नुकतीच परीक्षा संपून शाळांना सुट्टी आहे तेव्हा या मुलांच्या उन्हाळी सुट्टीचा सदुपयोग कसा कराल? आपली मुलं ही फक्त पुस्तकात रममाण होणारी नसावीत,तर ती मनातून समाधानी,शांत,समृद्ध व मूल्य जपणारी असावीत.यासाठी पालकांनी विशेष प्रयत्न करायला हवे.मुलांची उत्तमरीत्या जडण घडण करताना उपयुक्त गोष्टी ठरलेल्या साच्याप्रमाणे न करता नवीन पद्धतीने कशा करता येतील ते आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

•हसत खेळत व्यायाम
मुलांकडून व्यायाम करून घेताना, तसेच व्यायामाची गोडी लागावी याकरिता व्यायामामध्ये विविधता असेल तर काम सोपे होते. मुलांना व्यायाम करताना गंमत वाटेल असे काहीतरी केले पाहिजे. व्यायाम करताना पुढच्या स्टेप मध्ये जाण्यासाठी आपण आकड्यांचा वापर करतो अशा वेळेस आकड्यांचा वापर न करता” सा रे ग म प ध नि सा” या संगीताच्या तालावर व्यायाम केल्यास ऐकायला बरे वाटते आणि मुलांना मजा ही येऊ शकते. संगीताच्या ताल-लयानुसार व्यायामाच्या हालचाली ही सहज होऊ शकतात.
अगदी लहान मुलं व्यायाम करताना लक्ष देत नाहीत तेव्हा लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांच्यासोबत सहभागी असणाऱ्या इतर मुलांची नावे घेऊन व्यायाम केल्यास आपलं नाव कधी येते याची मुलं वाट बघतील आणि त्यांचे व्यायामामध्ये लक्ष लागेल. तसेच यामध्ये दुसरा एक प्रकार म्हणजे आठवड्याचे वार व महिन्यांची नावे बोलून व्यायाम केल्याने मुलांकडून सहजरीत्या तोंडपाठ होतील.
•खेळातून परिसर व निसर्गाची ओळख
खेळ हा वेगवेगळ्या गुणांना आवाहन करणारा प्रांत आहे.
त्यामुळे खेळामधली विविधता आवश्यक आहे. मोठ्या वयोगटांमध्ये प्रश्न उत्तरांचे खेळ खेळून वर्तमानपत्रातल्या बातम्या किंवा सामान्य ज्ञान यावर भर देता येऊ शकते. मुलांना परिसर,आजूबाजूची विविध झाडे, वेली, प्राणी,पक्षी, ऋतूनुसार पर्यावरणात घडून येणारा बदल यांची ओळख होते.
निसर्गाची ओळख करून घेताना पक्ष्यांचे आवाज ऐकणे, झाडावरील पक्ष्यांची घरटी,त्यांची पिल्ले,प्राणी,कीटक तसेच फुलांचे गंध ओळखणे, आकाशाच्या पडद्यावर रंगांचे निरीक्षण करणे, झाडावर भरभर चढणे, डोंगर ,नदी, धबधबे, जंगल या अशा जगतामध्ये अनेक आश्चर्यांशी मुलांची ओळख होते.अशाप्रकारे निसर्गाच्या सानिध्यात मनसोक्त आनंद घेतल्यामुळे मुलांच्या मनात निसर्गाबद्दल प्रेम निर्माण होते. यामुळे निसर्गप्रेम व पर्यावरणातल्या प्रश्नांची समज मुलांना यायला मदत होते.
•शैक्षणिक सहलीचे आयोजन
सहल म्हटले की मुलं फार खुश असतात. अशा वेळेस ऐतिहासिक ठिकाण,प्राणीसंग्रहालय,वस्तूसंग्रहालय,सामाजिक संस्था, बागा,गड, टेकड्या, कारखानेभेटी इत्यादी ठिकाणी सहलीचे आयोजन करून मुलांना शैक्षणिक माहिती देता येते. कारखान्यांना भेट देऊन आपण वापरतो त्या वस्तू कशा तयार होतात,ते पाहायला मिळते आणि उद्योगाचे महत्त्व ही समजते. सहलीमध्ये तुम्ही करमणुकीचे कार्यक्रम सादर करू शकता त्यामुळे मुलांच्या कलागुणांना वाव देखील मिळतो. त्याचबरोबर सहल पार पडली की, सहलीमध्ये काय काय पाहिले याची नोंद करून ठेवायची.त्यामुळे मुलांच्या हातून लेखन होईल.
जवळच्याच ठिकाणी पायी (चालत) सहलीचे आयोजन केल्यास रस्त्यानं कसं चालायचं? वाहनांकडे लक्ष कसं ठेवायचं? रस्ते कसे ओलांडायचे ?अमुक रस्त्याला हे नाव कसं पडलं? वाटेत लागणाऱ्या शाळा, देऊळ, दवाखाना, सामाजिक संस्था यांचे कार्य कसे चालते?असं जाता जाता असंख्य विषयांबद्दल माहिती मुलांना मिळते.
•चित्रकला व हस्तकलेचा आनंद
चित्रकला आणि हस्तकला मुलांच्या हातात वर्षभर खेळत असतात.चित्रकलेसाठी चित्र कागदावरच काढली पाहिजेत असं नाही . कधी फरशीवर,भिंतीवर,मैदानावर कुठेही चित्र काढता येतात.अलीकडे चेहरे सुद्धा रंगवले जातात. आजूबाजूच्या परिसरातील खराब झालेल्या भिंतीवर विविध नक्षी,प्राणी, पक्षी, झाडे रेखाटून ती छान रंगवून भिंती पुन्हा एकदा नव्याने नटून उभ्या राहतील. यामुळे मुलांना आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत किंवा सामाजिक कार्य इत्यादीचे मनात बीज पेरले जाईल.
हस्तकलेच्या माध्यमातून मुलांमधील कलेला वाव मिळतो. सणानिमित्त किंवा शुभेच्छा देण्यासाठी बनवले जाणारे ग्रीटिंग्ज कार्ड, दिवाळीत किल्ले कसे तयार करायचे, पणत्या रंगवणे, रांगोळ्या काढणे, आकाश कंदील तयार करणे, राख्या बनवणे,गणपतीत स्वतः मातीचा गणपती तयार करणे, सजावट करणे यातून मुलांना आनंद मिळतो आणि त्यांच्यातील सर्जनशीलता व कल्पकतेचाही विकास होतो.
हस्तकला म्हणजे सुंदर शोभेच्या वस्तू तयार करणं असं नाही. कुंड्या भरणं, रोपे लावणं, भाज्या निवडणे,स्वयंपाक करणे ही हस्तकलाच आहे. याशिवाय घरात बेसिन साफ करता येणं, पुस्तकांचं कपाट आवरता येणं, कपडे धुणं, भांडी घासणे, ओटा स्वच्छ करणे ही पण एक हस्तकलाच आहे. घरातील अशा छोट्या छोट्या कामांमुळे मुलांना जबाबदारी कळते,तसेच शारीरिक कष्टाची ही सवय लागते.
•शिबिरातून शिक्षण
उन्हाळी सुट्टी सुरू झाली की पालक उन्हाळी शिबिरांचा शोध घेऊ लागतात. मुलांची आवड व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल तसेच त्यांचा व्यक्तिमत्व विकास करता येईल अशी शिबिरे मिळाली की पालक ही खुश असतात. साधारणतः स्वयंपाक शिबिराचे आयोजन केल्यास मुलांना स्वावलंबी होण्यास मदत होते. यामध्ये मुलांना सरबत,लस्सी,सॅंडविच,भेळ,कोशिंबीर, पोळीचा लाडू असे अनेक पदार्थ करता येतात.
मुलांच्या आजच्या जगण्यातून सर्व प्रक्रिया त्यांना नाकारल्या जातात. दूध कुठून येतं, धान्य कसं निर्माण होतं याच्याशी त्यांचा काहीच संबंध नसतो. त्या प्रक्रियांशी त्यांचं नातं जोडण्याची गरज आहे. शेतात भाज्या, धान्य यांचे पिक घेण्याची प्रक्रिया कशी असते? ही माहिती या उपक्रमांद्वारे मिळाल्यास एखादा पदार्थ निर्माण होण्यामागचे कष्ट मुलांना समजतात आणि त्याची किंमत ही त्यांना कळते.
मुलांसाठी काहीतरी नवा अनुभव निर्माण करणं ही फार आनंदाची गोष्ट असते.फार खर्च न करता या गोष्टी कल्पकतेने करता येतात. ज्या गोष्टीत मुलांना आनंद मिळतो त्या गोष्टी पालकांनी मुलांना नक्कीच करू द्याव्या.
वरील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा. तसेच आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशीच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’या वेबसाईटला नक्की भेट द्या तसेच व्हाट्सअप ग्रुप ही जॉईन करा.
धन्यवाद!
आकांक्षा निरळकर,मुंबई
Very good information
Very informative for this vacation 👍👌
Very nice for this vacation 👍👌
, खूप छान आहे माहिती
Very useful information for vacayion