26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मराठी शुभेच्छा: आज २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन ! १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताचे संविधान अंमलात आले. म्हणून हा दिवस साजरा केला जातो. ह्या दिवशी माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. देशाची राजधानी दिल्ली येथे राजपथावर संचलन केले जाते. त्याच वेळी देशासाठी लढणाऱ्या वीरांना शौर्य पुरस्कार प्रदान केले जातात. आपले राष्ट्रगीत म्हणून ध्वजाला मानवंदना दिली जाते. हा एक राष्ट्रीय दिवस आहे. म्हणून देशभरात सगळ्या शाळांमध्ये , सरकारी कार्यालयात , आणखी वेगवेगळ्या ठिकाणी तो साजरा केला जातो. चला तर आपणही प्रजासत्ताक दिन साजरा करू. ध्वजवंदन तर करायलाच हवं त्याच बरोबर आपल्या लोकांना समाज माध्यमांद्वारे शुभेच्छा देखील पाठवूया. आपल्या देशाप्रती वाटणाऱ्या आपल्या भावना इतरांबरोबर देखील शेअर करूया !
1.भारतीय संविधान
अंमलात आले आज
प्रजासत्ताक दिनी चढला
देशभक्तीचा साज
2.अशोक चक्रांकित तिरंगा ध्वजाचे
होते आज आरोहण
देशासाठी लढलेल्या वीरांचे
आज करूया स्मरण
3)ब्रिटिशांची गुलामगिरी
उलथवून टाकली एकजुटीने
पवित्र ध्वजाला नमन करूया
फडकवू आज सन्मानाने
4)देशाचे हे संविधान
पवित्र ग्रंथ आहे
विविधतेतही एकतेची
ग्वाही देत आहे
5)प्रजासत्ताक दिन आज
वाहू वीरांना श्रध्दांजली
शौर्य पुरस्कारांच्या सन्मानाने
वाहू त्यांना आदरांजली
6)तीन दलांचे सर्व राज्यांचे
संचलन राजपथावर होते
एकजुटीचे एकमताचे
जगाला दर्शन होते
7)प्रजासत्ताक दिन आज
ध्वज वंदनाला हजर राहू
नमन करून ध्वजाला
देशाप्रती पाईक राहू
8)भारत माझा देश आहे
देशावर माझे प्रेम आहे
ध्वजाला वंदन करणे
हे माझे कर्तव्य आहे
9)प्रजासत्ताक दिन आज
संविधान अंमलात आले
एकजुटीचे एकात्मतेचे
मूल्य आम्हा शिकवले
10)प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी
राजपथावर चित्ररथ सजतात
देशाच्या विविध संस्कृतीचे
दर्शन आम्हा घडवतात
11)विविधतेने नटलेला
असे देश हा माझा
एकतेने बांधलेला
असे देश हा माझा
12)दूर चंद्रावर देखील
पोहोचला आमचा ध्वज
सदा फडकत असतो
आमच्या हृदयात आमचा ध्वज
13)भारत माता की जय
असे एकच नारा
जगात कुठेही फिरा
तरी भारत आम्हाला प्यारा
14)भारत देश महान
जिथे रामाचा असे वास
असे वारसा संस्कृतीचा
आहे पुण्य भूमी ही खास
15)प्रिय आम्हाला देश आमचा
वंदन करतो त्याला
एकजुटीने मनापासूनी
आम्ही पुजतो त्याला
देशभरात आज 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. अगदी जिल्हा परिषदेतील शाळेपासून ते दिल्लीतील लाल किल्ल्यापर्यंत सर्वत्र तिरंगा फडकविण्यात येतो. देशभक्तीच्या गीतांनी दिवसाचे सुरुवात होते. या दिवशी सोशल मीडिया ही पूर्ण हिंदमय होते.भारत हा विविधता आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेला जगातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे. तसेच भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे, म्हणजेच हे लोकांनी, लोकांसाठी, लोकांच्या कल्याणासाठी चालवलेले राज्य आहे. हा अधिकार भारताच्या घटनेनुसार 26 जानेवारी 1950 साली सर्व भारतीयांना मिळाला.
प्रजासत्ताक दिनाचा इतिहास – 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वातंत्र्य झाला असला तरी देश चालवण्यासाठी घटना अजून तयार झाली नव्हती. १९३५ सालच्या कायद्यावर भारताचे कायदे आधारित होते. 9 डिसेंबर 1946 रोजी अनेक वेगवेगळ्या बैठका सुरू झाल्या. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष झाले व त्यांच्या पुढाकाराने स्वतंत्र भारताचे खास संविधान तयार करण्यासाठी मसुदा समिती स्थापन केली गेली. या समितीने मसुदा तयार करून 4 नोव्हेंबर 1947 रोजी सादर केला. राज्यघटना स्वीकारण्यापूर्वी या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी हा प्रस्ताव 166 दिवसांसाठी खुला केला. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसांच्या कालावधीनंतर समितीने हा अंतिम मसुदा तयार केला. 308 सदस्यांनी यावर 24 जानेवारी 1950 रोजी स्वाक्षरी केल्या. सन 1929 मध्ये लाहोर येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीत पूर्ण स्वतंत्र्याची मागणी केली होती. 26 जानेवारी 1930 हा दिवस पूर्ण स्वराज्य दिवस म्हणून घोषित करण्यात आला होता. लाहोर अधिवेशनात जवाहरलाल नेहरूंनी तिरंगा फडकवला. 26 जानेवारी पूर्ण स्वराज्य घोषित करण्याच्या तारखेला महत्त्व देण्यासाठी 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून घोषित करण्यात आला. त्यानंतर 26 जानेवारीला राष्ट्रीय सुट्टी दिन म्हणून ही घोषित करण्यात आला. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 26 जानेवारी 1950 रोजी 21 तोफांच्या सलामी सह ध्वजारोहण केले, आणि भारताला प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित केले. ज्याने देशाला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक मध्ये रूपांतरित केले. हा दिवस डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील रचनाकारांच्या दूरदृष्टीचा आणि अथक प्रयत्नांचा गौरव करतो. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बी. आर. आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार म्हटले जाते. प्रजासत्ताक दिन विविधतेतील एकतेचे प्रतीक आहे. हे लोकशाही मूल्यांकन भारताच्या वचन पद्धतीचे प्रगती आणि सर्वसमावेशकतेच्या दिशेने प्रवासाचे स्मरण करून देणारे आहे. प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. देशाचे प्रथम नागरिक म्हणून राष्ट्रपती झेंडा फडकवतात.
प्रजासत्ताक दिन कसा साजरा करतात – भारतातील प्रजासत्ताक दिन भव्यतेने आणि देशभक्तीच्या उत्साहाने साजरा केला जातो. दरवर्षी 26 जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत दिल्लीत साजरी केली जाते. भारताचे पंतप्रधान अगोदर अनाम सैनिकांसाठी बनवलेले स्मारक, अमर जवान ज्योती येथे पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या वीर सैनिकांसाठी श्रद्धांजली वाहण्यात येते. त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्यमंचावर जातात व उपस्थित असलेल्या पाहुण्यांना भेटतात. प्रमुख पाहुणे व राष्ट्रपतीचे आगमन झाल्यानंतर ध्वजारोहण करून राष्ट्रगीत होताच 21 तोफांचे सलामी दिली जाते. त्यानंतर देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र हे पुरस्कार देतात देशातील शूर बालके ज्यांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहेत ते सजलेल्या हत्तीवरून किंवा वाहनावरून संचालनात सहभागी होतात.
भारतीय फौजांचे (नौदल, पायदल वायुसेना) वेगवेगळ्या सेना विभाग घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर यद्यावत शस्त्रे किंवा क्षेपणास्त्रे, रणगाडे समवेत संचलन करतात. भारताचे राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात. बीटिंग रिट्रीट या कार्यक्रमाने प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे सांगता केली जाते. तसेच हा दिवस शाळा, कॉलेजातून, सरकारी निम सरकारी, कार्यालय, सोसायटी, चौकातून झेंडावंदन करून साजरा केला जातो. मान्यवर व्यक्ती, निवृत्त अधिकारी, नेते मंडळी यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. शाळा कॉलेजांमध्ये भाषणे कवायती तसेच विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. प्राथमिक शाळांमध्ये मुलांना खाऊ वाटप केला जातो. तसेच अनेक ठिकाणी विद्युत रोषणाई केली जाते.
2024 च्या प्रजासत्ताक दिनाची वैशिष्ट्ये – यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाला विशेष महत्त्व आहे.
प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे सन्मानित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
प्रजासत्ताक दिनाची थीम 2024 – यावर्षीचे थीम विकसित भारत आणि भारत – लोकतंत्र की मातृका ( भारत – लोकशाहीची जननी). राष्ट्राच्या आकांक्षा आणि लोकशाही नीतिमत्ता समाविष्ट करतात.
परेड मार्ग – परेडचा मार्ग विजय चौक ते कर्तव्य पथ पर्यंत पसरलेला आहे. जो देशाच्या प्रगतीचे प्रतीक असलेला नयनरम्य प्रवास तयार करतो. परेडमध्ये प्रत्येक भारतीय राज्याच्या सांस्कृतिक आणि विकासात्मक कामगिरीचे प्रतिनिधित्व करणारी दोलायमान झाकी दाखविण्यात आले आहे.
अशाप्रकारे चला आपणही प्रजासत्ताक दिन साजरा करू. आपल्या देशाप्रती वाटणाऱ्या आपल्या भावना इतरांबरोबर शेअर करूया. अशीच माहिती मिळवण्यासाठी आमच्या watsapp गृपला ही जॉईन करा.
लेखिका – अंकिता कार्ले (शुभेच्छा संदेश ) व सुनिता बाबर (माहिती)
सुंदर अभ्यासपूर्ण लेखन. शुभेच्छा.
शुभेच्छा संदेश आणि माहिती, दोन्ही मस्त👌👌
V nice
खूप छान 👍