मराठी कथा – राधी l Marathi Story For Reading

WhatsApp Group Join Now

एका कोवळ्या मनाच्या मुलीच्या आयुष्याचा वेध घेणारी कथा.

राधी सात वर्षाची पोर..

कोवळ्या हाडांची,किडकिडीत बांधा अशी. आईच्या आजारपणात तिचं बालपण गेलं, त्यात दोन मोठ्या बहिणी आधाराला होत्या. वडील मोलमजुरी करायचे त्यामुळे घरची परिस्थिती अगदीच बेताची..! दोन मोठ्या बहिणी शाळेत होत्या. त्या घरचं सगळं करून शाळेत जायच्या, शनिवार-रविवार दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करायच्या.

त्यामुळे राधीवर फार  काही जबाबदारी नव्हती घराची. दिवसभर हुंदडायचं,गोठ्यातल्या जनावरांना कधी वैरण घालायची,कधी कधी हाप्सीवरून एखादी घागर आणायची बस्स.. एवढंच काम..! या सगळ्यांत नेहमीचं एक काम म्हणजे सायंकाळी आईला आधार देऊन उठवायचं आणि मोठया बहिणीने केलेली खीर तिला पाजायची. मग आईने खाताना सांडलेली खीर पुसायची, आईचं तोंड स्वच्छ कापडाने पुसायचे आणि परत आईला आधार देऊन झोपवायचं. आईची एक बाजू अर्धांगी झालेली, त्यामुळे ती अंथरुणातच असे.

राधी प्रंचड खोडसाळ होती.तितकीच हळवी व्हायची कधी कधी..? मग आईच्या अंथरुणात शिरून तिला बिलगूनच झोपायची. कधी कधी आई झोपल्यावर तिच्या नाकाच्या जवळ बोट धरून ती आईचा श्वास चालू आहे का नाही ते बघायची? परिस्थितीचं भान त्या कोवळ्या मनाला चटका देत असे. कधी दुपारच्या वेळी आईस्क्रीमवाला घंटा वाजवत आला, तर धावत पळत त्याच्या त्या सायकल मागे जायची, पण घरी येऊन कधी आईस्क्रीमसाठी हट्ट करायची नाही.

त्यांच्याकडे टीव्ही नव्हता. त्या दोन खोल्यांच्या घरात मोजकंच सामान होतं आणि त्या घरावर अनेक छोटे-मोठे होल पडलेला पत्रा होता. मग अशावेळी टीव्ही पहायचा, तर तो शेजाऱ्यांकडे. सायंकाळी तिघी बहिणी काम उरकून टीव्ही बघायला शेजारच्या घरात भिंतीला टेकून बसत असत. वडील  मात्र कधी जायचे नाहीत. त्यांना सतत कुठेतरी वाटत राहायचं कि ते आपल्या मुलींना सुखाच्या गोष्टी देऊ शकत नाही? हि सल टोचत रहायची..! मग अशावेळी ते राधीच्या आईजवळ बसायचे. एखाद दोन नेहमीचे कार्यक्रम झाले, की परत सगळे जेवायला एकत्र यायचे. राधी मात्र जेवून परत टीव्ही बघायला पळायची. टीव्हीचं प्रचंड वेड होतं तिला. त्यातली चित्रं बघून अगदी हरपून जायची ती. हे सगळं रोजचंच.त्यात

शेजारी पण चांगले होते,त्यांची परिस्थिती ओळखून होते. राधी हक्काने त्यांच्या घरात वावरायची. त्या घरात मध्यम वयाचं एक जोडपं आणि त्यांचा मुलगा होता. तो कॉलेजमध्ये शिकत होता .राधी त्याला दादा म्हणायची. एक दिवस राधी असंच जेवण झाल्यावर परत टिव्ही पाहण्यासाठी शेजारी गेली. पण  त्यादिवशी नेमकं गावात पारायण होतं आणि शेजारच ते जोडपं पारायणाला गेले होते. घरात फक्त त्यांचा मुलगा होता. राधी नेहमी प्रमाणे ती स्वतःच पोलक सावरून भिंतीला टेकून टीव्ही पाहत बसली. त्याने जे लावलं होत ते ती बघत होती. नाही म्हणलं तरी, हवं ते  बघण्याचा हक्क नव्हता तिथे..!

ती गुंतून गेली होती, त्या रंगीबेरंगी चित्रात. पण काहीवेळाने त्या दादाने तिला मांडीवर घेतलं आणि तिच्या हातात टीव्हीचा रिमोट दिला आणि तुला हवं ते लाव असं म्हणाला. राधी एकदम खुश..! त्या कोवळ्या जीवाला कोण आनंद झाला ? आणि ती धडाधड चॅनल बदलू लागली. कधी नव्हे ते तिच्या मर्जीच तिला बघायला मिळत होतं. पण हळूहळू ती चलबिचल होऊ लागली, कारण तिला मांडीवर घेतलेल्या दादाचा स्पर्श  नकोसा वाटत होता. जो नकळत तिला अस्वस्थ करत होता. खरंतर हे सगळं कळण्याच तिचं वय नव्हतं, ना समज होती. पण तो स्पर्श तिला वेगळा जाणवत होता. ती तिथून उठण्याचा प्रयत्न करू लागली. पण त्याने तिच्या अंतरवस्त्रात हात घातला होता,ती घाबरून गेली,. उठायची धडपड करू लागली. पण सगळं फोल पडत होतं त्याच्या ताकदीपुढे. तिने हातातला रिमोट जोरात त्याच्या डोक्यावर मारला आणि उठून दार उघडून ती पळत गेली.

तो बावचळला आणि  तिच्या पाठी धावत गेला.पण बाहेर आल्यावर  त्याच्या लक्षात आलं की तिने आरडाओरडा केला, तर  तो अजूनच अडकेल, म्हणून तो परत घरात शिरला. घामाघूम झालेली राधी घरात येऊन पट्कन मोरीत शिरली. भरलेल्या बादलीतलं पाणी तिने चेहऱ्यावर ओतलं. तिचं हृदय एवढ्या जोरजोरात धडधडत होतं की आत्ता जीव जाईल की काय? असं तिला वाटू लागलं. तिच्या आवाजाने दोन नंबरची  बहीण झोपेतून जागी झाली.

“आलीस तू?संपली व्हय मालिका?आणि म्होरीत काय करतीस आत्ता?झोप पटकन..!”

“हम्म..!”  राधीच्या तोंडातून एवढंच निघालं. ती खूप घाबरली होती. श्वास कोंडतोय का काय? असं तिला होत होतं,तिने पोलक्यालाच तोंड पुसलं आणि आईच्या शेजारी जाऊन झोपली.

पण तिला झोप लागत नव्हती. डोळे विस्फारून ती पत्र्याकडे बघत होती. मध्येच थंडी वाजल्यासारखं तिला होत होतं. राहूनराहून अस्वस्थ झाल्यामुळे ती या कुशीवरून त्या कुशीवर होत होती. मग कधीतरी पहाटे  तिचा डोळा लागला..डोळे जेव्हा उघडले, तेव्हा दिवस चांगलाच वरती आला होता. पण तिच्या अंगात ताप भरला होता. उठून परत तिला तेच आठवलं. ती परत घाबरली. पण तिला भीती वाटत होती की, हे कुणाला सांगितलं आणि तिलाच ओरडा बसला तर? ती गप्प राहिली. पण त्या दिवसानंतर राधी कधी त्या घरात गेली नाही आणि तिने या गोष्टी कुणाला सांगितल्याही नाहीत. पण दिवसेंदिवस ती शांत,समजुतदार होत होती. तिने हट्ट करणं सोडून दिलं होतं. मध्ये मध्ये तिला त्या रात्री घडलेलं आठवायचं, त्यावेळी ती घट्ट डोळे मिटून दात ओठ खायची. अशावेळी तिच्या श्वासाचा वेग वाढायचा. काळानुसार ती स्वतःला सावरत गेली.

ती सातवीत गेली, तेव्हा मोठ्या बहिणीचं लग्न ठरलं होतं. लग्न त्यांच्या परिस्थितीनुसार झालं. मोठी बहीण तिच्या घरी गेली. राधी आता जबाबदार होत चालली होती. मधल्या बहिणीला मदत करणं,आईची काळजी घेणं हे सगळं ती मनापासून करत होती. आईची तब्येत दिवसेंदिवस ढासळतच चालली होती,वडील पण थकलेले..! सगळेच आपापल्या परीने स्वतःची परिस्थिती लपवण्याचा प्रयत्न करीत असत.

राधी स्वप्नाळू होती. तिला नेहमी वाटायचं, आपल्याकडे अशी काही जादू यावी आणि सगळी परिस्थिती आपण क्षणात पालटून टाकावी..! बहिणीच्या लग्नाचं कर्ज फेडावं, आईला बरं करावं,वडिलांना स्वतःची हिरवीगार शेती द्यावी,डागडुजी करूनसुद्धा पोपडे पडत असलेलं घर टुमदार करावं. आसपास फुलांची बाग करावी. शेजारीच आपल्या छापरातल्या  जनावरांसाठी उबदार असा गोठा बांधावा,ताईचं लग्न मोठ्या थाटामाटात करावं, रोजच्या भाकरीची वणवण मिटवून सगळ्यांना हसत करावं आणि स्वतः साठी…? काहीच नाही,हे सगळं झालं की आपण खुश..!

त्या कोवळया जीवाचं हेच काय ते जग आणि हिच काय ती स्वप्न…पण परिस्थिती तसं काहीच घडवत नव्हती. दिवसेंदिवस परिस्थिती अजूनच बिकट होत चालली होती. कर्ज वाढत होतं,याच सर्व गोष्टींसोबत राधी मोठी झाली. दिवसांवर दिवस ढकलून..! आता दोन नंबरच्या बहिणीचंही लग्न जुळत होतं. पण मोठ्या बहिणीच्या लग्नाचा भार अजून उतरला नव्हता, तर आता दुसरीचं..!! पण वडील समाजाच्या लाजे खातर इकडून तिकडून पैसे काढत होते. त्यांची हतबलता स्पष्ट दिसत होती.त्यांना गोठ्यातली दुधाची  एक गाय विकावी लागली. त्यातून काही पैसे जमवले. शेतीचा एक तुकडा गहाण टाकावा लागला. हे सगळं करताना त्यांना होणारा त्रास ते कधी बोलून दाखवायचे नाहीत. हल्ली हल्ली आईनेही जेवण टाकलं होतं. ती फक्त डोळ्यांनी वाहायची.

नवऱ्याचा त्रास आणि स्वतःभुईला धरून असणं तिला खूप वेदना पोहचवत होतं. दुसऱ्या बहिणीचं लग्न झालं. सगळा मानपान उरकला,सगळं जिकडच तिकडं झालं, आता त्या घरात फक्त राधी,आई-वडील आणि गोठ्यात एक गाय आणि तिचं वासरू होतं. राधीच्या मनावर भूतकाळात घडलेल्या गोष्टींच्या तीव्र जखमा होत्या.आई-वडील सोडून तिला कुणाचाच स्पर्श नकोसा वाटायचा. कुणी तिच्या जवळ आलं, तर तिची धडधड वाढायची. ती गुदमरून जायची,स्वतःला कुठेतरी कोंडून घ्यावं आणि जोरात ओरडावं असं तिला व्हायचं.

अशात तिच्या लग्नाचं वय झालं होतं. हाडामासाने ती भरीव होती, त्यामुळे लगेच उठून दिसायची.पण लग्नाचा विषय कुणी काढला, की सारं घर डोक्यावर घ्यायची.

“तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही? “असं म्हणायची तेव्हा वडील हसायचे आणि म्हणायचे.”सगळ्या पोरी लग्नाच्या आधी असंच म्हणत्यात,आणि एकदा का अक्षदा पडल्या की माहेरला यायला त्यांचा पाय निघत नाय संसारातन..!”

राधीची आतल्या आत घुसमट होत होती,कुणाला सांगणार  आणि काय सांगणार…?काही गोष्टी कुणाशीच बोलता येत नाहीत, इतक्या त्या नाजूक असतात.राधी स्वतःच्या भीतीसोबत जगत होती..अशात तिला एक स्थळ सांगून आलं. मुलगा बेस्टमध्ये नोकरीला होता मुंबईला.तिच्या झालेल्या चिडचिड्या स्वभावामुळे वडिलांनी तिच्यापर्यंत ते आणलंच नाही. ज्या दिवशी बघायला येणार, त्याच दिवशी तिला ते कळलं. वडिलांच्या चेहेऱ्याकडे बघून दात ओठ खात राधी तयार झाली, पण तिने मनोमन ठरवलं होतं त्यांचे काही असो, आपण नकारच कळवायचा.

बघायला आलेली मंडळी अगदी तयारीने आलेली, अगदी गाडी भरून. घर भरून गेलं होतं.साडीमध्ये राधी खुलून दिसत होती.उसणं हसू तोंडावर आणत ती वावरत होती. ऐरवी मधासारखी मवाळ राधी लग्नाच्या नावाने मात्र कोडगी झालेली..! बघणं बोलणं झालं आणि कळवतो या बोलीवर पाहुणे मंडळी निघून गेली.

राधी दोन दिवस कुणाशीच बोलली नाही.तिकडून होकार आला आणि तिची खरी पंचायत झाली. राधी हो नाही करता करता म्हणाली,” मला एकदा भेटायचं आहे नवऱ्या मुलाला?”

घरातल्यानी तोंडात बोटं घातली,उतावळी नवरी म्हणून चिडवलं सुद्धा, पण राधीने हट्ट धरला आणि नवरा मुलगा आला घरी..!राधीच्याच उंचीचा,सावळा पण हसरा असा अमित.राधीला माहिती होतं, घरात बोलता यायचं नाही, सगळ्यांच्याच नजरा असणार..! म्हणून ती त्याला गोठ्यात घेऊन गेली.

“असं गोठयात कोण भेटायला बोलवतं..!”अमित हसत हसतच बोलला. 

राधीने ऐकून न एकल्यासारखं केलं आणि म्हणाली,”तुम्ही नकार कळवा..!”

“का ??” आश्चर्यचकित होऊन अमितने विचारले.

“का म्हणजे? मी सांगतेय म्हणून..!”

“मग तूच दे ना नकार मला का सांगतेय..?” अमित म्हणाला.

“त्योच तर प्रॉब्लेम हाय ना,मी नाय देऊ शकत नकार”

“का…??”

“तुमची गाडीतर का वरच का अडकली आहे..!” राधी थोडं चिडूनच बोलली.

“हो,कारण मला तुझ्या या नकारा मागचं कारण कळायला हवं ना..!”

“मला नाही सांगायचं ..!” राधी.

“मग मी होकार समजू..?”

राधीच्या संयमाचा आता अंत होत होता,ती गाल फुगवून गप्प बसली..

“बरं,मी देईन नकार.!”अमित म्हणाला.

“पण मला तुमच्या नकाराचं खरं कारण कळल्यावर..! विश्वास ठेवा, मी ते कुणालाही नाही सांगणार..!  तुला दुसरं कुणी आवडतं का??”

“नाय …”- राधा.

“मग तुला आत्ता लग्न करायच नाहीये का..?” – अमित.

“तस बी नाय ..!”- राधा.

“अगं, मग काय कारण आहे?? 

तुला मी आवडलो नाहीये का?,माझं नाक बसकं आहे का? 

का माझे डोळे तिरळे आहेत..? का मी दिसायला एकदम चंपक आहे..?? “अमित वातावरण हलकं करण्यासाठी बोलला.

हे ऐकून राधी हसायला लागली,पहिल्यांदा ती कुण्या दुसऱ्या पुरूषासोबत इतकी खुलून बोलत होती.

“नाय..नाय..! तुमच्यात काय बी कमी नाय..?” ती हसता-हसता तोंडावर हात ठेवत म्हणाली.

“मग काय कारण आहे?, खरं कारण सांगा, मग मी खरा नकार देतो..!”

हसता हसता राधी अचानक गप्प झाली, चेहऱ्यावर परत भीतीची कळा पसरली.

“सांगून टाकू का यांना की नको..?” अशी तिची मनस्थिती झालेली.”शेवटी हे सुद्धा एक पुरुषच आहेत,कळेल का यांना माझा त्रास.? आणि यांनी कुणाला सांगितलं तर,तर काय करेन मी..?

इतकी वर्षे भीतीत काढली, पण कुणाला कळलं तर त्यांची सहानुभूतीची नजर नाही सोसायची मला त्यापेक्षा…!”राधी स्वतःच्या विचारातच हरवून गेलेली.

अमितने चुटकी वाजवली आणि ती भानावर आली.”काही नाही तुम्ही नकार द्या फक्त,हवं ते कारण सांगा.”

“पण एकदा सांगून तर बघा ना..एकदा विश्वास ठेवायला काय हरकत आहे?मित्र म्हणून समजा..!”

आत्तापर्यंत अमितला कळलं होतं की तिच्या आत खूप भयंकर असं काही खलतयं ज्याला वाट मिळायला हवीय…!शेवटी राधी थकली आणि तिने डोळे बंद करून, सगळा भूतकाळ सांगितला…! जेव्हा ती शांत झाली तेव्हा,तिचा चेहरा अश्रूंनी चिंब भिजून गेला होता आणि अमितचा हात तिने घट्ट पकडून ठेवला होता. त्याचा हात तिने कधी हातात घेतला, तिलाही कळलंच नाही.राधी धाप लागल्यासारखी श्वास घेत होती, तिचा घसा सुकलेला. इतका वेळ अंगी आणलेला कोडगेपणा कुठेतरी विरून गेला होता. लहान मुली सारखी निरागस चेहऱ्याने ती बसली होती. अमितने काहीही न बोलता तिच्या हातावर विश्वासाचा  हात ठेवला.

“मी देईन नकार,नका काळजी करु आणि हे कुणाला सांगणार ही नाही..पण तुम्हाला यातून बाहेर पडावं लागेल..तेही स्वतःसाठी..! किती वर्षे या भीतीत वाया घालवली आहेत तुम्ही कळतंय का..?

आपलं शरीर म्हणजे आपलं पूर्णत्व नसतं आत्मा शुद्ध हवा..आणि कुणी आपल्या शरीराला आपल्या इच्छेशिवाय शिवल तर असं झुरत बसायचं नसतं,ज्याने हे केलं त्याला थोबडून यायचं, कधी चार चौघात तर कधी एकट्यात..!! आपल्या इच्छेनुसार जगायचं,पण गप्प राहून आतल्या आत मरत नाही जगायचं..ते पण त्यासाठी ज्यात आपली काहीच चूकच नाही. कसल्या लाजेला तुम्ही घाबरताय जो तस वागला त्याला लाज वाटायला हवी ना की तुम्हाला..?

आणि अजून एक,इतका वेळ तुम्ही ऐकून घेतलं म्हणून सांगतोय..सगळेच पुरूष सारखे नसतात हो…!”अस म्हणून अमितने तिच्या हातातला हात सोडवला आणि निघून गेला..!!

राधी तिथेच बसून होती,शांत..मनात धडधड नव्हती,भीती नव्हती की कसलीच घुसमट नव्हती? कुणीतरी आरसा दाखवल्या सारखं झालं होतं तिला..!जवळपास एका महिन्यानंतर राधीच्या घरावर तोरण होतं राधीच्या लग्नाचं…

तुम्हाला ही कथा कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.

 धन्यवाद !

महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)

1 thought on “मराठी कथा – राधी l Marathi Story For Reading”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top