26 January Bhashan in Marathi l26 January Best Speech in Marathi l Republic Day Marathi Speech

WhatsApp Group Join Now

२६ जानेवारी रोजी ठिकठिकाणी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. भारतभर त्या दिवशी उत्साहाचे वातावरण असते. या मंगल दिवशी जे मान्यवर भाषण देतात ते अगदी दीर्घकाळ लक्षात राहील असे हवे. म्हणून तुम्हाला अगदी योग्य आणि समर्पक शब्दांत हवे असल्यास आजचा लेख जरूर वाचा आणि अनेकांपर्यंत तो पोहोचवा.

               रंग त्यागाचा तिरंग्यात पहावा
               देश प्रेमात सारा जनसागर उसळावा
               जयघोष भारताचा नभात गुंजावा
               प्रजासत्ताक दिन सदा चिरायू व्हावा.

आदरणीय मान्यवर मंडळी, माझ्या देश बांधव आणि भगिनींनो,

सर्वप्रथम ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनमोल योगदान दिले त्या सर्व वीर महापुरुषांना माझे विनम्र अभिवादन.

   आजच्या या मंगलमय पावन दिवशी आपला भारत देश ‘७५वा प्रजासत्ताक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. हा आपला राष्ट्रीय सण असून प्रत्येक भारतीयांसाठी आनंदाचा,उत्साहाचा, सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. आपणा सर्वांना या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला दर वर्षी प्रश्न पडत असेल कि प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी याच दिवशी का साजरा केला जातो?

तुम्हाला माहीतच असेल की, भारत स्वतंत्र होण्यापूर्वी आपल्या देशावर ब्रिटिशांचे राज्य होते. स्वातंत्र्य चळवळीत अनेक वीर पुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. महात्मा गांधीजींच्या अहिंसा आणि सत्याग्रहांनी ब्रिटिशांना हादरवून सोडले .तर भगतसिंग,सुखदेव व राजगुरू यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. डॉ.आंबेडकर, महात्मा फुले आणि अनेक समाज सुधारकांनी समाजातील विषमते विरुद्ध लढा देऊन समानतेचा पाया रचला. या सर्व महापुरुषांच्या योगदानाने आज आपला भारत देश स्वतंत्र आणि समतावादी राष्ट्र म्हणून ओळखले जाते.१५ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश या ब्रिटिश राजवटी पासून मुक्त झाला आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. म्हणून ‘१५ ऑगस्ट ‘हा दिवस आपण ‘स्वातंत्र्य दिन’ म्हणून साजरा करतो. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले खरे पण या देशाचा राज्यकारभार चालवण्यासाठी कोणतेही नियम ,अटी ,कायदे लागू झाले नव्हते ही गोष्ट लक्षात घेऊन पंडित जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभा घेण्याचा निर्णय घेतला.

             आता तुम्हाला प्रश्न पडला असेल संविधान म्हणजे काय?भारताचे संविधान म्हणजेच भारताची राज्यघटना किंवा घटना. हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे .देशाच्या राज्यकारभारासंबंधीच्या तरतुदीचा लिखित दस्तऐवज होय. संविधानातील तरतुदीनुसारच राज्यकारभार करण्याचे शासनावर बंधन असते.म्हणजेच एखादा देश किंवा राष्ट्र चालवण्यासाठी आखून दिलेले मूळ अधिकार ,कायदे व नियम असे म्हणता येईल. हे नियम राष्ट्राचे अस्तित्व ठरवतात.संविधान भारताला सार्वभौम ,समाजवादी,धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही घोषित करते. संविधान हे नागरिकांना न्याय,समानता आणि स्वातंत्र्य तसेच बंधुत्वाला चालना देण्यासाठी प्रयत्नांची हमी देते. हे जगातील सर्वात मोठे लिहिले गेलेले असे भारताचे संविधान आहे. यात २२ भाग आणि बारा वेळापत्रकांमध्ये विभागलेले ४४८ लेख आहेत. हे संविधान तयार करण्यासाठी मसुदा समिती स्थापन करण्यात आली होती.

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या संविधान समितीने तब्बल २ वर्ष ११ महिने १८ दिवस अथक परिश्रम घेऊन देशाचे समृद्ध संविधान तयार केले. हे संविधान तयार करण्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा होता.म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘राज्यघटनेचे शिल्पकार’असे म्हटले जाते.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी या संविधानाचा स्वीकार करण्यात आला म्हणून २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. तर २६जानेवारी १९५० रोजी या संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली होती.जवाहरलाल नेहरू यांनी ३१ डिसेंबर १९२९ रोजी लाहोर जवळ रावी नदीच्या काठी अशोक चक्रांकित तिरंगा ध्वज फडकवून पूर्ण प्रजासत्ताकाची (स्वातंत्र्याची )घोषणा केली होती.त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. आणि आपला भारत देश ‘प्रजासत्ताक’ म्हणून घोषित करण्यात आला. म्हणून २६ जानेवारी याच दिवशी ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा केला जातो. ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणजे प्रजेच्या हाती सत्ता आली तो दिवस थोडक्यात असे म्हणता येईल.

           भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे म्हणजेच भारतावर कुठल्याही परदेशी राष्ट्राचा ताबा नाही भारत स्वतःचे परराष्ट्र धोरण ,आर्थिक ,न्याय आणि इतर सर्व धोरणे ठरवते म्हणूनच भारताला ‘प्रजासत्ताक ‘असे म्हटले जाते. देशात २६ जानेवारी हा दिवस सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दरवर्षी नवी दिल्ली येथे २६ जानेवारी रोजी राजपथावर भव्य पथ संचलन पार पडते. यामध्ये देशाची समृद्ध संस्कृती दिसून येते. तसेच लष्करी पराक्रमाचं शक्ती प्रदर्शन पाहावयास मिळते.या पथ संचलनामध्ये राजपथावर भारतीय सैन्य दल, हवाई दल आणि नौदल यांच्या वेगवेगळ्या रेजिमेंट्स सहभागी होतात.तसेच विविध राज्यांची संस्कृती आणि भिन्नता यांचे झलक दाखवणारे चित्ररथांचेही संचलन पार पडते. या तीन दिवसाच्या उत्सवाची समाप्ती बीटिंग रिट्रीट या समारंभाने होते.

         स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत १९५० रोजी राजधानी दिल्ली येथे राजपथावर पहिले संचलन आयोजित करण्यात आले होते. भारताच्या ‘विविधतेतून एकता’या वैशिष्ट्याला ही मानवंदना होती.

              स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या दोन्ही दिवशी झेंडा फडकविला जातो परंतु सामान्य भाषेत त्याला ध्वजारोहण आणि ध्वज फडकवणे असे म्हणतो. परंतु खूप कमी लोक असे असतील ज्यांना या दोन शब्दांमधील फरकाचा अर्थ माहित असेल तर तो अर्थ माहिती असणे आवश्यक आहे. १५ ऑगस्ट १९४७ पासून दरवर्षी स्वातंत्र्य दिवशी देशाचे पंतप्रधान  लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात. स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकवण्याची एक खास पद्धत असते या दिवशी खांबाच्या तळाशी तिरंगा बांधला जातो आणि तो दोरीने खेचून वर पर्यंत नेऊन फडकवला जातो याला ‘ध्वजारोहण’असे म्हणतात. हे ध्वजारोहण नवीन राष्ट्राच्या उदयाचे प्रतीक मानले जाते.१५ ऑगस्टला केले जाणारे ध्वजारोहण भारताचा उदय आणि ब्रिटिश राजवट यांचे प्रतीक आहे. देशाचे पंतप्रधान स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करतात. तर देशाचे राष्ट्रपती २६ जानेवारीला राजपथावर झेंडा फडकवतात. १९५० पासून दरवर्षी प्रजासत्ताक दिनी देशाचे राष्ट्रपती राजधानी दिल्लीत असलेल्या राजपथ वर तिरंगा फडकवतात याप्रसंगी तिरंगा ध्वज आधीच खांब्याच्या वर्षा टोकाला बांधलेला असतो आणि तो दोरीने खेचून राष्ट्रपती उघडतात आणि फडकवतात याला ‘झेंडा फडकवणे’ असे म्हटले जाते. झेंडा फडकवण्याच्या या कृतीतून भारत हा आधीपासूनच स्वतंत्र आणि संविधानिक देश असल्याचे चिन्हांकित होते.

             राष्ट्रपती हे देशाचे घटनात्मक प्रमुख व्यक्ती असल्याने त्यांच्या हस्ते ध्वज फडकविला जातो. राष्ट्रपतींचे आगमन झाल्यानंतर इंडिया गेट पासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथावर हे पथसंचलन सुरू होते. ध्वज फडकविल्यानंतर राष्ट्रगीत गायले जाते आणि २१ तोफांची सलामी दिली जाते. त्यानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते देशासाठी शौर्य गाजविलेल्या सैनिकांना अशोक चक्र , परमवीर चक्र आणि वीरचक्र हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. भारतात ठिकठिकाणी ध्वजवंदन करून भारतीय संविधाना प्रति आदर व्यक्त केला जातो.

               २६ जानेवारी हा केवळ उत्सवाचा दिवस नाही तर हा आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. आजचे नवे तंत्रज्ञान अवकाश संशोधन ,आरोग्य ,शिक्षण या विविध क्षेत्रात भारताने उल्लेखनीय प्रगती केली आहे. देशाच्या विकासासाठी आपण आवश्यक ते प्रयत्न केले पाहिजे व आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. देशातील ‘विविधतेतील एकता ‘या तत्त्वाचे पालन केले पाहिजे.

लहान लहान कृतीतूनही आपल्याला आपल्या देशावरचे प्रेम व्यक्त करता येईल.जसे शिक्षणापासून वंचित असलेल्याला तुम्ही ज्ञानदान देऊ शकता. भुकेल्याला अन्न देऊ शकता, एखाद्याला निवारा देऊ शकता तसेच एखाद्या आजारी माणसाची काळजी घ्या .पर्यावरण राखण्यासाठी एखादे झाड लावून पर्यावरणाचे रक्षण करा .पक्षी,प्राण्यांवर दया करा.पाणी हे जीवन आहे त्याचा योग्य तो वापर करा.प्लास्टिकचा वापर टाळा.आपल्या धरणी मातेचे रक्षण करा. आपल्या प्रगतीच्या प्रयत्नात आपण आपल्या पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घ्यावी. एक जबाबदार नागरिक म्हणून भावी पिढ्यांसाठी आपल्याला आपल्या निसर्गाचे रक्षण केले पाहिजे. देशाच्या प्रगतीसाठी एकत्र येऊन देश उज्वल करण्यास हातभार लावूया.

            मंडळी, फक्त एक दिवस प्रजासत्ताक दिन साजरा करून आपलं काम संपलं असं होत नाही.प्रजासत्ताकाचा खरा अर्थ आहे स्वातंत्र्य,समता ,बंधुभाव ,प्रेम ,मानवता आणि ते जीवनभर जपणं हे आपले कर्तव्य आहे. चला तर मग आपल्या कर्तव्याचे पालन करत लोकशाहीचा वारसा जपण्याची शपथ घेऊया.

                शपथ तुम्हाला मातृभूमीची
                शपथ तुम्हाला प्रजासत्ताकाची
                 जाती पाती नष्ट करूया
                 शान वाढवूया आपल्या भारत मातेची.
                          जय हिंद ,जय भारत!
                                 धन्यवाद!

    तुम्हाला आजचे हे भाषण कसे वाटले ते नक्की कळवा .आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका .अशाच नवनवीन माहिती आणि कथा यांचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’या वेबसाईटला नक्की भेट द्या.तसेच आमचा WhatsApp ग्रुप ही जॉईन करा .धन्यवाद!

15 thoughts on “26 January Bhashan in Marathi l26 January Best Speech in Marathi l Republic Day Marathi Speech”

  1. कविता पांडे

    आजकाल हीच माहीती नीट मिळत नाही मुलांना.खूपच छान भाषण झालं.

    1. धन्यवाद मॅडम, मी माझ्या लेखातून अशीच नवनवीन माहिती देण्याचा प्रयत्न करेन. अशा कमेंट मुळे लिहिण्याचा उत्साह वाढतो.

  2. माधवी देशपांडे

    खूप छान, प्रजासत्ताक दिनाविषयी समग्र माहिती नेमके पणाने सांगितली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top