“मनाली रविवारी मृत्यंजयेश्वरला जायचा प्लॅन आहे .तू नक्की येणार ना?”
सिंहगड रोडच्या वृंदावन सोसायटीत उत्साही महिलांचा एक छानसा गटच होता. एखादी छानशी मुव्ही, कधी उगाचच तुळशीबागेत भटकंती, कधी छोटीशी सहल. पंचवीस जणींचा हा गृप. सदा आनंदी. एकत्र सगळीकडे जाण्याची मजा अनुभवताना, गैरहजर मैत्रीणीविषयी काहीही बोलायचं नाही हा अलिखित नियम. बरेचसे प्लॅन हे संध्याकाळी सोसायटीच्या आवारात फिरताना पक्के व्हायचे. कुणीतरी एखादं निमित्त,एखादं ठिकाण सुचवायचं आणि त्यावर सगळ्यांनी चर्चा करुन शिक्का मोर्तब करायचं! पुण्यात जायचं असेल टू व्हीलर रॅलीच निघायची. पंचवीस पैकी २२/२३ जणी तरी नक्की हजर असायच्या. उरलेल्या दोघी तिघी अगदी न टाळता येण्यासारखं काही कारण असेल तरच ट्रीप चुकवायच्या.
मनालीला ही भटकंती आवडायची. मुळात या सगळ्या गोष्टी रविवारी होत असल्यामुळे ती ललितच्या म्हणजे तिच्या नवऱ्याच्या ताब्यात जाईला म्हणजे पाच वर्षाच्या तिच्या लेकीला सोपवून जाऊ शकायची. ललित आठवडाभर जाईला वेळ देऊ शकत नव्हता. त्यामुळे रविवारी जाईबरोबर वेळ घालवायला त्याला मनापासून आवडायचं.
आज चालता चालता आरतीने दोन दिवसानंतरच्या मृत्युंजयेश्वरच्या प्लॅनविषयी सांगीतलं. मनाली मनोमन खुश झाली, ती हो म्हणणारच होती, तितक्यात कुणीतरी आरतीला विचारलं “कुठं आहे हे मृत्युंजयेश्वर ? आणि आता का तिकडे जायचं?” ” काल महाशिवरात्र झाली ना, मग दर्शन घेऊन येऊ,बरेच दिवसात आपण कुठे गेलो नाही ना खूप प्राचीन मंदिर आहे ते”

आरतीच्या या उत्तराने मनालीच्या मनात एक बारीक कळ उठली. आरतीने मनालीला विचारलं, “मने तू कन्फर्म येणार ना?” “मी ? नाही, नको नाही जमणार मला, मला बरं वाटतं नाही आहे ग” मनाली चटकन वळली आणि जरा कोपऱ्यातल्या बेंचवर जाऊन बसली. ट्रीपचं प्लॅनिंग करता करता तिच्या मैत्रीणी पुढे निघून गेल्या.
बेंचवर बसलेल्या मनालीच्या डोक्यात महाशिवरात्र या शब्दाने फेर धरला होता. मनाली तिच्या बालपणात पोचली. दहा ,बारा वर्षाची होती मनाली. नुकतीच महाशिवरात्र झाली होती…….”इथून उजवीकडे जा, चार कवाडं सोडलीत की पुढचं घर गोविंद गुरुजींचं ”
कवाडं? म्हणजे? बारा वर्षाच्या मनालीला प्रश्न पडला होता.
“कवाडं म्हणजे दार ग” सुमन काकुंनी सांगितलं तेंव्हा तिला छानसं हसूच आलं. तिने मैत्रीणीकडे म्हणजे विद्या कडे पाहीलं. विद्याच्या चेहर्यावर ही हसू उमटलं होतं. दोघींना खिदळायला आणि गप्पा मारायला हा विषय बराच वेळ पुरला असता पण तेव्हढ्यात गोविंद गुरुजींचं घर आलं. मनाली, विद्या, विदयाचे आई, बाबा आणि आजी असे सगळे दापोली जवळ आले होते. महाशिवरात्र झाली होती दापोलीजवळच्या या गावात जागृत शंकराचं स्थान होतं. तिथं दर्शन घ्यायचं आणि छोटीशी पिकनिक असा बेत होता.
इरिगेशनच्या नातूनगर कॉलनीत मनाली आणि विद्या रहायच्या. मनालीच्या बाबांचं मूळ गाव कोल्हापूरजवळ होतं तर विद्याच्या बाबांचं गाव पुण्याजवळ होतं. नोकरीच्या निमित्ताने त्यांची इथे बदली झाली होती. विद्या आणि मनाली रोज सकाळी ६.३० वाजता स्कूलबसने खेडला शाळेत एकत्र जायच्या. कॉलनीचीच एक जुनाट बस होती.आणि शाळेत जाणारे पाच सहा विद्यार्थी. मनाली आणि विद्या वेगवेगळ्या वर्गात असल्या तरी दोघींचं मेतकूट होतं. दोघींच्या आईही मैत्रीणी होत्याच. विद्याच्या आईने शनिवारीच मनालीच्या आईला दापोलीला येण्याविषयी विचारलं होतं. “महाशिवरात्र झालीय दापोलीजवळ आमचं कुलदैवत आहे, तिथंच जवळ एक शंकराचं जागृत देवस्थान आहे, सोमवारी डबे घेऊन जाऊ आणि संध्याकाळी परत येऊ” मनालीची आई म्हणाली “माझी काही हरकत नाही,एकदा मनीला विचारते “पण त्या दिवशी मनालीचं काय बिनसलं होतं कुणास ठाऊक, “आपण नाही जायचं म्हणजे नाही जायचं” असं ती निक्षुन म्हणाली होती.” “तुला यायचं नाही तर मी जाऊन येते ,नाहीतरी तू सकाळी शाळेतच जाशील, दुपारी बाबा थांबतील तुझ्याजवळ, चालेल?” आईने विचारलं तर मनालीने रडून गोंधळ घातला . आई म्हणाली “बरं बाई मी पण जात नाही.” आणि तिने विद्याच्या घरी तुम्ही जाऊन या असा निरोप पाठवला.
मोबाईलच काय टेलीफोन ही नव्हते त्या काळातली ही गोष्ट. तेंव्हा खाजगी गाड्या ही फारशा नव्हत्या. विद्या आणि तिच्या घरचे कॉलनीच्या स्कूलबसनेच खेड पर्यंत आणि मग तिथून पुढे दापोलीला एस.टी.ने जाणार होते. मनाली दिसली आणि विद्याने रहावलं नाही.
“मने तू तरी चल की ग”.विद्याने आर्जव केलं.
मैत्रीणीच्या त्या विनवणीने मनाली पाघळलीच. विदयाच्या आईने ही मग “जा ग घरी दप्तर ठेवून आईला सांगून ये ” असं सांगितलं . दोघी क्षणात मनालीच्या आईसमोर ! मनालीची आई हसली, “अग मने आधीच हो म्हणाली असतीसं तर मी पण आले असते की” मनाली बावरली, गोंधळली आणि तिथंच उभी राहिली. ” जा आता आवर पटकन” असं आईने म्हटल्यावर धावपळ करून युनिफॉर्म बदलला, छानसा फ्रॉक घालून मनाली तयार झाली. विद्या आणि मनाली हातात हात घालून धावत धावत बसजवळ पोहोचल्या. रोजचाच रस्ता. शाळा नसल्यामुळे जास्त छान वाटत होता.
शेवटी एकदाचं खेड आलं, तिथून लगेचच दापोलीची गाडी मिळाली. तिथून रिक्षाने सगळे गोविंद गुरुजींच्या घरी पोहचले. गोविंद गुरुजींच्या घरी पोचल्यावर गार पाण्याने हातपाय धुताना बरं वाटलं. पाऊस ही जरा उघडला होता. गोविंद गुरूजी देवळात गेले होते. त्यांच्या पत्नीने सर्वांना फराळाचं आणि चहा दिला. ते घेऊन सगळे देवळाकडे निघाले. देवळात पोचल्यावर मनाली विस्मय चकितच झाली. शंकराची पिंडी आणि त्या मागे माणसाच्या उंचीचं वारूळ. मनाली क्षणभर घाबरलीच. विदयाचा हात धरुन आत गेली . बाहेरगावच्या पाहुण्यांना गुरुजी सांगत होते, “अहो किती वेळा वारुळ काढले, रात्रीत तेव्हढं परत तयार” “रक्षणकर्ताच आहे तो” आता आम्ही कधी त्याला त्रास देत नाही, त्याने तर कधीच आम्हांला त्रास दिला नाही”. “पण दिसत नाही हो कोणास” चांगला मनगटाएव्हढा जाड आहे म्हणतात”. त्या वारुळातल्या नागाविषयी ऐकताना मनाली आणखीन घाबरली. तितक्यात तिला मंदिरालगत वाहणारी नदी दिसली. हवेत जाणवणारी किंचित उष्णता नदीपात्र बघताना गारवा देत होती. मनाली समाधानाने त्या दृश्यात हरवली. गाभाऱ्यात सुरू झालेल्या धीर गंभीर मंत्र पठणाने ते सगळं वातावरण मनालीच्या मनात कोरलं गेलं.
दिवसभर कामात असणा-या आईला आपण इथे आणायला हवं होतं. आपण का नाही म्हटलं हेच मनालीला आठवेना. असू दे पुढच्या वर्षी सुमन काकूंना आपणच आठवण करुन देऊ, आणि पुढच्या वर्षी आईला नक्की इथे आणू असं मनातल्या मनात ठरवल्यावर मनालीला बरं वाटलं. पंचवीस वर्षं होऊन गेली मनाली ते वातावरण विसरली नाही. दर वर्षी महाशिवरात्रीला ती हा प्रवास करुन येई. मनालीच्या बालहटटामुळे निसर्ग प्रेमी असणारी तिची आई या वातावरणाला मुकली होती. आईला घेऊन पुढच्या वर्षी नक्की इथं येऊ असं मनालीने ठरवलं होतं. पण दिवाळीच्या वेळी मनालीच्या बाबांची कोल्हापूरला बदली झाली. मनालीच्या मनात महाशिवरात्रीची आठवण होती. आपण आईला विद्याकडे येण्यासाठी तयार करु त्या आधी विद्याला पत्र लिहू अशी स्वतःची समजूत घालून मनाली कोल्हापूरला गेली. मनाली आणि विद्या ,तसचं मनालीची आई आणि विद्याची आई यांचा पत्रव्यवहार सुरू होता.
जानेवारीच्या अखेरीस आलेल्या विद्याच्या पत्रानं मनाली रडू आवरेना. विद्याच्या बाबांची साता-याला बदली झाली होती.फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात विद्या आणि तिचे कुटुंबीय साता-याला जाणार होते. यावर्षीचा महाशिवरात्रीला दापोलीला जाण्याचा प्लॅन पुरेपुर फसला, हे मनालीच्या लक्षात आलं. ती दरवर्षी दापोलीला जाण्याचा प्रयत्न करत होती, पण काही केल्या ते घडून येत नव्हतं.मनालीचं लग्न होऊन मनाली ललित बरोबर पुण्यात आली.मनालीचे आईबाबा कोल्हापूरात स्थायिक झाले.जाईचा जन्म झाला आणि ललितने नवी कोरी कार घेतली. ललितने विचारलं “बोला मॅडम कुठं कुठं जायचं?” मनाली पटकन म्हणाली”दापोलीला जाऊया?” ललितला हे अनपेक्षित होतं. तो म्हणाला “जाई किती लहान आहे इतका लांबचा प्रवास झेपेल का तिला?” “आता नाही रे , मार्चमध्ये महाशिवरात्रीनंतर, माझ्या आईबाबांना घेऊन जाऊ!” ललित गोंधळला ,हा काय प्रकार आहे हे त्याच्या लक्षात येईना. पण मनालीचा उत्साह बघता त्याला मनालीचं मन मोडवेना. “Okay ठीक आहे, तेंव्हाचं तेंव्हा बघू ” ललितने विषय थांबवला.
फेब्रुवारी महिना उजाडला,मनालीला दापोलीला जाण्याचे वेध लागले होते. पण अचानक एके दिवशी “आईला बरं नाही तुम्ही लगेच निघा” असा मनालीच्या भावाचा फोन आला. मनालीने कोल्हापूरला जाताना ठरवलं होतं, आईला दापोली ट्रीप विषयी सांगायचं. लहानपणी जे वागले त्याविषयी माफी मागायची,तिला सांगायचं लवकर लवकर बरी हो आपण ट्रीपला जाऊ. या विचारातच प्रवास सरला. प्रवासात ललित फारसं बोलला नाही हे तिच्या लक्षात आलं नाही. जसजसं घर जवळ आलं तसतशी गर्दी जाणवायला लागली. मनाली आईजवळ पोचली तर सगळंच संपलं होतं. मनाली कोसळली.,.. तिच्या मनात एक खंत गेले काही वर्ष खुपत होती. आईने त्या घटनेचा, मनालीच्या वागण्याचा चुकूनही उल्लेख केला नव्हता, त्यामुळे ती खंत आज जास्तच सलत होती.आणि हा सल आता तर काळजात कायम सलणार होता.
दरवर्षी महाशिवरात्र आली की मनालीच्या मनातली ही खंत अधिकच दाट होऊन जायची… वेदना द्यायची…..ठसठसायची….
लेखिका -माधुरी केस्तीकर
तुम्हाला ही कथा कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन कथा आणि माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.
धन्यवाद !
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे. लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
खूप छान..!!
Thank you Gauri Ma’am 😊
फार छान 👌
Thank you Vaishali Ma’am 😊
खूप छान कथा