तुमचे विचारच ठरवतात तुमच्या आयुष्याची दिशा
सारखं ती संध्याकाळचा चहा पित खिडकीत बसून समोर खेळणाऱ्या मुलांची गंमत पाहत होती. थंडीचे दिवस चालू होते शीतलहर तर होतीच शिवाय तिच्या मनात अनेक विचारांची लहर वाहत होती. अचानक तिची तंद्री लागली आणि ती नकळत भूतकाळात रमली.
कशी कोणास ठाऊक विचारांच्या लहरींमुळे तिला तिच्या भूतकाळात डोकावण्याची इच्छा झाली. तिने कपाटातून अल्बम बाहेर काढला आणि तो उघडला. तिची सुरकुतलेली बोटे हळूवार फोटोंवरून फिरू लागली. तिच्या डोळ्यांसमोर स्पष्ट चित्र उभं राहिलं. तिचं इवलंस घरटं, दोन पिल्लं आणि पिल्लांचे आई-बाबा. गोड चौकोनी कुटुंब. आदित्य आणि अमित ही दोघे लाघवी मुलं, तेजस्विनी त्यांची आई आणि डॉ. दीपक त्यांचे बाबा. हळूहळू पिल्ले मोठी होत होती. अभ्यासात अत्यंत हुशार होती.
दोन्ही मुलांना शिकवून डॉक्टर बनवण्याची आई वडिलांची इच्छा होती. अगदी त्यांच्या वडिलांसारखं. दिवस पुढे जात होते सगळं काही सुरळीत चालू होतं; पण म्हणतात ना कधी कधी सुखाला स्वतःचीच दृष्ट लागते तसं झालं जणू.
कुठलंही व्यसन नसताना कोणत्याच वाईट सवयी नसताना एके दिवशी डॉक्टर दीपक यांना अचानक पॅरालिसिसचा झटका आला. सगळं जग जणू जागच्या जागी थांबल. तेजस्विनीला तर काहीच सुचत नव्हतं. ती पार कावरीबावरी होऊन गेली होती. तिच्यावर आभाळ कोसळले होते. डॉक्टर दीपक डॉक्टरांच्या निगराणीत दवाखान्यात ऍडमिट होते. डॉक्टर त्यांच्यासाठी पूर्ण प्रयत्नांची पराकाष्टा करत होते; पण त्यांच्या शरीराची एक बाजू पूर्णतः निकामी झाली होती. मुले बिचारी गोंधळून गेली होती तरीही ते चिमुकले हात त्यांच्या आईचा आधारसाठी सरसावले. त्यांचे धीर देणारे शब्द ऐकून तेजस्विनी सावरली तिने विचार केला ‘इवलीशी पिल्लं अचानक एवढे प्रौढ माणसासारखे वागू लागली आहेत तर आपल्यालाही स्वतःला सावरून घ्यायलाच हवं. आता रडत बसण्याची वेळ नाही तर आपल्याला उभं राहायला हवं आणि सगळी परिस्थिती आता मलाच हाताळायची आहे तेव्हा मला खचून जाऊन चालणार नाही.’ तिने स्वतःला समजावलं आणि अचानक अंगात वीज संचारल्यासारखी ती उभी राहिली. ती आता काय करणार होती हे तिलाही माहीत नव्हतं; पण तिला हे माहीत होतं की तिला काही तरी ठाम निर्णय घ्यायचा आहे आणि त्यानुसार पुढे पाऊल टाकायचे आहे आणि हाच स्वतःवरचा विश्वास तिच्याकडून तिलासुद्धा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून घेणार होता.
तेजस्विनी एक सामान्य गृहिणी होती. शिक्षण जेमतेम बारावी. लग्न लवकर झालं आणि संसारात ती इतकी रमली की पुढे तिला शिक्षण घेण्याची गरज जाणवलीच नाही. कुणी तिला अडवलं असतं असं नाही पण इतर अनेक भारतीय महिलासारखं तिचं आयुष्य संसारातच सार्थकी लागलं अस ती समजत होती. तिला आता जाणवत होतं शिक्षणाची ही उणीव तिला कुठेतरी भरून काढायला हवी होती; पण आता तितका वेळ तिच्या हातात नव्हता. नशिबाने वेळ अशी आली होती की तिला काहीतरी करणं भाग होतं. घराबाहेर पाऊल टाकणं ही काळाची गरज होती.
सहा महिने वाट बघूनही जेव्हा डॉक्टर दीपक यांच्या तब्येतीत कोणतीही सुधारणा दिसली नाही तेव्हा तिने त्यांना घरी आणून त्यांची काळजी घेण्याचे ठरवले त्यांच्यासाठी एक नर्सची सोय केली जी त्यांची सगळी काळजी घेईल अणि स्वतः घराबाहेर पडायचं ठरवलं कारण आता उरलं सुरलं सेविंगही संपून गेलं होतं. आई वडिल, सासू सासरे यांच्याकडून होईल तेवढी मदत घेऊन झाली होती. मित्रमैत्रिणींकडूनही आता अपेक्षा ठेवण्यात काहीही अर्थ नव्हता. जे काय होतं ते तिचं तिलाच निभावायचं होत.
मनात एक नवी जिद्द घेऊन तिने स्वतःची पाककला पणाला लावायचे ठरवले. तिच्या हाताला खूप छान चव होती. तिने जवळच्या वस्तीतल्या आठदहा गरजू बायका हाताखाली घेतल्या आणि मसाल्यांचा छोटासा व्यवसाय सुरू केला. जमेल तेवढे सर्व प्रकारचे मसाले तिने बनवायला सुरुवात केली. अगदी वाजवी किमतीत आणि कमीत कमी नफा तत्त्वावर तिने सुरुवात केली. देवालाही थोडी काळजी असेल तिची, तिच्या दोन बाळांची. त्यामुळे नशिबानेही या बाबतीत तिची साथ दिली.
तेजस्विनीने स्वतःच्या मनाशी निश्चय केला होता जे तुमच्याकडे नाही त्यासाठी रडत बसण्यापेक्षा चे तुमच्याकडे आहे त्यातून कसं पुढे जाता येईल हे महत्वाच आहे. रडत बसण्यापेक्षा हसत हसत जगण्याचं गाणं गाऊया. यश मिळाले तरी तिने ते डोक्यात कधी जाऊ दिलं नाही. यश मिळाले की तो आजचा दिवस साजरा करून तिथून पुढचा दिवस नवीन चॅलेंज स्वीकारण्याचं करण्याचं तिने ठरवलं. आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं आहे आणि दोन्ही मुलांना खूप छान वाढवायच आहे. शिवाय दीपकला योग्य ती ट्रिटमेंट देऊन त्यांनाही पुन्हा बरं करायचं आहे हे ध्येय तिने ठरवलं होतं.
या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करताना तिला अडथळे आले नाहीत असं अजिबात नव्हतं. सासूसासऱ्यांचे आजारपण, आर्थिक अडचणी, सामाजिक विरोध या सगळ्याला तोंड देऊन दोन्ही मुलांना डॉक्टर बनवलं. अर्थात मुलांनीही तिला तशीच साथ दिली. दोघांनी स्वतःची जबाबदारी ओळखली. आईला जमेल तशी मदतही केली दिवसा शाळा आणि रात्री आईला तिच्या व्यवसायात मदत अशी मुलांची दिनचर्या झाली होती. शिवाय अभ्यासातही कधीच कुठे कमी पडले नाहीत. इतर मुलांच बघून कधीच काही हट्ट केला नाही. दुसऱ्या मुलांनी काही चिडवलं की तुमच्याकडे छान छान कपडे नाहीत, खेळणी नाहीत तरी कधीच आईकडे तक्रार केली नाही. मुलांचे आणि तेजस्विनीचे अथक परिश्रम मार्गी लागले नसते तरच नवल होतं.
डॉक्टर दीपक हे सगळं अंथरुणावरूनच बघत होते. मनातून कितीही इच्छा असली तरी शरीर साथ देत नव्हतं त्यामुळे हतबल होऊन एका जागी पडून ते सगळं बघत होते. कुठेतरी आत त्यांना तेजस्विनीबद्दल सार्थ अभिमान वाटत होता आणि त्यामुळेचं की काय त्याचं आत्मिक बळ जागं झालं. मनाची ताकद एवढी असते की त्यापुढे कुणाचेच काही चालत नाही. जेव्हा त्यांच्या मनाने असं ठरवलं की मी कसही करून उठणारच तेव्हा त्यांच्या शरीरानेही हळूहळू त्यांना साथ द्यायला सुरुवात केली. डॉक्टर दीपक यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसू लागली. मुलं आणि तेजस्विनी अतिशय खुश झाले फिजिओथेरेपी करणाऱ्या डॉक्टरांना यश मिळू लागलं आणि हळूहळू डॉक्टर दीपक त्यांच्या पायावर उभं राहायला शिकले. हे सगळं एका दिवसात अचानक झालं नव्हतं; पण हळूहळू मनातल्या जिद्दीने हे यश मिळवलं होतं.
एक सामान्य गृहिणी काय करू शकते तेजस्विनीने सिद्ध केलं होतं. तिने तिच्या व्यवसायाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं होतं. शिवाय अनेक गरजू महिलांना तिने रोजगार मिळवून दिला होता. आज अनेक कुटुंब तिने उभारलेल्या व्यवसायावर पोसले जात होते. तिला मनापासून आशीर्वाद देत होते. आज ती एक यशस्वी उद्योजिका होती.
कित्येक दिवसांनी नव्हे वर्षांनी तिला तिच्या कष्टाचं फळ दिसत होतं. आज तिला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होते. तिच्यासारख्या स्त्रियांना आणि सामान्यांना प्रेरणा ठरणाऱ्या या उद्योजिकेला शासनाने पद्मश्री पुरस्कार जाहीर केला होता.
सोहळ्यासाठी डॉक्टर दीपक, मुलं सगळा मित्र परिवार आणि आप्तेष्ट सगळेच हजर होते. तेजस्विनी अतिशय शालीन वेशभूषेत पुरस्कारासाठी तयार झाली होती. कॉटनची छान पांढरीशुभ्र काठाची साडी तिच्या पेहरावाला एक वेगळीच झळाळी देत होती. एका खांद्यावर शाल आणि तिच्या लांबसडक केसांची वेणी. वयाप्रमाणे आलेले प्रौढत्व तिच्या तेजाला मात्र अजिबात झाकू शकलेले नव्हतं.
आज पुरस्कार घेताना एवढय़ा वर्षांचा तिच्या जीवनातील संघर्ष झरझर तिच्या डोळ्यांसमोरून सरकला. तिचं तिलाच मनाशी वाटून गेलं की खरंच आपण या सगळ्यातून पार पडलो ? आणि ती भानावर आली ती टाळ्यांच्या कडकडाटाने. डॉक्टर दीपक यांचासुद्धा ऊर भरून आला होता डोळे आनंदाश्रूंनी वाहत होते आणि तिच्या जिद्दीला सलाम करत होते!
………समाप्त ……
तुम्हाला ही कथा कशी वाटली, ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.
लेखिका- सौ. माधुरी शेलार, नवी मुंबई
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
Chhan katha
👌👌
Sundar katha
Inspirational story 👍
सकारात्मक कथा !
Chhan
खूप छान👌