कथा एका ध्येयवेड्या स्त्रीच्या आंतरिक संघर्षाची…!!
समुद्राच्या लाटांची गाज ऐकत समीर नमिता ची वाट बघत होता. दोन वर्षांनंतर तो तिला भेटणार होता .लांबूनच त्याला नमिता सारखी आकृती दिसली .जवळ येताच त्याने ओळखलं..नमिताच ती..केसांचा लांबसडक शेपटा तिला तेव्हा ही नकोसा वाटायचा ..पण केवळ आपल्यासाठी ती ती वागवत होती. नमिता जवळ येताच म्हणाली, “समीर मला उशीर झाला नाही .””फार नाही ,पण वाट पहावी लागली “!आणि तो तिच्याकडे बघतच राहिला..अंगकाठी फारशी बदलली नसली तरी केसांचा बॉबकट, कपाळावर असणारी नकळत लहानशी टिकली आणि सगळ्यात आकर्षून घेणारा डोळ्यांचा आत्मविश्वास आणि तिचे ते शांत, प्रफुल्ल प्रसन्न हास्य …जे समीरला कधीच बदलू नये असं वाटत होतं..!!
“बोल ..कशासाठी एवढ्या तातडीने बोलवलं ?”तंद्री भंग करत नमिता म्हणाली. तसा तो चपापला आणि म्हणाला, “मला वाटते ,आपण आपल्या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार करूया ..आरवची सेटलमेंट झाली असली तरी तो पुन्हा लंडनहून भारतात येईल असं वाटत नाही..आणि पुढची काही वर्षं अशी काढायची म्हणजे
तुलाही ते जड जाईल …!”तशी नमिता उत्तरली, “समीर ,मी कधी असं म्हटले ?मी आज या घडीला तसे जगते आहे ते मला आवडतं ..माझी लाईफ स्टाईल मी माझी मनापासून स्वीकारली आहे ..त्यामुळे त्यात येणाऱ्या अडचणी प्रसंगांना सामोरं कसं जायचं हा प्रश्नच येत नाही..घेतलेला निर्णय हा मी पूर्ण विचार करूनच घेतला होता ..आता राहिली तुझी अडचण…ती कशी डील करावी हा सर्वस्वी तुझा प्रश्न आहे.” समीर तसा नाराजीने म्हणाला ,’नमिता ,वीस वर्षांपासूनचा सुखासमाधानाचा संसार मोडून वेगळे झालो ..काळाच्या ओघात नवरा-बायकोचं नातं घट्ट होतं ,दूध -साखरे सारखं विरघळतं ,आपल्या बाबतीत ते खरं होतं ..पण असा निर्णय..तोही कोणतीही स्वतःची बाजू न मांडता शांतपणे बाजूला झालीस…असं का.. “!!
तशी ती म्हणाली, “सुखासमाधानाचा संसार तुझ्यासाठी होता समीर ..माझ्यासाठी घुसमटच होती..मित्रांच्या मदतीला धावून जाणारा, शेजाऱ्यांची अडचण समजून घेणाऱा ,आई-वडिलांचा अतिशय नम्र मुलगा ..यात मी तुझ्या आयुष्यात किती होते सांग ना.? .मुलीने माहेरची सगळी वळणं, संस्कार सोडून सासरी राहायला सुरुवात करावी असे म्हणतात ,पण या एकट्या मुलीला सांभाळून घ्यायचा आश्वासक हात कुणी हात पुढे करायचा.? ..ज्यांच्यासाठी ती आली ,त्याने ही कोरडी वागणूक ठेवली तर करायचं काय?…तुमच्यासाठी आले पण तुमच्यातली नाही ….वागण्यात कमीजास्त झालं तर तूझ्या आईसारखे टोचून बोलण्यात तूही हिरीरीने भाग घ्यायचास…जगासाठी देव माणूस म्हणून नावाजलेला तू बायको साठी कधी भला माणूस तरी झालास का रे? ‘तू वेल क्वालीफाईड आहेस, तुझा निर्णय तू घे’ असं म्हणता..पण घेतलेले निर्णय अमान्य करून आपल्याला सोयीचे फिरवून घ्यायचे …..बालविवाह होत नाहीत रे आता !!.. चोवीस पंचवीस वर्षाची ,स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची जाण असलेली, समाजात धडपडत आत्मविश्वासाने चालणारी मुलगी ..तुम्ही बायको म्हणून आणता…मग ती घरी आल्यानंतर मात्र मुकाट्याने मांजर व्हावी अशी अपेक्षा करतात तरी कशी…? “
“नमिता ,मी समजू शकतो..एम्.एस्सी.
मध्ये तू विद्यापीठ रॅंकर असतानाही तुझ्या मनासारखी नोकरी तुला करून दिली नाही.. केवळ घरच्या जबाबदाऱ्या म्हणून..माझी चूक नव्हतीच…आईचं करायचं, करायला कोणी नव्हते..तसं ही आईची ,माझी इच्छा नसतानाही तू मुलाला होस्टेलला ठेवलेसच ना..हा तुझा हेका नाही तर काय …स्वतःची बाजू ही तू समजून घे ना..!! “
“समीर ,आता या गोष्टी पुन्हा उगाळण्यात काहीच अर्थ नाही ..तरीही त्यावेळी मी कोणतेही कारण सांगितलं नाही म्हणून सांगते…आरवचे लहानपण कसे धावपळीत गेले हे मी पाहिले आहे .. “मेरा बच्चा “असं म्हणून दोन मिनिटे जवळ घेणे…आणि त्याच्या जबाबदारीत सहभागी होणे वेगळे… आईपण ही माझी जबाबदारी ..मी ती कधी टाळली ही नाही…पण कुणालाही एखाद्याचा आधार मिळाला तर ते नातं बहरून येतं …नुकतीच लागलेली नोकरी , पाळणाघर …आईचं करणे ,या सगळ्या तू कुठे होतास..?तू ही नोकरी केलीस पण तुला वेळेवर मिळत होतं ..ते आवरून तू सगळीकडे हजर असायचास..फक्त बायको सोडून!!एवढे गृहीत धरलं होतं तू मला…!!शेवटी निर्णय घेतला आणि तो आता बदलेल असं मला वाटत नाही..! “
“अग ,पण तुझं स्टेटस ते काय…दोन खोलीत रेंट वर राहतेस ..तोंडापुरते पेन्शन असलेली नोकरी आणि तू कुठे जाणार आहेस …पुढे बरेच काही वाढून ठेवले असेल…कल्पनाही येणार नाही असे प्रसंग येतील तेव्हा तू कसे निभावशील..?आणि एकत्र राहणंच नको असेल तर मैत्रीचा तरी पर्याय पडताळून पहायला काय हरकत आहे? “
” समीर ,असा काही पर्याय मी तुला मागितलाच नाही ..पुन्हा त्या गुंत्यात मला जायचंच नाही..देवा- ब्राह्मणांच्या साक्षीने झालेल्या लग्नात मला सोबत देऊ शकला नाहीस मग पोकळ मैत्रीचे मृगजळ ते काय .? .. काय रे एक सांगशील..तुम्हाला लग्नाआधी मुलगी उच्चशिक्षित आहे..रॅंकर आहे असं सांगताना अभिमान वाटतो..पण लग्नानंतर समान वागणूक देताना इगो आड येतो की तिची बौद्धिक चमक पेलवत नाही….ती ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे.भौतिक , सांसारीक ,,आर्थिक ,भावनिक गरजांच्या पलीकडे ही एक मोठी गरज असते ..बौद्धिक..ती पूर्ण झाली नाही तर होणारी घुसमट सांगताही येत नाही आणि सहनही करता येत नाही अशी असते…मग मीच विचार केला..मीच माझ्या व्यक्तिमत्वाला न्याय देऊ शकत नसेल तर माझं जगणं कशासाठी …इतक्या वर्षात तुमचं वागणं बदललं नाही ,तर आता पुढेही ते बदलणे तुम्हाला शक्य आहे का..? “
” पण वेगळे होणे इतपत कोणताही वाद किंवा कारण नसताना हा निर्णय का”?
“वाद नव्हता समीर..पण सुसंवाद तरी कोठे होता..?तरी घरात भांडण झालेच नाही ..कारण मी तुझ्यात बदल होणार नाही हे समजून घेतलेले किंवा मी केलेले पूर्णपणे दुर्लक्ष.!!..यामुळे आता बदल नाही…आपण आयुष्यभर किनारेच राहिलो रे … दोन्ही किनाऱ्यांनी नदीचा प्रवाह घडवला..त्याला दिशा दिली ,,रूप दिले ,,पण ते किनारे कधी एकत्र आले नाहीत…येऊ शकत नाहीत…तेच आपलं प्राक्तन होतं !!.. समोरासमोर असूनही एकमेकांत गुंतणं नाही ..कायमच एक अंतर राहिलं आपल्यामध्ये…!! “
असं म्हणता म्हणता नमिताने मान फिरवली..कदाचित पाणावलेले डोळे दिसतील म्हणून..शेवटी समीर निराश झाला..म्हणाला, “ठीक आहे..मी आग्रह करणार नाही पण कधीही तुला यावसं वाटलं तर नेहमी माझं घर तुझ्यासाठी उघडत असेल..”” नमिता हसली आणि म्हणाली ,”अजूनही “माझं घर” म्हणतोस ना…असो..त्याची काहीही गरज पडणार नाही..तुझ्या आयुष्यात ही नमिता फक्त एक भूतकाळ असेल.. असे म्हणून ती समुद्राकडे वळून पाहू लागली…मागे वळून समीर गेला की नाही हे पाहण्याची तिची इच्छा सुद्धा झाले नाही ..तेवढ्यात तिचा फोन वाजला.
“हॅलो ..मिस नमिता साने…?”पलीकडचा आवाज.!
“हो बोलते..बोला.”
“मी टाटा कॅन्सर हॉस्पिटल मधून बोलते..मॅडम उद्या तीन वाजता तुमची शेवटची केमो असेल.. “
“ओके मॅडम ..आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद..उद्या मी दोन वाजता दवाखान्यात असेन”..तिने फोन ठेवला.
नमिताने फोन ठेवला खरा …पण आयुष्याचे ताणेबाणे सरसर समोरून गेले..अतिशय सामान्य परिस्थितीत एवढे उच्च शिक्षण घेऊनही ,त्याचे चीज आपण वेळेवर करू शकलो नाही ,ही खंत तिला आताही बोचत होती ..केवळ स्त्रीचे व्यक्तिमत्व म्हणून भावनेकडेच तिने झुकले पाहिजे, हा समजच आपल्याला किती निरर्थक गोष्टींमध्ये गुंतवत गेला आहे,, हे तिला कळून चुकले होते ..भावना आणि व्यवहार …ध्येय आकांक्षां आणि जबाबदारी याचा समतोल वेळेवर नक्कीच साधला गेला असता …पण आपण आपल्या भूमिकेवर ठाम राहायला हवे होते ..! आपले अस्तित्व दाखवून ,प्रत्येक अडचणीतून व्यवहार्य आणि आपल्या आकांक्षांना न्याय देणारा मार्ग आपण नक्कीच काढू शकलो असतो..फक्त एकदा स्वतःला तटस्थ आणि शांतपणाने वेळ द्यायला हवा होता ..आपण आदर्श होण्याच्या इच्छा व्यर्थ कवटाळून बसलो. पण कोणीच सगळ्याच आघाड्यांवर कधीही परिपूर्ण होऊ शकत नाही..हे आपल्याला फार उशिरा कळले ..पण आता आपण ठाम निर्णय घेतला आहे आणि आजही त्याच्याशी प्रामाणिक आहोत ..अगदी कोणाच्याही दबावाला बळी न पडता ..!! म्हणजे आपल्या स्वतःच्या आयुष्याशी प्रामाणिक राहण्याची आणि आपल्या नैसर्गिक क्षमतेला न्याय देण्याची सुरुवात झालेली आहे ..याचे आज आपल्याला खूप समाधान वाटत आहे ..!! या सगळ्या विचारांच्या आंदोलनाने तिला दमल्यासारखे झाले ..पण वाऱ्याची एक मंद लहर तिला दिलासा देऊन गेली..!!
नमिता समुद्राकडे पहात होती .लाटेच्या आवाजात ती हळूहळू विरघळून जात होती.. समुद्राच्या लाटा तरंग निर्माण करत होत्या…सुंदर गाज मोहवत होती …पण नमिता मख्ख बसली होती …त्या थिजलेल्या आणि गोठलेल्या अंतरंगाला एकच जाणीव समाधान देत होती. ..तिच्या स्वतःच्या अस्तित्वाची ….स्वतःच्या आदिम, मुक्त जगण्याच्या प्रेरणेची….!!!!
हि कथा कशी वाटली , अश्याच छान कथा Marathi Motivational Story 2024 वाचण्यासाठी आमचा whatspp ग्रुप जॉईन करा.
लेखिका – गौरी संतोष जंगम,मिरज
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे आहेत. लेखिकेने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखिकेच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
खुप छान
Thank you
सुंदर लेख
अप्रतिम , मनाला स्पर्शणारी कथा आहे
Thank you mam
अतिशय सुंदर
फारच छान.
अप्रतिम 👌👌