प्रजासत्ताक दिन म्हणजे लोकशाहीचा गौरव. ‘लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही’.भारत हा एक लोकशाही देश आहे. राज्यघटनेनुसार लोकशाही भारताला 26 जानेवारी 1950 साली मिळाली. त्या दिवसापासून प्रजेची सत्ता सुरू झाली. 15 ऑगस्ट व 26 जानेवारी हे दोन आपले राष्ट्रीय सण.
15 ऑगस्ट आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो तर मग 26 जानेवारी या दिवसाचे काय महत्त्व आहे ? या मागचा काय इतिहास व तो कोठे आणि कसा साजरा करतात याविषयीची सर्वच माहिती आपण या निबंधात जाणून घेऊया चला तर मग पाहूया प्रजासत्ताक दिन म्हणजे नक्की काय ?
‘प्रजासत्ताक’ म्हणजे जिथे देशाचा प्रमुख हा वारसा हक्काने निवडला न जाता लोकनिर्वाचित पद्धतीने निवडला जातो. प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष निवडणुकांच्या माध्यमातून व जेथील सर्व शासकीय कार्यालय पदे देशाच्या सामान्य नागरिकांसाठी खुली असतात. भारताने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती तो दिवस म्हणजेच प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. मुख्यत्वे ‘प्रजासत्ताक’ हा शब्द सार्वभौम देशांसाठी वापरला जात असला तरी, अनेक देशांचे उपविभाग देखील प्रजासत्ताक असू शकतात.

आपण प्रजासत्ताक दिन का साजरा करतो?
देशाची राज्यघटना हि तिथल्या लोकांसाठी आणि त्याच्या विकासासाठी सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज असते आणि ज्या दिवशी तो अमलात येतो तो दिवस राष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस असतो. 26 जानेवारी हा दिवस भारतातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारा दिवस आहे. कारण हाच दिवस होता, जेव्हा देशासाठी सरकार निवडण्याचे स्वातंत्र्य आणि अधिकार नागरिकांच्या हातात देण्यात आले होते. संविधानाने आपल्या नागरिकांसाठी मूलभूत अधिकाऱ्यांची व्याख्या केली आहे आणि लोकांना भाषण स्वातंत्र्य, समानता स्वातंत्र्य आणि न्याय दिला आहे जेणेकरून ते सन्मानाने जगू शकतील आणि कोणत्याही भीती शिवाय स्वतःला व्यक्त करू शकतील.
प्रजासत्ताक दिन हा दिवस,ज्यांनी देशासाठी आपले प्राण दिले त्या महान स्वातंत्र्य सैनिकांच्या संघर्षाची आणि बलिदानाची आठवण करून देतो. हा दिवस भारताची समृद्ध एकता आणि विविधता संस्कृती जगासमोर दाखवण्यास मदत करतो. प्रजासत्ताक दिन लोकांना त्यांच्या हक्काची आणि राष्ट्राप्रती असलेल्या कर्तव्यांची जाणीव करून देतो आणि राष्ट्राला देशभक्ती आणि एकात्मतेच्या रंगात रंगतो.
भारतीय प्रजासत्ताक दिनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी –
भारताच्या प्रजासत्ताक दिनाचा ऐतिहासिक संदर्भ भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्याकडे परत जातो.15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले असले तरी अद्याप स्वतःचे संविधान नव्हते. भारताचे कायदे हे भारतीय राज्यशासनाच्या १९३५ सालाच्या कायद्यावर आधारित होते.
29 ऑगस्ट 1947 रोजी, कायमस्वरूपी राज्यघटनेची रचना करण्यासाठी मसुदा समिती स्थापन करण्याची मागणी करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. डॉ. बी. आर. आंबेडकर ज्याचे अध्यक्ष होते, स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून हा बहुमान त्यांना मिळाला. भारताचा स्वातंत्र्य दिन- ब्रिटिश राजवटी पासून देशास स्वातंत्र्य मिळाले म्हणून तर प्रजासत्ताक दिन -देशाचे संविधान अमलात आले म्हणून साजरे केले जातात. समितीने संविधानाचा मसुदा तयार केला आणि ४ नोव्हेंबर १९४७ रोजी तो संविधान देशाला सादर केला. राज्यघटना स्वीकारण्यापूर्वी विधानसभेची दोन वर्ष एक महिने आणि 18 दिवस चाललेल्या सार्वजनिक अधिवेशनांमध्ये सुमारे 166 दिवस बैठक झाली. व्यापक विचार मंथन आणि सुधारणा नंतर संविधान सभेच्या 308 सदस्यांनी 24 जानेवारी 1950 रोजी दस्तावेज यांच्या दोन हस्तलिखित आवृत्ती त्यांवर स्वाक्षरी केली. दोन दिवसानंतर भारताचे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी संपूर्ण देशात लागू करण्यात आले.
त्या दिवशी डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी भारतीचे राष्ट्रपती म्हणून कार्यकाल सुरू केला त्यांनी २१ तोफ्यांच्या सलामीसह ध्वजारोहण केलं आणि भारताला ‘प्रजासत्ताक राष्ट्र’ म्हणून घोषित केलं. भारतीय नवीन राज्यघटनेच्या संक्रमणकालीन तरतुदीनुसार संविधान सभा भारतीय संसद बनली. त्यानंतर प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिन साजरा केला जाऊ लागला.
प्रजासत्ताक दिनासाठी 26 जानेवारी तारखेची निवड का करण्यात आली ?
सन 1929 मध्ये लाहोर येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बैठकीत ‘पूर्ण स्वराज्य’ किंवा पूर्ण स्वातंत्र्याची मागणी करण्यात आली आणि 26 जानेवारी 1930 हा दिवस पूर्ण स्वराज्य दिवस म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला. जवाहरलाल नेहरूंनी १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. वीस वर्षानंतर संविधान सभेने राज्यघटना अमलात आणण्याची तारीख निश्चित करत असताना पूर्ण स्वराज्याची मागणी करणाऱ्या महान नेत्यांच्या आणि स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करण्यासाठी आणि भारताचे राज्यघटना अस्तित्वात आणण्यासाठी 26 जानेवारी ही एकमताने ठरवण्यात आली.
प्रजासत्ताक दिन कसा साजरा केला जातो-
प्रजासत्ताक दिनाचा समारंभ भारताची राजधानी दिल्ली येथे आयोजित करण्यात येतो. समारंभ मुख्यत्वे तीन भागांमध्ये विभागला जातो. याच सोबत प्रजासत्ताक दिनी खास परदेशी पाहुण्यांना आमंत्रित केले जाते तसेच भारताचे राष्ट्रपती प्रथम तिरंगा फडकवतात आणि त्यानंतर तेथे उपस्थित असलेले सर्व लोक एकत्रितपणे उभे राहून राष्ट्रगीत गातातव २१ तोफांची सलामी दिली जाते.देशासाठी शौर्य गाजावलेल्या सैनिकांना राष्तारापातींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र देण्यात येतात. तसेच राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्राप्त लहान मुले हत्तीवरून किंवा वाहनातून संचालनात सहभागी होतात.
सोहळ्यात भारतातील इतर घटक राज्ये हि भाग घेतात. भारतातील विविध क्षेत्रातील वैभवाचे दर्शन घडवणारी सांस्कृतिक आणि पारंपारिक झाकी काढण्यात येते, जे पाहण्यास अतिशय आकर्षक असतात. तसेच प्रजासत्ताक दिनाचा सर्वात खास कार्यक्रम म्हणजे परेड ज्याला पाहण्यासाठी लोक खूप उत्सुक असतात. राजपथावरील अमर जवान ज्योतीवर पंतप्रधानांनी पुष्प अर्पण केल्यानंतर परेडला सुरुवात होते यात भारतीय फोजांचे वेगवेगळे सेनाविभाग ,घोडदळ, पायदळ तोफ खान आणि इतर अद्यायवत क्षपानास्त्रे, रणगाडे समवेत संचालन करतात. पुरस्कार वितरण – दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या संध्याकाळी भारतीय राष्ट्रपती भारतीय नागरिकांना पद्म पुरस्कार प्रदान करतात. भारतरत्न नंतर हा भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. बिटिंग रिटट या कार्यक्रमाने सोहळ्याची सांगता करण्यात येते.
भारताच्या प्रत्येक राज्यात ,जिल्ह्यात, गावात प्रजासत्तक दिन साजरा करण्यात येतो. शाळांमधून, सरकारी कार्यालयात व अन्यत्रही सकाळी ध्वजवंदन व इतर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते .शाळांना पताका, तोरणे लावली जातात. लहान मुले झेंडा हातात घेऊन मोठ्या उत्सहाने भारत मातेचा जयघोष करीत प्रभात फेरीत भाग घेतात.राष्ट्रीय गाणी वाजवली जातात. प्राथमिक शाळांमधून लहान मुलांना खाऊ दिला जातो. भाषणे, प्रभात फेऱ्या यांचे आयोजन केले जाते. नंतर सर्वजण भारतीय एकात्मतेची शपथ घेतात. विविध क्षेत्रात उलेक्खनीय कामगिरी करणाऱ्या व धाडसी मुलांचाही सरकार तर्फे सत्कार करण्यात येतो. अनेक ठिकाणी विद्युत रोषणाई केली जाते.
प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व –
प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व प्रत्येक भारतीय नागरिकाच्या हृदयात आहे हा भारताचा राष्ट्रीय सणांपैकी एक आहे जो प्रत्येकाच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करतो तरुण दिलेला आपल्या महान भारतीय इतिहासाचे आणि संस्कृतीची ओळख करून देण्यात मदत करणारा हा एक प्रसंग आहे हा तो दिवस आहे जेव्हा आपण आपल्या महान नेत्यांना आणि स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करतो ज्यांनी देशासाठी बलिदान दिले प्रजासत्ताक दिन आपल्याला हे देखील लक्षात ठेवतो की संवेदनासाठी देशातील सर्व नागरिक समान आहेत आणि जात पंथ किंवा धर्माच्या आधारावर कोणताही भेदभाव नाही.
या कार्यक्रमाद्वारे भारत देखील आपली मुत्सद्दी शक्ती प्रदर्शित करतो आणि जगाला संदेश देतो की आपण स्वतःचे रक्षण करण्यास सक्षम आहोत प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचा हा कार्यक्रम भारताच्या परराष्ट्र धोरणांसाठी ही खूप महत्त्वाचा असतो. या कार्यक्रमात आमंत्रित केलेल्या विविध देशांच्या प्रमुख पाहुण्यांच्या आगमनामुळे भारताला या देशांशी संबंध वाढवण्याची संधी मिळते. २६ जानेवारी हा दिवस आपल्या सर्वांसाठी एक ऐतिहासिक सण आहे , तो आपण आदराने व उत्साहाने साजरा करायला हवा, पण केवळ उत्साहात दिवस साजरा केल्याने आपली जवाबदारी संपत नाही. खरे तर प्रत्येक भारतीयाने या दिवशी देशासाठी देश हितकारक कार्य करण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे व तसे वागले पाहिजे.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा watsapp ग्रुप हि जॉईन करा.
धन्यवाद !
लेखिका – डॉ. सुप्रिया सांगवीकर, औरंगाबाद.

वाचनीय, माहितीपूर्ण लेख
सोप्या शब्दात सुंदर मुद्देसूद मांडणी आणि अभ्यासपूर्ण माहिती…
Very well written and informative
छान माहिती.
Very well written 👍
खूप छान माहिती मॅम👌👌👌👌