Marathi Story for Reading- शाळेतील मैत्री

WhatsApp Group Join Now

         सुधा तिच्या तेरा वर्षाच्या मुलीला मधुराला जेवायला बोलवण्यासाठी तिच्या खोलीत गेली. त्यावेळी मधुराच्या खोलीचे दार बंद होते म्हणून सुधा सरळ मधुराच्या खोलीचे दार उघडुन आत गेली. त्यावेळी मधुरा कोणाशीतरी फोनवर बोलत होती. आईला बघताच मधुराने फोन बंद केला आणि आईला म्हणाली, ” आई तुला एवढे पण मॅनर्स नाहीत का ? किती वेळा मी तुला सांगितले माझ्या खोलीत येताना दार वाजवत जा ? सरळ कशी काय तू दार उघडून खोलीत येतेस ? आई मी आता मोठी झाली आहे. मला पण प्रायव्हसी हवी असते. तुझ्या आणि बाबांच्या खोलीत येताना मी दार वाजवून यायचे आणि माझ्या खोलीत तू दार न वाजवता येतेस. बाबा बघ कसा माझ्या खोलीत येताना दार वाजवून येतो.”

      त्यावेळी सुधा मधुराला म्हणाली, ” अग ! आत्ताशी तू तेरा वर्षाची आहेस. एवढ्या लहान वयात तुला कशाला हवी प्रायव्हसी. बाबांची गोष्ट वेगळी आहे. मी तुझी आई आणि मैत्रिण आहे म्हणुन मी सरळ दार न वाजवता तुझ्या खोलीत येते. मला तुझे हे प्रायव्हसीचे चोचले नको सांगू. मला समजतं तुला कधी प्रायव्हसी ध्यायची तेव्हा मी तुला देईन. आता पटकन हातपाय धुऊन घे. मग आपण सर्वजण जेवायला बसू.”

           मधुरा हातपाय धुवायला बाथरुममध्ये गेली तोपर्यंत सुधा मधुराच्या खोलीत तिने तिच्या बेडवर अभ्यास करताना केलेला पसारा आवरायला लागली. तिथे असलेली मधुराची स्कूल बॅग उघडून त्यात मधुराच्या शाळेचे कॅलेन्डर बघायला घेतले. त्यावेळी त्यात सुधाला दिसले की, मधुराच्या क्लास टिचरने  तिच्या आईवडिलांना शाळेत भेटायला बोलावले होते. सुधा त्या कॅलेंडर मधील टीचरचा रिमार्क पाहून विचार करत होती की ही गोष्ट मधुराने आपल्याला का सांगितली नाही. तेवढ्यात मधुरा बाथरुममधून बाहेर आली आणि आईवर जोरात ओरडली, “आई ! माझ्या स्कूल बॅगला कशाला हात लावलास तू ? आपल्या घरात मला कुठलीच प्रायव्हसी नाही.”

 हे ऐकल्यावर सुधा मधुराला म्हणाली, ” अग ! मधुरा केवढ्या मोठ्यांदा ओरडते आहेस माझ्या अंगावर आणि आधी मला हे सांग स्कूल टिचरने मला आणि तुझ्या बाबांना स्कूलमध्ये कशाला बोलावलं आहे ? आणि तू मला हे सांगितले पण नाहीस. मी आता हे कॅलेन्डर बघितल्यावर मला समजतं आहे.

           त्यावेळी मधुरा आईला म्हणाली, ” अग आई, मी जेवण झाल्यावर तुला आणि बाबांना सांगणारच होते.”

 त्यावर सुधा मधुराला म्हणाली, जेवण झाल्यावर नाही मला आत्ताच सांग. कशाला स्कूल टिचरने मला आणि तुझ्या बाबांना स्कूलमध्ये बोलावलं आहे.”

      त्यावर मधुरा आईला म्हणाली, ” अग आई, त्याचे काय आहे ? माझ्या क्लासमधील केतन आहे ना त्याला मी आवडते आणि तो मला आवडतो. म्हणजे आमच्यात तसे काही नाही आहे आई. तू मला सांगितले आहेस की मुलगा व मुलगी पण चांगले मित्र होऊ शकतात. आम्हांला दोघांना फक्त एकमेकांची कंपनी खूप आवडते त्यामुळे आम्ही कधीकधी शाळेच्या बाहेर पण भेटतो, कॉफी प्यायला जातो, शॉपिंगला जातो, सिनेमा बघायला जातो; पण त्यामुळे आम्हा दोघांना स्कूलमधील मित्रमैत्रिणी लव्हबर्ड म्हणून चिडवतात. त्यात आमचा काय दोष ? ही गोष्ट आमच्या स्कूल टिचरला कळली. तिने आम्हा दोघांना बोलावले आणि सांगितले की, तुम्ही दोघे अजून लहान आहात असल्या गोष्टी करायला. तुम्ही दोघांनी एकमेकांशी बोलायचे नाही, एकत्र भेटायचे नाही आणि आता क्लास टिचर  केतनला दुसऱ्या क्लासमध्ये बसायला सांगणार आहे. हे सर्व सांगायलाच टिचरने तुला आणि बाबांना स्कुलमध्ये बोलावले आहे.”

      हे सर्व मधुरा तिच्या आईला सांगत होती तेव्हा तिचे बाबा पण तिथे आले होते. मधुराने हे सर्व सांगितल्यावर तिच्या आईने तिला थोबाडीत मारली आणि म्हणाली, ” अगं मधुरा, तुला आम्ही मुलांशी बोलायला परवानगी दिली म्हणून तू त्या केतनला शाळेच्या बाहेर एकटी भेटतेस ? त्याच्याबरोबर सिनेमा बघायला जातेस, शॉपिंगला जातेस ? माझा आणि तुझ्या बाबांचा तू विश्वासघात केला आहेस. फार चुकीचे वागली आहेस तू.” 

            त्यावेळी मधुरा आईला रडत म्हणाली, ” अगं आई ! तूच तर मला सांगत होतीस मी आता वयात आली आहे, मोठी झाले आहे. अशा वेळी मुलगा व मुलीला एकमेकांशी मैत्री करायला आवडते, एकमेकांशी बोलायला व एकमेकांबद्दल आकर्षण वाटणे साहजिक असते. मग तू आणि आमच्या स्कूल टिचर आम्हा दोघांना समजून का नाही घेत ? स्कूल टिचरचं जाऊ दे. तू माझी आई आहेस तुझा पण माझ्यावर विश्वास नाही का? आम्ही दोघे बाहेर भेटतो म्हणजे लगेचचं आमच्यात काहीतरी होऊन मी प्रेग्नेनंट राहणार आहे का? अग आई आम्हाला सायन्समध्ये शिकवलं आहे.  हल्ली आम्ही एवढे मोबाईल वापरतो ते काय फक्त गेम खेळायला नाही. त्यात पण आम्ही वाचतो.  मुलगा व मुलीचे संबध झाले तर काय होईल ?

              मी तुला आधी सांगितले नाही ही माझी चुक झाली हे मी मान्य करते. आम्हा दोघांच्या मनात मैत्रीशिवाय काही नाही आहे. आम्ही भेटतो तेव्हा आम्ही इतर विषयांवर पण बोलतो.”

      ह्यावर मधुराचे बाबा मधुराच्या आईला म्हणाले, ” सुधा शांत हो. मधुरा म्हणते ते बरोबरचं आहे. ती आता मोठी होत आहे. ह्या वयात मुलांशी मैत्री करणे काही चुकीचे नाही. आता तिच्या क्लास टिचरने कशाला बोलावले आहे ते आपण उद्या स्कुलमध्ये गेल्यावर बघू. आता आपण सगळेजण जेवण करु.”

      मधुराचे आईवडील दुसऱ्या दिवशी मधुरा सोबत स्कूलमध्ये गेले. तिथे केतन आणि केतनचे आईवडीलपण आलेले होते. सगळेजण मिळून क्लास टिचरकडे गेले. त्यांना बघून क्लास टिचर सगळ्यांना म्हणाल्या, ” आपण सगळेजण प्रिन्सिपल मॅडमच्या केबीनमध्ये जाऊन बोलू या. त्या तुमची सगळ्यांची वाट पाहत आहेत.”

      सगळेजण प्रिन्सिपल मॅडमच्या केबीनमध्ये गेले. मॅडमनी  सगळ्यांना बसायला सांगितले आणि केतन आणि मधुराच्या आईवडिलांना म्हणाल्या, ” तुमची मुलं वयात आली आहेत, मोठी होत आहेत, त्यांच्यामध्ये हार्मोन्स चेंन्जेसमुळे त्यांना एकमेकांचे आकर्षण वाटणे, एकमेकांशी बोलायला जास्त आवडणे ह्या गोष्टी नैसर्गिक आहे हे मान्य; पण तरीही आम्ही टिचर म्हणून व आपण पालक म्हणून आपली मुले कुठल्या चुकीच्या मार्गाने जात नाही ना ह्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

      सध्या स्कूलमध्ये केतन आणि मधुरा हे दोघेजण फक्त आणि फक्त एकमेकांसोबत गप्पा मारतात त्यांना इतर मित्रमैत्रिणींशी बोलायला आवडत नाही. दोघेजण स्कूलच्या बाहेर एकत्र फिरतात, एकमेकांना महागड्या भेटवस्तू देतात. महागड्या भेटवस्तू घ्यायला पैसे तुमच्याकडूनच घेत असतील. ह्या सर्व गोष्टी पालक म्हणून तुम्हाला  माहीत आहेत का?”

      ह्यावर केतन आणि मधुराचे आईवडील म्हणाले, ” आम्हाला ह्यातले काहीच माहीत नाही. सॉरी मॅडम.”

      त्यावेळी प्रिन्सिपल मॅडम केतन आणि मधुराला म्हणाल्या, ” केतन आणि मधुरा तुम्ही दोघेजण वयात येत आहात, मोठे होत आहात, तुमच्यामध्ये हार्मोन्स चेंन्जेस होत आहे. एकमेकांबद्दल आकर्षण वाटते. एकमेकांची मैत्री आवडते ह्या सर्व गोष्टी तुम्ही इंटरनेटवर वाचल्या, पालक आणि टिचरकडून ऐकल्या म्हणून अगदी तसेच वागायचे नसते. तुमच्या मैत्रीबद्दल मला तुमच्या पालकांना व तुमच्या टिचरला काही अडचण नाही आहे. आमचे एवढेच म्हणणे आहे ह्यामुळे तुम्ही तुमच्या बाकीच्या मित्रमैत्रिणींशी बोलणे बंद करु नका. तुमच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष  करु नका. खेळण्याकडे दुर्लक्ष करु नका. ह्यामुळे तुमचेच नुकसान होत आहे. हे वय अभ्यास करण्याचे आहे. आयुष्यात तुम्हाला शिकून काय बनायचे आहे ह्याचा विचार करण्याचे आहे. तुम्ही आता मजामस्ती करण्यात वेळ घालवला तर तुमचे आयुष्य खराब होईल. एकदा गेलेली वेळ परत कधी येत नाही. तुम्ही दोघेजण अभ्यासात हुशार आहात. तुम्ही तुमची छान फ्रेंडशिप ठेवा. अभ्यासात एकमेकांना मदत करा. माझे म्हणणे तुम्हाला पटले असेलच.”

      ह्यावर मधुरा आणि केतन या दोघांनी प्रिन्सिपल, क्लास टिचर आणि आपल्या पालकांची माफी मागितली आणि ह्यापुढे आम्ही असे वागणार नाही असे त्या दोघांनी कबूल केले.

 मधुरा आणि केतनचे पालक प्रिन्सिपल मॅडमला म्हणाले, ” तुम्ही हा नाजूक विषय खूप छान हातळला त्यासाठी धन्यवाद. आताच्या पिढीला आपण कसे हाताळायचे हे आम्हा पालकांना तुमच्याकडून शिकण्यास मिळाले ह्यासाठी तुमचे आभार मानावे तितके कमी आहे. खरंच ! एक पालक म्हणून मुलांशी कसे बोलायचे, त्यांच्याशी कसे वागायचे ह्या गोष्टी आत्मसात करणे हे पालकांचे कर्तव्य आहे. मॅडम आता आम्ही आमच्या मुलांना जोपासताना योग्य ती काळजी नक्की घेऊ.”

              प्रिन्सिपल मॅडमचे आभार मानून मधुरा आणि केतनचे आईवडील नवीन शिकवण घेऊन बाहेर पडले.

                                                             

2 thoughts on “ Marathi Story for Reading- शाळेतील मैत्री”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top