मराठी कथा – पुन्हा गवसला सूर…!!!

WhatsApp Group Join Now

हेमांगी नेहमीच्या नऊच्या ठोक्याला आपल्या ओपीडीमध्ये म्हणून जाण्यास निघाली .पण वाटेत तिने भैरवीला फोन केला. ” हॅलो भैरवी मी आता येतेय तुझ्याकडे. तुझं आवरलय ना सगळं. ? आज दिवसभर मी तुझ्याकडेच थांबेन.”

असे म्हणून तिने फोन ठेवला. भैरवी .! तिची अगदी बालपणापासूनची मैत्रीण . शाळा, कॉलेज, क्लास सारं काही एकत्रच केलं . दोघींच्याही आवडीनिवडी वेगळ्या, करिअरची क्षेत्रं वेगळी . तरीही एकच धागा त्यांना जोडणारा होता तो म्हणजे गाणं .! त्यामुळेच त्यांची मैत्री अखंड राहिली होती अगदी आजपर्यंत!दोघींनाही गाण्याची अतिशय आवड. अगदी क्लासिकल साँग पासून आजच्या उडत्या चालीच्या गाण्यापर्यंत त्यांना कशाचंही वावडं नव्हतं. पण भैरवी नं गायनाचं २ीत सर शिक्षण घेतलं होतं . हेमांगीलाही त्याचा सार्थ अभिमान होता . अवघ्या एका गाण्यावर., न०हे एका ओळीवरही, गायकाने सूर पकडलेल्या नेमक्या जागेवर त्या तासनतास चर्चा करत असत.

            मधल्या दहा वर्षामध्ये मात्र दोघींचेही मार्ग वेगळे झाले . अर्थात लग्नानंतर ! एकाच शहरात असूनही त्या इतक्या व्यग्र झाल्या की गप्पा , चर्चा दूरच, साधी चौकशीही करायला आवर्जुन वेळ काढावा लागत असे. गाडी चालवतानाच हेमांगी तिच्या मनात या साऱ्यांची उजळणी करत होती . आणि लगेचच ती भैरवीच्या घराजवळ येऊन पोहोचली . आत पाय ठेवताच तिला प्रसन्न वाटलं . घराभोवती वाढलेल्या छोटया जागेतील मस्त सुगंध देणाऱ्या झाडांनी सगळा पोर्च सुगंधित होत होता. ओपीडीच्या नित्य सहवासाने नीरस झालेल्या मनाला मस्त तजेला मिळाला. तिने आतुरतेने दरवाज्यावरची बेल वाजवली आणि समोर भैरवी आली . नितळ चेहऱ्याची , मर्यादित हासणारी,. लांबसडक केस वर क्लिपमध्ये टांगलेले , सुस्तावलेली , डोळ्यातील चमक कुठे तरी हरवून गेलेली.

     ” काय हे भैरवी , कशी आहेस.? आणि अशी मख्ख का…?”

     ” अगं हो.किती प्रश्न विचारतेस .? जरा बस तरी. काय घेणार.? सगळं तुझ्या आवडीचं बनवलयं .पण आधी मस्त कॉफी घेऊ आणि छान गप्पा मारू !”

       ” हो . हो . आणि घरातील बाकीची मंडळी कुठायत? सासूबाई ,समीर आणि तुझं चक्क बारा वर्षाचं लेकरू प्रीतम कुठाय..?”

       ” अगं तेच सांगायला बोलावलयं तुला.एवढी चांगली मानसोपचारतज्ञ आहेस. त्यात मैत्रीण , म्हटलं , छान समजून घेशील. आज़ पंधरा दिवस झाले मी एकटीच आहे घरात. आणि आता सवयच करावी लागेल. समीरला त्याच्या कंपनीने दोन वर्षासाठी जर्मनला पाठवलयं .तो इथे नाही म्हटल्यावर सासूबाई नाराज झाल्या . त्या गेल्या मोठया दिरांकडे राहायला . प्रीतम तर गेल्या वर्षापासून होस्टेललाच आहे .आता पर्यत एवढया सगळ्यांचं करण्यात दिवस हे , वर्षे कशी गेली कळलं नाही. आता एवढा वेळ आहे काय करायचं सुचत नाही.  मग मनात सगळ्या वर्षाची उजळणी होते. चांगले असे क्षण आठवतच नाहीतच. केवळ चुका आणि त्यामागची कारणं शोधण्यात चं वेळ जातो . काय करावं..”

               बोलता बोलता भैरवी कासावीस झाली . बैचेन झाली . काय बोलावं तिला सुचेना . हेमांगीने तिला शांत केलं .कॉफी घ्यायला लावली . आणि थोडा वेळ तिला शांत बसू दिलं 

” कसं असतं ना भैरवी, आपल्या माणसांचा हाच गोंधळ होतो. आपण नेहमी बाहेरच्या भौतिक गोष्टी मध्ये गुंतून पडतो . पण माणूस जन्माला आल्यापासून त्याचं एक नातं मात्र अगदी कायमचं नक्की जोडलं जातं . त्याचं स्वतःचं स्वतःशी असलेलं नातं.! आपण समाजात कुणीही असलो. आणि कसेही असलो तरी आत्मवंचना करू शकत नाही . आपली इतर नाती जपली जावीत . आपलं घर कुटुंब सांभाळलं जावं यासाठी आपण काहीही करायला तयार असतो. आणि ते चुकीचंही नाही . पण या सगळ्या कोलाहलात आपण आपल्यालाच हरवून बसतो .आपलचं अस्तित्व धूसर करतो. अग तेही रोपटंचं की ! त्यालाही गोंजारावं लागतं . सांभाळावं लागतं. पण एकदा ते हातातून निसटून गेलं की आपणच आपल्याला परके होतो. आपल्याला काय करायचं होतं आणि आता आपण काय करणार आहोत. यामध्ये ज्यावेळी माणसांचा गोंधळ होतो. त्या वेळी त्याची अवस्था आता तुझी आहे त्याप्रमाणे होते . काय… काही येत यं का लक्षात…?”

     ”  हेमांगी , अगं इतक्या वर्षापासूनची आपली ओळख.. तूला काही वेगळं सांगायला नको.औपचारिक शिक्षणापेक्षा माझी गाण्याची आवड तुला माहितच आहे. पण ते सारं माझ्या  लग्ना आधीच निगुतीनं झालं . इथे माझ्या गाण्याचं नाही कौतुक , नाही त्याला पाठिंबा. नाही म्हणायला सुरुवातीला अगदी कौतुकानं मिरवलं . बायकोचं सुनेचं कौतुक. पण नंतर ‘ आता काय उपयोग’ या टोमण्यात ते कधी बदललं कळलचं नाही . मग ती गाणारी भैरवी  मनाच्या अगदी तळाशी कुलूपबंद करून टाकली.. ती कधी परत मोकळी झालीच नाही.  आता पुन्हा तिकडे जायचं तर धीरचं होत नाही. पुन्हा जमेल का.? एकदा सूरांशी तुटलेली तार पुन्हा सांधली जाईल का.? “

       .  . हेमांगीने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली,

” या संसारांच आणि नात्यांचं गणित भल्याभल्यांना सुटलं नाही. मग आपल्यालाच सारं समजावं असा आटापिटा कशाला.? पण एक सांगू , निसर्गाने आपल्याला जन्म देताना कुणालाही रिक्त हस्ताने पाठवलं नाही. काही ना काही ,, कशाचं ना कशाचं बीज पेरूनच जन्माला पाठवलयं . पण ते शोधण्याची जबाबदारी मात्र आपल्याला दिलीय . सुदैवाने तुला तो सूर बालपणीच समजला. तुझ्या बाबांनी त्याला खतपाणी घातलं . तुझ्या शिक्षणाच्या बाबतीत , गायनाच्या बाबतीत ते किती काटेकोर होते , दक्ष होते ते पाहिलयं मी .”

               ” हो .. मुळातच माझ्या गायनाशी ते त्यांच्या काही पूर्वसंचितानेच बांधले गेले होते . त्यांच्या स्वतःवर फार लवकर घरची जबाबदारी आल्याने त्यांना गायनाची आवड बाजूला करावी लागली . त्यांची स्वप्ने ,आकांक्षा ,कला हे सारं ते माझ्यात बघत आले होते . लग्नानंतर ही ते सतत माझ्या गायनासाठी आग्रही होते. पण परिस्थिती पाहून ते अबोल होत गेले . आजही वाटतं मी त्यांच्या प्रयत्नांना, कष्टांना न्याय देऊ शकले नाही.”

              ” भैरवी., बरोबर आहे तुझं .  यासाठी एकच गोष्ट मनाशी पक्की करायची . आपण आपल्या स्वतःशी ठाम आणि प्रामाणिक राहायचं   . आपल्या मुलीच्या आयुष्यात येतातच गं अनेक अडथळे.!  त्या जबाबदाऱ्या  अटळ ही आहेत . पण त्या व्यावहारिक नजरेने पहायच्या .  कारण सिर सलामत तो पगडी पचास.! ” 

               यावर दोघीही अगदी मनमोकळेपणाने हसल्या..

” … खरचं भैरवी . या सगळ्या गोष्टी part of life होत्या. आहेत. म्हणून त्या बाजूला करूया. ज्या गोष्टी तुझ्या स्वतःच्या असण्याला अडचण ठरतील त्यांच्याशी डील कर . त्यांना भिडायला शीक . त्यांना कधीच heart of life म्हणून कवटाळू नकोस. समीर आल्याशिवाय सासूबाई तुझ्याकडे येणार नाहीत आणि समीर तर दोन वर्षांनी येणार आहे. मग  का परत रियाज सुरू करत नाहीस…?एवढी चांगली संधी मिळाली आहे . माझं तर मत आहे , तू सरळ बाबांच्या गावी कोकणात जा. तिथे तुला वेगळं वातावरणही मिळेल आणि बाबांची एक आश्वासक आठवण तुला प्रेरणा देईल. बघ मी येते तुला सोडायला.,”

              ” हो. पण आता सगळं परत नव्याने सुरू करायचं म्हणजे…,”

            ,,” हे बघ आता जास्त विचारांचा गोंधळ घालू नकोस. तूच म्हणालीस ना वडिलांचं पूर्वसंचित म्हणून गायन करू शकले.मग त्याच अनुषंगाने काही तरी कार्य झाल्याशिवाय तुझ्या असण्याला पूर्तताच येणार नाही.आपण सगळे जगतो आहोत या मागे सुप्त हेतू असतोच असतो. जो पर्यंत तो हेतू साध्य होत नाही तोपर्यंत आयुष्य आपल्याला अनेक हुलकावण्या देत राहते . अत्यंत निर्विकार मनानं तो हेतू शोधता यायला हवा. आणि आदिम प्रेरणेने त्याकड़े चालत जाता यायला हवं . तरच जगण्याच्या पूर्ततेचा क्षण अनुभवता येतो.तो सूर पकडता आला की सार्थकता फार दूर राहात नाही.”

            ” खरंच ग  .!मला आवडेल असा जगण्याचा सूर शोधायला आणि जगण्याच्या सार्थकतेच्या जवळ जायला!.”

                 …………. आणि अशाच गप्पांमधून दोघी मैत्रिणी मनं सांडत गेल्या. अनुभवांची शिदोरी उलगडत गेल्या.स्वप्नांचे इमले रचत,  हरवलेल्या सुरांशी पुन्हा सूर जोडत.!! मधली कित्येक वर्षे हरवून गेलेला क्षण पुन्हा त्यांच्या समोर होता आणि तो त्या दोघी जगत होत्या,  तोच क्षण, एखादया उलगडणाऱ्या,, चित्तवृत्ती शांत करणाऱ्या सुरासारखा.! भैरवीच्या बाबांनी बांधलेल्या सुराला त्या पुन्हा आळवत होत्या, बाबांच्याच शब्दांमधून. .. 

           ताल नादावतो धुंद

           चित्तास भुलवितो मंद.. 

             छंद आवडीचा जसा

             मोहवितो क्षणाक्षणाला….! 

               पकडावे मुठीत अलगद

                 धावत्या या भावनेस… 

                  गवसावे  नव्याने मज

                 गुज आभासी निरलस….! 

                  खेळ पुन्हा हा सावरता

                  रचावे नव्या रहस्या… 

                 शोधावी मग अंतिमतः

                श्वासाची लय शतशः..!! 

वाचक हो. .कशी वाटली तुम्हास ही कथा.? अशाच नवनवीन कथा आणि लेखांसाठी आमच्या लेखक मित्र या वेबसाईटला नक्की भेट द्या..! शेअर करा आणि कमेंट करा. 

महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)  

4 thoughts on “मराठी कथा – पुन्हा गवसला सूर…!!!”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top