प्रभू श्रीरामाच्या ‘अयोध्या ते लंका’ वनवासातील १० प्रमुख ठिकाणे | 10 Major Places of Sri Rama’s ‘Ayodhya to Lanka’ Vanvas (Exile)

WhatsApp Group Join Now

विषय –  प्रभू श्रीरामाच्या ‘अयोध्या ते लंका’ वनवासातील १० प्रमुख ठिकाणे

आज श्री रामनवमी! मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम हे भगवान श्रीविष्णूच्या दहा अवतारांपैकी सातवे अवतार मानले जातात. वडिल राजा दशरथ यांनी त्यांची पत्नी कैकेयीला दिलेले वचन पाळण्यासाठी श्रीरामाने राजसुखाचा त्याग केला. पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासोबत १४ वर्षांचा वनवास भोगला.

वनवास म्हणजे शब्दश: जंगलात किंवा वनात राहणे. १४ वर्षाच्या वनवासात श्रीराम कोणत्याही गावात, शहरात अथवा राजधानीत राहू शकत नव्हते. त्यामुळे हा संपूर्ण काळ ते नागरी वस्तीपासून दूर जंगलात, आश्रमात राहिले. ऋषीमुनींची सेवा केली. शेकडो राक्षसांना यमसदनास पाठवले. रावणाने सीतेचे हरण केले तर थेट लंकेमध्ये जाऊन त्यांनी रावणाचा वध केला.

आज या लेखामध्ये श्रीरामाच्या वनवासातील प्रमुख घटनांवर आधारित त्यापैकी प्रमुख १० ठिकाणांबद्दल थोडेसे जाणून घेऊ.  

वाल्मिकी रामायणाचा संदर्भ घेतला तर रामाचा ‘अयोध्या ते लंका’ हा प्रवास प्रामुख्याने आधुनिक भारतातील ६ राज्यातून जातो | 6 states of modern India through which Rama’s journey from Ayodhya to Lanka mainly passed

१.     उत्तर प्रदेश – अयोध्या, शृंगवेरपूर, प्रयागराज

२.     मध्य प्रदेश – चित्रकूट, दंडकारण्य

३.     छत्तीसगढ – दंडकारण्य

४.     महाराष्ट्र – दंडकारण्य, रामटेक, पंचवटी

५.     कर्नाटक – रामदुर्ग, हम्पी

६.     तामिळनाडू – रामेश्वरम्, धनुष्कोडी

या प्रवासादरम्यान श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांनी काही नद्या ओलांडल्या तर काही नद्यांच्या किनाऱ्यावर वास्तव्य केले. त्यांची नावे पुढीलप्रमाणे | Names of river which Shri Ram, Sita and Laxman crossed over or lived at the bank during their exile

१.      शरयू नदी (उत्तर प्रदेश)

२.      तमसा नदी (उत्तर प्रदेश)

३.      वेदश्रुती नदी (उत्तर प्रदेश)

४.      गोमती नदी (उत्तर प्रदेश)

५.      गंगा नदी (उत्तर प्रदेश)

६.      गंगा – यमुना संगम (उत्तर प्रदेश)

७.      यमुना नदी (मध्य प्रदेश)

८.      गोदावरी नदी (महाराष्ट्र)

९.      पंपा सरोवर (कर्नाटक)

श्रीरामाच्या १४ वर्षाच्या वनवासात काही प्रमुख घटना आणि ठिकाणांबद्दल वेगवेगळे संदर्भ उपलब्ध आहेत.

त्यापैकी निवडक १० स्थानांबद्दल आपण जाणून घेऊ, जेथे श्रीराम, सीता, लक्ष्मणाच्या वास्तव्याच्या खुणा अस्तित्वात आहेत | 10 prominent places where traces of residence of Shri Ram, Sita and Laxman exist

१.      अयोध्या – अयोध्या ही श्रीरामाची जन्मभूमी! शरयू नदीकिनारी स्थित ‘अयोध्या नगरीचा युवराज’ म्हणून श्रीरामाच्या नावाची घोषणा होणार हे निश्चित असताना राणी कैकेयीने राजा दशरथाला दिलेल्या वचनाची आठवण करून दिली. राजा दशरथाला हे मुळीच मान्य नव्हते. वडिलांना असे धर्मसंकटात पाहून श्रीरामांनी स्वत:हून युवराजपदाचा त्याग केला आणि वनवास पत्करला. त्यांच्यासोबत पत्नीधर्म निभावण्यासाठी सीता आणि बंधुधर्म निभावण्यासाठी लक्ष्मणसुद्धा अयोध्येहून निघाले.   

२.      शृंगवेरपूर – अयोध्याहून प्रयागराजला जाताना श्रीराम, सीता आणि लक्ष्मण शृंगवेरपूर येथे गंगाकिनारी आले. खरेतर त्यांना गंगा नदी ओलांडून पलीकडे जायचे होते. मात्र शृंगवेरपूरचा राजा ‘निषाददराज’ आणि त्याची प्रजा त्यांस गंगा नदी ओलांडू देत नव्हते. उलट रामाने वनवासाला न जाता तेथेच राहावे असा त्यांचा आग्रह होता. अखेरीस श्रीरामांनी त्या सर्वांना समजावले, वनवासाला जाण्याचे महत्व पटवून दिले. तेव्हा कुठे राजा ‘निषादराज’ आणि त्याच्या प्रजेने श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांना गंगापार नेण्याची व्यवस्था केली. श्रीरामांनी निषादराज यांना आपले मित्र मानले, व कायम त्या नात्याचा आदर राखला.

३.      प्रयागराज – अयोध्येहून निघल्यानंतर श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांनी वनवासातील पहिला मुक्काम प्रयागराज येथे केला. गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांच्या संगमाचे हे स्थान आहे. असे म्हणतात की श्रीरामांनी या ठिकाणी ऋषि भारद्वाज यांच्या आश्रमात भेट दिली. तेव्हा स्वत: ऋषि भारद्वाज यांनी त्यांस वनवासातील पुढील काही काळ चित्रकूट येथे व्यतीत करावा असे सुचवले.  

४.      चित्रकूट – उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांच्या सीमेवर चित्रकूट हे अतिशय पवित्र आणि नयनरम्य असे स्थान आहे. या ठिकाणी श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांनी अनेक वर्षे निवास केला. हे तेच स्थान आहे जेथे श्रीरामांची बंधू भरत यांच्याशी भेट झाली. भरताने श्रीराम यांना अयोध्येला परत येण्याची विनंती केली. परंतु वचनबद्ध अश्या श्रीरामांनी भरताच्या विनंतीला विनम्र नकार दिला. त्यानंतर भरत श्रीरामाच्या पादुका आपल्या मस्तकी धरून अयोध्येला परत आला. श्रीरामांना पिता दशरथ यांच्या मृत्यूची वार्ता इथेच समजली.

चित्रकूटमधील वास्तव्याच्या शेवटच्या काळात श्रीरामांनी अत्री ऋषींच्या आश्रमात काही काळ घालवला. येथे अत्री ऋषींनी श्रीरामांना ‘अक्षय्य भाता’ (ज्यामधील बाण कधीही संपत नाही असा भाता) दिला.

अत्री ऋषींच्या पत्नी देवी अनुसूया यांनी सीतेला ‘कधीही न मळणारे असे पवित्र वस्त्र आणि काही दिव्य आभूषणे’ दिली. तसे ‘पतिव्रताधर्मा’ची शिकवण दिली.

५.      दंडकारण्य – चित्रकूटनंतर श्रीराम, सीता आणि लक्ष्मण दंडकारण्याच्या निबीड जंगलात काही वर्षे राहिले. हे जंगल अतिशय भीषण आणि घनदाट असे होते. असे म्हणतात की आजच्या काळातील मध्यप्रदेशचा काही भाग, छत्तीसगढचा काही भाग आणि महाराष्ट्राचा काही भाग एवढ्या मोठ्या परिसरात हे जंगल पसरले होते. या दरम्यान श्रीराम आणि लक्ष्मण यांनी मिळून शेकडो राक्षसांचा वध केला. जे ऋषीमुनी यज्ञयाग करत होते त्यांना संरक्षण दिले.

६.      रामटेक – दंडकारण्यातून बाहेर पडून श्रीराम, सीता आणि लक्ष्मण रामटेक (नागपूर जवळ, महाराष्ट्र) या ठिकाणी वास्तव्यास आले. येथे अगस्ती ऋषि आणि श्रीराम यांची भेट झाली. अगस्ती ऋषी आणि इतर ऋषिगण रामटेक येथे आश्रमात यज्ञ करीत असताना राक्षस येऊन त्यात सतत विघ्न आणत होते. श्रीरामांनी असंख्य दुष्ट राक्षसांचा वध केला आणि यज्ञकार्य सुखरूप पार पाडण्यास मदत केली.

ऋषि अगस्ती यांनी श्रीराम यांना ब्रह्मास्त्र दिले. रावणाचा वध करण्यासाठी श्रीरामांनी याच ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. 

७.      पंचवटी – रामटेकनंतर श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांनी पंचवटी (आताचे नाशिक) या ठिकाणी बराच काळ वास्तव्य केले. बंधू लक्ष्मण यांनी बांबू आणि अन्य वनस्पतींचा वापर करून निवासासाठी सुंदर असे कुटीर (झोपडी) तयार केले. लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक कापण्याची घटना इथेच घडली. त्याचा बदला घेण्यासाठी रावणाने सीतेचे पंचवटीच्या कुटिरा बाहेर हरण केले.

८.      रामदुर्ग – सीता नाहीशी झाली हे कळताच श्रीराम आणि लक्ष्मण सीतेचा शोध घेऊ लागले. मार्गतच त्यांना जटायुकडून ‘रावणाने सीतेचे कपट करून हरण केल्याचे’ समजले होते. तसेच ‘तो सीतेला पुष्पक विमानात बसवून दक्षिण दिशेला गेला’ हेसुद्धा समजले होते. सीतेचा शोध घेता घेता ते रामदुर्ग (कर्नाटक) या ठिकाणी पोहोचले. तेथे शबरी देवीच्या आश्रमात शबरीमाता श्रीरामाची वाट पाहत होती. श्रीराम यांनी आपली परमभक्त शबरीची उष्टी बोरे इथेच खाल्ली. शबरीने रावणाची शक्ति आणि अहंकार याबद्दल श्रीरामांना सावध केले आणि दक्षिण-पूर्व दिशेला जाण्याचा सल्ला दिला.

९.      हम्पी – शबरीच्या मार्गदर्शनानुसार श्रीराम आणि लक्ष्मण हे किष्किंधा नागरी (आताचे हम्पी, कर्नाटक) या ठिकाणी येऊन पोहोचले. येथे श्रीरामाचे परमभक्त हनुमान यांची भेट झाली. वानरराज बालीचा वध, सुग्रीवाचा राज्याभिषेक या सर्व घटना इथेच घडल्या. श्रीरामांनी या सर्वांना ‘रावणाने सीतेचे हरण केल्याचे’ सांगितले तेव्हा हनुमानाने त्यांना सीतेने आकाशमार्गे जाताना ठिकठिकाणी फेकलेली आभूषणे दाखवली. सीतेची आभूषणे श्रीरामांनी बरोबर ओळखली. त्यामुळे सीतेला शोधण्यासाठी पुढची योजना निश्चित झाली.

१०.  रामेश्वरम् – सीतेचा शोध घेत घेत श्रीराम, लक्ष्मण आणि सारी वानरसेना दक्षिणेच्या समुद्र तटावर येऊन पोहोचली. येथून पुढे समुद्रपार करून लंकेत जायचे होते. समुद्रदेवाच्या सूचनेनुसार ‘भारताचा दक्षिण तट ते लंका’ असा एक सेतु बांधण्याचे ठरले. श्रीरामांनी या कार्यात यश मिळावे यासाठी या ठिकाणी भगवान शिवशंकराची स्थापना केली आणि पूजा केली. त्यानंतर वानरसेनेतील दोन शिलेदार नल आणि नील (जे विश्वकर्माचे मानसपुत्र होते) यांच्या दिव्य गुणांच्या मदतीने दक्षिण सागरावर लांबलचक असा दगडी सेतु बांधण्यात आला. त्यावरून चालत जाऊन श्रीराम, लक्ष्मण आणि वानरसेनेने लंकेवर आक्रमण केले. युद्ध करून रावणाचा वध केला आणि सीतेची मुक्तता केली.

रामायण हे आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीचा अविभाज्य आणि पूजनीय घटक आहे. रामायण सत्य आहे की मिथक यावर अनेकवेळा उलट सुलट चर्चा होत असतात. मात्र रामायणामध्ये उल्लेख केलेली रामाच्या वनवासातील अनेक ठिकाणे अगदी आजच्या काळातही आढळतात हे सत्य आहे.

श्रीरामाच्या अयोध्या ते लंका वनवासातील १० प्रमुख ठिकाणे | १० Major Places of Sri Rama’s ‘Ayodhya to Lanka’ Exile याबद्दलचा हा लेख कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला या लेखाबद्दल काही सूचना करायच्या असतील तर तुमच्या सूचनांचे स्वागत आहे.

विविध विषयांवरील माहितीपूर्ण लेख तसेच कथा वाचण्यासाठी आमच्या लेखक मित्र या वेबसाईटला भेट देत रहा तसेच आमचा whatsapp ग्रुप जॉइन करा.

धन्यवाद!

2 thoughts on “प्रभू श्रीरामाच्या ‘अयोध्या ते लंका’ वनवासातील १० प्रमुख ठिकाणे | 10 Major Places of Sri Rama’s ‘Ayodhya to Lanka’ Vanvas (Exile)”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top