साधारणपणे मुले सातवी आठवीत गेली की पालकांचा शोध सुरू होतो, आपल्या मुलांसाठी बेस्ट कोचिंग सेंटर निवडण्याचा. परीक्षा कुठलीही असो, जेईई, एमबीबीएस किंवा यूपीएससी, त्यासाठी क्लासेस लावणे हे आजकाल अपरिहार्य झाले आहे. याच मागणीचा फायदा घेऊन गेले कित्येक वर्ष कोचिंग सेंटर्स वाले मनमानीचा कारभार चालवत आहेत. कोर्स फी च्या नावाखाली लूट करणे, अपुऱ्या जागेत क्लासेस चालवणे, चुकीची आश्वासने देऊन पालकांची दिशाभूल करणे, अयोग्य शिक्षण पद्धतीचा वापर अशा अनेक तक्रारी गेली काही वर्षे शिक्षण मंत्रालयाकडे येत आहेत.
२०२३ मध्ये कोटा या कोचिंग सेंटर हब शहरात हा आकडा २६ असा होता, जो २०१५ पासूनचा सर्वोत्तम आहे. मागच्या वर्षी (२०२३ मध्ये) नोव्हेंबर महिन्यात मुंबई स्थित डॉक्टर अनिरुद्ध मालपाणी यांनी कोचिंग सेंटर्स ना नियमित करण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. त्या याचिकेत असे म्हटले होते की 14 वर्षाखालील मुले घरापासून दूर या कोचिंग सेंटर मध्ये प्रवेश घेतात तेव्हा त्यांच्यावर अतिरिक्त ताण येतो. हे कलम 21 मध्ये दिलेल्या सन्माननीय जीवन जगण्याच्या अधिकाराच्या विरुद्ध आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने १५ जानेवारीला खाजगी कोचिंग क्लासेस साठी नियमावली जाहीर केली आहे. खाजगी कोचिंग केंद्रांच्या अनियंत्रित वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व त्यांचे व्यवहार कायदेशीर चौकटीत बसवण्यासाठी शिक्षण मंत्रालया कडून मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत. त्यानुसार कोचिंग क्लासेस ना १६ वर्षाखालील मुलांना प्रवेश देता येणार नाही. तसेच जाहिराती करणे आणि उत्तम मार्क्स मिळवून देण्याची गॅरंटी देणे हे बेकायदेशीर मानले जाईल.
हे नियम कोणासाठी?
नियमावली नुसार ज्या क्लासेस मध्ये ५० पेक्षा जास्त विद्यार्थी शिकतात त्या सर्वांना हे नियम लागू होतात.
काही महत्त्वाचे नियम:
१. १६ वर्षावरील म्हणजेच ज्यांनी माध्यमिक शाळा परीक्षा दिली आहे अशाच विद्यार्थ्यांना क्लासेस मध्ये प्रवेश देणे.
२. क्लासेस मध्ये शिकवणारे शिक्षक हे किमान पदवीधर असावे. तसेच त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल नसावा.
३. कोचिंग सेंटर्सनी कुठलीही फसवी जाहिरात करू नये. तसेच आपल्या विद्यार्थ्यांचे मार्क्स कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रित्या प्रकाशित करू नये.
४. कोचिंग सेंटर्सनी विद्यार्थी किंवा पालकांना चांगले मार्क्स किंवा सर्वोच्च नंबर ची खोटी आमिषे दाखवू नये.
५. कोचिंग सेंटर्सनी आपल्या सर्व कोर्सेस ची माहिती, त्याची पूर्ण फी, त्याचा कालावधी, प्रत्येक वर्गात साधारण किती विद्यार्थी असतील, शिक्षकांची संपूर्ण माहिती या सर्व गोष्टी प्रॉस्पेक्टस मध्ये तसेच त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर देणे बंधनकारक राहील.
६. प्रत्येक कोर्ससाठी ठरवलेली फी ही योग्य व वाजवी असावी. फी भरल्या नंतर त्याची योग्य रिसीट विद्यार्थ्यांना द्यावी. कोर्स चालू असताना मध्येच त्याची फी बदलणे बेकायदेशीर असेल.
७. एखादा विद्यार्थी काही कारणाने मध्येच कोर्स सोडून गेला आणि जर त्याने पूर्ण फी आगाऊ भरली असेल तर त्याची उरलेली फी ही प्रो-राटा बेसिस वर त्याला १० दिवसांत परत करण्यात यावी. जर विद्यार्थी कोचिंग सेंटर्सच्या हॉस्टेल मध्ये रहात असतील तर त्यांना उरलेली हॉस्टेल आणि मेस ची फी सुद्धा परत करणे बंधनकारक राहील.
८. वाढता अभ्यासाचा ताण लक्षात घेता कोचिंग सेंटर्सनी समुपदेशक सेवा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी. विद्यार्थी आणि पालकांच्या मार्गदर्शनासाठी अनुभवी आणि तज्ञ अशा मानसोपचार तज्ञ आणि समुपदेशक यांची सेंटर्सने नियुक्ती करावी. आणि अशा सेवेची माहिती त्यांच्या वेबसाइटवर द्यावी. 2023 मध्ये कोटा येथे मोठ्या प्रमाणात झालेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर मानसिक आरोग्याचा तपशील देणारी मार्गदर्शक तत्त्वे बनवण्यात आली आहेत. तसेच कोचिंग सेंटर मध्ये एक कंप्लेंट बॉक्स असावा ज्या द्वारे विद्यार्थी आपल्या तक्रारी नोंदवू शकतात. कोचिंग सेंटरने अशा तक्रारींची त्वरित नोंद घेऊन ते सोडवण्यास विद्यार्थ्यांना सहाय्य करावे. नेहमीच्या अवलंबलेल्या वाटांसोबतच करिअरच्या इतर पर्यायांबद्द्दल विद्यार्थ्यांना माहिती द्यावी जेणेकरून विद्यार्थ्यांवरील ताण कमी होईल.
९. कोचिंग सेंटर्सनी विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा जसे की पुरेशी जागा (प्रत्येकी किमान एक स्क्वेअर मीटर जागा), मुले व मुलींसाठी वेगवेगळी प्रसाधनगृहे, कॅम्पस मध्ये जागोजागी सीसीटीव्ही ची सोय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या द्रुष्टीने क्लासच्या इमारतीमध्ये योग्य त्या सर्व उपाय योजना करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी कॅम्पस मध्ये प्रथमोपचार सेवा उपलब्ध करून देणे अनिवार्य राहील.
१०. कोचिंग सेंटर मध्ये जातीच्या, रंगाच्या किंवा आर्थिक परिस्थितीच्या आधारावर कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाऊ नये. तसेच कोचिंग सेंटर्स आर्थिक दृष्ट्या मागास, स्त्रिया आणि दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी विशेष सवलत देऊ शकतात .
११. कोचिंग सेंटर शाळा किंवा कॉलेजच्या वेळेमध्ये लेक्चर्स ठेवू शकत नाहीत. तसेच एका दिवसात पाच तासांपेक्षा जास्त वेळ लेक्चर्स घेऊ शकत नाहीत. विद्यार्थी व शिक्षकांना आठवड्यातून एक दिवस सुट्टी देणे अनिवार्य राहील.
कधीपासून लागू? New Guidelines for Coaching center in Marathi
नवीन कोचिंग सेंटर्सनी क्लासेस चालू करण्यापूर्वी प्रथम सक्षम अधिकार्यांकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच आता जे कोचिंग सेंटर चालू आहेत त्यांनी पुढच्या ३ महिन्यात स्थानिक प्रशासनाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.
नियम मोडल्यास होणारा दंड:
कोचिंग सेंटर्सनी जर या नियमावलीचे एकदा पालन केले नाही तर त्यांना २५ हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. आणि जर पुन्हा नियमांचे उल्लंघन झाले तर १ लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. तसेच त्या नंतरही नियमांचे उल्लंघन केल्यास कोचिंग सेंटरची नोंदणी रद्द होऊ शकते.
कोचिंग सेंटर्सची नवीन नियमावली वर प्रतिक्रिया:
या नवीन नियमावली नंतर देशातील अनेक नामवंत कोचिंग सेंटर्स कडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार सोळा वर्षापर्यंत साधारण विद्यार्थी अकरावी मध्ये असतात आणि सर्व एंट्रन्स परीक्षा या बारावी मध्ये किंवा १२ पास झाल्यानंतर देता येतात. अशा परिस्थितीत मुलांना एका वर्षात परीक्षेसाठी तयारी करणे कठीण जाते म्हणूनच बहुसंख्या विद्यार्थी नववीपासून या परीक्षांचा तयारी सुरू करतात. जर सरकारला हे नियम लागू करायचे असतील तर त्यांनी या परीक्षांसाठीचे attempts वाढवून दिले पाहिजेत. कोचिंग सेंटर्सच्या मते आजच्या घडीला कोचिंग क्लासेस मधील साधारण 30 टक्के विद्यार्थी हे सोळा वर्षाखालील आहेत. तसेच हे नियम लागू करण्यात आले तर नववी आणि दहावीच्या सर्व कोचिंग सेंटर्सना त्यांचे क्लासेस बंद करावे लागतील. याचा परिणाम शिक्षकांच्या नोकऱ्या आणि मुलांचा शैक्षणिक विकास या दोन्हीवर होईल.
पालकांची प्रतिक्रिया:
अखिल भारतीय पालक संघाच्या अध्यक्ष अपराजिता गौतम यांच्या मते केंद्र सरकारचा हा निर्णय योग्य व स्तुत्य आहे. परंतु त्या असेही म्हणाल्या की या नियमांची योग्य अंमलबजावणी होत आहे की नाही हे बघणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. पुढे त्या हेही म्हणाल्या की आजची शिक्षण पद्धती बदलणे गरजेचे आहे जेणेकरून मुलांना उच्च व अद्ययावत शिक्षण शाळा आणि कॉलेजमध्येच मिळेल आणि कोचिंग क्लासेसची गरजच भासणार नाही.
सरकार आणि कोचिंग सेंटर्स यांच्या वादात आपल्याला हे विसरून चालणार नाही की आपल्या मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे हे सर्वप्रथम आपले कर्तव्य आहे. प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी आपल्या पालकांची साथ असणे हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे.
अशाच विविध विषयांबदल आणि ताज्या घडामोडीं बद्दल अधिक माहिती हवी असल्यास आमच्या या वेबसाइट ला भेट देत रहा. आणि वेळच्या वेळी अपडेट मिळण्यासाठी आमच्या WhatsApp channel ला फोलो करा.New Guidelines for Coaching center in Marathi
लेखकाचे नाव: नेहा करंदीकर- हुनारी
छान माहिती मिळाली
धन्यवाद.
सर्व मुद्दे नीट मांडले आहेस.लेख छान आहे.
लेख खूप मुद्देसूद आणि माहितीपूर्ण आहे. आवडला. शुभेच्छा.