एक नेहमी सारखीच सकाळ..पण आजच्या दिवसात मात्र खास काही तरी होतं!
कधीतरी हसत खेळत असणारं घर आता कमालीचं शांत झालं होतं आणि ह्या शांत पाण्यात कोणी तरी खडा मारवा आणि पाणी ढवळून निघाव असं काही आज झालं!तो येणार माहितीच होतं..पण त्याने येऊ नये असच रोहिणी ताईंना वाटतं होतं. त्याच्या येण्याने पुन्हा सुकलेल्या जखमेवरची खपली निघेल असं वाटत होतं म्हणून त्याचं न येणच योग्य आहे असं रोहिणी ताईंना वाटणं साहजिकच म्हणा!
त्यानेही अट्टाहासाने डॉक्टरांकडून इथला पत्ता आणि नाव विचारून घेतलं. तसं तर विजयरावांसोबत फोन वर बोलून झालं असलं तरी त्याला मनाच्या समाधानासाठी विजयराव आणि रोहिणी ताईना भेटायचं होतं.त्याच्या डोळ्यांनी त्याला तिच्या आई वडिलांना पहायचं होतं!
तो शिवम्! इंजिनियर! कधी तरी लाखात पगार असणारा आज डोक्यावर न उतरणार कर्ज घेऊन त्यांना भेटायला येत होता.रोहिणी ताई मात्र तयार नव्हत्याच मुळी भेटायला पण विजयरावांनी होकार दिल्याने त्यांना शिवमचं येणं टाळता येत नव्हतं..
” आज तो भेटायला येणार आहे आपल्याला” विजयराव
” हां ” रोहिणी ताई
” तु फक्त एकदा भेट त्याला, खुप दुरून येणार आहे तो””एकदा सांगितलं ना मला कोणालाही भेटायचे नाहीये” रोहिणी ताई रागात ओरडल्या.विजयराव उसासा टाकत खोली बाहेर निघून गेले.
ते बाहेर जाताच दाटून आलेला हुंदका बाहेर पडलाच.”नेत्रा” म्हणत त्यांनी तिचा फोटो हृदयाशी कवटाळला.बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला.शिवम आला असावा, सोबत त्याच्या बायकोचा आणि मुलीचा आवाज आला, पण रोहिणी ताई काही खोलीच्या बाहेर आल्याचं नाही.जुजबी गप्पा झाल्या तरीही रोहिणी ताई काही दिसत नाही म्हणून शेवटी त्यानेच विचारले,
” त्या येणारच नाहीत का बाहेर?”
“नाही” हतबल होते विजयराव !
” मी जाऊ वर भेटायला?” शिवमने विचारलं.
विजयरावांनी मानेनेच होकार कळवला.त्याची छोटीशी लेकही धावत बाबा मागे गेली.
” मी येऊ का आत?” साधारण ह्याच खोलीत असाव्यात ह्या अंदाजाने त्याने विचारलं.उत्तरा दाखल फक्त एक अस्पष्ट हुंदका!मनाचा हिय्या करून तो आत गेलाच!
” ही नेत्राची खोली का?” आजूबाजूला असलेल्या फोटोंवर नजर फिरवत त्याने विचारलं.
” हां” इतकंच उत्तर.
“अय्या, ही दिदी ट्रेकिंग करते! ए बाबा मी मोठी झाल्यावर दिदी सारखं ट्रेकिंग करणार हं !” त्या छोट्या मुलीच्या आवाजाने तेथील शांततेचा भंग केला.
भिंतीवरून फोटोवर नजर फिरवत ती कुतूहलाने पाहत होती सर्व.रोहिणी ताई गडबडून गेल्या त्या आवाजाने,” नाही हो बाळ! तु नको असा वेडा हट्ट करुस! खुप आवडायच तिलाही असं दरी खोऱ्यातून भटकायला..पण शेवटी काय झालं! गेली ना ती कायमची सोडून आम्हाला ह्या ट्रेकिंगच्या नादात !”
“म्हणजे?” त्या निरागस जीवाचा प्रश्न !
” काही नाही जिविका! आज्जीला बरं वाटतं नाहिये ना! तु जा खाली, खाली जाऊन खेळ हां ” शिवम् ची जिवीने खाली जावं म्हणून विनवणी सुरू होती.
” पण आज्जीला काय झालं? आज्जी रडू नको बरं ! नाही तर चेहेरा खराब दिसतो, हे नाक आहे ना ते लाल होतं आणि मग सगळे चिडवतात ” आपल्या इवल्या इवल्या हातांनी जिवीका आज्जीचे डोळे पुसत होती.
रोहिणी ताईंना त्या इवल्या हातांचा स्पर्श झाला आणि त्यांना गलबलून आलं!
” जिवि, पाणी घेऊन ये बरं आज्जी साठी!” शिवम् ने जिविकाला शेवटी खाली पाठवलच!
रोहिनिताई नेत्राच्या आठवणीने भावूक झाल्या होत्या. त्यांच्या थरथरत्या हातावर अलवार हात ठेवत तो बोलला, ” मी..मी नेत्राला तर परत नाही आणू शकत पण माझ्या डोळ्यांनी पहा ना तुम्ही ! दिसेल नेत्रा तुम्हाला!”
त्यांनी चमकून शिवमच्या डोळ्यात पाहिलं..पुढच्या क्षणाला त्यांचं डोकं बाजूला बसलेल्या शिवम्च्या खांद्यावर विसावल, डोळ्यातून वाहणाऱ्या अविरत धारांनी रोहिणीताई त्यांचं मन हलकं करत होत्या.
त्या खांद्यावर आता रोहिणीताई आणि विजयरावांची देखील जबाबदारी त्याने अलगद पेलली.
” आज नेत्रा मुळेच मी माझ्या मुलीला पाहू शकतो, आई !” तोही भावनिक होत बोलला.डोळ्यातील अश्रू त्याने अजिबात लपवले नाही.
“आई, अंधारातील जीवन मी जगलोय! खुप खुप तरसलो होतो माझ्या जिविकाला पाहण्या साठी! आपलं बाळ समोर असुन देखील पाहता येत नाही..ह्या पेक्षा मोठं दुःख कोणतं? जगताला सर्वात हतबल बाप असल्याची जाणीव आतून पोखरून काढत होती. नाहीच शब्दात सांगु शकत मी त्या भावना! कंपनीत स्फोट झाला आणि त्यात माझे डोळे गेले..तुम्हाला माहित आहे आई त्याच वेळेस वंशिका प्रेग्नंट होती..ज्या दिवशी मला कळलं मी पाहू शकणार नाही! मी सैरभैर झालो ..पण केवळ नेत्रा मुळेच आज मी माझ्या सुखाच्या गाठोड्याला मिठीत घेऊ शकतो. तिचे उपकार तर आजन्म राहतीलच पण तुमचेही उपकार खुप आहेत आई! आभाळा इतकं मोठं मन असावं लागत असा निर्णय घ्यायला !”
शिवमला सावरायला रोहिणीताई पुढे आल्या त्यांनी शिवामच्या डोळ्यातील अश्रू आपल्या बोटांनी टिपले.
” आई, मी कधी नेत्राला पाहिलं नाही पण तिच्या डोळ्यानी मी जग पाहतोय..तब्बल पाच वर्षे मी अंधारात चाचपडत होतो..आजचा शिवम् केवळ नेत्रा मुळेच!”
” चुकले मी! नाही समजू शकले तुझं दुःख!” रोहिणीताईंनी त्याच्या हातावर आपला दुसरा हात ठेवला.
” स्वत:च्या मुलीच्या जाण्याने मी इतकी दुःखात बुडाले की मला इतरांच्या दुःखाची जाणीवच झाली नाही बघ! माझी मुलगी तरी ह्या जगात नाही म्हणून मी तिला पाहू शकत नाही..पण तुझ्या समोर तुझी जिविका असून तुला तिला पाहता येत नाही हे दुःख कधी मला जाणवलंच नाही रे!”
” पण आता कळतंय तिने जातांना आमच्यासाठी अनमोल ठेवा ठेवला आहे” रोहिणी ताईंनी उठून शिवमाच्या दोन्ही डोळ्यांवर एक एक करून ओठ टेकवले..
” माझी नेत्रा आहे रे अजून इथेच! “
खरं तर नेत्राचा हा नेत्र दानाचा संकल्प त्यांना आवडला नव्हता,पण क्षणभर आपली मुलगीच आपल्या समोर आली आहे असं त्यांना शिवम् च्या डोळ्यांकडे पाहून वाटलं आणि नेत्राच्या जाण्याने दुःखी झालेल्या मनामध्ये आता तिच्याच विषयी अभिमान दाटून आला.
एका कुटुंबाला नेत्रामुळे मुलगा, नवरा आणि वडील यांचा आधार मिळाला होता.
शिवम् च्या “आई” हाके मुळे रोहिणीताई पुन्हा एकदा प्रेमाच्या बंधनात अडकल्या!तिच्या असण्याची जाणीव पुन्हा एकदा झाली.शिवम् च्या डोळ्यात रोहिणीताईंना पुन्हा एकदा नेत्राच्या असण्याचा दिलासा मिळाला.कसं असतं ना! ना कोणतं नातं, ना कोणतीही ओळख तरीही हे अतूट बंध बांधले जातात.. नेत्राच्या डोळ्यांनी शिवम् जग पाहतोय आणि शिवम् च्या डोळ्यात नेत्राच्या आई वडिलांना नेत्रा दिसते.
” गोड आहे जीविका!” वातावरणातील ताण हलका करण्यासाठी रोहिणीताई बोलल्या.
दारात ओला फ्रॉक झ्टकात एका हातात ग्लास घेऊन जिविका उभी होती..
तिला असं पाहून दोघांनाही हसू आले..
” मी पाणी घेऊन आले पण माहीत नाही कुठे गेलं” चेहेरा बारीक करत हातातला रिकामा ग्लास पुढे करून जिविका नवीन आज्जी पुढे उभी होती.
” पण आम्हाला तर कळलं पाणी कुठे गेलं ते!” असं म्हणत हसत त्यांनी तिचा फ्रॉक झ्टकला.
जीवनात सगळ्यांचं सगळी सुख मिळतातच असं नाही! पण आपल्या मुळे जर कोणाच्या जीवनात आनंद येणार असेल तर त्या पेक्षा सुखाची गोष्ट कोणती!
जीवना जगताना आणि जीवना नंतरही..निरंतर आपल्या प्रियजनांची आठवण जिवंत ठेवान्यासाठी मृत्यू पश्चात नेत्र दानाचा संकल्प आजच करूया. इतरांचे जीवन देखील प्रकाशमान करण्यासाठी प्रकाशाचा वसा घेऊया!
कथा आवडल्यास जरूर शेअर करा. अश्या नवनवीन कथा आणि माहितीपूर्ण लेखांसाठी आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या.
लेखक -रश्मी शशांक बंगाळे (अश्मी )
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे आहेत. लेखिकेने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे. लेखिकेच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
छान आहे कथा…!!!
खूप छान कथा