कथा — सत्यमेव जयते
सत्य कधीच लपत नसते.
“मुंबई ह्या स्वप्न नगरीमध्ये आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आलेल्या मृण्मयीची निर्घृण ह*त्या? कोण असेल मृण्मयीचा खु*नी?” “कुणाच्या डोळ्यात खुपत होती मृण्मयी प्रगती?” “कुणी घाला घातला मृण्मयीच्या आयुष्यावर?” “कोणाशी होती मृण्मयीची दुष्मनी?” “मृण्मयीचा कुठल्या टोळीशी संबंध होता का? “
सतत ह्या प्रश्नांचा भडिमार न्यूज चॅनल वर सुरू होता. चोवीस तास अपडेट देणाऱ्या न्यूज चॅनल्स नी तर्कवितर्क करून भंडावून सोडले होतं. पोलीस प्रशासनाला उसंत मिळू देत नव्हते. म्हणून पोलिस आयुक्तांकडून ही केस इन्स्पेक्टर अर्णव देशमुख ह्यांच्याकडे सोपविण्यात आली. इन्स्पेक्टर अर्णव वय वर्ष तीस. वडीलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पोलिस दलात रूजू झाला. लहान वयातच खूप मेहनत घेऊन स्वतःची योग्यता सिद्ध केली होती. ह्याआधी बर्याच जटील केसेस सहज सॉल्व्ह केल्या होत्या आणि खऱ्या गुन्हे*गाराला जगासमोर आणले होते. म्हणूनच ही केस त्याच्याकडे सोपविण्यात आली होती.
इन्स्पेक्टर अर्णव नी केस संदर्भात चौकशी ताबडतोब सुरू केली. “चला दळवी, केस ची फाईल द्या . बसून देणार नाहीत हे मिडीयावाले. ” असं म्हणतं अर्णव पोलीस स्टेशन मध्ये शिरला. दळवींना अर्णव ची सवय माहित होती. त्याच्या प्रत्येक केसमध्ये दळवी सोबत असतातच. दळवी दोन चहा सांगून फाईल घेऊन अर्णव च्या केबिन मध्ये गेले.
“सर ही घ्या फाईल.” दळवी यांनी फाईल, आतापर्यंत गोळा केलेले पुरावे आणि जबाबांचे संकलन सुपूर्द केले. पानं उलटत असताना अर्णव सगळ्या तपशिलांचे ठिपके जोडू लागला. मृण्मयीचे आयुष्य, तिच्या आकांक्षा आणि तिच्या हत्ये*मागील संभाव्य हेतू उलगडण्याचा प्रयत्न करत होता.
इन्स्पेक्टर अर्णव नी आपल्या टीम ला मृण्मयीची माहिती मिळवण्यासाठी तिच्या ऑफिसमध्ये,तिच्या घरी आणि मित्रमैत्रिणीं कडे पाठविले. तसेच टेक्निकल टीम कडून तिच्या सोशल साईटची संपूर्ण माहिती आणि तिचे कॉल रेकॉर्ड मागवले. एका पेपरवर मिळालेली माहिती, पुरावे ह्याची नोंद करून वेगवेगळ्या दृष्टिकोनातून केसचा अभ्यास सुरू केला. काही शक्यता त्याने पेपरवर नोंदविल्या. काही अंदाज बांधले आणि त्या दिशेने चौकशी करण्यास सुरूवात केली.
चौकशी अंती त्याने तीन शक्यतांचा फेरविचार सुरू केला. अर्णव आणि दळवी सर्व माहीती मिळवून परत पोलिस ठाण्यात आले. “काका परत एक चहा सांगा ना प्लीज.” अर्णव ने आल्या आल्या दळवींना सांगितले. “आपल्याला मिळालेली माहिती, पुरावे परत एकदा पडताळून पाहू या. काहि सुगावा लागतो का ते बघू. ” असं म्हणत मृण्मयी च्या केस संदर्भात असलेली माहिती बघण्यास सुरूवात केली.
“काय वाटतंय काका तुम्हाला?काय मोटिव्ह असेल बरं? आपण एक काम करू. एक एक पॉईंट ह्या पेपरवर लिहून काढू, म्हणजे आपल्याला कळेल कुठला पॉईंट मोटिव्ह असू शकतो किंवा कुठला पॉईंट सुटून गेला ते.” असं म्हणत अर्णव ने सुरूवात केली. “आपल्या गुणवत्तेवर ऑफिस मध्ये प्रमोशन मिळवले. बरेच प्रोजेक्ट एकटीने यशस्वीरीत्या पूर्ण केले. ऑफिस मध्ये सहकाऱ्यांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध आणि कोणा ही सहकाऱ्यांबरोबर मतभेद नाहीत. कुटुंब मध्यमवर्गीय. भावंडांबरोबर कुठलेही वाद नाही. अगदी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे नातं. मग अशा सगळंच चांगलं असणाऱ्या व्यक्तीला कोणी का संपवेल? “
“जिथे सगळंच चांगलं असतं तिथे ईर्षा असते आणि हे सुद्धा कारण असू शकत. दुसरा पॉईंट प्रेम. कुणाच तरी प्रेम असणारंच मृण्मयी वर. ” दळवींनी आपलं मतं अर्णवला सांगितलं.
” एखादं सत्य मृण्मयीला माहित झालं जे तिला कळायला नको होतं. हे ही एक कारण असू शकतं .” अर्णव ने आपला अंदाज वर्तवला आणि पेपरवर त्याची नोंद केली. दळवींनी ही त्याला आपली संमती दर्शविली.
“काका परत एकदा मृण्मयीच्या ऑफिसमध्ये तुम्ही स्वतः चौकशी करा. तुमचा अनुभव आपल्याला नक्कीच काहीतरी शोधून देईल. मला खात्री आहेच. तोपर्यंत मी टेक्निकल टीम कडून काही धागेदोरे मिळतात का ते पाहतो. संध्याकाळी परत एकदा इथेच भेटू.” असं म्हणत अर्णव निघाला आणि दळवी मृण्मयीच्या ऑफिसमध्ये निघाले.
संध्याकाळी अर्णव आणि दळवी केबिनमध्ये बसून कागदावर पॉईंट लिहून घेत होते. दळवी काकांनी मृण्मयीच्या ऑफिसमध्ये केलेल्या चौकशीत मिळालेल्या माहितीची नोंद कागदावर लिहीत फक्त एक नाव लिहीले. ‘ शिखा ‘. त्याखाली अर्णवने मृण्मयीच्या सोशल साईटवर तिने लिहीलेले कोट्स लिहीले होते. ” सत्य कधीकधी धोका*दायक असते.”
“काका तुम्हाला ह्या शिखा वर संशय आहे का? काय कळलं आहे तुम्हाला?” अर्णवने असं विचारल्यावर दळवींनी आपल्याकडील माहिती त्याला सांगितली. त्यात त्याला कळले की शिखा मृण्मयीच्या प्रमोशननंतर बराच काळ नाराज होती. तिने अनेकदा व्यक्त केले होते की प्रमोशन तिचे हक्काचे आहे.
त्याच दरम्यान मृण्मयीच्या कॉल रेकॉर्ड्समधून एक नंबर वारंवार समोर येत होता – आदित्यचा. आदित्य मृण्मयीचा बॉयफ्रेंड होता; पण काही दिवसांपासून त्यांच्यात वादविवाद झाले होते. अर्णवने आदित्यला चौकशीसाठी बोलावले. आदित्यने सांगितले की मृण्मयी काही दिवसांपासून खूप डिस्टर्ब होती. ती खूप चिडत होती. घाबरत होती. तिने आदित्यबरोबर बोलणे, भेटणे कमी केले होते. त्यामुळे त्यांच्यात सतत वाद होऊ लागले होते. एक दिवस आदित्यने स्वतःच्या जीवाचे काही करून घेण्याची भिती घातल्यावर मृण्मयीने त्याला तिला मोठे रहस्य माहित असल्याबद्दल सांगितले आणि ती त्याबद्दल खूप घाबरली होती. परंतू तिने सगळे सत्य सांगण्याआधीच ती हे जग सोडून गेली होती.
शिखाला ही चौकशीसाठी बोलावण्यात आले. तिने अर्णवला सांगितले की ती आणि मृण्मयी खूप चांगल्या मैत्रीणी होत्या आणि ती मृण्मयीच्या प्रमोशनबद्दल आनंदी होती; पण तिच्या डोळ्यात चलबिचल, भिती दिसत होती. अर्णवने शिखाचे कॉल रेकॉर्ड तपासले. त्यात अर्णवला काही संशयास्पद मेसेज सापडले. अर्णवने तिच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरूवात केली आणि त्याचा तिच्यावर संशय बळावत गेला. त्याने तिच्या घराची व आजूबाजूची तपासणी केल्यानंतर त्याला अंगणात एका झाडाखालील माती ऊकरल्यासारखी दिसली. तिथे खोदून बघितल्यावर त्याला औषधाच्या काही बाटल्या सापडल्या. त्याची पडताळणी केल्यावर त्याला त्या औषधांविषयी धक्कादायक माहिती कळाली व त्याने शिखा विरोधात सगळे पुरावे जमा केले.
ह्या सगळ्याचा एकमेकांशी काहीतरी संबंध असावा ह्या दृष्टिकोनातून आणि अर्णवने मृण्मयीच्या सोशल साईटवर तिने लिहीलेल्या कोटस् चा संदर्भ घेऊन पुढचा तपास सुरू ठेवला. अर्णवने तिच्या लॅपटॉपची तपासणी केली आणि त्यामध्ये त्याला एक लपवलेली फाईल सापडली. त्या फाईलमध्ये खूप धक्कादायक माहिती पुराव्यांसहित होती.
मृण्मयीच्या ऑफिसमध्ये चालणाऱ्या गैर*प्रकारांची माहिती त्या फाईलमध्ये मृण्मयीने पुराव्यासह लिहून ठेवली होती. मृण्मयीने एका मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न केला होता. ह्या घोटाळ्यामध्ये कंपनीचे उच्चपदस्थ अधिकारी सामील होते. मृण्मयीने ह्या गैरप्रकारांची माहिती एकत्र केली होती आणि ती बाहेर येण्याआधीच तिने हे जग सोडले होते.
अर्णवने हा तपशील वरिष्ठांना सांगितला आणि संपूर्ण चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले. कंपनीतील काही उच्चपदस्थ अधिकारी सस्पेंड करण्यात आले आणि अर्णवने त्यांची चौकशी सुरू केली. चौकशी दरम्यान समोर आले की शिखा सुद्धा ह्या गैरप्रकारांमध्ये सहभागी होती आणि मृण्मयी त्यांच्यासाठी घातक ठरू शकत होती. म्हणून मृण्मयीला कायमचे दूर करण्याचे ठरविले.
शिखाला चौकशी दरम्यान तिच्या विरोधात मिळालेल्या पुराव्याविषयीने अर्णव ने तिला सांगितले. त्यानंतर शिखाने खून कबूल केला. तिने सांगितले, ” मृण्मयीला आमच्या मार्गातून दूर करण्यासाठी खूप दिवस आधीपासून आमचा प्लॅन सुरू झाला होता. मृण्मयी चहाप्रेमी होती. कधीही चहा पिण्यास तयार असायची. ह्याच गोष्टीचा फायदा घेत मी रोज तिला माझ्यासोबत चहा पिण्यासाठी नेत होते. तिच्या चहामध्ये मी औषधाचे काही थेंब टाकत होते. हे औषध हळूहळू माणसाला संपवत जाते. मी रोज त्या औषधाचा डोस वाढवत होते. त्यादिवशी मीच मृण्मयीला ऑफिसमध्ये खूप ऊशीरापर्यंत थांबवून घेतले होते. सगळे निघून गेल्यानंतर मृण्मयीला ह्या औषधाचा जास्त डोस चहामधून मीच दिला. तिने गोळा केलेल्या पुराव्यांविषयी मी विचारले. त्यावेळेस मृण्मयीला मीसुद्धा ह्यामध्ये सामील आहे हे कळाले. मृण्मयीने मला हा सगळा प्रकार आणि पुरावे कंपनीच्या मालकांना आणि पोलिसांना देणार असल्याचे सांगितले. पण तोपर्यंत मी माझे काम केले होते. तिला कायमचे शांत करण्याचे औषध दिले गेले होते.” शिखाने मृण्मयी आपल्या करिअरमध्ये आणि आयुष्यात खूप मोठा धोका निर्माण करू शकते म्हणून तिचा खून केला हे मान्य केले.
शिखाला अटक करण्यात आली आणि कंपनीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली. अर्णवने पुन्हा एकदा आपली योग्यता सिद्ध केली.
मृण्मयीच्या हत्ये*मागील सत्य उघड झाल्यामुळे तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला होता. सत्याचा लढा मृण्मयी जिंकली होती ;मात्र ह्यासाठी मृण्मयीने आपल्या आयुष्याची आहूती देऊन न्यायासाठी फार मोठी किंमत मोजली होती. तरीही सत्य नेहमीच उघड होण्याचा मार्ग शोधते आणि ह्या केसमध्येही सत्याचा विजय झाला.
आहे ही कहाणी तिच्या बलिदानाची विजयाची
कुरूप वाईट असत्य विरोधात सत्याची लढाई
एक ज्योत निर्भीड सत्यासाठी ऊभी होती
असत्याच्या अंधाराला दूर करू पाहत होती
आरंभलेले सत्याचे युध्द अजूनही सुरूच होते
सत्याच्या प्रकाशाने असत्याला हरायचेच होते
क्रूर दुर्जनांनी फसवून घेतला होता तिचा बळी
सत्याच्या जयासाठी तिने प्राणांचीही आहुती दिली
तिच्या बलिदानाने सर्वांना सत्याची ओळख झाली
सत्यमेव जयतेची गाथा पुन्हा एकदा अमर झाली
__पुजा सारंग, मुंबई
खूप छान
धन्यवाद मॅडम 🙏🏻