आजारपण तर कधी आणि काय! लगीन लांबतच हुतं. दोघंबी घायकुतीला आली. रोज कुठं न कुठं भेटायचे. आणि शेवटी व्हायला नको तेच झालं. माजी सूनबाय राहिली नं गरुदर! पण तवा आम्ही कुणालाच काय बोललो नाय! गपचिप लग्न उरकले. नि आठव्या महिन्यातच या सुजाचा जन्म झाला.” ही स्टोरी ऐकून जाधव मास्तरांची म्हातारी मात्र जामंच उखडली. बाहेरून तसे न दाखवता मनातून सुजाताच्या अख्ख्या कुटुंबाला शिव्या घालतच घरी परतली. आतातर आधीच नावडती सून अजूनच नावडती झाली. एव्हढे दिवस फक्त सुजाताला बोल लावणारी सासू आता तिच्या आई बापाचाही उद्धार करू लागली. सुजाताला कळेचना यात आईचा काय दोष! असलाच तर तो बाबांचा असायला हवा! आपणही अशीच सरांपुढे शरणागती पत्करली होतीच. बिच्चारी आपली आई! लग्न जमवून केलेले असूनही आयुष्यभर अवहेलनाच सहन केली. निदान बाबा समजूतदार तरी होते. स्वत:ची चूक मान्य करून नेटाने संसार केला. आपले नशीब मात्र त्याही बाबतीत फुटकेच. नवऱ्याला स्वत:ची चूक मान्यच नाही! मीच कशी मूर्ख आहे, काळजी घेतली नाही म्हणून मलाच ओरडतात. मला काय माहिती तेव्हा काय काळजी घ्यायची आणि काय नाही ते! खरे तर सर आपल्या शरीराबरोबर काय करताहेत तेच कळले नव्हते तेव्हा! जे करताहेत ते आवडत नव्हते पण अडवतही नव्हते! काय चालले आहे समजतही नव्हते त्या वयात! पण बोलणार कुणाला! आणि एव्हढे होऊन पुन्हा चूक माझीच! वळणाचं पाणी मीच..!
अरे देवा! वळणाचं पाणी आठवल्यावर बादलीतल्या पाण्याचा थंडगार स्पर्श सुजाताला अजूनच जाणवला. विचारांच्या नादात पाणी अगदीच निवले वाटतं! असू दे! असेच गार बरे वाटतेय! हे थंड गार पाणी असेच अंगावर घेत रहावेसे वाटतेय. शरीराबरोबरच मनाचीही काहिली शांत होतेय! नाही नाही.. पण आता मात्र आटोपले पाहिजे लवकर. पोरीवर खरेच लक्ष ठेवले पाहिजे. आईचे प्राक्तन तेच आपले प्राक्तन झाले. आता पोरीचे प्राक्तन तरी बदलायला हवे. दुसऱ्या कोणाच्या चुकीची शिक्षा माझ्या पोरीने नाही भोगायची. आईने भोगली. मी ही भोगली. पण रोहिणी!!! नको रे देवा!!! पण काय करता येईल त्यासाठी??? आपल्या वेळेस शाळेत ‘से*क्स एज्युकेशन’ असे काहीसे बोलत होते. आतापर्यन्त सुरू झाले असेल का ते? बोलावे का शाळेतल्या बाईंशी?? बोलायलाच हवे. फारच गरज आहे या शिक्षणाची. आपली मैत्रीण चित्रा! ती ही कुठल्याशा शाळेत टीचर आहे. तिलाच भेटायचे का?? कि नकोच! आपणच बोलावे आपल्या पोरीशी!! नक्कीच! आपणच व्हावे आपल्या पोरीची खास मैत्रीण. मीच समजावेन तिला सारे काही!
मनाशी ठाम निर्णय घेऊनच सुजाता न्हाणीघरातून ताजीतवानी होऊन बाहेर आली. आता मनावरचे मळभ नाहीसे झाले होते. भिंतीवरचा आरसा सुद्धा लख्ख दिसत होता..!
धन्यवाद!
तुम्हाला माझी कथा कशी वाटली? मला कमेन्ट करून जरूर कळवा. अशाच नवनवीन कथा वाचनासाठी आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या. आपल्या मैत्र परिवारासोबत शेयर करायला विसरू नका.
लेखिका – जिज्ञासा म्हात्रे,मुंबई
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे आहेत. लेखिकेने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखिकेच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
मस्त👌👌
धन्यवाद!
Khup chan 👌🏻👌🏻
छान
धन्यवाद!
सुंदर कथा 👌
धन्यवाद!
खूप छान 👌👌
धन्यवाद!
मार्मिक लेखन.
धन्यवाद!
सुंदर कथा.
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?