एक बंदिस्त रहस्य l Marathi Horror Story 2024 

WhatsApp Group Join Now

 तनु खिडकीतून बाहेर आसमंतामध्ये चंद्र ताऱ्यांची शीतलता पाहण्यात व्यस्त होती . ताऱ्यांपेक्षाही कमालीचा तेजस्वी चंद्र तिला जास्तच आकर्षित करत होता. ती तेजस्विता आणि ती शीतलता एक वेगळाच थंडावा मनाला देत होती. अतिशय शांत वातावरणात समोरचा मंत्रमुग्ध नजारा पाहण्यात व्यस्त असणाऱ्या तनुला अचानक आवाजाचा भास झाला आणि ती दचकली . घाबरलेल्या तनुची नजर आता चंद्रावरुन हटली आणि हळूहळू खिडकीतून थोड्याशा दूरवर असणाऱ्या त्या बंद वाड्यावर स्थिर झाली. संमोहित झाल्या सारखी ती एकटक त्या बंद दरवाजा कडे पाहू लागली. 

        “तनु.. तनु… ए तनु…. काय झाले हिला? कशी बेशुद्ध पडली ?..आणि ही खिडकी…. ही खिडकी कोणी उघडली ? ” अक्कासाहेब रागाने सर्वांवर अक्षरशः कोसळत होत्या. अण्णासाहेब देखील गोंधळले होते तर भानुप्रताप आपल्या पत्नीला कावेरीला हाक देत होते. तनुच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडताच तिने हळुच डोळे किलकिले करत पाहिले. अक्कासाहेबांच्या जिवात जीव आला. त्यांनी तनुला उठवून बसवले. घरकाम करणारे सगळे नोकर अक्कासाहेबांच्या आवाजाने धावत आले होते. सगळेच गोंधळले होते आणि घाबरले सुद्धा होते. नंदा आणि सुलभाने तनुला आधार देत उठवले आणि तिथून बाहेर घेऊन गेल्या. 

         “कावेरी…. कावेरी… ” अक्कासाहेबांचा राग सातव्या आसमानावर पोहोचला होता. थरथरत त्या उघडलेल्या खिडकी कडे पाहत होत्या आणि अचानक त्यांच्या कानाजवळ आवाज आला. 

        “मालतीइइइइ…. “. अक्कासाहेबांच्या कपाळावर घाम जमा झाला. आतापर्यंत रागाने कडाडणाऱ्या अक्कासाहेबांच्या चेहऱ्यावर भिती स्पष्ट दिसू लागली. त्यांनी हळुच मान पाठीमागे वळवली पण तिथे कोणीच नव्हते. आपल्याला भास झाला असे समजून अक्कासाहेब छातीवर हात ठेवून श्वास नियंत्रित करु लागल्या. अक्कासाहेबांच्या जोरजोरात हाका मारण्याने घाबरून तिथे आलेली कावेरी जागीच गोठून गेली. कारण तिचे लक्षही त्या उघडलेल्या खिडकी कडे गेले होते. तिने धावत जाऊन पटकन ती खिडकी बंद केली आणि आजूबाजूला गडबडून पाहू लागली. तिथेच खाली जमिनीवर पडलेला लाल धागा उचलून तिने परत त्या खिडकीला बांधला. 

        “अक्कासाहेब… खिडकी शेवटी उघडली गेलीच.. तेही तनुच्या हातून..गेली बावीस वर्षे बंद असणारी खिडकी आज उघडली गेली अक्कासाहेब.. काही तरी करा अक्कासाहेब… काही तरी करा.. वेळ हातातून निसटून जाण्याआधी काही तरी करा… आम्हाला तर आता भिती एकाच गोष्टीची वाटत आहे… जर…. जर तनुला सत्य कळले तर…. ” कावेरीच्या बोलण्यावर अक्कासाहेब कावऱ्या बावऱ्या झाल्या. 

       “नाही.. नाही.. कधीच नाही.. आम्ही तनुला कधीही सत्य कळू देणार नाही…. कधीच नाही “. अक्कासाहेब जवळजवळ धावतच त्या खोलीतून बाहेर पडल्या. कावेरी मात्र अजूनही त्या खिडकी कडे पाहत होती. 

     तनुला शुद्ध आली होती पण डोके खूप जड वाटत होते . आपल्या सोबत नक्की काय घडले हे आठवण्याचा प्रयत्न ती करत होती पण केवळ चंद्र आणि तारे आठवत होते त्या पलीकडे काहीच नाही. 

      “तनु …. बाळ तुम्ही तिथे कशा पोहोचलात? वाड्याचा अगदी वरचा माळा आणि ती खिडकी या वाड्याची मागची बाजू आहे . तिकडे जाण्यास सर्वांनाच बंदी असताना तुम्ही का गेला तिकडे? ” अक्कासाहेब थोड्याशा रागात आणि खूप साऱ्या काळजीने तनुला विचारत होत्या पण तनुला ती तिथे कशी गेली आणि ती खिडकी तिने का उघडली आठवेना. अक्कासाहेब आता मात्र शांत बसल्या. पुढे त्यांनी तनुला काहीच नाही विचारले . 

        तनुजा म्हणजे अक्कासाहेबांचं एकुलत एक लाडकं कन्यारत्न होतं. तळहाताच्या फोडा प्रमाणे जपले होते अक्कासाहेबांनी तनुला. चौथी पर्यंत तर तनु अक्कासाहेबांसोबत त्यांच्या वाड्यातच राहीली पण पाचवीपासून मात्र तनुला त्या वाड्यापासून दूर पाठवण्यात आले. शिक्षणासाठी म्हणून बाहेर पडलेली तनु काही दिवसांपूर्वी परतली होती…. पुन्हा त्याच वाड्यात….. 

        “अक्कासाहेब…. काय विचार करत आहात? ज्या दिवशी खिडकी उघडली त्या दिवसापासून या वाड्यात विचित्र आणि भयानक घटना घडत आहेत.कदाचित…कदाचित ..ते सगळे परत आलेत…नक्कीच परत आलेत “.विचारात गढलेल्या अक्कासाहेबांना पाहून घाबरलेल्या कावेरीने विचारले आणि हातातील चहाचा कप अक्कासाहेबांच्या हातात दिला. 

       “कावेरी… या घरात आमची धाकटी जाऊ बनून आलात आणि आमच्या धाकट्या बहिणी प्रमाणे आम्ही तुम्हाला वागणूक दिली. आजही आम्ही तुमच्या वर डोळे झाकून विश्वास ठेवतो आणि म्हणूनच परत परत एकच गोष्ट सांगतो….तुमच्या कडून आमचा विश्वासघात होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्या… समजले का जाऊबाई…”अक्कासाहेबांच्या थंड पण धारदार आवाजाने कावेरीच्या शरीराला मात्र थरथर जाणवू लागली. कानामागून भितीने घामाचे ओघळ वाहू लागले. 

         “नाही नाही अक्कासाहेब.. आ.. आम्ही तु..तुमच्या विरोधात जाण्याचे धाडस कसे करणार? कारण आम्हाला माहिती आहे की आमचाही सगळ्यात तेवढाच सहभाग आहे जेवढा तुमचा.. इतकी वर्षे लोटली पण आम्ही तोंडातून ब्र नाही काढला आणि इथून पुढेही नाही.. तुमची शपथ अक्कासाहेब “. कावेरीने अक्कासाहेबांची शपथ घेतली इतक्यात सुलभाचा जोरात किंचाळण्याचा आवाज आला आणि अक्कासाहेब झटकन उठून उभ्या राहिल्या. कावेरी अजूनही बसून होती आणि त्या आवाजाने घाबरली होती. 

      ” कावेरी… बसलात काय अशा? बाहेर जाऊन पहा काय झाले आहे. उठा.. “अक्कासाहेबांचा चढलेला आवाज ऐकून कावेरी उठून लगबगीने बाहेर गेली. अक्कासाहेब तिच्या पाठोपाठ आल्या आणि पाहतात तर सुलभा त्या बंद वाड्याकडे पाहत होती. घाबरलेल्या सुलभाच्या तोंडून आवाज फुटत नव्हता. सगळे काय झाले म्हणून विचारत होते पण सुलभाचे शब्द तोंडात विरत होते. अक्कासाहेब आणि कावेरी दोघीही एकदा बंद वाड्याकडे आणि एकदा एकमेकींकडे पाहत होत्या. खिडकी उघडल्या पासून चित्र विचित्र घटना घडत होत्या. कधी कोणाला काही इजा व्हायची तर कधी कोणाला विचित्र भास व्हायचे. 

        आज तनुचा वाढदिवस होता. वाडा छान सुशोभित करण्यात आला होता. तनुच्या आवडीचे पदार्थ बनत होते . तनुच्या वाढदिवस धुमधडाक्यात साजरा होत होता. तनु तिच्या रुम मध्ये तयार होत होती की अचानक कोणीतरी तिथे असल्याचा भास तिला झाला. तिने हातातील कंगवा खाली ठेवला आणि इकडे तिकडे पाहत ती रुम मधून बाहेर आली. इकडे तिकडे पाहता पाहता तिचे लक्ष वरच्या माळ्याकडे गेले आणि तिथे खांबाच्या आड एक अस्पष्ट आकृती नजरेस पडली. 

        “कोण? कोण आहे तिकडे? आणि तुम्ही वरच्या माळ्यावर काय करताय? अक्कासाहेबांनी सांगितले आहे तिकडे जाण्यास बंदी आहे.. परत या.. कोण आहे? ” तनु पाठीमागून आवाज देत देत कधी वरच्या माळ्यावर येऊन पोहोचली तिला कळले देखील नाही. त्या आकृतीच्या पाठोपाठ तनु आता परत त्या खोली समोर येऊन उभी राहिली आणि तिला आठवले की त्या दिवशी पण ती अशीच तर इथे पोहोचली होती. पुस्तक वाचताना वाचता कोणीतरी असल्याचा भास झाला आणि ती अस्पष्ट आकृतीचा पाठलाग करत इथपर्यंत पोहोचली होती. आज देखील असेच घडले होते. 

        तनुने हळुवार पावले टाकत त्या रुम मध्ये प्रवेश केला. सगळ्या रुम मध्ये नजर फिरवली. तिची नजर त्या खिडकीवर येऊन स्थिरावली. पावले आपसूकच तिकडे वळली आणि परत तनुने त्या खिडकीचा लाल धागा काढून टाकला आणि खिडकी उघडली. एक हवेची थंड झुळूक आली आणि तनुने हवेच्या स्पर्शाने डोळे मिटले. तिला बंद डोळ्याआड तिच्या आजच्या वाढदिवसाची सजावट दिसू लागली. मग दिसला तो मला मोठ्ठा केक… अक्कासाहेब…अण्णासाहेब..कावेरी.. भानुप्रताप… वरद… तेजू….. तनुच्या चेहऱ्यावर गोड हास्य पसरु लागले. तिचं घर.. तिची माणसं… आणि ते… ते कोण आहेत?…. त्या.. बाई कोण आहेत?… तिथे तर एक वृद्ध स्त्री पण आहे…. कोण आहेत हे सगळे आणि माझ्या घरात का आहेत? ही अनोळखी लोक आहेत… कोण? कोण?… माझ्या कडे पाहून स्मितहास्य का करत आहेत?….. मी… मी ओळखतो का तुम्हाला?… अरे थांबा… थांबा… ओ काका… कुठे चाललात? अगं आई गं… पडले ना मी… ” तनुने खाडकन डोळे उघडले आणि समोरचा नजारा पाहून तिची हाडं गोठली.. 

         तनु त्या बंद वाड्याच्या भल्या मोठ्या दरवाजा समोर उभी होती. तिने आजूबाजूला पाहीले. तिथे कोणीही नव्हते. कसलाही आवाज नव्हता. पसरली होती केवळ भयाण शांतता आणि अचानक करकर करत समोरचा दरवाजा उघडला गेला. तशी तनु दचकली पण लगेचच स्वत:ला सावरत तिने समोर उघडणारा दरवाजा पाहिला. घाबरत घाबरत तिने त्या दरवाजातून आत प्रवेश केला.सगळीकडे धुळीचे साम्राज्य पसरले होते. जाळी आणि जळमटांनी ठाण मांडले होते. तनु सगळीकडे नजर फिरवत पुढे पुढे चालली होती आणि अचानक ती एका जागी थांबली. तिने हळुच मान बाजूला फिरवून पाहिले तर एका आराम खुर्चीवर मघाशी दिसलेले काका बसले होते. 

       तनु काहीशा रागात पुढे जातच होती की तिला तिथे ती वृद्ध स्त्री आणि ती बाई एका पायरीवर बसलेल्या दिसल्या. तनुला काहीच समजेनासे झाले आणि अचानक दचकून ती चार पावले मागे सरकली. 

       “मी… मी इथे कशी आले? मी तर माझ्या वाड्यात होते. मा.. माझा वाढदिवस.. अक्कासाहेब.. अक्कासाहेब”.तनु दरवाजा कडे धावली पण ती दरवाजा पर्यंत पोहोचण्या आधीच दरवाजा धाडकन बंद झाला. तनुची भितीने गाळण उडाली. तिने हळूहळू मागे फिरुन पाहिले. 

        इकडे सगळे तनुला शोधून बेजार झाले होते. तनु कुठे सापडत नव्हती तसा अक्कासाहेबांचा जीव घाबरा होऊ लागला. अक्कासाहेबांनी त्या बंद वाड्याकडे जायचा मनाशी निश्चय केला आणि दरवाजा कडे धावल्या पण त्यांची पावले जागीच थबकली कारण समोर तनु उभी होती. अक्कासाहेबांच्या मनाला शांतता मिळाली. त्यांनी तनुला छातीशी घट्ट कवटाळले पण तनुने त्यांना झिडकारून लावले. अक्कासाहेब आणि इतर सगळेच अवाक् झाले. 

        “तनु काय झाले बेटा? कुठे गेला होता? आम्ही किती घाबरलो होतो? …. ठीक आहे.. चला केक कापूया “.अक्कासाहेबांनी तनुचा हात धरला आणि पुढे चालू लागल्या. 

      ” आमच्या आई वडिलांना का मा*र*ले? किय बिघडवले होते तुमचे? ” . तनुच्या या प्रश्नासरशी अक्कासाहेब स्तब्ध झाल्या. 

     “आम्ही तुमच्या आई आहोत तनु.. हे असे काही काय बोलत आहात “. अक्कासाहेबांनी सावरण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. 

       ” तुम्ही आमच्या आई आहात तर या कोण आहेत? ” तनुच्या पाठीमागे दरवाजा समोर तनुला दिसलेली बाई उभी होती. तिला पाहून कावेरी थरथर कापू लागली. अविश्वसनीय गोष्ट घडत होती. अक्कासाहेब देखील हादरल्या कारण आता ते काका आणि वृद्ध स्त्री पण तिथे होती. अक्कासाहेबांना कळून चुकले आणि भावनिक होऊन त्यांनी सत्य सांगायला सुरुवात केली. 

       अक्कासाहेब म्हणजेच मालती, कावेरी आणि वसुंधरा इनामदार घराण्याच्या सुना.. पण मान मिळत होता केवळ सगळ्यात मोठ्या वसुंधराला आणि या गोष्टीचा राग मालती आणि कावेरीला होता. त्यामध्ये मालतीला संतान नसल्याने ती अजूनच चिडचिड करत होती. त्यात सर्व संपत्ती इरादेवींनी आपल्या मोठ्या मुलाच्या आणी मोठ्या सुनेच्या नावे करायची ठरवली आणि इथेच भडका उडाला. संपत्ती आणि अपत्य यांच्या लोभापायी मालतीने कावेरीला हाताशी धरून इरादेवी, वसुंधरा आणि दिनकरराव तिघांनाही संपवले. जिथे त्यांना संपवण्यात आले तो वाडा बंद केला. केवळ वसुंधरा आणि दिनकररावांची दहा महिन्यांची मुलगी तनुला मात्र मालतीने आपले अपत्य मानून सांभाळले.त्याच्या काहीच अंतरावर असणाऱ्या दुसऱ्या वाड्यात त्या राहण्यासाठी आल्या पण वाड्याच्या मागच्या बाजूला असणारी एकमेव खिडकी बंद करून टाकली. पण तनुने खिडकी उघडली आणि बावीस वर्षानंतर सत्य बाहेर आले. अक्कासाहेबांचा तनु वर खूप जीव होता. अक्कासाहेब रडत होत्या. तनुची माफी मागत होत्या आणि तनु मात्र समाधानाने हसणाऱ्या आपल्या जनमदात्यांकडे आणि लाडक्या आजीकडे पाहत होती. 

टीप : सदर कथा कोणत्याही अंधश्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. 

—–समाप्त ——

      Marathi Horror Story 2024  कथा कशी वाटली तुमच्या प्रतिक्रिया देऊन कळवा.तुमच्या मित्र परिवारासोबत कथा शेअर करा.अशा नवनवीन कथांसाठी आमच्या लेखक मित्र वेबसाइटला जरुर भेट द्या आणि आमचे what’s up चॅनेल जाॅइन करा. धन्यवाद 

महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)

6 thoughts on “एक बंदिस्त रहस्य l Marathi Horror Story 2024 ”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top