बोरन्हाण म्हणजे काय? ते का करतात? कसे करावे?
संक्रांतीचे महत्व
आपला भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे त्यात धर्माचे लोक राहतात. आणि बरेच सण व उत्सव साजरे केले जातात. त्यात एकूण 28 राज्य आहेत ते 28 राज्याचं स्वतःचं वेगळं अस्तित्व ,महत्व आहे. अनेक धर्म त्यांचे धार्मिक सण साजरे करतात त्यातलीच एक म्हणजे मकर संक्रांत. बोरन्हाण हा मकर संक्रांतीचा एक भाग आहे.
आता अनेकांना प्रश्न पडतो की आपण मुलांचं बोरन्हाण का करतो? बोरन्हाण काय असतं? तर चला शोधूया यांची उत्तरे
नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि हा सूर्य संक्रमणाचा काळ. या दिवशी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो आणि त्याचे उत्तरायणाचा प्रारंभ होतो या कालावधीत लोकांना अधिक प्रकाश आणि उष्णता मिळत असते. वर्षभरात सूर्याचे बारा राशीतून चार संक्रमणे होता पण जानेवारीत होणारे संक्रमण यामुळे मकर संक्रांतीला अधिक महत्त्व प्राप्त झालेली आहे यंदा हि मकर संक्रांत 14 जानेवारीला नसून 15 जानेवारी ला आलेली आहे कारणही तसंच आहे 2024 लीप वर्ष आहे. या सणाला लोक एकमेकांना भेटून तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं बोलून शुभेच्छा देतात काळे कपड्यांना जास्त महत्व दिलं जातं. बायकांचा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम असतो. आणि लहान थोरांचा पतंग उडवण्याचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो. नवविवाहित जोडप्याचा तीळ -व्याचा सण असतो आणि बालमंडळी चे असते ते बोरन्हाण . काही ठिकाणी याला बोर लूट असेही म्हणतात. बोरन्हाण ही परंपरा महाराष्ट्रा त जास्त प्रचलित आहे. आज आपल्या सगळ्यांना उत्सुकता लागली आहे ती म्हणजे या परंपरेचे शास्त्रीय कारण जाणून घेण्याची….
बोरन्हाण म्हणजे काय?
नवजात मूल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला लहान मुलांना बोरन्हाण घातले जाते. तसं हा एक उत्तमच शिशु संस्कार मानला जातो लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि भरभराटी साठी बोरन्हाण घालण्याची पद्धत आहे. शास्त्रीय पद्धतीनुसार समजवायचे झाले तर या काळात वातावरणात अनेक बदल होत असताना लहान मुलांना होणाऱ्या हंगामी व्याधी पासून त्यांचे संरक्षण व्हावे. बदलत्या ऋतूची बाधा त्यांना होऊ नये म्हणून हा एक बोरन्हाण सोहळा असतो आनंदाचा .मुलं अगदी फुलाप्रमाणे सजवतात, नटवतात. हलव्याच्या दागिन्यांनी त्यांना सजवले जाते आणि क्षणिक सुखाचा आनंद मिळतो. त्यांचा औक्षवंन करून त्यांच्या डोक्यावरून बोर, ऊस, हरभरे बत्तासे, हलवा, तिळाच्या वड्या, चॉकलेट, बिस्किट असे सगळे पदार्थ टाकले जातात आजूबाजूला बसलेली असतात ती म्हणजे बालक मंडळी खूप मज्जा असते यांची. तो क्षणिक सुखाचाआनंद बच्चे कंपनी मनमुराद लुटतात त्यालाच म्हणतात बोर स्नान. तथ्य तर हे आहे की लहान मुलांना बोरन्हाण घातल्याने त्यांची परंपरेची आणि संस्कृती शी नाळ बांधली जाते.
बोरन्हानाची आख्यायिका?
मकर संक्रांतीचे महाराष्ट्रात एक वेगळेच महत्व आहे. संक्रांति बाबतही एक आख्यायिका सांगितली जाते ती म्हणजे फार वर्षापूर्वी एक शंकरा सुर नावाचा राक्षस होता. गावातील लोकांना फार त्रास देत असे. त्याला ठार मारण्यासाठी देवीने संक्रांती चे रूप घेतले आणि त्याला ठार केले लोकांना त्याच्या जाचापासून मुक्ती मिळाली.लहान मुल हे एक कृष्णाचे रूप मानलं जातं. अध्यात्मिक कथेत वाचनात असं आलं आहे की या राक्षसाची वाईट दृष्टी कृष्णावर पडू नये म्हणून हा विधी सर्वप्रथम गोपाळ कृष्णावर करण्यात आला होता. वाईट दृष्टी , वाईटविचार यांच्यापासून लहान मुलांचे संरक्षण व्हावे या हेतूने बोरन्हाण करण्याची परंपरा सुरू झाली.
बोरन्हाण करण्यामागील शास्त्रीय कारण?
शास्त्रीय कारण असं की मकर संक्रांत ही ऋतू बदलाची चाहूल आहे. बदलत्या ऋतूचा परिणाम बाळावर होऊ नये आणि या ऋतू मधील फळे त्यांना चाखायला मिळावीत हा महत्त्वाचा उद्देश या परंपरेचा असून बोरन्हाण च्या मस्ती आणि आनंदामध्ये न चाखणारे फळे ही मुले आवडीने खातात.
कसं आणि किती वर्षाच्या मुलांचे करावे बोरन्हाण ?
संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे करी दिनापासून ते रथ सप्तमी पर्यंत हा सोहळा आपण संपन्न करू शकतो यावर्षी तर जवळपास महिनाभराचा काळ मिळतो बोर स्नान घालण्यासाठी ते म्हणजे 16 जानेवारी ते 16 फेब्रुवारी 2024 यात आपण अगदी चिमुकल्या पासून ते पाच वर्षाच्या मुलांना बोर स्नान घालू शकतो तेही मोठ्या थाटामाटात. बाजारपेठा आणि चिमुकल्याच्या मातोश्री अगदी सज्ज असतात त्यांना नटवून सजवून तयार करण्यासाठी या सणाची आतुरतेने त्या वाट बघतात.
कसं घालायचं बोरन्हाण ?
” बोरन्हाणम्हणजे वर्षाव प्रेमाचा, वर्षाव आनंदाचा, वर्षाव सुबत्तेचा” याप्रमाणे आपल्या घरातील महत्त्वाचा कोपरा ज्या ठिकाणी आपण बोरन्हाण घालू यात ती जागा स्वच्छ करून गालीचा त्यावर अंथरून त्यावर चौरंग ठेवून किंवा पाठ ठेवून रांगोळी रेखाटावी. बाळाला स्वच्छ काळे कपडे परिधान करून हलव्याच्या दागिन्यांनी सजवावे. आणि त्या चौरंगावर बसवावे. लहान मुलाला अथवा मुलीला पाटावर बसवून आप्तेष्ट कडून त्याला ओवाळावे. मग बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून मिळणारे फळे उदाहरणार्थ उसाचे तुकडे, बोर ,भुईमुगाच्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगा, ओले हरभरे तसेच मुरमुरे, लाह्या ,चॉकलेट, बिस्कीट, तिळाच्या वड्या हे सगळे पदार्थ एकत्र करून मुलांच्या डोक्यावरून टाकले जातात. उपस्थित मुलांना ते लुटण्यास सांगतात. इतर वेळेस मुलं ही फळ खात नाहीत म्हणून या निमित्ताने मुलांच्या पोटात हंगामी फळं जातात. आणि पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सुदृढ बनते असे शास्त्रीय कारण यामागे सांगितलेले आहे. शिवाय घरी आलेल्या सुवासिनींना हळदी कुंकू लावणे त्यांना वाण देणे तिळगुळ देऊन शुभेच्छा देणे आणि हा एक छोटेखानी सोहळाच ठरतो. एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे ती म्हणजे बोरन्हाण घालताना ते पदार्थ लहान मुलांच्या अंगाला लागू नये काळजी घ्यावी हल्ली छत्रीचा सुद्धा वापर करतात. आणि कामना करावी की माझं बाळ असंच कायम बाळ गोपाळात हसू बागडू दे,सर्वांचा लाडका होऊ दे आशीर्वाद मिळू देत…
परंपरा टिकवण्याची गरज का आहे?
बदलत्या जीवनशैलीत असणारा वेळेचा अभाव यामुळे हा सोहळा मोठा करणे शक्य होत नाही तरीही परंपरा टिकवणे ही आपली जबाबदारी आहे त्यामुळे आजकाल छोटेखानी सोहळा होऊ लागलाय. म्हणूनत्लोक एकमेकांच्या घरी जाऊन तो सण साजरा करतात. वर्षाच्या सुरुवातीला येणारा हा सण” तिळगुळ घ्या गोड गोड बोला” असं म्हणून संपूर्ण वर्षभर तीळाप्रमाणे थोडं थोडं का होईना गोडवा निर्माण करण्याचा आपुलकी निर्माण करण्याचा सलोखा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. आरोग्याच्या दृष्टीने “तिळगुळ “हे अत्यंत लाभदायक ठरतो आणि” वान “देण्याच्या दृष्टीने एक छोटस दान हीआपण दान करत असतो.
” तिळाचा तीळवा ,स्नेहाचा गोडवा,बोरन्हाना चा मनवा, नात्यांचा मेळावा करू साजरा या क्षणांचा गोडवा”
या ओळींप्रमाणे आपणही आपल्या आयुष्यात एक नवचैतन्य निर्माण करून तीळाप्रमाणे हळूहळू एक एक कण आनंदाने जगू या, आणि आपल्या आयुष्यात आनंदाचं वातावरण निर्माण करूया हा संदेश या संक्रांतीच्या निमित्ताने सगळ्यांना देऊया……. तर कसा वाटला माझा हा लेख नक्की सांगा, अशाच नवनवीन ,ट्रेंडिंग माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि ही माहिती आपल्या मित्र परीवारा सोबत शेअर करायला विसरू नका. नमस्कार!! (Makar Sankranti Bornhan 2024)
लेखिका :Shubhangi Chunarkar,Nagpur.