रात्रीची वेळ होती .काळ्याकुट्ट ढगांनी आकाशामध्ये गर्दी केली होती. अधून मधून विजांचा कडकडाट चालू होता. सगळे वातावरण गंभीर झाले होते. अशावेळी झपाझप पाऊल टाकीत सगुना पांदीतून चालली होती. कोणत्याही प्रकारची भीती तिला वाटत नव्हती. पायाखालची वाट असल्यामुळे ती बिनधास्त चालली होती. आधीच पडून गेलेल्या पावसामुळे कमालीची शांतता पसरली होती. चिखला मधून चालत असताना येणाऱ्या पायाचा पच – पच् आवाज तेवढाच घुमत होता. सगुना पुढे आणि वाघ्या मागे असे दोघेही एका मागोमाग चालले होते. वाघ्या हा सगुनाचा चा इमानदार कुत्रा. दाट लवलवित केस, मजबूत बांधा, आणि रुबाबदार चाल चालताना त्याची केस त्याच्यासोबत नृत्य करत त्यामुळे तो अधिकच खुलून दिसे. अंगावरती पट्टेरी खुणा त्यामुळे तो वाघासारखा दिसायचा. म्हणून सगुनाने त्याचे नाव ‘वाघ्या’ ठेवले होते. गावातील सगळी कुत्रे त्याला घाबरायची. त्याचा वेगळाच दरारा होता. परंतु त्याने कधीही कोणाला त्रास दिला नाही. तो कधीही मालकिणीला एकट सोडत नसे. एखाद्या पाठीराख्यासारखा तो सतत तिच्या सोबत असायचा. रात्रीही सागुनाला शेताच राखण करावं लागत असे. कारण रात्रीची रानं जनावरे शेतात घुसून उभ्या पिकांची नासाडी करायचे. आजही सगुना आणि वाघ्या शेतावर पोहचले . बाजरीचे पीक चांगलं जोमात आले होतं. पिकातून फुस-फुस असा आवाज आला . वाघ्याने मोठ्या मोठ्याने भुंकायला सुरुवात केली. सगुनाने पिशवीतून गोफन काढली त्यात एक दगड टाकून सर सर गोफन फिरवली. तड तड तड असा आवाज करत ती पिकात जाऊन पडली. त्या आवाजाने रानंडुक्कर घाबरून सैर भैर पळू लागलं. वाघ्याचा सगुनाला मोठा आधार होता. थोड्याच वेळात ढगांची कालवा कालव चालू झाली. आकाशात विजा नाचू लागल्या. सगुना आणि वाघ्या पुन्हा माघारी फिरले.
सगुना घरात एकटीच राहत असे. तिचा मुलगा मुंबईला उच्च शिक्षणासाठी गेला होता. त्यामुळे घरची शेती सगुनाच पाहत असे. सगुना ही खूप धाडसी आणि वाघ्या तिच्या सोबत असल्यामुळे तिला कसलीही काळजी नसायची. सकाळ झाली .उन्हे चांगलीवर आली होती .सगुनाची सकाळची कामे उरकली आणि ती भाकर बांधून शेताकडे जायला निघाली.वाटेत तिला सावकार भेटला . “काय ओ सगुनाबाई…… कुठे निघाल्या म्हणायचं काही आराम – बिराम करता का न्हाय? दररोज आपल काम – काम? ” तो कु – भावनेने बोलला. गावचा सावकार हा अतिशय दुष्ट माणूस! लोकांनी मदत मागितली की मदत करायची परंतु त्या बदल्यात त्यांच्याकडून जमीनी बळकवायच्या हा त्याचा धंदा. कोणी नाही म्हटलं, दिली नाही तर त्याच्याकडून जबरदस्तीने घ्यायचा. गावातील लोकांकडून जमीन घेतल्यावर ती परत द्यावा लागू नये म्हणून त्यांच्याकडून जास्तीचा कर आकारायचां. सगळ्या गावावर त्याची हुकूमशाही चाले. सगळे गोरगरीब त्याच्या सावकारकीला आता पार वैतागून गेले होते. पण सगुना काही त्याच्या हाती लागत नसे. ती खूप स्वाभिमानी आणि धाडसी बाई . तिच्याकडे कोणीही ढुंकू नही बघत नसे. आणि तिचा वाघ्या हा कायम तिच्या बरोबर असे. सावकाराच्या बोलण्याकडे सगुनाने लक्ष दिले नाही. सावकाराचा सगुनाच्या शेतावर डोळा होता. कधीतरी संकटात सापडेल आणि माझ्याकडे मदतीला येईल तेव्हा तिची जमीन लिहून घ्यायची असं त्याला कायम वाटायचं. सावकार त्याच्या दोन-तीन माणसांबरोबर सगुनाच्या शेतावर गेला.
दुपारच्या उन्हाच्या झळाया लांब लांब दिसत होत्या. उबाळा वाढल्यामुळे आजही पावसाची चिन्हे दिसत होती. सगुनाने चार लाकडांच्या मेडी रोऊन त्यावर माचोळी केली. त्यावर बसून वाघ्या आणि सगुना पाखरांपासून पिकांच राखण करत असे. बाजरीच्या कणसांना आता मोत्यावानी दाणे भरले होते. उन्हामुळे त्यांची चमक वाढली होती.सावकार आणि त्याची माणसे सगुनापाशी आले. वाघ्यानी त्या माणसांना पाहिलं आणि गुरकायला सुरुवात केली. जुने वैर असल्यासारखे वाघ्या त्याच्यावर धाऊन जाई. “ओ सगुनाबाई….. तुमच्या कुत्र्याला आवरा!”
सावकाराचा गडी राम्या बोलला. “कुत्रा कोणाला म्हणतो रे…वाघ्या म्हणायचं.” असं म्हणून दोन-चार खमंग शिव्या तिने त्या गड्याला दिल्या.तो गप बसला. “मी काय म्हणतो सगुनाबाई, तुमचा राजू मुंबईला गेला हाय शिकायला तर काई मदत करायची असल्यास सांगा.” हातातली छडी दुसऱ्या हातावर मारत सावकार बोलला. माझ लई झाक चाललय बगा.मला तुमच्या उपकाराची गरज न्हाय.असे सगुना रागानेच बोलली. सावकाराचे तोंड रागाने गोळा झालं. सगळी गावातली लोक माझ्याक काईबाई कारण काढून येत्यात. मला एव्हढा तुझा जमिनीचा तुकडा दे..मी देतो की तू म्हणशील तेवढं पैकं. निघतो की काढून पायातील पायतान! असं म्हणून सगुनाने वाकून पायाला हात लावला. सावकाराचा चेहरा रागाने लालबुंद झाला. तुला बघून घेईन असं काठी सगुनाकडे करत सावकार बोलला. तसा वाघ्या जोरजोरात धावून गेला .आता लोचका तोडतो की काय असं झालं होतं. सावकार मागे सरत तिथून निघून गेला.
वाघ्या शेपटी हलवत सगुनापाशी येऊन बसला. सगुनाने त्याला लेकरावानी गोंजारल. “आर माझ्या वाघ्या तू हाय तर मला काय बी भ्या वाटत नाय बघ. तू माझा पाठीराखा हाईस.तुझ्यापुढे कोणाची बी ताकत नाय मला हात लावायची. “आस म्हंटल्यावर वाघ्या लाडाला आला. चल आता आपण भाकर खाऊ, आस म्हणून सगुनान कपड्यातली भाकर सोडून त्यातली एक भाकर वाघ्याला दिली. काहरलेल्या वाघ्यांनं तडा – तड भाकर तोडून गापागप खाऊन टाकली. आणि पुन्हा तिच्या तोंडाकडे पाहू लागला. सागुनाच्या पोटात कळवळून आले. तिला त्याचे खूप वाईट वाटले. तिने तिच्या भाकरीतील काही भाकर त्याला दिली. पण वाघ्यानं ती खाल्ली नाही. मालकिणीचा वाटा आपण कसा खायचा? एवढ्या त्या मुक्या जनावराच्या ध्यानात आलं असावं?पाखरांचा थवा आकाशातून गिरक्या मारू लागला. वाघ्या नी खाली झेप घेतली आणि तो थवा पाहून पळू लागला. बऱ्यापैकी वाघ्या पिकाच राखण करू लागला.
संध्याकाळची दिवे लागण्याची वेळ. दिवसभराच्या कामाच्या थकव्याने सगुनाने सर्व कामे पटापट आवरून लवकरच अंथरून टाकलं आणि झोपी गेली. वाघ्याही आपल्या जागेवरती जाऊन बसला. रात्रीच्या वेळी वाघ्याचे कान टवकारले असायचे.कोण येतंय, कोण जातंय याकडे वाघ्याचे बारीक लक्ष असायचे. एका भाकरीच्या जोरावरती रात्रभर वाघ्या इमानदारीने राखण करायचा. थोडी जरी चाहूल लागली तरी वाघ्या जोर जोरात भुंकायचा. रात्रीचा रिमझिम पाऊस चालू होता. वाघ्या ओट्याच्या एका कडेला पोटात पाय घेऊन झोपला होता. सगळीकडे स्मशान शांतता पसरली होती. त्यावेळी सर सर असा आवाज वाघ्याचा कानावर पडला. त्याने कानोसा घेतला. दोन माणसं ओट्याच्या खाली उभी राहिली आणि दोन माणसे हळूच पडवीत खडकीतून उतरली. वाघ्याने जोर जोरात भुंकायला सुरुवात केली. कुत्र्याच्या भुंकण्याच्या आवाजाने सगुना बाहेर आली. तिला कोणीही दिसले नाही. तिने एक नजर ओट्यावर टाकली. तर वाघ्या तिथून गायब होता. तिने सगळीकडे नजर टाकली. हल्ली जंगली श्वापदेही घराकडे यायला लागली होती. त्यामुळे सगुनाला काळजी लागली. तिने कशीबशी रात्र उजडली. पहाट झाली. सगुनाला लवकरच जाग आली. वाघ्याच्या काळजीने रात्रभर सगुनाला नीट झोप लागली नव्हती. वाघ्याच्या काळजीने सगुना बेचैन झाली. तिने वाघ्याला आवाज दिला.
“वाघ्या ये वाघ्या” कधी वाघ्याला आवाज दिला तर वाघ्या धूम ठोकून पळत यायचा. परंतु आज वाघ्याचा काहीही मूगमास लागला नाही. सुगुना मात्र आता घाबरी झाली. आता तिने चपला पायात घातले आणि ती तडक शेताकडे निघाली. सकाळची वेळ रस्त्याला कोणीही वाटसरू नव्हतं. पांदीचा रस्ता झरझर कापत सगुना निघाली. सूर्य डोके वर काढू लागला तशी सगुनाची चालण्याची गती वाढू लागली. कधी एकदा वाघ्या नजरेला पडतोय असं तिला झालं होतं. सगुना शेतावर पोहचली .समोरच दृश्य पाहताच तिला धक्का बसला. वाघ्यात आणि सावकाराच्या माणसांमध्ये झटापटी चालू होती. दोन माणसांनी त्याचे पाय धरलेले आणि वाघ्या चवताळून त्यांना चावा घेत होता. आणि आजूबाजूला पाहिले तर काही जनावरे शेत खात होती. सावकरांन काही जनावरे शेतात सोडून दिली होती. सगुना काकू….. सगुना काकू……धापा टाकत शिरप्या पळत आला. आवं रातच्यापासून ह्यो वाघ्या यांच्याशी लढतोय.या माणसांनी तुया शेतात गुरं सोडली होती. पण तुमच्या वाघ्याने खरचं खऱ्या वाघासारखी शेती राखली हाय….बिचाऱ्याला खूप मारलं .सगुनाच्या डोळ्यातून खळखळ पाणी वाहू लागलं.उभ्या पिकांची झालेली नासाडी पाहून सगुना कोलमडली. भर जोमात आलेलं पीक भुईसपाट झालं होतं. तर काही पीक हे वाघ्याने वाचवलं. सगुनाने आणि शिरपाने वाघ्याला सोडवले. एवढ्या जखमा होऊनही वाघ्याने तोंडातून ‘ब्र ‘ देखील काढला नाही. सागुनाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. दगड, गोटे घेऊन सगुना त्यांच्या मागे धावू लागली. ती त्यांना चांगल्याच शिव्या देऊ लागली. आज वाघ्यानं इमान राखलं होतं .
“काय रं वाघ्या काय करून घेतलस ? शिळ्या भाकरीला जागत एवढं मोठं काम केलस. ” त्याच्या जखमेवर हळद भरत रडतच सगुना बोलली.आता त्या सावकाराची काय खैर नाय. लईच डोक्यात जायला लागलाय.असं म्हणून सगुनाने राजुला फोन केला. घडलेला प्रकार सांगितला. राजुचा वर्गमित्र पोलिस अधिकारी म्हणून जवळच्या पोलिसठाण्यात नवीनच बदली होऊन आला होता. त्याने त्याच्या कानावर सर्व हकीकत घातली. त्या पोलिस अधिकाऱ्याचा चांगलाच दरारा होता. त्याने या प्रकरणात लक्ष दिले आणि सावकारला कायद्याच्या भाषेत चांगलेच सुनावले. आता त्याची हिम्मत नव्हती लोकांना त्रास द्यायची. सगळे सावकाराच्या जाचातून सुटले. आता स्वतंत्रपणे सर्वजण आपापलल्या धंदा व्यवसायात चांगले जोमाने तयारीला लागले. आता वाघ्याचा तब्बेतीत चांगलीच सुधारणा झाली.वाघ्यामुळे सर्वजण निरधास्त झाले.आता वाघ्या पुन्हा सगुनाबरोबर शेतावर जाऊ लागला. तो जास्तच खुलून दिसू लागला. वेगळीच ‘ऐट आणि वेगळाच रुबाब ‘. सगुनाचा लाडका ‘वाघ्या’ आता सर्वांचा लाडका झाला. “वाघ्या” ह्या नावाचे खऱ्या अर्थाने सार्थक झाले.
तुम्हाला ही कथा कशी वाटली, ते नक्की कळवा.आणि आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.या कथांचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या.
धन्यवाद !
लेखिका – शितल औटी, जुन्नर
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे आहेत. लेखिकेने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे. लेखिकेच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
आमचाही लाडका वाघ्या होता!!माझा आणि माझ्या निलुचा खुप जीव होता!!अतिषय प्रामाणिक आणि इनामदार होता!!नेहमी आमच रक्षण करायचा कोणाचीही चाहुल लागली तरी लगेच आम्हाला सावध करायचा!!!जिकडे जाईल तिकडे आमच्याच सोबत होता!!आमच्या आॅफिसचे दिवसभर रक्षण करायचा!!आणि आमच्या पेमामध्ये त्याने महत्वपुर्ण आमची साथ दिली आहे!!!एके दिवस असाच त्याला मी संध्याकाळी नेहममीप्रमाने चहा बिस्कीट घातले ..आणि मार्केट ला गेलो …पण संध्याकाळी वाघ्या दिसलाच नाही …CCTV चेक केले तेव्हा समजले कि राञीच्या वेळेस त्याला वाघाने खाल्ले!!!!आमचा वाघ्या आमच्यातुन निघुन गेला!!वाघ्या हा मला माझ्या भावाप्रमाने होता!!अतिषय दुःखत घटना घडली!!!माझ्या निलुला या दुःखातुन बाहेर काढायला आठ दिवस गेले!!!आणि मी तिला वचन दिले की आपल्या वाघ्याची सेम प्रतिकृती बनवुन आपल्या आॅफिसमध्ये ठेवील आणि रोज त्याला अंघोळ घालुन नेहमीप्रमाने गंध लावील!!!आणि मग नंतर असाच वाघ्या मी बनवुन आॅफिसमध्ये ठेवलाही !!!कोणी ओळखुच शकत नाही कि हा खरा वाघ्या आहे की त्याची प्रतिकृती!!विशेष म्हणजे आज मला कमी पण माझ्या वाघ्याला अनेक लोक ओळखायला लागली आहेत!!!माझ्या वाघ्याला पाहण्यासाठी येता जाताना खुप लोक थांबतात!!!त्याच्यासोबत सेल्फी घेतात आणि मग जातात!!!म्हणुन माझा वाघ्या आजही माझ्यासोबत मरुणही जिवंत आहे!!!हाच त्याचा प्रामाणिकपणा!!आणि त्याच्यावर प्रेम करणारी निलु साध त्याला पाहायला पण आली नाही, माझ्या निलुने त्याच्याच शपथा,त्याचीच वचने,त्यालाच साक्षी ठेऊन माझी साथ सोडणार नाही अस सांगितल होत!!!पण आता तिच मला खुप मोठा धोका देऊन,बाहेरील गुंड बोलावुन मला खुप मारुन माझा,माझ्या वाघ्याचा,आणि माझ्या प्रेमाचा अपमान करुन आम्हाला कायमचे सोडुन गेली!!!आणि आता ती खुप आनंदात देखील आहे!!!!
वाघ्याने जाता जाता एक शिकवण दिली ,कुञ्यावर विश्वास ठेवा पण मुलींवर विश्वास ठेऊ नका!!! I love you माझा वाघ्या!!!
🙏