सुरेखा आणि अविनाश दोघेही रेल्वेत बसले आणि सुरेखाने सुटकेचा निश्वास सोडला. याच दिवसाची ती अनेक दिवस वाट पाहत होती.लग्नाला जेमतेम २-३ वर्ष झालेली तिच्या.त्यांच्या लग्नानंतर लगेच तिचे वडील गेले.त्यामुळे तिची आई गावाला एकटीच राहत होती आणि वयोमानाप्रमाणे तब्येतीच्या काहीतरी कुरबुरी सुरूच असायच्या. त्यामुळे सुरेखाला राहून राहून आईची काळजी वाटत राहायची.आज काहीही झाले तरी ती तिच्या आईबद्दल त्याच्याशी बोलणार होती,पण मनात एक प्रकारची अनामिक भीती वाटत होती.”असे कितीसे ओळखतो आपण एकमेकांना आणि सासूबाईंचे तर काही कळतच नाही… त्या आहेत तशा समजूतदार पण तरीही कधी कधी वाटते,आईचा विषय त्यांच्यासमोर काढूयात नको …” ती मनाशीच पुटपुटली.
अविनाशने हळूच सुरेखाकडे पहिले,तो हसत होता.तसे आज फक्त दोघेच खूप दिवसांनी सुरेखाच्या माहेरी चालले होते.पण सुरेखाच्या चेहऱ्यावरचे भाव थोडे काळजीचे आणि वैतागल्याचेच होते. त्याने त्याचा हात तिच्या खांद्यावर सरकवला आणि म्हणाला … “आज पहिल्यांदा दोघे बाहेर पडलोय, मस्त गप्पा मारत जाऊ,काही खायचेय का तुला ..? आणि कसला विचार करतेयस?आई होईल बरी … नको काळजी करुस?सुरेखाने कसनुसं हसत अविनाशला प्रतिसाद दिला आणि म्हणाली, ” अहो ,थोडी केळी आणि चिप्स असे काही मिळाले तर बघा ना, सोबत डबा आहेच , पहाटेच पोहोचू आपण गावी, पण ट्रेन लेट झाली तर असावे काहीतरी सोबत….!!” अविनाश ठीकाय म्हणाला आणि खाली प्लॅटफॉर्मवर उतरला.
सुरेखा पुन्हा विचारचक्रात अडकली.काल ऑफिसमध्ये रामदादांचा फोन आला आणि काल सकाळचा सगळा प्रसंग तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला. काल सकाळी ती ऑफिसला पोहचली. सोबतच्या मैत्रिणींसोबत थोड्या कामाच्या गप्पा झाल्या, तिने कामाची फाईल समोर ओढली आणि तिचा फोन वाजला. गावाकडे….माहेरी शेजारी राहणाऱ्या रामदादाचा फोन होता.
” सुरेखाताई, विमल मावशीची परिस्थिती बघवत नाही गं आता..!! , एकदा येऊन बघून जा,… शक्य झाले तर ह्यावेळेस तिला सोबतच घेऊन जा , तुझाही संसार आहे मला माहिती आहे , पण बघ काही मार्ग काढता येतोय का ?” सुरेखाचे डोळे भरून आले. ती पुढे ऐकत राहिली.” तुझा मोठा भाऊ, जाऊन बसला अमेरिकेत… तो इकडे फिरकेना,अडीनडीला आम्ही आहोतच गं,पण म्हातारीला आता सोबतीची गरज आहे… बघ मग…. ये लवकरात लवकर, ठेवतो फोन…” असे म्हणून रामदादानी फोन ठेवला.
सुरेखा खूप अस्वस्थ झाली आणि मनाशीच म्हणाली, “नाही….नाही…, आता काहीतरी निर्णय घ्यायलाच हवा आणि तो अविनाशला सांगायलाच हवा.आधी उद्या जाऊन तरी येऊ म्हणून तिने लगेच अविनाशला फोन केला आणि रामदादाच्या फोनबद्दल आणि आईच्या प्रकृतीबद्दल त्याला जुजबी माहिती दिली आणि तात्काळ मध्ये कोल्हापूरकडे जाणाऱ्या कुठल्याही ट्रेन चे तिकीट बुक करण्यास सांगितले.
संध्याकाळी ऑफिसवरून घरी पोहचल्यावर अविनाशही सोबत येतोय म्हंटल्यावर तिलाही थोडेसे हायसे वाटले . त्याचे ऑफिसचे कोल्हापूरला काम होते आणि तिला सोबतही होईल असे म्हणून त्यानेही बॅग भरली. सुरेखाच्या डोक्यात घोळणारा विचार परत उसळी मारून वर आला. रामदादाशी फोनवर बोलणे झाल्यापासून तिचा निर्णय खरे तर पक्काच झाला होता.पण अविनाशला काय वाटेल?त्याला आवडेल का?आणि सासूबाई…. त्यांना चालेल का ?
पुढची आयुष्यभराची सगळी जबाबदारी आपल्यावरच असेल,एक ना धड अनेक विचार…कशा असतो ना आपण बायका, सतत आपला दुसऱ्याचा विचार,याला काय वाटेल,त्याला काय वाटेल,सतत द्विधा मनस्थिती …!!!!,मी जर माझ्या सासूबाईंना आई म्हणून ट्रीट करतेय तर माझ्या आईला स्वीकारायला अविनाशला काय प्रॉब्लेम आहे?अविनाश तसा प्रेमळ आणि समजूतदार आहे पण तरीही कधी कधी मी त्याला अजूनही ओळखत नाही असेच वाटतेय…. जाऊ दे. …..पण अनायसे उद्या दोघेही एकत्रच आहोत तर उद्याच ट्रेनमध्ये सविस्तर बोलता येईल… ” या विचाराने तिला हायसे वाटले आणि आईच्या बाबत काय निर्णय घायचा,अविनाशशी कसे आणि काय बोलायचे याची उजळणी करतच ती झोपी गेली होती. आणि आज… आता… दोघेही एकत्र प्रवास करत होते.
अविनाश कॉफीचे दोन ग्लास आणि थोडाफार खाऊ घेऊन वर आला. त्याने कॉफीचा एक ग्लास तिच्या हातात दिला . एव्हाना ट्रेनने वेग घेतला होता . बाहेरुन येणाऱ्या हवेच्या थंड झुळुकीबरोबरआणि गरम कॉफीच्या घोटासोबत तिला थोडे बरे वाटले आणि मनही थोडे शांतावले.अविनाशने हसून सुरेखाकडे पाहीले,कॉफीचा ग्लास तोंडाला लावत अविनाश तिच्याकडे पाहत विचार करत राहिला …..”एका लहानशा गावातून आलेली ही मुलगी… लग्नानंतर किती एकरूप झाली माझ्याशी… माझ्या घरच्यांशी … सगळ्या जबाबदाऱ्या अगदी हसून खेळून पार पाडते नेहमी … तिचे ऑफिस , माझ्या आईची काळजी , सगळ्यांचे करते अगदी मनापासून ….
आईच्या काळजीने तिचा धास्तावलेलला चेहरा पाहून त्यालाही वाईट वाटले.तिच्या मनातली चलबिचल त्याने ओळखलीच होती, तिने तिच्या खांदयावर थोपटून तिला धीर दिला आणि म्हणाला , “मग काय ठरवतेयस आईबद्दल?…” , श्रेयस बद्दल म्हणजे सुरेखाच्या भावाबद्दल तो थोडेफार ऐकून होता,त्याने त्याची पूर्ण जबाबदारी टाळली होती ते आणि तो आता परत कधीच येणार नाही. सुरेखाचे वडील,तात्या गेल्यानंतर तर सुरेखाची आई पूर्णतः एकटीच पडली होती.अविनाशने थेट आईबद्दल विचारल्यावर तिचे डोळे परत एकदा भरून आले. तो पुढे म्हणाला,” गावात सगळी व्यवस्था करावी लागेल ना?रोजचे खाणे-पिणे,औषध पाणी,घरादाराची व्यवस्था आणि हो…!!सगळ्यात महत्वाची सोबत…कुणीतरी मिळेलच ना गावात?दर महिन्याला काहीतरी रक्कम ठरवून एखादी व्यक्ती बघता येईल ना …?”
सुरेखाने कॉफी संपवून त्याच्याकडे पाहिले आणि मनात विचार केला,”हीच संधी आहे,आपल्या मनात काय चाललेय ते त्याला सांगायची…. “पण अविनाश,आईची गावातच काहीतरी व्यवस्था करायला हवी याच दृष्टीने बोलतोय असे वाटून तिचा निर्णय तिच्या मनातच राहिला. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत त्याने “थोड्या दिवसांकरिता का होईना आईला आपण सोबत घेऊन जाऊ असे म्हणायला तरी काय हरकत आहे ?…”असा विचार करून ती वैतागलेल्या चेहऱ्याने म्हणाली ” बघू … कसे होतेय…..?घरी पोहचल्यावर ठरवेन…..आणि अविनाश,अहो गावाकडे नसते हे असे काही..!!ही केअर-टेकर संकल्पना वैगेरे शहरातच… हे फॅड आमच्या गावात तरी नाही अजून …. हक्काने येऊन सवड काढून ज्याला जसे जमेल तशी मदत करून जातात सगळी आईला,शिवाय विनामोबदला….!!येता -जाता चौकशी करतात,काही हवे असेल तर आणून देतात,रात्रीच्या वेळी जेवणं झाली कि सगळे एकत्र मिळून गप्पा मारतात.
थोडा उशीर झाला तर त्याचे चार्जेस वैगेरे नसतात हा आमच्याकडे …!! ” घरच्या आठवणी तिच्या मनात चिंब दाटून आल्या आणि सोबत आईची काळजी पण पापण्यांमधुन वाहू लागली.अविनाश हळूच तिच्याजवळ सरकलाआणि तिचा हात आश्वासकपणे हातात घेऊन त्याने हळुवारपणे दाबलाआणि वातावरणात थोडी मोकळीक यावी म्हणून म्हणाला ,” गावाला मजा असते नाही !!, मग काय बाईसाहेब, गावी पोहचल्यावर आमच्याकडे लक्ष असू द्या म्हणजे झाले….नाही म्हणजे मी पण सोबत असणार आहे, हे विसरू नकोस….. ” हे एकूण सुरेखाही थोडी मोकळी होत मनापासून हसली.
सकाळी ६-७ पर्यंत ते दोघेही गावात पोहचले… सुरेखाला बघून विमलताईंना खूप आनंद झाला.कित्येक दिवसांनी त्यांच्या सुरकुतलेल्या आणि वाळून गेलेल्या चेहऱ्यावर हसू आले.स्वतःमध्ये करायची कसलीही ताकद न्हवती पण जावईबापू आलेत म्हंटल्यावर त्यांनी त्यांची मैत्रीण जिजाक्काला सांगून सगळी जेवणा-खावणाची व्यवस्था केली होती.अविनाश तर मजेतच होता.विमलताईंना तर सुरेखाचे किती लाड पुरवू अन किती नको असे झाले होते.सुरेखाने पण त्या दोन-तीन दिवसात आईची उत्तम काळजी घेतली.मध्येच ती अविनाशला म्हणाली पण ” तुमचे कोल्हापूरला ऑफिसचे काम होते ना ? ” तर स्वतःशीच गाणे गुणगुणत तो सुरेखाला म्हणाला ” अगं,ते झाले फोनवर काम,त्यामुळे जायची गरज नाहीये आता कोल्हापूरला …” आणि त्याने सुरेखाकडे डोळे मिचकावून हसून पाहिले.
मुंबईला जाण्याच्या आदल्यारात्री रामदादा, त्याची बायको, विमलताई आणि त्यांची मैत्रीण जिजाक्का सगळ्यांनी एकत्र जेवण केले . मस्त गप्पांचा डाव रंगला . विमलताई भरले घर कौतुकाने न्याहाळत होत्या आणि मध्येच शांत होत होत्या . सुरेखाची पण अवस्था खूपच बिकट झाली होती. तिला काय करावे सुचतच न्हवते.आईला अशा परिस्थितीत एकटे सोडून जाणे तिला जमेल असे वाटत न्हवते. सगळी आवराआवरी झाल्यावर जिजाक्का जायला निघाल्या.त्यांना सोडायला म्हणून बाहरेच्या सोप्यात सुरेखा सोबत गेली. “सुरेखा,पोरी,…. आईची दशा बघत्यास ना .. सोबत माणूस -काणूस आसल तर ह्यो म्हातारा जीव रमत्योय बघ,… न्हाय तर मरणाची वाट बघत पडून राहणं लयी वंगाळ … आम्ही काय आपलं …आज हाय तर उद्या न्हाय… तिला बी जावयाच्या घरी सुखानं राहता याचं न्हाय…लहानपणापासनं आम्हाला तेच सांगितलंय न्हवं …लग्नानंतर लेक परकी .. तरी बी लेकीचं काळीज राहतंय का? ती आपली… पण जावई कुणाचा न्हाय …?पण बघ,न्ह्याची आसशील तर घिऊन जा वाईच थोड्या दिसाकरता….”सुरेखाच्या पाठीवर मायेने हात फिरवित जिजाक्का म्हणाल्या.
सुरेखाने तो हात हातात घेतला आणि डोळ्यातले पाणी वाहू देत ती जिजाक्काला म्हणाली,”जिजामावशी,मला सगळ कळतंय गं,….आणि माझा निर्णय पण झालाय,पण अविनाशशी ह्या गोष्टी कशा बोलायच्या काही कळतच नाही. लग्न झाल्यावर एवढ्या मर्यादा येतात का गं ?…. कि माझ्याच आईची मी काळजी घेण्यासाठी मला सासरच्या लोकांच्या परवानगीची गरज लागावी?अविनाश तसा समजून घेणारा आहे पण तरीही बोलताना सतत हा का विचार येतोय कि सासरच्यांना काय वाटेल? हे दडपण का येतेय मला ….?
सासरी गेल्यावर माहेर इतके दुरावते का?पूर्वापार चालत आलेल्या ह्या सगळ्या रूढी मनाच्या तळाशी किती खोल रुतून बसल्यात गं …?सासर आणि माहेर हे एकसंध कुटुंब का नाही होऊ शकत, … दोन्हीकडची माणसे एकमेकांच्या कुटुंबाचा का नाही भाग बनू शकत…? तिने ओलेत्या डोळ्यांनी स्फुंदून स्फुंदून आपल्या मनातला सल बोलून दाखविला. जिजाक्कानं तिला पोटाशी धरले,डोक्यावरून हात फिरविला आणि “नगं काळजी करुस, मी घेईन तिची काळजी,….तू तुझा संसार जप…”असा आशीर्वाद देऊन डोळे टिपत ती बाहेर पडली.
दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रेनच्या परतीच्या प्रवासात सगळं स्थिरस्थावर झाल्यावर सुरेखाने स्नेहार्द नजरेने अविनाशकडे पहिले आणि तिने त्याचा हात आपल्या हातात घेतला आणि प्रेमपूर्वक तो दाबत,ती त्याला म्हणाली” अविनाश,थँक यु सो मच “तुम्हाला माहित नाहीये तुम्ही माझा केवढा मोठा भार हलका केलाय,… मी माझा निर्णय बोलायच्या आतच तुम्हाला कसे कळले आणि हे सगळे कधी ठरले?” तिने डोळे पुसत पुसत अविनाशला विचारले. अविनाशने हळूच तिच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाला ,” सुरेखा आभार वैगेरे मानु नकोस ग , मी काही फार मोठे काम केले नाही , तू तुझे घर,तुझी माणसे सोडून माझ्या कुटुंबाचा भाग बनू शकतेस तर तुझ्या कुटुंबातली माणसे माझ्या कुटुंबाचा भाग का नाही बनू शकत?
त्या दिवशी रामदादांचा फोन तुला आला होता ना ….. त्यानंतर मलाही आला होता,मी त्याच दिवशी आईशी बोललो आणि आईनेपण मला अगदी बजावून सांगितले कि तुझ्या आईला सोबत घेऊन येच म्हणून,त्यामुळे येतानाच मी तिकिटे बुक केली होती आपली तिघांची…. त्याने डोळे मिचकावले आणि म्हणाला “आणि ऐक ना,सो सॉरी…तुला मी हे आधीच सांगितले नाही,खूप वेळा रडलीस ना तू आईच्या काळजीने … आणि तुझ्या निर्णयाचं मला आणि आईला नेहमीच कौतुकच वाटलं असतं, तू तुझा निर्णय सांगितला नाहीस पण मी तो आधीच ओळखला होता…. हाच होता ना निर्णय तुझा …??आता तरी खुश ना बाईसाहेब …. !!” सुरेखाला काय बोलावे तेच सुचेना… हे स्वप्नवत आणि आदर्शवत वाटावं असेच होते.
तिच्या मनात आपसूकच विचार झरत राहीले. “वास्तवात कुठे अशा गोष्टी घडतात?,कोण इतकी काळजी घेतं एकमेकांची?एकमेकांच्या मनातले ओळखायला तरी कुणाला इथे वेळ आहे….? खऱ्या व्यावहारिक आयुष्यात सासर आणि माहेर म्हणजे दोन ध्रुवावरची दोन टोकं..!! ,लग्नानन्तरच्या थोड्याच दिवसात सुरु होतो तो मानापमान,अपेक्षा ,एकमेकांना दोष देणे, हेवेदावे,अहंकार आणि समोरच्याला आपल्या मनाप्रमाणे बदलण्याची तीव्र चढाओढ…. हा खेळ मग रंगतच जातो. यात नाती कधी दुरावतात आणि कधी दुभंगतात कळतच नाही. जेव्हा कळते तेव्हा उशीर झालेला असतो आणि जिवाभावाचे हात निसटून गेलेले असतात. आपल्या कितीतरी मित्र-मैत्रिणींचे अनुभव आपण ऐकलेत ….” आणि मग सुरेखाला जाणीव झाली की अविनाशसारख्या जोडीदाराच्या रूपात आपल्याला आयुष्यात खूप काही मिळालेय.
तिचे लक्ष समोरच्या बर्थवर शांत मनाने,एखाद्या निष्पाप लहान बाळाप्रमाणे झोपलेल्या तिच्या आईकडे गेले.तीने अतीव समाधानाने अविनाशकडे पाहीले.तिच्या डोळ्यात त्याच्याबद्दल आदर,मायाआणि प्रेम एखाद्या झऱ्यासारखे पाझरू लागले.तिने हलकेच त्याच्या खांद्यावर डोके ठेवले. तिच्या आजवरच्या आयुष्यात प्रत्येक प्रसंगात आईच्या हातानी दिलेल्या आधारासारखाच तिला अविनाशच्या खांद्याचा आधार अजुन जास्त आश्वासक वाटला.निर्णय सुरेखाचा होता पण तो कृतीत अविनाशने आणला होता,त्याच्या ह्या वागण्याने ती आश्वस्त झाली होती, कारण सुरेखाच्या निर्णयाला अविनाशची साथ होती आणि त्या तिघांना घेऊन ट्रेन आता फक्त मुंबईतच थांबणार होती.
सावित्री (सुनिता पवार) ,अलिबाग.
छान आहे कथा 👌👌👌
अप्रतिम मॅम 👌👌👌👌👌
एकदम मस्त