माझे काय चुकले? l Marathi Emotional Story for reading

WhatsApp Group Join Now

परदेशस्थ मुलीच्या आईच्या डायरीतील काही पाने  

५ ऑक्टोबर २००१

आज घरात आनंद नुसता ओसंडून वाहतोय.  दिवाळीला अजून अवकाश आहे.  पण आमच्याकडे आजच दिवाळी सुरू झालीय.  सायलीचा व्हिसा आला.  एव्हढे दिवसांची कसली वर्षांची मेहनत फळाला आली.  उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला चाललीय माझी पोरगी.  एव्हढेसे माझे पिल्लू कधी मोठे होऊन पंख पसरून उडायला शिकले समजलेच नाही.  आकाशात उंच उंच भरारी घेऊ दे तिला.  माझा मन भरून आशीर्वाद आहे. 

१६ नोव्हेंबर २००१

आज भाऊबीज. निमित्त साधून जवळचे दूरचे झाडून सगळे नातेवाईक कधी नव्हे ते स्वत:हून सायलीला भेटायला काय आले.  फोन काय केले.  ‘आम्हाला विसरू नकोस बरे!, म्हणून बजावून गेले.  सर्वांच्या डोळ्यांत आनंद कमी असुयाच जास्त दिसली.  आम्हां दोघांच्या चेहऱ्यावर मात्र आनंद ओसंडत होता.  याच लोकांनी २३ वर्षांपूर्वी मला मुलगी झाली म्हणून नाक मुरडले होते.  आणि आम्ही एकाच मुलीवर थांबायचा निर्णय घेतला तेव्हा तर डोळे वटारले होते.  सासूबाई तर नुसत्या घूश्श्यात होत्या.  पण आता पहा! सर्वांना अभिमानाने सांगताहेत, ’माझी लाडकी नात, माझे लाडकी नात!’

२३ जून २००४

सायली भारतात परतलीय.  आमच्या अख्ख्या घराण्यातून परदेशी उच्च शिक्षण घेऊन परतलेली ही पहिलीच मुलगी,  सगळे नातेवाईकांनी तिला आग्रहाने जेवायला बोलावले होते.  आणि तिच्या बरोबर आम्हालाही.  तिनेही आठवणीने सर्वांसाठी भरपूर चॉकलेट्स आणि चुलत, मामे, आत्ते भावंडांसाठी छोटी छोटी गिफ्ट्स आणलीत.  गोतावळा तरी किती मोठा आमचा! दोन्ही कडचे आजोबा आजी, एव्हढे सगळे काका, मामा, आत्या, तेव्हढीच कझिन भावंडे.  कुणा कुणाला काय काय म्हणून आणणार! छोटी गिफ्ट्स पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर थोडी नाराजीच दिसली.  पण मीच सायलीला समजावले.  काही लक्ष देऊ नकोस.  या लोकांच्या अपेक्षा काय कधीच पूर्ण होणाऱ्या नाहीत.  तू आपले आपले बघ!  तशी लहानपणापासून हुश्शार माझी सायली! काहीही सांगितले तरी बरोब्बर समजते मला काय म्हणायचे ते! आजीसाठी मात्र मोठ्ठा मेकअप् बॉक्स आणला होता.  मी नको म्हटले होते तरी.  तो बघून सासूबाई बोलल्याच, ”अगं, काय करायचाय हा मला? मी कुठे रंग फासून मिरवणार आहे आता?” त्यांनी बोलायचा अवकाश, मोठ्या जावेने लगेच उचलला आणि ‘असू देत, असू देत,’ म्हणून ठेवून घेतला.  सासूबाई सध्या त्यांच्याकडे राहतात ना! आता अजून तीन भाऊ आहेत यांना! सासरे गेल्यापासून तीन तीन महीने प्रत्येकाने वाटून घेतलेत.  धाकटी जाऊ चरफडली ते पाहिले मी! पण काणाडोळा केला.  तसेही तिला दोन्ही मुलगे म्हणून नेहमीच भाव खायची.  आता खा भाव किती खायचाय तो!

२५ मे २००७

सायलीने स्वत: आमच्यासाठी विमानाची तिकिटे काढलीत.  आम्ही चांगले सहा महीने अमेरिकेला जाणार राहायला.  कित्ती मज्जा!  अगदी कृतकृत्य झाल्यासारखे वाटतेय!  तसे तिच्या कॉनव्होकेशनला गेला होतो आम्ही. परंतु सासूबाई आजारी असल्याने वीस दिवसांत परतलो.  तेव्हा आम्ही आमच्याच पैशाने गेलो होतो.  पण आता मुलीने तिकिटे पाठवली! याचाच केव्हढा तरी अभिमान वाटतोय!  हे तर ज्याला त्याला सांगत सुटलेत! मुलगी मस्त सेटल झालीय तिकडे! 

१६ जून २००७ 

खरे तर या पुढचे अजून दोन महीने सासुबाईंना ठेवून घ्यायची आमची पाळी होती. पण आम्हाला अमेरिकेला जायचेय म्हटल्यावर धाकटीला गळ घातली. म्हटले, “ठेवून घे. नंतर आम्ही परत आल्यावर आमची पाळी पूर्ण करू.” हो ना करता तयार झाली बुवा एकदाची! मेकअप बॉक्स रेंगाळत असेल मनात अजून! पण जाऊ देत.  आमची तर सोय झाली. आम्ही उडणार आता भुर्रर्रर्रर्र..

९ नोव्हेंबर २००७

आज लक्ष्मीपूजन.  जीवाला नुसतीच हुरहूर लगलीय.  एव्हढी वर्षे दिवाळी म्हटली की उत्साह नुसता ओसंडून वाहायचा.  पंधरा दिवस आधीपासूनच फराळाची तयारी.  लाडू काय, करंज्या काय, चकल्या काय! इतकी वर्षे सायलीला पाठवायची म्हणून किलो किलोने बनवायचे.  आता आम्हीच अमेरिकेत येऊन बसलोय.  पण दिवाळीची मजा काही येत नाहीये.  रांगोळी नाही, आकाश कंदील नाही.  फटाके तर त्याहून नाही! टबात कसले अभ्यंगस्नान करायचे! म्हणून ते ही नाही.  अशी दिवाळी पहिलीच अनुभवली.  चार महीने होत आले अमेरिकेत येऊन.  पण अजून म्हणावे तसे काही रुळलोच नाही.  सायली गेली ऑफिसला कि घरी बोलायला आम्ही दोघेच.  बोलून तरी किती बोलणार?  सुरवातीला महिनाभर खूप फिरलो अमेरिका!   न्यूयॉर्क, सॅनफ्रॅन्सिस्को, लॉस एंजेलीस  शिकागो, मियामी, लासवेगास,  काही सोडले नाही.  सायलीने उत्साहाने फिरवले.  पण आता तिला तिचे ऑफिस.  बरे शेजार म्हणून नाहीच. त्यामुळे अघळ पघळ गप्पाही नाहीत.  मॉल मध्ये गेलो तर हे बोलतात तरी थोडेफार इंग्लिश!  माझे इथेही वांधेच!  मी पडली मराठी प्राथमिक शिक्षिका! इंग्रजीशी काय लढणार?  म्हणून गप्पच! एकदम चिडिचूप! खूप कंटाळा येतोय.  टी. व्ही. वरही सगळी इंग्लिश चॅनेल्स! हे बघत बसतात काही बाही अधून मधून,  मला तर बाई ठो कळत नाही.  नुसती चित्रे बघत बसते.  काय बाई ही अमेरिका! पुन्हा यायला नको इथे!  मुलांचे बरेय! ती शिकली इंग्रजीतून.  छान जम बसवतात स्वत:चा!  आमचे वांधेच होतात.

१२ सप्टेंबर २००८

आजच ऑस्ट्रेलिया वारीहून परतलोय.  नुसती धम्माल केली. परंतु थकवा कसा तो जाणवत नाहीय.  अजून तीन महिन्यांनी जपानला जाणार.   सायली म्हणते, “धडधाकट आहात तोवर सगळं जग फिरून घ्या.”  नक्कीच घेणार!  रिटायरमेंट नंतरचे हे  लाईफ मस्त एंजॉय करणार. वेगवेगळ्या ट्रीपा काय, गेट टुगेदर्स काय! आयुष्य नुसते मजेत चाललेय!

१४ मे २००९

आज सकाळपासून जीव हुरहुरतोय.  माझ्या सायलीने लग्न केले.  तिकडेच.  मित्र मैत्रिणींच्या गोतावळ्यात.  मागच्या आठवड्यातच फोन वर सांगितले होते तिने.  परवानगी वगैरेचा प्रश्नच नाही. व्हिडिओ कॉल वर डायरेक्ट मित्राला बाजूला बसवून ओळख करून दिली.  ‘हा जतिन पटेल. माझा  बॉयफ्रेंड!  गेली चार वर्षे आम्ही रिलेशनशिप मध्ये आहोत. आम्ही लग्न करतोय!’ बस्स! संपला विषय.  ही काय पद्धत झाली!  आता नातेवाईकांना काय तोंड दाखवणार?  आम्ही तर हादरलोच.  पण एव्हढया दुरून नाराजी व्यक्त करण्या पालिकडे काय करणार होतो?  आणि आमच्या नाराजीला विचारतोय कोण?  ती तिचा निर्णय घेऊन मोकळी झाली होती.  हा आत्मविश्वास आणि ही आत्मनिर्भरता आम्हीच तर दिली होती तिला. तिचे काय चुकले?  शेवटी आम्ही तिचा निर्णय स्विकारला.  लग्नाला जाऊ शकत नाही म्हणून इथूनच आशीर्वाद दिला.  सासूबाईंना जाऊन वर्ष झाले होते. नशीब त्या नाहीयेत.  नाहीतर मान खाली घालावीच लागली असती त्यांच्यापुढे! सगळे संस्कार काढले नसते बाहेर त्यांनी? फटकळ काय कमी होत्या? 

११ जानेवारी २०११

आज परत अमेरिकेला येऊन महिना झालाय.  सायलीचे बाळही आता बाळसे धरू लागलेय.  नऊ महिन्यांपूर्वीच तिने ही गोड बातमी दिली तेव्हा किती हुरळून गेलो आम्ही!  कधी एकदा उडून तिच्याजवळ येतो, तिला कुशीत घेऊन कुरवळतो असे झाले होते.  माझं पिल्लू आता स्वत:च आई होणार होतं.  आणि तो दिवस आलाच. ३१ डिसेंबरच्या रात्री ठीक १२ वाजता सायलीने अर्जुनला जन्म दिला.  म्हटले भारीच मुहूर्त गाठलास गं! तर म्हणते, “आई अगं, प्रि प्लॅन्ड होते.  याच दिवशी याच वेळी जन्म द्यायचा हे आधीच ठरले होते.  बाळाचे नावही आधीच ठरवले होते.” “म्हणजे? मूलगा कि मुलगी हे ही आधीच माहीत होते?”  मी तर बाई तोंडातच बोटे घातली.  आपल्याकडे नाही असले काही!  बाळाला पहिल्यांदा व्हीडिओ कॉल वर पाहिले आणि तडक सगळा बाळंतविडा घेऊन अमेरिका गाठली. 

२९ मार्च २०११

आज कंबर अतिशय दुखते.  पोरीचे बाळंतपण करायचा उत्साह पार मावळलाय आताशा!  इथे ना मालिशवाली येत! ना स्वयंपाकाला बाई मिळत! ना आपली नेहमीची झाडलोट नी भांडी घासणारी कामवाली बाई असत! सगळीच्या सगळी कामे आपली आपणच करायची! यांची तर काडीची मदत नाही! नुसते बघ्यासारखे बसून राहतात.  बाळाची दुपटी बदलायलाही मदत नाही करत.  यापूर्वी कधी केली होती म्हणा!  सायलीला मी आणि सासुबाईंनीच तर वाढवली.  सासूबाई तेव्हा माझ्याकडेच होत्या ना! मी शाळेत जायचे तेव्हा छान सांभाळायच्या त्या सायलीला!  अर्थात दिमतीला नेहमीची कामवाली बाई, स्वयंपाकाला बाई आणि २४ तास एक लहान मुलगी बाळगीण म्हणूनही होती.  त्यामुळे फार भार नाही पडला त्यांना.  पण इथे माझा मात्र पार पिट्ट्या पडलाय.  कधी एकदा माझी पाळी संपते आणि विहीण बाई येतात असे झालाय! इथे तीच पद्धत! सहा महीने आमची पाळी. सहा महीने व्याह्यांची पाळी.  सासू बाई अशाच तीन तीन महीने मुलांकडे राहायच्या!  हे का आठवतंय आता मला! निराश वाटले कि असेच नको नको ते विचार मनात येतात हल्ली!

२ फेब्रुवारी २०१५

कालच दोन आठवड्यांसाठी सायली आली जतिन आणि अर्जुन बरोबर भारत व्हिजिटला.  पाच वर्षांचा अर्जुन केव्हढा मोठा दिसतोय.  छान वाढलाय! ऊर परत एकदा अभिमानाने भरून आला!  इतके दिवस व्हिडिओ कॉल वर बघत होतो.  आता त्याला छातीशी कवटाळायला जीव आसुसला होता नुसता.  पण तो काही जवळ यायला तयारच नाही.  साहजिकच आहे म्हणा!  आम्ही सख्खे असलो तरी दुरचेच ग्रँडपा आणि ग्रँडमा झालोय ना!  त्यात भाषेचा अडसर आहेच!  काही म्हणता काही समजत नाही त्याला नि त्याचे बोबडे इंग्लिश आम्हांला!  जावई बापू बाकी समंजस आहेत.  खूप सांभाळतात सायली आणि अर्जुनला सुद्धा!  बाळंतपणासाठी गेले होते तेव्हा बघितले होते ना! आमचे हे ढीम्म हलायचे नाहीत पण जावईबापू घरी आले कि मला सगळी मदत करायचे.  साफसफाई, स्वयंपाक अगदी बाळाचे डायपर सुद्धा बदलायचे! सायलीला अभिमानाने सांगितले, “पोरी नशीब काढलेस गं! एव्हढा समंजस नवरा मिळाला!” तर म्हणते, “आई, इथे सर्वांनाच सगळे करावे लागते.  त्यात काही विशेष नाही!”  आताही जावईबापू फार आपुलकीने बोलले आमच्याशी.  तेव्हढीच आमच्या हृदयावर फुंकर!

२० सप्टेंबर २०२०

आज पेपरला बातमी वाचली.  खारघरला एका घरात एकाकी वृद्धाचा मृत्यू.  दोन दिवसांनी शेजाऱ्यांना दुर्गंध आल्यावर पोलिसांनी घर फोडले तेव्हा कळाले.  हे वाचल्यापासून तर जीव हुरहुरतोय. आताशा संध्याकाळ झाली कि अनामिक हुरहूर दाटून येते.  ‘संध्याछाया भिवविती हृदया’ हे पटू लागलेय.  हे हसून म्हणतात, “अगं, दोघे आहोत नं आपण! मग कसली काळजी करतेस! छान साथ देऊ एकमेकांना.”  पण मनाचे समाधान काही होत नाही! उद्या दोघांपैकी एकटंच कुणी राहू तेव्हा…?  अरे देवा! दिवा लावायचाय आणि काय तो विचार!

१७ ऑक्टोबर २०२२

यांना देवाज्ञा होऊन आज महिना झाला.  सगळी दिवसकार्य पार पडली आणि सायली आत्ता आली.  खूप राग आलाय मला तिचा!  सगळे कार्य नातेवाईकांच्या मदतीने पार पाडावे लागले.  तिला कळवले तेव्हांच सुट्टी नाही म्हणाली. ही काय रीत झाली? ज्यांच्या समोर आजवर नाक वर करून टेचात वावरायचे त्यांच्याच मदतीने सगळं करावं लागलं मला! ते काही नाही!  आता माझी पूर्ण जबाबदारी घ्यावीच  लागेल.  जन्माला घातले, वाढवले, शिकवले ते कशासाठी मग?  आजच बोलले तिच्याशी.  एकतर मला कायमची घेऊन जा नाही तर तू एकडे ये आता.  मी काही यापुढे एकटी राहणार नाही! माझा जीव घाबरतो.  तसे काही फार आढेवेढे घेतले नाहीत तिने पण चेहऱ्यावर आनंदही नाही दिसला.  काहीतरी सोय बघते म्हणाली.  “सोय?”  हं सोयच ! व्हिसा वगैरे प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तरी सोयच करायला हवी!

११ जानेवारी २०२४

अखेर येऊन पडलेच इथे अमेरिकेत.  पुढच्या आठवड्यात वर्ष पूर्ण होईल.  इतके दिवस पेन हातात घ्यावेसेही वाटले नाही.  रोज सायलीशी वाद होतोय.  खरे तर आई मी तिची.  पण सासू असल्यासारखी भांडतेय.  माझी अडचणच जाणवतेय बहुधा तिला!  अर्जुनलाही काही आपुलकी दिसत नाही.  सायलीला बोलले तर म्हणते, “चालायचेच.  आजी गावाहून आपल्याकडे राहायला यायची तेव्हा तुलाही तर अडचणच व्हायची ना गं? आणि मला तरी कुठे एव्हढी आपुलकी निर्माण केलीस तू तिच्याबद्दल?”  “हो. हे ही खरंच की! मीच तुला इंग्रजी माध्यमात शिकवायचा हट्ट धरला! तू फाडफाड इंग्रजी बोलयचीस तर किती अभिमान वाटायचा मला! आजी समोर मुद्दाम इंग्रजीतून बोलायला लावायचे तुला! पण त्यात सासुबाईंची गोची करायचा इरादा नव्हता गं! तर सगळ्या नातवंडांत तू कशी हुशार हेच दाखवायचे असे! तू जन्मली तेव्हा चेहऱ्यावर आनंद नव्हता ना दिसला त्यांच्या! म्हणूनच गं!  आणि मला त्यांची अडचण व्हायची हे ही खरंच! अगं, वन बीएचके फ्लॅट आपला! त्यात तुला, मला, यांना सगळ्यांनाच सकाळी लवकर आपापल्या कामाला जायचे असायचे.  एकच टॉयलेट बाथरूम.  सासूबाईंना फार वेळ लागायचा सगळ्याच गोष्टींसाठी.  मग अडचण होणारच ना!  पण त्या गावाहून यायच्या तरी भाषेचा प्रॉब्लेम नव्हता ना गं त्यांना!  आपल्या आजूबाजूचे सगळेच मराठी बोलायचे! त्यामुळे शेजऱ्यांशीही खूप गप्पा मारायच्या त्या!  टी. व्ही. वरही भरपूर मराठी कार्यक्रम बघायच्या.  मस्त वेळ जायचा त्यांचा! सासरे गेल्यावरही एव्हढा एकटेपणा नाही कधी वाटला त्यांना!  कि माझ्या सारखे कधीच एकटे नाही राहायला लागले! चार मुलगे होते त्यांना! तीन तीन महिने राहायच्या प्रत्येकाकडे! मान्य आहे जबाबदारी वाटली गेली त्यावेळी आमची! पण मला एकच मुलगी आहे.  आता ही माझीच चूक का?” हो वाटतं! माझीच चूक! मीच निर्णय घेतला होता. आपल्याला एकच मुल होऊ द्यायचे! यांनीही स्वागत केले इतकेच! तुला सगळी सुखे, सगळ्या सोयी सुविधा देण्यासाठी आम्ही दूसरा चान्स घेतलाच नाही. काय माहीत घेतला असतं तर ते ही मुल कदाचित असेच कुठेतरी परदेशात असते. हं पण जबाबदारी तरी वाटली गेली असती नाही का?  बरोबरच आहे. माझेच चुकले! आता माझ्या चुकीची शिक्षा मीच भोगली पाहिजे. एकटं राहायची सवय करायलाच हवी..!

तुम्हाला  ही कथा कशी वाटली ते नक्की कळवा.  आपल्या मित्र परिवारा सोबत शेअर करायला विसरु नका.  अशाच नवनवीन कथा आम्ही तुमच्या पर्यन्त पोहचवत राहू.  याचा  लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाइटला नक्की भेट द्या.  तसेच आमचा WhatsApp ग्रुप ही जॉइन करा.  धन्यवाद! 

महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)

3 thoughts on “माझे काय चुकले? l Marathi Emotional Story for reading”

  1. वैशाली देव

    कथा मनाला खूप भावली. बहुतेक आजकाल एकच मुल असल्यामुळे आई-वडिलांची अशी परिस्थिती होते. त्यातही ते परदेशात निघून गेले की त्यांची आपुलकी खूपच कमी होते.

  2. motha prashn aahe ha.. ek mulache sangopan nit karata yave mhnun dusryacha vichar n karnarya parents la bodh aahe hi katha.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top