मराठी कथा -वारसा आदर्शाचा l Marathi story for reading

WhatsApp Group Join Now

आज राम टेक्सटाईल मिलला एखादा सण असल्यासारखं सजवलं होतं. सगळेच पारंपारिक वेष परिधान करून आले होते. सगळ्यांना हॉलमध्ये बसण्याची सूचना करण्यात आली. तिथेच प्रभुणे कुटुंब रामरायाची पूजा करत होते. हॉलमध्ये एका सुंदर देवघरात प्रभू श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण आणि हनुमान ह्यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात येत होती. पूजा संपन्न झाल्यावर लाडू आणि सुंठवडा देण्यात आला. 

आता कामाला लागावे असा विचार करत सगळे आपापल्या डेस्कवर जायला निघाले. परंतु रामने सर्वांना बसायला सांगितले. “हॉलमध्ये असलेल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना माझा नमस्कार. मी राम प्रभुणे.” असं म्हणत रामने बोलायला सुरुवात केली. “ओळखत असालच मला. तुमचा खडूस बॉस.” 

त्याने असं म्हणताच हॉलमध्ये हास्याची खसखस पेरली गेली. हास्य पेरत संवादाची सुरुवात करायची ही रामची नेहमीची सवय. म्हणूनच कदाचित त्याचा सगळ्यांसोबत चांगला बॉन्ड तयार झाला होता. 

Marathi story for reading

रामने पुढे बोलायला सुरूवात केली, “आज खूप छान वाटतंय. आमच्या शब्दाला मान देऊन तुम्ही इथे अगदी पारंपारिक वेषात आलात. तुमचे सर्वांचेच आभार. सगळेच छान दिसताय. मलाही नेहमीच्या फॉर्मल ड्रेसचा कंटाळा आला होता. म्हणून म्हंटलं आज निमित्त आहे तर जरा छान तयार होऊन हौस पूर्ण करून घेऊ. हँडसम दिसतोय ना? नाहीतर रोज बोअरिंग दिसतो तुमचा खडूस बॉस.” 

त्याच्या ह्या बोलण्यावर तर सगळ्यांनीच हसत होकार दिला. आज राम सर बोलत आहेत म्हणजे एखाद्या नवीन प्रोजेक्टविषयी सांगणार असा अंदाज सगळ्यांनी लावला. कारण प्रत्येक प्रोजेक्टआधी असंच मोटिव्हेशनल स्पीच सगळ्या स्टाफला देणं ही रामची सवय होती आणि कदाचित म्हणूनच प्रत्येक प्रोजेक्टमध्ये त्यांची अव्वल कामगिरी घडायची.

रामने पुढे बोलायला सुरुवात केली, “या पारंपारिक वेषात आज तुम्हाला कशासाठी यायला सांगितलं, हे एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल. ही पूजा कशाकरता आहे ते सुध्दा समजलं असेलच. आज आपल्या प्रभू श्रीरामांची अयोध्येत प्राणप्रतिष्ठा आहे. सुमारे पाचशे वर्षांनंतर ते आपल्या मूळ स्थानी विराजमान होणार आहेत. त्यांच्या आयुष्यात त्यांनी खूप संघर्ष सोसला आणि आताही त्यांच्या मूळ स्थानावर त्यांची प्राणप्रतिष्ठा होण्यासाठीही खूप संघर्ष झाला. पण विजय हे संघर्षाचे अंतिम फळ असते हे त्यांच्या जीवनचरित्रातून सिद्ध होते. 

घाबरू नका, मी काही संपूर्ण रामकथा नाही सांगणार. कारण मलाच अजून ती नीट आत्मसात झालेली नाही. तर मी आज तुमच्यासमोर माझे काही सिक्रेट्स ओपन करणार आहे. आज तुम्ही मला खूप शांत, संयमी, हसतमुख, सगळ्यांशी विचारविनिमय करून निर्णय घेणारा ‘कुल’ बॉस म्हणून ओळखता. पण मी हा असा घडलो कसा, ह्याविषयी सांगणार आहे. मी याआधी खूप चिडका, हट्टी, भांडणारा राम होतो. अगदी आत्ताचा जो राम आहे त्याच्या अगदी विरूद्ध पर्सनॅलिटी होती माझी. बाबांना माझी खूप काळजी वाटायची. प्रत्येक आई वडिलांना वाटतं, आपल्या मुलांनी आयुष्यात खूप यश, नाव कमवावं, त्याला समाजात मान मिळावा. माझ्या बाबांनाही वाटत होतं की मुलाने आपला बिझनेस अजून पुढे न्यावा. त्यांना माझ्यात एका सक्सेसफुल बिझनेसमनसाठी जे गुण, जी हुशारी असायला हवी ती दिसत होती. पण त्यांना शांत, संयमी राम माझ्यात दिसत नव्हता. त्याची जाणीव माझ्यात निर्माण करण्यासाठी बाबांनी एक पाऊल उचललं. 

योग, ध्यान, नामस्मरण ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी माझ्याकडून करवून घेतल्या. त्यामुळे मी बर्‍याच प्रमाणात शांत, संयमी झालो. बिझनेस यशस्वी करण्यासाठी संवाद, निर्णयक्षमता, चौफेर विचार, युक्ती, क्लृप्ती सगळंच शिकणं गरजेचे होतं. किंबहुना ते सगळे गुण माझ्यात होते. पण त्यांचा वापर कधी, कुठे करावा ही जाणीव मला स्वतःलाच व्हावी असं त्यांचं मत होतं. आणि आता त्यासाठी काय करावं हा त्यांच्यापुढे प्रश्न होता. त्यांनी त्यावेळेस मला जे सांगितलं ते आज तुम्हाला, माझे बाबा म्हणजे आपल्या फर्मचे फाउंडर, आपल्या फर्मचे सर्वेसर्वा श्री.श्रीधर प्रभुणे सांगतील. आज तुम्हाला ते मार्गदर्शन करतील. “

रामने श्रीधर सरांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली. सरांची जवळपास साठी पार झालेली होती. पण चेहर्‍यावर समाधानाचे तेज होते. त्यांनी ऑफिसची पूर्ण जबाबदारी आता रामवर सोपवली होती. ते आता फक्त सणावारी आणि महत्त्वाच्या मिटींगसाठी येत होते. पण आज त्यांचे विचार ऐकायला मिळणार, त्यांचे मार्गदर्शन मिळणार म्हणून सगळेच उत्सुक होते. 

श्रीधर सर सगळ्यांसमोर उभे राहिले आणि हात जोडून रामरक्षा म्हणायला सुरूवात केली. 

“राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे।

सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने॥३८॥

बोला प्रभू श्रीरामचंद्र की जय. 

तुम्हाला वाटतं असेल, हा म्हातारा आता स्तोत्र, किर्तन आणि प्रवचन देणार. नाही का? नाही म्हणजे मी म्हातारा झालो ह्याचा अंदाज बरोबर आहे तुमचा. पण अजूनही तुमच्या रामसरांएवढाच हँडसम दिसतो आहे की नाही? हं …सांगा ..सांगा घाबरु नका ह्या रामला.. “

सगळेच जण हसू लागले आणि उत्स्फूर्त प्रतिसाद देत सगळेच ओरडू लागले, “यू लूक मोअर हँडसम दॅन राम सर.”

“चला म्हणजे रामचा भ्रम दूर झाला असेल, तो एकटाच हँडसम आहे ह्याचा. आता हा विचार करू नका की राम अगदी माझ्यावर गेला आहे. अगदी माझ्यासारखंच छान बोलतो. माझ्याकडूनच शिकला असेल. तसं अजिबात नाही. मी त्याच्याकडून शिकलो आहे असं हसतखेळत आपल्या सहकाऱ्यांशी संवाद साधणं आणि मला खरंच खूप आवडतंय त्याच्याकडून शिकायला. पूर्वी राम असा नव्हता. माझ्यावर लहानपणापासूनच एक उत्तम माणूस बनण्याचे संस्कार झाले आणि तोच संस्कारांचा वारसा मी रामला देण्याचा प्रयत्न केला. पण राम खूप चिडका, खूप अस्थिर होता. संयम आणि संवाद तर त्याला माहितच नव्हता. योग आणि मेडिटेशनने तो शांत झाला. पण त्याला स्वतःलाच काही गोष्टींची जाणीव होणं गरजेचं होतं. म्हणून मग मी एक प्रयोग सुरू केला. रोज एक तास त्याच्याशी त्याच्या

लहानपणीच्या आठवणींवर बोलायला सुरुवात केली. आणि बोलता बोलता मला जाणवलं त्याला आपल्यातल्या गुणांची जाणीव आहे. फक्त त्याला गरज होती ती मार्गदर्शनाची. छोट्या छोट्या घटनांमधून त्यानेच शिकावं असं माझं मत होतं. त्याच दरम्यान मी एक कार्यशाळेबद्दल ऐकलं, ‘मोटिव्हेशनल स्पीच’. त्यातून काही मार्ग सापडतो का, हे बघण्यासाठी मी त्याला तिथे घेऊन गेलो. आणि तिथे गेल्यावर माझा राम एकदम शांत, संयमी आणि विचारी झाला. त्या कार्यशाळेत प्रभू श्रीराम यांच्या जीवनातील घटनांबद्दल सखोल माहिती दिली होती. प्रभू श्रीरामांनी प्रत्येक घटनेबाबत घेतलेले निर्णय, त्यामागचा उद्देश, त्याचे परिणाम, त्यातून दिसणारा प्रभू श्रीरामांचा गुण ह्याची चर्चा तिथे केली गेली होती. ते सर्व माझ्या रामने लक्षात ठेवून तेच अंगिकारण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आणि एक उत्तम माणूस म्हणून राम घडला.

मला तो एक उत्तम आणि यशस्वी व्यावसायिक झालेलं बघायचं होतं. माझी ही इच्छासुद्धा त्याने पूर्ण केली. व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी फक्त संयम असून चालत नाही तर संवाद, सगळ्यांची मतं जाणून, चौफेर विचार करणं, प्रत्येकाला सहभागी करून घेणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांचा आदर करणं ही कौशल्य अंगी असणं गरजेचं आहे. हे तो शिकला रामायणाच्या गोष्टींमधून. प्रभू श्रीरामांच्या जीवनातील प्रत्येक घटनेमधून त्यांचा कुठला गुण दिसून येतो आणि त्या गुणांचा परिणाम काय? हे सगळं राम स्वतःहून माझ्याबरोबर बोलायला लागला. त्यातून त्यालाच बर्‍याच गोष्टीं समजल्या आणि त्याप्रमाणेच तो निर्णय घेऊ लागला. आणि म्हणूनच आज माझ्या छोट्या उद्योगाचं मोठ्या व्यवसायात रूपांतर झालं आहे.

आता तुम्हालाही इच्छा झाली असेल ना हे शिकायची. नक्कीच शिका. कारण खूप काही शिकण्यासारखं आहे प्रभू श्रीरामांकडून. तरीही अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. प्रभू श्रीरामांना आपण मर्यादा पुरुषोत्तम म्हणून जाणतो. ते एक आदर्श पुत्र, आदर्श भाऊ, आदर्श पती, आदर्श राजा, आदर्श मित्र होते. पण आदर्श होण्यासाठी त्यांना फार खडतर आयुष्य काढावं लागलं. वनवासही भोगावा लागला. पण त्यांच्यामधील गुणांनी त्यांना आदर्श बनवलं. सचोटी, सदाचार, संयम, संवाद, अढळ नैतिक आचरण, धर्म, सत्य, प्रेम, करुणा, धैर्य, कर्तव्याची जाणीव, ठाम तत्वं, नात्यांची जपणूक, सर्वांचा आदर, नम्रता हे प्रभू श्रीरामांचे गुण त्यांच्या जीवनातील प्रत्येक घटनेमधून आपल्याला दिसून येतात. श्रीरामांचे हे गुण दिशादर्शक आहेत आपल्यासाठी. हे गुण जे कोणी आत्मसात करतील ते आदर्श ठरतील. 

आजच्या ह्या आधुनिक, डिजिटल युगात तर ह्याची जास्तच गरज आहे. आजची जीवनशैली तर अधिक जलद, अनिश्चित, आव्हानात्मक, अस्थिर आणि गुंतागुंतीची झाली आहे. आजच्या काळात यशाचे शिखर गाठताना, वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील अनेक कठीण परिस्थितीला सामोरे जाताना, हरवत चाललेल्या सुसंवादाला परत आणताना, अध्यात्मिकदृष्ट्या समृद्धतेच्या दिशेने वाटचाल करताना प्रभू श्रीरामांचा हा वारसा आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करेल. “

इतकं बोलून श्रीधर सर थांबले. सर्वजण मंत्रमुग्ध झाले होते. सुई किंवा टाचणी जरी पडली तरी आवाज ऐकू येईल इतकी शांतता पसरली होती हॉल मध्ये. ती शांतता मोडत श्रीधर सर म्हणाले. “काय रे पोरांनो, कंटाळून गेलात का. मी खरंच म्हातारा झालो. आज प्रवचन दिले ना तुम्हाला. आता बोलायचा थांबतो. जास्त बोअर नाही करत तुम्हाला. आता तुमचे राम सर बोलतील. कारण त्यांना माझ्यापेक्षा जास्त चांगलं बोलता येतं. “

राम बोलायला उभा राहिला, पण श्रीधर सरांच्या बोलण्याने सगळ्यांसारखाच तोसुद्धा भारावून गेला होता. राम सरांना आज पहिल्यांदाच इतकं भावनिक झालेलं बघितलं होतं सगळ्यांनी. मग स्वतःला सावरत राम बोलू लागला, “आज खरंच लहान झाल्यासारखं वाटलं. सर्वार्थानेच. मी अजूनही काहीच नाही ह्याची जाणीव झाली. बाबा, मला तुमच्याकडून अजून बरंच शिकायचं आहे. तुम्ही माझे आदर्श आहात. माझं नाव राम आहे पण मी राम नाही. राम नाव आहे म्हणून ते सगळेच गुण माझ्यामध्ये नाहीत. ते अजून आत्मसात करायचे आहेत. अज्ञानाचा वनवास अजून संपला नाही माझा. हा वनवास संपवून मी नक्कीच आदर्श होण्याचा प्रयत्न करेन पण त्यासाठी गुरू वसिष्ठ तुम्हाला बनावं लागेल बाबा. आणि हे फक्त माझ्यासाठी नाही. तर इथे असलेल्या प्रत्येक रामासाठी मी तुमच्याकडे गुरुपद घेण्याचा आग्रह करत आहे. हो, इथे असणाऱ्या प्रत्येकात राम दडलेला आहे. स्वतःमध्ये असलेल्या रावणाचा अंत केला की राम सापडेल. याहून अधिक मी नाही बोलू शकत. इतकंच सांगेन, की आजच्या दिवशी प्रभू श्रीरामांची प्रतिष्ठापना होत आहे. हा खरंच सणच आहे आपल्यासाठी. आजची दिवाळी आपण जल्लोषात आणि उल्हासात साजरी करु आणि आजच्या दिवशी प्रभू श्रीरामांची शिकवण आचरणात आणण्याचा पण करु. “

आपल्याला ही कथा कशी वाटली हे जरूर कळवा. आवडल्यास आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करा. अश्या माहितीपर लेखासाठी वेबसाईट ल भेट द्या. आणि आमच्या लेखकमित्र व्हाॅट्स ॲप चॅनल ला फॉलो करायला विसरू नका.

महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे आहेत. लेखिकेने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखिकेच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)

3 thoughts on “मराठी कथा -वारसा आदर्शाचा l Marathi story for reading”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top