‘’अरे ! आज हिचं मौनव्रत आणि उपवास दोन्ही आहेत .आता हे मला माहितच नव्हतं. मी बापुडा सकाळी ऑफीसला जाण्याआधी ‘ब्रेकफास्टला’ बसलो; तर हि वेडेवाकडे हातवारे करायला लागली. हि बसली होती देवासमोर पण लक्ष सगळं माझ्याकडे. मला वाटलं तिच्या पूजेत व्यत्यय येत असेल म्हणून ;ती मला तिथून निघून जायला सांगत असेल. शेवटी मी घाबरून किचनमध्ये जाऊन तिथे बसून नाश्ता संपवला’’ महेश त्याच्यासोबत ऑफिसला जाण्यासाठी आलेल्या आपल्या मावसभावाला माणिकला आपली आपबिती सांगत होता. ’’आणि नंतर, आता ऑफिसला निघायच्या आधी मी आईला एव्हढंच सांगितलं, ‘’आई तुला मेदुवडे खुप आवडतात ना ! ऑफीसमधुन येताना आणतो हं !’’ तर हिने माझ्याकडे मारक्या म्हशीसारखं बघितलं जणु ती आता मला शिंगावरच घेईल. ’’तिच्या हातात कर्पुरारतीचा चमचा होता.काय सांगु ! अरे फेकुन मारला की रे तिने मला तो ‘’. ते ऐकून आई उंउं करून हातवारे करू लागली. तिची ती हातवाऱ्यांची भाषा समजल्यासारखं करून तिच्या वतीने माणिक बोलला. ‘’अरे मग मावशी फेकून मारणार नाही तर काय करणार? एकतर उपवास असताना तू समोर बसून नाश्ता करतोयस. त्यातून मेदुवडा आणु का ? म्हणून विचारतोयस. कोणाला राग येणार नाही’’.
आईने समाधानाने ‘तू माझ्या मनातल बरोब्बर ओळखलस,किती गुणाचं गं लेकरू’ अस ईशाऱ्यानेच सांगून माणिकला मायेने कुरवाळलं. त्यांच्या या भरत-भेटीकडे दुर्लक्ष करत आपलीच री ओढत महेश म्हणाला ,’’हं तरी बरं ऑफिसला निघालो होतो म्हणुन माझ्या डोक्यावर हेल्मेट तरी होतं, म्हणून वाचलो’’.आईचे पुन्हा हातवारे, ’’अरे तुझा हेल्मेट पाहुनच मारला तिने चमचा,शेवटी आईचं हृदय रे ते .आईची माया दुसरं काय !’’.भुवया वरच्याबाजुने वक्राकार ताणून आणि ओठांचा चंबू करून माणिकचं पुन्हा अचूक ट्रान्सलेशन. यावर चवताळून महेश म्हणाला, ‘’अरे मण्या कसलं हृदय, कसली माया. अरे उद्या हेल्मेट आहे म्हणून चंदन उगाळायचा सहाण फेकेल ती माझ्यावर,आणि तसंही हेल्मेट फक्त डोक्यावर असतं. ही जर उपवासाच्या दिवशी अशीच फेकाफेकी करत राहिली तर मला घरात चिलखतच घालून फिरावं लागेल’’.
त्याच्या या व्यक्तव्यावर आई रागाने माणिक अचंब्याने पाहु लागला तर आत्तापर्यंत हा सर्व तमाशा तिथेच नाश्ता करत शांतपणे बसून ऐकणारी महेशची लहान बहिण पीहू मात्र खिदळून हसू लागली.
दुसऱ्या दिवशी मण्याला महेश कंपनीच्या कॅफेत कॉफीचे घुटके रिचवत बसलेला दिसला .’’काय रे लंच मध्ये जेवायचं सोडून कॉफी काय ढोसत बसला आहेस’’. ‘’मग काय करू डब्यात ले भगरीचे धिरडे पाहुन भुकच मेली माझी’’. ‘’अरे मग कँटीनमध्ये खायचं ना !’’.’’ अरे कंटाळा आलाय त्या कँटीनचापण. वरण अस्त की नुस्त पाण्याला फोडणी देतात कोण जाणे ’’. कॉफीचा शेवटचा घोट घेता घेता त्याने एक मरगळलेला उसासा पण टाकला .विषय बदलत मण्याने विचारलं, ’’काय रे नेहा काय म्हणते?’’ ‘’ नेहा माझ्या वाळवंटी आयुष्यातली माझी बिसलेरीची बाटली’’. ‘’ नेहा!’’. नेहाच्या नावाने महेशची कळी खुलली. ही कळी चुरगाळत मण्या म्हणाला .’’हि तुझी बिस्लेरीची बॉटल तुझ्या घरच्या टाकीत कधी ओतणार आहेस ?’’ महेशची प्रश्नार्थक नजर पाहून मण्याच पुन्हा बोलता झाला. ’’अरे म्हणजे ,घरी सांगितलस का तिच्याबद्दल?’’ . ‘’नाही ना ! पण मुहर्त शोधतोय, पण मण्या मला ना कधीकधी टेन्शनय येतं बघ. आमच्या घरच्या या आई नावाच्या जमदग्नीसमोर माझं हे नाजुक साजुक जाईचं फुल टिकेल का रे ?’’ मण्याने ओठांचा चंबु करून आणि डोळ्यांची अनिमिष उघड झाप करून त्याच्या या भिजलेल्या आणि आईच्या भीतीने थिजलेल्या भावनांना प्रतिसाद दिला .
सोबतच त्याला बरं वाटावं म्हणून म्हणाला, ’’अरे घाबरू नको रे .मावशी जरी इंग्रजांसारखी क्रुर असली तरी आपली नेहा पण झाशीची राणी आहे काय !’’. महेशने त्याच्या कडे एक जळळीत कटाक्ष टाकला . ‘’आपली?’’ मण्या ओशाळून म्हणाला, ‘’बरं बाबा ‘तुझी’ फक्त तुझीच झालं !’’. मण्या असं म्हणाल्याबरोबर महेशची कळी पुन्हा श्रावणातला फुलासारखी फुलली. ‘’माझी नेहा. माझं गरीब पिलु’’. नेहाच्या आठवणीत प्रेमाच्या गटांगळ्या खाण्याऱ्या महेशला केसाना धरून ओढून किनाऱ्यावर आणावं तसं मण्या परत बोलला. ‘’अरे ये बाबा,नेहाला ‘ऑफिशियली’ मावशीशी गाठ घालून दे लवकर. नाहीतर तुझं हे पिलु भुर्रकन उडुन कोण्या दुसऱ्याच्या घरट्यात जाऊन बसायचं’’. मण्याच्या या व्यक्तव्याने महेशची अवस्था नाकातोंडात पाणी गेलेल्या माणसा सारखी झाली त्याची ही चेतावणी आणि चिथावणी मनावर घेऊन त्याने आजच्या आजच नेहाची घरच्यांशी गाठ घालून द्यायचं ठरवलं.
महेशच्या किचनमध्ये नेहा चहा बनवत होती .समोर कोचावर महेश आपण परिक्षा 100 टक्यांनी उत्तर्ण होणार या आत्मविश्वासात बसला होता. आई परिक्षकेच्या भूमिकेत भारीच कडक दिसत होती. पिहुला या भानगडींचं काही देणघेण नव्हतं. बाबा मात्र नाट्य गृहात बसलेल्या प्रेक्षकाच्या भुमीकेत शिरलेले होते.नेहाने बनविलेल्या चहाचा पहिला घोट सर्वांनी घेतला आणि नेहाने तिथेच बाबांकडचे 50% मिळवले. कारण चहा हा विषय बाबांचा जीव की प्राण. आपल्या उर्वरित जीवनात उत्तम चहाची उत्तम सोय झाली या आनंदात बाबा असतानाच .’’काय गं स्वयंपाक येतो का ?’’ असा आईने चहाचा दुसरा घोट घेत नेहावर बाउंसर टाकला. पण नेहा पण तयारीची खेळाडू होती. ‘’हो तर!अहो काकु सगळा स्वयपाक येतो मला.अगदी पुरणाच्या स्वयंपाकासहित सगळ शिकून घेतलय मी’’.हे ऐकून एक सुचक नजर मोबाईलमध्ये चाळा करत बसलेल्या पिहुको टाकत आई म्हणाली. ‘’अरे व्वा !’’ पिहु पण समजायची ते समजली. आईचा डि.एन.ऐ. कुटून कुटुन भरलेल्या पिुहुने उसळी मारून पलटवार केला.’’बायका अवकाशात चालल्या. पण तुमचा P.S.L.V., G.S.L.V. रॉकेट अजुनही किचनमध्येच पुरण घालतात’’. आपण ठार बहिरे आहोत या अविर्भावात आई नेहाला पुढे म्हणाली. ‘’काय गं ! स्वयपाक येतो म्हणजे सणावारांचीही चांगली माहिती असेल तुला’’. ‘’हो तर मला सगळे सणवार, रीतीरिवाज, परंपरा अगदि साग्रसंगीत माहित आहेत. एव्हढेच नव्हे काकू अहो मी प्रदोष,चयुर्थी, एकादशी,नवरात्री आणि श्रावणी देखील धरते. अहो काकू कुकींगचे क्लास लावून मी उपवासाचे विविध प्रकारचे कितीतरी खास जिन्नस बनवायचे सुद्धा शिकलेय. एवढंच काय मी (लाजत) महेशसाठी सोळा सोमवार पण केलेत.’’ आता नेहाच्या या चौकार षटकारांनी महेशची दांडी गुल झाली. क्षणभर त्याला वाटलं हे माझं पिलु नाहीच !. आपण या नेहाला ओळखतच नाही. तिकडे मात्र आईने हे ऐकल्यावर विजयाच्या हर्षान्मोदात नेहाला सुन म्हणून झटकन पसंती देऊन टाकली. आता तिच्या टिममध्ये एक अष्टपैलू भिडु जमा झाला होता.
पुढे काही दिवसातच दोघांचं लग्न झालं. हळुहळू सासू सुनेचं सुत चांगलंच जुळलं. घरात आत्तापर्यंत एकटी आईच उपवास करीत होती. आता दोघी सासुसूना हे उपवसाचे सोहळे अगदी साग्रसंगीत पार पाडु लागल्या. नेहा आल्यापासून तिचे उपवासाचे विविध जिन्नस गळ्याखाली उतरवणं महेशला जसं जड जाऊ लागलं तसं त्या दोघी सासुसुनांच्या उपवासाच्या सामग्री, फळं आणि भरमसाठ ड्रायफ्रुटचं बील बघुनही त्याच्या तोंडाला फेस येत होता. तो त्यांना तब्येतीचं कारण देऊन या गोष्टीपासून परावृत्त करण्याचे प्रयत्न करी पण दोघी दाद देत नसत. आता महेशची अवस्था त्रासलेल्या वरुन दयनीय वर आली. पण बापुडा सांगतोय कोणाला?
असेच काही दिवस गेले. एके दिवशी आईची तब्येत बिघडली. महेश त्वरित तिला दवाखान्यात घेऊन आला. तिच्या छातीत प्रचंड दुखत होत. डॉक्टर तिला तपासण्यासाठी घेऊन गेले. बाकी कुटुंब बाहेर काळजीत बसलं. आईसोबत महेशचं कितीही वाजत असलं तरी; त्याचा आईवर खूप जीव होता .ज्या आईने त्याला संस्कारांच बाळकडू पाजवून आज या जगात तरायला शिकवल, ज्या आईने बाबाच्या छोट्याश्या पगारात कोंड्याचा मांडा करून त्या दोघा भावंडाना वाढवल, जिने त्यांच्या आजारपणात रात्र-रात्र जागून काढली. ती आई आज अचानक आजारी पडली. जणू सगळ घरच आजारी पडल होतं. त्यांच्या आयुष्यातील आई नावाचं हे सळसळत चैतन्य आज निपचित पडल होत.आईला काही झाल तर. या नुसत्या कल्पनेनेच महेशच्या अंगावर काटा आला. ‘’नाही, नाही तिला काही होणार नाही. देवा माझ्या मनात असे विचार का येत आहेत ? वैरी न चिंती ते मन चिंती म्हणतात. बरोबरच आहे.’’ या आणि अश्या विचारांनी महेशच्या मनात चिंतेच काहूर उठलं ,तो खूप अस्वस्थ झाला. त्याची नजर हॉस्पिटलमध्ये असलेल्या गणपतीच्या मूर्तीकडे गेल. हॉस्पिटलमधील देवदूतही शेवटी याच्याच भरवश्यावर काम करत होते ना. मानवीय आयुष्याचे अनाकलनीय धागे शेवटी याच्याच तर हातात होते. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाच्या आयुष्याची दोरी आणि त्यांच्या जीवलगांच्या धैर्याचा चिवटपणा मजबूत रहावा याची अढळ जवाबदारी या विघ्नहर्त्यावरच तर होती. त्या मंगलमूर्तीच्या शांत संमयी मुद्रेकडे पाहत महेशला एकाकी भरून आलं. त्या विधात्यासमोर नतमस्तक होऊन तो म्हणाला. ‘’देवा माझ्या आईला बरं कर. तिच्याशिवाय आमच्या आयुष्याला काहीच अर्थ नाही. ती या संकटातून सुखरूप निघु दे देवा. मी अकरा मंगळवार करेन. तुला अकरा नारळांची माळ चढवेन.’’ आईच्या मायेने उपास-तपासावर विश्वास न ठेवणाऱ्या या मुलाने शेवटी नवस बोलून त्या गणपतीला गळ घातली.
आपला प्रिय व्यक्ती आपल्यापासून दुरावेल हि भीती माणसाला काय काय करायला लावेल हे सांगता येत नाही. तपासणीमध्ये अर्धा दिवस गेला .शेवटी रिपोर्ट बघून डॉक्टरांनी सगळ्यांना केबिन मध्ये बोलावलं. त्या सर्वांच्या चेहऱ्यावरचे उडालेले रंग पाहून डॉक्टर म्हणाले, ‘’अहो टेन्शन घेऊ नका. काही गंभीर नाही .काल त्यांनी उपवास केला होता आणि आज सकाळी परत काही अरबट चरबट खाल्लेलं दिसतय त्यामुळे ‘एसिडिटी’ होऊन त्यांच्या छातीत दुखत होतं. इथून पुढे त्यांचे सर्व उपवास बंद.’’ डॉक्टरांनी असा आज्ञाबर ह्कुम सोडत, तपासण्यांच भलं मोठं बिल त्यांच्या हाती ठेवत, या कुटुंबाचं आईरूपी सळसळत चैतन्य त्यांच्या हवाली करत त्यांना घरी जाण्यास सांगितलं.’’खोदा पहाड,निकला चुहा‘’ हॉस्पिटल मधून बाहेर पडताना पिहुने केलेल्या या कमेंटला खोडून काढण्याची कोणाचीच न हिम्मत होती ना इच्छा.
दुसऱ्या दिवशी सकाळी महेश नाश्त्यासाठी बसला तसं त्याच्यासमोर भगर,आणि दुध ठेवण्यात आलं. तो चिडून बोलला. तुम्हाला डॉक्टरने काय सांगितल ते लक्षात नाही का ? आजपासून आई कसलाही उपवास करणार नाही’’. काही ड्राय फ्रुट त्याच्यासमोर ठेवत नेहा म्हणाली, ‘’हा आईचा नाही. हा तुमचा नाश्ता आहे.आज मंगळवार आहे’’. हे ऐकून महेशाला आपण बोललेल्या नवसाची आठवण झाली. आई त्याला म्हणाली. ‘’काही हरकत नाही बाळा तू माझ्यासाठी एवढा नवस बोलला तेच खूप आहे. तू मंगळवार नाही धरलेस तरी चालेल’’. ‘’नाही, नाही मी करेन ना ,शेवटी आई तुझा प्रश्न आहे. तुझ्याबाबतीत मी ना तुझ्या उपवासाची रिस्क घेईन ना माझ्या नवसाची‘’.अस म्हणून त्याने भगरीचा एक घास तोंडात टाकला;आणि तो स्वतःशीच कऱ्हावून बडबडला .’’बापरे अकरा मंगळवार ! ‘’ ‘’तेवढ्यात मधून नेहाने बाकीच्या सगळ्यांसाठी नाश्ता आणला. आईने नेमक्या आज त्याला आवडणाऱ्या गरमागरम बाजरीच्या खमंग कन्या शिजवल्या होत्या तर नेहाने मस्तपैकी पालक परोठे बनवले होते. सगळे ताव मारून खाऊ लागले. आणि आता महेशाला समजल होतं कि उपवास असताना जेव्हा इतरजण समोर बसून चांगलं -चुंगलं खात असतील तर मनाला किती वेदना होतात.
एवढ्यात त्याच लक्ष सकाळपासूनच गुमसुम बसलेल्या पिहू कडे गेलं, ’’तू का गं एवढी गप्प गप्प?’’ शेवटी त्याने विचारलचं,तिच्या ऐवजी नेहानेच उत्तर दिलं ’’कारण तिचाही आज उपवास आहे’’.’’कसला उपवास ?इथे समोर बसून सगळ तर खातेय !’’. परत नेहाच उत्तरली, ”तिचा उपवास तुमच्यापेक्षा कडक आहे, हॉस्पिटलमध्ये तुमचा नवस ऐकून तिनेही नवस बोलला कि, ती हि पुढचे अकरा मंगळवार मोबाईलचा उपवास करेल. ती या दिवशी बिलकुल मोबाईलला हात लावणार नाही’’, हे ऐकून सगळे चाट पडले. आपली मुलगी आपल्यावर एवढ प्रेम करते यावरआईचा विश्वासच बसेना, तिच्या प्रेमाच्या सागराला भरती आली आणि तिने या भरतीच्या भरातच डोळ्यांच्या ओलावलेल्या कडा पुसत दोन जास्तीचे पालक परोठे तिच्या ताटात टाकले आणि तिच्या ताटातील गरम गरम बाजरीच्या कण्यावर पुन्हा एकदा साजूक तुपाची धार धरली. ती तुपाची धार आशाळभूत नजरेने पाहत महेशने भगरीचा दुसरा घास घश्याखाली ढकलला.
समाप्त.
लेखिका -शिवलीला शिवपूजे,धाराशिव.
( माझ्या लेखकमित्र कुटुंबातील सर्व वाचक सदस्यांना सविनय नमस्कार !. वाचकहो हि कथा कशी वाटली ते जरूर कमेंट करून सांगा. आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय. सोबतच आपल्या सूचना,आणि सल्ल्यांचही स्वागत आहे.अश्याच रंजक कथा आणि माहितीपर लेख वाचण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करायला विसरू नका.धन्यवाद !)
मस्तच कथा आहे 👍👌
धन्यवाद 🙏
सुंदर लेख
धन्यवाद🙂🙏
वाचनीय कथा ,
छान लिखाण 👍👍👍
खुप खुप धन्यवाद🙏
खूप छान कथा
खुप खुप धन्यवाद मॅम .🙏
अप्रतिम. बऱ्याच दिवसांनी चांगलं मराठी वाचायला मिळालं.
बापरे ! फार मोठी कमेंट आहे हि. आपले मनस्वी आभार.🙏☺
सुरेख.. हल्की फुल्की कथा
धन्यवाद वृषाली मॅम .🙂🙏
chhan katha
धन्यवाद मॅडम