फिर उस मोड पर l Marathi Story for reading

WhatsApp Group Join Now

   खिडकीच्या काचांवरून पावसाचे पाणी ओघळत होते. घराच्या छतावरून येणारे थेंब त्या काचेला स्पर्श करुन पुढचा प्रवास करत होते. थेंबाचा शांत आवाज, तो स्पर्श मनाला मोहवत असतांना जणू कुठल्यातरी जुन्या आठवणीत गुंतवून ठेवत होता. अशा सुंदर वातावरणात मनाला कोणीच थांबवू शकत नाही. आज या आठवणीत रमून जायचं असं मनाने ठरवलचं होतं. त्या ओघळणाऱ्या थेंबाकडे पाहत अनिता भूतकाळात केव्हा गेली हे समजलंच नाही.

        अनोळखी गाव, अनोळखी माणसं सायंकाळची वेळ होती. अनिता आणि तिची आई भाड्याचे घर पाहण्यास शोधात निघाल्या. कदमांचे घर काही सापडत नव्हतं, शेवटी तिथे बसलेल्या एका तरूणाला अनिताने घराचा पत्ता विचारला. त्याने आधी अनिता आणि तिच्या आईची चौकशी केली मग समोर बोट दाखवून सांगितले कि ते समोरचं घर कदमकाकांचं आहे. दोघींनी त्या घराची पाहणी केली आणि लगेचचं दुसऱ्या दिवशी सामान घेवून रहायला येतो असे सांगितले.

       दुसऱ्या दिवशी अनिता तिच्या कुटुंबासहित कदम काकांच्या इथे भाड्याच्या घरी रहायला आले. सगळे सामान व्यवस्थित लावून झाले. समोर छान मोठे अंगण होते. तिथे बसून सगळेजण गप्पा मारू लागले; पण अनिता थोडी बेचैन वाटली कारण समोरच्या घरात राहणारा नीरज सारखा तिच्याकडे पाहत होता.

       एक दिवस अनिताची नजर नीरजवर पडली. दिसायला अतिशय स्मार्ट, गोरापान असा राजबिंडा नीरज अनिताला पण आवडला. अनिता पण त्याला चोरून चोरुन पाहत होती; पण मनात एक भीती होती  ह्याला आपण आवडतो की नाही.न राहवून नीरजने अनिताला एक साधेसुधे पत्र नाही प्रेमपत्र पाठवले. अनिताच्या मनातही नीरजविषयी प्रेम उत्पन्न झाले होते त्यामुळे त्याला लगेच होकार मिळाला. येथून सुरू झाली अनिता नीरजची प्रेमकहाणी. दोघेही येताजाता एकमेकांशी बोलू लागले, एकमेकांना प्रेमपत्र देणेघेणे सुरु झाले.

        नीरज एका कंपनीत कामाला होता. सकाळी जायचा ते सायंकाळी यायचा. संध्याकाळ झाली की अनिता त्याची वाट पाहत असे. दोघांचेही पहिले प्रेम होते; पण ते दोघे मनाने एकमेकांमध्ये पूर्णपणे गुंतले होते. पत्राद्वारे दोघे मनातल्या भावना एकमेकांना सांगू लागले. भेटीगाठी होऊ लागल्या. अनिता फार प्रेम करत होती नीरजवर. त्याच्यासाठी ती काहीही करायला तयार असायची. कधीकधी नीरज घरातून डबा न घेता जायचा; पण अनिता त्याच्यासाठी त्याच्या कंपनीत लांबवर डब्बा घेऊन जायची. त्याच्या कंपनीत पण सगळ्यांना यांची प्रेमकहाणी समजली होती. दोघांनी आपल्या संसाराची खूप स्वप्न रंगवली होती. 

        एक दिवस नीरजच्या घरी सगळं समजले. त्याचे आईवडिल अनिताच्या घरी आले. दोघांच्या कुटुंबाने अनिता आणि नीरजला वेगळे केले. त्यावेळी नीरज कंपनीच्या कामानिमित्त पंधरा दिवसासाठी बाहेर गावी गेला होता. त्याने जाण्याआधी अनिताला कल्पना दिली होती की तो बाहेर गावी जाणार आहे; पण त्या काळात असे काही घडले की, दोघेही एकमेकांपासून लांब झाले. 

नीरज कुठे गेला ? अनिता कुठे गेली ? याचा पत्ता दोघांना पण नव्हता. अनिताला त्या शहरापासून लांब पाठवण्यात आलं तेव्हा अनिताकडे फक्तं नीरजच्या घरचा फोन नंबर होता. नीरजच्या घरी अनिताने खूप फोन केले. त्याला अनेक पत्रे पाठवली; पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अनिताची नजर नेहमीचं नीरजला शोधत राहिली; पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. दोष कुणाला देणार ? दोघंही घरातल्यांसमोर आणि नियतीपुढे हतबल झाले होते.

          इकडे अनिताचे तिच्या आईवडिलांनी लग्न करून दिले. मनात नसतांनाही अनिताला लग्न करावे लागले. अनिता तिच्या नवऱ्याला तिचा भूतकाळ कधीचं सांगणार नव्हती कारण तिने नीरजवर पवित्र प्रेम केले होते. आपल्या शिलाला डाग लागावे असे कृत्य केले नव्हते; पण अनिताने एक पत्र नीरजला लिहून ठेवले होते ते अनिताच्या नवऱ्याच्या हातात सापडले. 

             जेव्हा पत्र सापडले तेव्हा अनिता आपल्या संसारात पूर्णपणे गुंतली होती. दोन मुलांची आई झाली होती. नवरा आणि मुलंच तिचे विश्व झाले होते. तरीदेखील तिचा नवरा आता तिच्यावर संशय घेऊ लागला. मुलांसमोर तिला वाटेल तसा बोलू लागला. अनिताने तिच्या नवऱ्याला कितीतरी वेळा पटवून देण्याचा प्रयत्न केला तरीही तो त्याचा हेका सोडत नव्हता की त्याने अनितावर संशय घेण्याचे सोडले.   

        अचानक ‘ आई आई ए आईईईईईई ‘ कोणता विचार करते आहेस ? असा आवाज ऐकला आणि अनिता भानावर आली. अनिताच्या लग्नाला बावीस वर्ष पूर्ण झाली होती; पण म्हणतात ना पहिलं प्रेम माणूस कधीच विसरत नाही. ती व्यक्ती मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी असतेचं.अनिताचा नवरा तिच्यावर लग्नाला इतकी वर्षे होऊनसुद्धा अजूनही संशय घेतंच असल्यामुळे तिच्या मुलांनी तिच्या पूर्वायुष्याबद्दल विचारले असता अनिताने मुलांना तिच्या भूतकाळातील गोष्ट सांगितली.

 तिच्या मुलांना तिने सांगितले होते की, तिचं देखील नीरजवर प्रेम होतं; पण परिस्थिति अशी आली की, त्यांचं प्रेम सफल झाले नाही. आपली आई तिच्या संसारात कुठेही कमी पडली नाही हे तिच्या मुलांनी पाहिले होते म्हणून मुलंपण तिला कधी चुकीचं समजत नव्हते.  पण अचानक एक दिवस फेसबुकला मेसेंजरवर आलेला नीरजचा मेसेज पाहुन अनिताला  समजतचं नव्हते की याच्यासोबत बोलू की नको ? बावीस वर्षांनंतर याला माझी आठवण कशी काय आली ? न राहवून नीरजच्या मेसेजला अनिताने रिप्लाय केला. पूर्ण दिवस मेसजवर बोलून एकमेकांचे फोन नंबर दोघांनी घेतले. रोज बोलून दोघात झालेले गैरसमज तर दूर झाले होते पण आता खूप उशीर झाला होता. तरीही दोघांनी मैत्रीचे संबंध ठेवण्याचा निर्णय घेतला. अनिताने हे सर्व तिच्या मुलांपासून लपवले नाही.

             मुलांनी आपल्या आईला कायम वडिलांच्या धाकात असलेली, स्वतःचे जीवन संसारात वाहून घेतले असले तरी नवऱ्याच्या नजरेत एक वाईट प्रतिमा निर्माण झालेली अशी एक स्त्री पाहिली होती. त्यामुळे आई आपल्या आवडत्या व्यक्तीशी नुसते बोलून आनंदीत राहू लागली आहे ह्याचा फारसा परिणाम मुलांवर झाला नव्हता कारण त्यांची आई आतापर्यंत स्वतःसाठी जगलीच नव्हती. अनिताची मुले आपल्या आईचा मानसिक त्रास, तिची सदानकदा होत असलेली घुसमट  रोजचं पाहत आली होती.

              रोज बोलणारी अनिता तीन चार दिवस झाले तरी का फोन करत नाही ? मेसेज का करत नाही ? या विचारात असतांना न राहवून नीरजने अनिताच्या मोबाईलवर फोन केला पण तो बंद येत होता. शेवटी त्याने अनिताच्या मुलीला फोन केला. फोनवर अनिताच्या मुलीचा आवाज आणि अनिताने सांगितलेला निरोप ऐकून नीरजच्या पायाखालची जमिनचं सरकली. अनिताने तिच्या मोबाईलमध्ये एक पत्र टाईप करून ठेवले होते ते अनिताच्या मुलीने नीरजला पाठवले.

        त्या पत्रात लिहीले होते, ” ज्या दिवशी हे पत्र तुला मिळेल तेव्हा मी या जगात नसेन. मी कायम तुझी वाट पाहत होते; पण तू आयुष्याच्या अशा क्षणी भेटशील अशी आशा नव्हती. मी जरी या जगात नसले तरी माझ्या मुलांशी संपर्क ठेव. माझी मुले कायम त्यांच्या वडिलांचा संशयी स्वभाव पाहत आले. मी पवित्र असूनही मला दूषणे दिलेली पाहत आले. त्यांना तुझ्या माझ्याविषयी सगळं सांगितलं आहे. तरीही आपली आई एका फोनवर बोलण्याने आनंदी दिसते ह्यात त्यांनी त्यांचा आनंद मानला. तू पुन्हा भेटलास तेव्हा मला फार आनंद झाला होता; पण मला ब्रेन ट्युमर झाला आहे हे सांगण्याची माझी तुला हिम्मत झाली नाही.”

           अनिताचा शेवटचा मेसेज पाहून मात्र आता नीरजच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले.

अनितासारखी चांगली मुलगी आणि तिच्या आयुष्यात तिला कधीचं सुख मिळाले नाही आणि आता तिला पुन्हा तिच्या आयुष्यात थोडेसे सुख लाभणार होते तर देवाने ते सुख देखील हिरावून घेतल्याने राहून राहून नीरजला त्याचेच सारखे वाईट वाटत होते. 

     अनितासाठीचा शोक व्यक्त करताना अचानक नीरजच्या छातीत एक जोरदार कळ आली आणि जणू अनिताला दुसऱ्या वळणावर भेटायला त्याने देखील हे मायावी जग सोडले.

2 thoughts on “फिर उस मोड पर l Marathi Story for reading”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top