अनुत्तरित – New Marathi Story for Reading

WhatsApp Group Join Now

हवेत कमालीचा गारठा होता. पाचगणीची थोडीशी गावाबाहेर असलेली, बैठे बंगले आणि रो हाऊसेसची कॉलनी धुक्याची दुलई पांघरुन गुडुप झोपल्यासारखी शांत दिसत होती. पुण्या-मुंबईच्या लोकांनी सेकंड होम म्हणूनच इथे घरं बांधली होती. वीकएंडला किंवा जोडून सुट्टी असेल तेव्हा बहुतेक मंडळी इथे यायची. कदाचित थंडी जास्ती होती म्हणून असेल, पण आज कॉलनीत कुठेच हालचाल दिसत नव्हती.

अपवाद त्या टोकाच्या ‘साफल्य’ बंगल्याचा.तिथे मात्र दिवे दिसत होते, जे आजूबाजूचा घनदाट काळोख जास्तच अधोरेखित करत होते.

त्या सुबक छोटेखानी बंगल्याचा मालक राघव आणि त्याची पत्नी नंदिता, जुहूला एका आलिशान कॉम्प्लेक्समध्ये रहात होते. त्यांच्याच कॉम्प्लेक्समध्ये रहाणारे आणि राघवच्याच बड्या मल्टिनॅशनल कंपनीत कामाला असणारे त्याचे दोन मित्र, मयूरेश आणि संदीप आपापल्या फॅमिलीज् बरोबर साफल्यला आले होते. त्यांच्याबरोबर मयूरेश आणि सानिकाची चार वर्षांची मुलगी स्वरा आणि संदीप-नेहाचा तीन वर्षांचा मुलगा यश पण आले होते. सगळी मंडळी त्या अतिशय कलात्मक पद्धतीने सजवलेल्या दिवाणखान्यात बसली होती. किशोरीताईंच्या मारव्याच्या स्वर्गीय सुरांनी वातावरण थोडं गूढ बनवलं होतं.

या अश्या थंडीत, नंदिताने बनवलेल्या अतिशय टेस्टी बटाटेवड्यांचा आणि वाफाळलेल्या चहाचा आस्वाद सगळेजण घेत होते. जोडीला गप्पा आणि हास्यविनोद होतेच.

संदीप आणि मयूरेशचे पण महाबळेश्वर आणि लोणावळ्याला बंगले होते. प्रत्येक महिन्यात एका वीकएंडला आलटून-पालटून एकेकाच्या बंगल्यावर सगळ्यांनी जमून दोन दिवस मस्त धमाल करायची आणि महिन्याभराची एनर्जी साठवून न्यायची असा त्यांचा अलिखित नियमच बनला होता.

आत्ता नंदिता अगदी प्रेमाने यश आणि स्वराला खास त्यांच्यासाठी आणलेला खाऊ भरवत होती. त्या दोघांचीही ती अगदी लाडकी नंदूमावशी होती. एकवेळ आईने सांगितलेलं ती दोघं ऐकायची नाहीत, पण मावशीचं मात्र सगळं विनातक्रार ऐकायची. मुंबईलासुध्दा त्यांच्या आया, नंदिताकडे मुलं असली की अगदी निर्धास्त असायच्या.

संदीपने तेवढ्यात राघवला विचारलं, “अरे, तुझी सोमवारी कधीची फ्लाईट आहे?”

यावर थोडयाश्या नाराजीच्या स्वरात नंदितानेच उत्तर दिलं, “संध्याकाळी सातलाच निघणार आहे राघव. पुढचे दहा दिवस इथे नसणार तो. मी काय म्हणते, तुम्ही तिघं तुमच्या ऍडमिनकडे तक्रार का नाही करत या सततच्या परदेशवाऱ्यांबद्दल?”

यावर राघव हसून म्हणाला, “अगं, चार-पाच महिन्यांतून एकदा फक्त जावं लागतं मला. आपल्या लग्नानंतर पाच-सहा वेळाच तर गेलो असेन मी. एकदा तुम्ही कंपनीचे एम्प्लॉयी झालात की कंपनीचे नियम पाळावेच लागतात, मग तुमची कुठलीही पोस्ट असू दे.”

यावर नंदिता म्हणाली, “पाच-सहा वेळा नाही, उद्याची तुझी आठवी परदेशवारी आहे.”

हे ऐकून संदीप नेहाला चेष्टेत म्हणाला, “बघ, बघ, राघव दहा दिवस नाही म्हणून नंदिता किती कासावीस होतीये. नाहीतर तू! मी जेव्हा टूरवर जातो तेव्हा तू मस्त मैत्रिणींबरोबर एन्जॉय करत असतेस.”

“आपल्यासारखी त्या दोघांच्या लग्नाला आठ वर्षं होतील ना, तेव्हा नंदिता पण असंच एन्जॉय करायला शिकेल.”

नेहाच्या या बोलण्यावर सगळेच हसले.

तेवढ्यात सानिका नंदिताला म्हणाली, “राघव इथे नसताना आम्ही एवढे सगळे तुझ्याबरोबर असतो की! तुला एकटं वाटायचं कारणच काय? आणि तरीही कधी एकटं वाटलंच, तर तुझी ‘म्युझिक थेरपी’ आहेच की.”

ते मात्र अगदी खरं होतं. नंदिता अतिशय नावाजलेली म्युझिक थेरपिस्ट होती. ती स्वतः संगीत विशारद होती. आघाडीची शास्त्रीय गायिका म्हणून लोकं तिला नावाजत होतीच. पण त्याबरोबरच तिच्या म्युझिक थेरपीने खूप लोकांना विविध मानसिक व्याधींबरोबरच काही विशिष्ठ शारीरिक व्याधींपासूनही मुक्तता मिळवून दिली होती. आजकालच्या या हरतऱ्हेच्या स्पर्धेच्या युगात अगदी लहान वयापासून,मनःस्वास्थ्य बिघडलेली कितीतरी लोकं तिच्या थेरपीने बरी झाली होती.

ती स्वतः मात्र अगदी हळव्या स्वभावाची होती. तिच्या सान्निध्यातल्या प्रत्येक गोष्टीवर अगदी जिवापाड प्रेम करणारी, राघव म्हणजे तर अगदी जीव की प्राण असणारी, अगदी छोट्या-छोट्या गोष्टीही त्याला विचारुन, सांगून करणारी, पण त्याचबरोबर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली नंदिता..राघवला तर जणू स्वर्ग दोन बोटं उरला होता. त्यांच्या लग्नाला जवळपास तीन वर्षं झाली होती पण दिवसेंदिवस त्यांचं प्रेम कणाकणाने वृद्धिंगतच होत होतं. त्यामुळेच राघवचं टूरवर जाणं नंदिताला नेहमीच बेचैन करायचं. आत्ता तिच्याकडे पाहताना राघवच्या मनात नकळत तिचा भूतकाळ उभा राहिला.

नंदिताचं बालपण…तिच्या निरागस, कोवळ्या मनाच्या पार चिंधड्या उडालेलं तिचं बालपण. तिचा जन्म दिल्लीचा.घरी आई-वडील आणि ती असे तिघेच.

दोघंही नोकरी करणारे. नंदिताला साधारण कळायला लागल्यापासून ती सतत आपल्या आई-वडिलांची होणारी टोकाची भांडणंच बघत आली होती. नंदितासमोर आपण कसं वर्तन करतोय याचं भान त्या दोघांनाही नसायचं. संतापाच्या भरात तिचे वडील काही वेळा तिच्या आईवर हात उचलायलाही मागेपुढे बघायचे नाहीत. त्या वेळी रागाने विकृत झालेला त्यांचा चेहरा नंदिताच्या मनावर जणू जळत्या रेषांनी कोरला गेला होता. कित्येकवेळा तो चेहरा आठवून ती झोपेतून दचकून जागी व्हायची. दुर्दैवाची बाब म्हणजे तिच्या आईलाही तिच्याविषयी जराही ममता, प्रेम नव्हतं. कदाचित तिच्या आईच्या या कोमल भावना करपून गेल्या होत्या. उलटपक्षी स्वतःच्या नवऱ्यावरचा राग ती या कोवळ्या जीवावर काढत होती, आणि एक दिवस ती हे घर सोडून गेली. कुठे? नंदिता हे कोणाला विचारणार? लगेचच तिच्या वडिलांनी तिची रवानगी हॉस्टेलवर केली.

नंदिताच्या मनावर या सगळ्याचा खोल ठसा उमटला होता. पण हळूहळू हॉस्टेलच्या मैत्रिणींच्या सहवासात ती सावरली. तिला अतिशय सुंदर आवाजाची देणगी लाभली होती. शिवाय अगदी लहान असल्यापासून तिला हे जाणवलं होतं की, कुठलंही गाणं ऐकलं की आपल्याला छान वाटतं, एकटेपणा जाणवत नाही. त्यामुळे ती तिच्या खोलीत असलेल्या रेडिओवर खूप गाणी ऐकायची. त्याबरहुकूम स्वतः म्हणण्याचा प्रयत्न करायची. हळूहळू गायनकलेत तिची लक्षणीय प्रगती व्हायला लागली. दहावी झाल्यावर तिने याच क्षेत्रातील पदवी संपादन करुन आपल्या करिअरची दिशा सुनिश्चित केली. शास्त्रीय गायनाचे तिचे क्लासेस अगदी जोरदार चालायला लागले होते. शिवाय म्युझिक थेरपीचा कोर्स करुन थेरपिस्ट म्हणून तिने चांगलंच नाव कमावलं होतं. जोडीला गायनाच्या मैफिली होत होत्याच.

नागपूरला अशाच एका मैफिलीच्या वेळेस राघवची आणि तिची ओळख झाली. राघव मूळचा नागपूरचा होता. ऑफिस मुंबईत असल्यामुळे एकटाच मुंबईत रहात होता.आई-वडील नागपूरला असायचे. त्यांना भेटायला इथे बरेचदा त्याचं येणं व्हायचं.

पहिल्याच भेटीत दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडली. त्यांची लग्नापर्यंतची वाटचाल खूप पटकन आणि सुकर झाली. राघवला मात्र तिने स्वतःची सगळी पार्श्वभूमी स्पष्टपणे सांगितली होती. अर्थात त्याच्या नकाराचा सवालच नव्हता. त्याच्या आई-वडिलांनी हे सर्व ऐकून सुरुवातीला थोडासा विरोध केला होता. पण प्रत्यक्षात तिला भेटल्यावर मात्र तिचं वागणं, बोलणं, दिसणं यामुळे ते इतके प्रभावित झाले, की त्यांचा क्षीण विरोध क्षणार्धात मावळला. लग्नानंतर राघवच्या प्रेमाच्या वर्षावात नंदिता पुरती न्हाऊन निघाली होती. आधी तिला जे मानसिक क्लेश सहन करावे लागले होते, त्याची पुरेपूर कसर भरुन काढणारं सुखाचं दान तिच्या ओंजळीत आता भरभरुन पडत होतं. त्या दोघांनी एकमात्र ठरवलं होतं, नंदिताच्या पूर्वायुष्याचा उल्लेख कधीही, कोणासमोर तर नाहीच, पण आपसात बोलतानाही करायचा नाही. जे सावट आता पूर्णपणे नष्ट झालं होतं, त्याच्या आठवणींची सावलीही आत्ताच्या सोनेरी, झळाळत्या आयुष्यावर त्यांना पडू द्यायची नव्हती.

नंदिताला, आईवडिलांसकट कोणीही नातेवाईक नाहीत असंच त्यांनी सगळ्यांना सांगितलं होतं.आत्ता तिच्याकडे बघताना त्याला एकदम गलबलून आलं. कोणाचं लक्ष नाही असं बघून त्याने हलकेच तिचा हात हातात घेतला. त्या स्पर्शातील अपार प्रेम अचूक जाणवून नंदिता नव्याने सुखावली.

दहा वाजायला आले तसा मयूरेश, स्वरा आणि नीलला झोपायला जाण्याच्या सूचना करायला लागला. त्या दोघांची मस्ती मात्र संपत नव्हती. सानिका आणि नेहा कुठल्यातरी कपड्यांच्या सेलचं डिस्कशन करत होत्या. राघव आणि संदीप, उद्या कोणते डॉक्युमेंट्स बरोबर न्यायचे ते ठरवत होते, आणि या सगळ्या आपल्या माणसांमुळे घराला आलेली सुखासमाधानाची शोभा, नंदिता आपल्या पाणावलेल्या डोळ्यांत साठवून ठेवत तशीच बसून होती.

दुसऱ्या दिवशी सगळे मुंबईला परतले.

संध्याकाळी राघवला अगदी जड अंतःकरणाने एअरपोर्टवर सोडून नंदिता आपल्या वॉर्डरोबसमोर उभी होती. या क्षणी तिच्या चेहऱ्यावर अतिशय विलक्षण भाव होते. विचारांचा प्रचंड झगडा आत्ता तिच्या मनात चालू होता. ती अगदी निकराने कशाचा तरी प्रतिकार करत असल्याच्या खुणा तिच्या चेहऱ्यावर उमटत होत्या. मध्येच तो चेहरा वेदनेने पिळवटून निघत होता. शेवटी तिचा निरुपाय झाल्यासारखा तिने वॉर्डरोबचा आतला चोरकप्पा उघडला. आतून एक चपटी, छोटी बॅग बाहेर काढली. थरथरत्या हातांनी ती उघडली.

आतमध्ये निळ्या रंगाचा एक रेशमी स्कार्फ होता आणि कसलेतरी पेपर्स होते. राघव जेव्हा टूरवर जायचा तेव्हा नेहमीच तिला ह्या मानसिक झगड्याला सामोरं जावं लागायचं. राघव इथे असला की तिला अगदी आश्वस्त, सुरक्षित वाटायचं. पण तो नसताना एक अशी उर्मी तिच्या मनात दाटून यायची की तिच्या मनावरचा तिचा ताबा नाहीसा व्हायचा आणि एकप्रकारची विकृती तिच्यावर अंमल गाजवायला लागायची. बरेचदा तिने यावर मातही केली होती. पण दोन वेळा तिचा अगदी सपशेल पराभव झाला होता. आजची पराभवाची ही तिसरी वेळ होती.

ते पेपर्स म्हणजे एक रिपोर्ट होता, दिल्लीच्या ‘कॉसमॉस मेंटल हेल्थ’ सेन्टरचा. नंदिता नव्वद टक्के बरी झाल्याचा रिपोर्ट. अजून थोडे दिवस ट्रीटमेंटची गरज होती. पण राघवशी ओळख झाल्यावर, हे जर त्याला कळलं तर तो आपल्यापासून दुरावेल, या भीतीने तिने ट्रीटमेंट अर्धवट सोडली होती.

तिची थेरपीही तिच्या मानसिक असंतुलनासाठी कुचकामी ठरली होती.

तिने तो स्कार्फ हातात घेतला. पुढचं काम तसं सोपं होतं. कुठलीही निर्जन बाग किंवा समुद्रकिनारा गाठायचा आणि एकटा मध्यमवयीन पुरुष आढळला की तो बेसावध असताना त्याच्या गळ्याभोवती स्कार्फ आवळायचा, बस्स! त्यावेळी वेदनेने आणि मरणाच्या भीतीने गोठलेल्या त्याच्या चेहऱ्यात तिला आपल्या वडिलांचा चेहरा दिसला की मग तिला एकप्रकारचं असीम मानसिक समाधान मिळायचं.

याचा शेवट काय? राघवला कळलं तर त्याची प्रतिक्रिया काय? ही विकृती संपेल का अजून तीव्र स्वरुप धारण करेल?

सध्यातरी सगळे प्रश्न अनुत्तरितच होते.

-समाप्त

(कथेमध्ये नाट्यमयता आणण्यासाठी शेवटी थोडा अतार्किक आधार घेतला असला तरी प्रत्यक्षातसुध्दा, लहान मुलांच्या संवेदनक्षम वयात त्यांच्या मनावर झालेला एखादा आघात, पालकांमधील बेबनाव, त्यांच्या मनावर खोल ठसा उमटवू शकतो. त्यामुळे अशी दुभंगलेली व्यक्तिमत्त्व पहायला मिळतात. यावरची तुमची मतं ऐकायला आवडतील. कथा आवडल्यास जरुर शेअर करा. अश्या नवनवीन कथा आणि माहितीपूर्ण लेखांसाठी आमच्या वेबसाईटला जरुर भेट द्या.)

महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे आहेत. लेखिकेने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखिकेच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)

9 thoughts on “अनुत्तरित – New Marathi Story for Reading”

  1. सुरेख मांडणी. वेगळा विषय…नवीन कथेची आतुरतेने वाट बघत आहे.

  2. Anita Rajopadhye

    खरच थरारक आहे, म्हणजे बघ ना माणसाच्या मनात कित्येक गोष्टी दाबून ठेवलेल्या असतात, त्याचा कसा विस्फोट होईल आणि काय स्व समाधान मिळविण्या साठी कोणत्या थराला मन नेईल सांगता येत नाही.
    म्हणजे कथा वाचताना शेवट असा भयंकर असेल अशी कलपना नव्हती.
    मस्तच कथा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top