आज मालती ताईंचा उत्साह ओसंडून वाहत होता…त्याला कारणही तसंच होतं, बऱ्याच वर्षांनी त्यांचा मुलगा आणि नात अमेरिकेहून आजोळी कोकणात येणार होती.
“ मुकुंदा अय मुकुंदा, खय गेला? “, मालती ताईंनी जोरातच मुलाला आवाज दिला.
“इलय इलय, कश्याक वरडंतस काय झाला? “, मुकुंदा धावतच येत म्हणाला.
“वरडूक माझ्या नरड्याक फोड इलाय ना , म्हणान वळवळ करतलंय”, मालती ताई.
“बाय मांझे, काह्यो काय बोलतस!”, मुकुंदा.
“ मग ए, तुका कवाच्यान बोलवूक राहिल्यान,खय रावला, का सासुरवाडीचो कापूस आणान कानात बोळा कोंबल्यान!”, मालती ताई बोलता बोलता मिश्किल मोड वर गेल्या तशीच सरीता कुजबुजली,
“दर येळेस माझो माहेरचा नाव निघूकच व्हया काय?”.
“हमम, झोंबली बघ मिरची तुझ्या बायलेक”, मालती ताई हसून म्हणाल्या..
“ अगो तिचा काय घेऊन बसल्यान, माका बोल काय झाला वरडूक ता “, मुकुंदा हातातलं काम उरकतच म्हणाला.
“अरे तुका सांगितल्यान ना,केळीचो घड तोडून आण म्हणान, माझो झीलाक आवडता रे, किती वर्षान घरी येतलय,त्याका कायो पण कमी पडाक नको, काय!”, मालती ताई वात वाळीत बोलत होत्या..
“व्हय तर, माका माहिती हा तुझ्या झिलाक काय आवडता ता, माझो पण मोठा भाव असा”, मुकुंदा हसत बोलला की लगेच सरीता ने शब्दाचा वार केला,
“व्हयतर, नावाचोच मोठो अन जबाबदारीच्या नावान तोटो”.
“त्वँड बंद ठीव तुझा, हे असले कुजके काजू त्येका समोर फोडान नको सांगून ठीवताय तुका”, मुकुंदा रागानेच म्हणाला, त्यावर सरीताने नाक मुरडलं.
अमेरिकेत राहणारा लेक आणि त्याची मुलगी खूप वर्षांनी आपल्या घरी कोकणात येणार म्हणून मालती ताईंनी वाडा स्वच्छ करून घेतला होता. तसा वाडा जुनेखानीच पण टुमदार होता. अंगणात केळीची, नारळाची झाडं येणाऱ्याचं स्वागत करायला डऊलदार उभी होती.
मालती ताईंना दोन मुले होती. मोठा मुलगा अभिजित, शिकायला अमेरिकेला गेला तर तिथेच स्थायिक झाला. दुसरा लहान मुकुंद मालती ताईंजवळ होता. तो जेमतेम शिकला होता, त्याची बायको सरीता. शेतीची, घराची सर्व जबाबदारी मुकुंदाने स्वतःवर घेतली आणि अभिजित ला शिक्षणासाठी मोकळं केलं. सरीता स्वभावाने तशी चांगली, जीव लावणारी होती पण सर्व जबाबदारी आपल्या नवऱ्यावरच पडते म्हणून चिडचिडी आणि थेट बोलणारी होती. मालती ताईंचा स्वभाव वरवर कडक पण आतून लोण्याच्या गोळ्यासारखा, सर्वांना आपलसं करणारा, येणाऱ्याचं स्वागत करून प्रेमाने विचारपूस करणाऱ्या मालती ताई विनायकरावांच्या निधना नंतर मात्र जरा खचल्या होत्या. त्या स्वतःमध्ये च आणि देवामध्ये मग्न असायच्या. एकट्यात च बोलायच्या. हरी नावाचा एक घरगडी तिथे राहायचा. तो मुकुंदला सर्व मदत करायचा आणि मालती ताईंच्या जवळचा होता.
गाडीच्या ब्रेक चा मोठा आवाज येऊन गाडी गेट जवळ येऊन थांबली तशीच सर्व मंडळी घाईतच त्यांना भेटायला दारात आली. सरीता ओवाळायचं ताट, भाकर तुकडा घेऊन आली. गोरापान राजबिंडा दिसणारा मालती ताईंचा मुलगा अभिजित गाडीतून उतरताच मालती ताईंच्या डोळ्यांतुन आनंदाश्रू वाहू लागले, लेकाला डोळे भरून त्या बघू लागल्या. त्याच्या मागून त्याची मुलगी सारा गाडीतून उतरली . तिला बघून तर सारेजण बघतच राहिले. 18-19 वर्षाची ती आता खूप मोठी आणि देखणी दिसत होती .मागच्या वेळी आली तेव्हा सारा लहान होती.
तिने टी शर्ट आणि छोटी पॅन्ट घातली होती, ते बघून सरीता हळूच कुजबुजली, “ व्हय हो, ही खालचे कपडे घालूक इसरल्यान काय?”,
मुकुंदाने खुणेनेच सरीता ला गप्प केलं.
सर्व जण घरात जायला निघाले तश्या मालती ताई म्हणाल्या,
“ येवा येवा, आत येवा. तुमचा घर तुमची वाट बघता”.
“ आई, वाडा अगदी होता तसाच आहे, काही ही बदल नाही”, अभिजित वाडा न्याहाळत बोलला.
“ व्हय तर, बदलेल कश्याक, खिशात दमडी तर पाहिज्यान ना बदलूक”, सरीता बोलली.
“तुका सांगितल्यान ना त्वँड गाप ठीव म्हणान”, मुकुंद ला सरीता बोललेली अजिबात आवडलं नाही.
त्यावर अभिजित म्हणाला, “ अरे काय चुकीचं बोलतेय ती! यावेळेस आपण घराचं रेनोवेशन करूनच टाकू “.
“ काय ता?”,
“ अरे म्हणजे दुरुस्ती, बदल करून घेवूत रे मुकुंदा”, असं म्हणून अभिजित घरात जाताना सरीता उत्साहात म्हणाली, “ व्हय भाऊजी, मी सांगतलय काय काय करुचा ता”.
“ हो अगदी तू म्हणशील तसंच करू आपण, शेवटी राहायचं तुलाच आहे इथे”, अभिजीत चं वाक्य ऐकून मालती ताईंनी त्याच्या बोलण्यातला सूर ओळखून मान हलवली.
अभिजित आणि साराने विनायकरावांच्या फोटोला नमस्कार केला. तेवढ्यात एक गार वाऱ्याची झुळूक तिच्या बाजूने गेलेली तिला जाणवलं.
“आजी मला थंडी वाजली”,असं साराने म्हणताच सरीता बोलली, “ अगो भर उन्हाळ्यात तुका थंडी कशी वाजल्यान! म्हणान म्हणतय पूर्ण कपडा घाल”, असं म्हणताच मुकुंदाने तिच्याकडे रागाने पाहिलं तशीच सरीता चूप बसली.
संध्याकाळी घरात फिरत असताना साराला मागच्या बाजूस पडकी झोपडी दिसली तशीच ती म्हणाली, “ हि मौवा ची झोपडी ना! मागच्या वेळी आली होती तेव्हा आम्ही खूप खेळलो होतो”.
“व्हय, तुका लक्षात राव्हली, पण आजे समोर तिचा नावं काढा नको चिडतलंय ता”, मागच्या बाजूस काम करत असलेला हरी तिला सांगत होता.
“ पण ती कुठेय आता?”, असं साराने विचारल्यावर तो विहिरीत असं म्हणेपर्यंत तर तेवढ्यात मालती ताई, “ तुका किती येळ सांगितल्यान तिचा नाव घ्यायचो नाय म्हणान, चल हैसून पुना हिथं येवाक नको”, असं म्हणून रागारागाने हरी ला आणि साराला रागवत तिला हात धरून आत घेऊन गेल्या.
मौवाचं रहस्य कोणालाच ठाऊक नव्हतं,फक्त ती होती एवढंच. कोणी म्हणायचं आईविना पोर विहिरीत पडून मेली, कोणी म्हणायचं गाव सोडून गेली. एरवी लोण्यासारख्या मऊ वागणाऱ्या मालती ताई तिचं नाव ऐकताच एवढ्या का चिडायच्या हे साऱ्यांना कोडंच होतं.
अभिजित सर्व गावभर फिरून येऊन सर्वांशी गप्पा मारत बसायचा पण साराला मात्र बोलायला, खेळायला तिच्या वयाचं कोणीच नव्हतं. ती घरभर फिरायची पण तिला सारखं आपल्याभोवती काहीतरी आहे असा भास व्हायचा. तिने सरीताला, आजीला हे सांगितलं. नवीन जागा आहे असं म्हणून त्यांनी सारा च्या बोलण्याकडे फार लक्ष दिलं नाही .. हे सगळं शुक्रवार च्या त्या दुपारपर्यंत चालू होतं. पण शुक्रवारच्या त्या दुपारी असं काही घडलं ज्याची कोणीही कल्पना केली नव्हती.
सरीताला अपत्य नव्हतं आणि साराला एकटं वाटतं म्हणून तिने आजूबाजूच्या 3-4 पोरींना तिच्यासोबत खेळायला बोलावलं. दुपारी या मुलींचा विहिरीत पोहायचा बेत ठरला.सारा फार खुष होती कारण बऱ्याच दिवसांनी तिला मनसोक्त खेळायला मिळालं होतं आणि आता तर पोहायला पण मिळणार होतं.
सगळ्याजणी एकेक करून विहिरीत उतरल्या. एकमेकींवर पाणी उडवत मजा करत साऱ्याजणी पोहत होत्या. पोहताना अचानक सारा कश्याला तरी पाण्यात धडकली, तिने मागे वळून पाहताच ती भीतीने थरथर कापू लागली, कोणाला काहीच कळेना अशी का करतेय पण सारा घाबरून पाण्याकडे फक्त बोट दाखवत होती. म म करत ती बेशुद्ध झाली.
तिला शुद्ध आली तेव्हा ती घरात बेडवर होती. सर्वजण तिच्या बाजूला होते.
“ काय झालं?”, असं साराने विचारताच तिच्या मैत्रिणी म्हणाल्या, “ गे बाय मांझे,तुका आठवत नाय! थैसर, बावीत बेशुद्ध पडल्यान ना तू, आम्ही बघल्यान म्हणान नायतर बुडलाच व्हता आज”.
“गाप ऱ्हावा, बघलंस नाय घाबरल्यान ती, बाय मांझे, माका सांग,काय झाला तुका बावीत?”, साराच्या पाठीवरून हात फिरवत मालती ताई म्हणाल्या.
“ आजी ती, ती होती तिथे, मी पोहत होती तेव्हा ती पाण्यावर मांडी घालून बसली होती, मला बघत होती, फाटका फ्रॉक घातला होता आणि चेहरा पांढरा फटक होता, ती होती आजी तिथे विहिरीत”, सारा खूप घाबरून बोलत होती.
“ व्हय व्हय ता व्हता, पण क्वान व्हता “, मालती ताई विचारत होत्या.
“ ती, मौवा”, सारा ने मौवा चं नाव घेताच आलेल्या पोरींनी घाबरून एकच धूम ठोकली.
“ गे बाय मांझे, काहींहयो काय बोलतस, मौवा कश्याक दिसल तुका, ता पण बावीत!”, सरीता बोललीच.
“ गाप रहाव, दिसत नाय काय तुका चेडू घाबरला असय”, मुकुंदा सरीताला रागवला.
“हमम गपच रहावतलंय मी, पण बघल्यान ना तिका क्वान दिसल्यान ता ”, असं म्हणून सरीता स्वयंपाक खोलीत निघून गेली.
“ शहाणी गो बाय माझे ती, तू आराम कर, मी वाईस पेझ आणतय तुका, बरा वाटल, हा, इलय मी”, असं म्हणून मालती ताई जश्या खाली जाण्यासाठी वळल्या तसे त्यांना साराच्या खोलीत ओल्या पावलांचे ठसे दिसलें, त्या थबकल्या आणि रागाने भीतीने ओरडून म्हणाल्या, “ अवदसे इलास तू, माझ्या नातीक धरून येऊचा बघता, ता मी जिती असेपर्यंत होऊ द्यायचे नाय, निघ हैसून, निघ म्हणतेय ना”. मालती ताईंनी असं म्हणताच जिन्यावरून पळणाऱ्या पावलांचा आवाज सर्वांना आला. कोणाला काहीच कळलं नाही कश्याचा आवाज होता ते. काही दिवसांनी सारा नॉर्मल झाली, तिच्या काकूंसोबत ती स्वयंपाक खोलीत रमू लागली.
“वाण वाढगो बाय मांझे sssss”, असा जोरात आवाज देत, कपाळाला मोठा मळवट भरलेली त्यावर मोठं कुंकू लावलेली, हिरवं इरकल नेसलेली, तेजस्वी दिसणारी एक देवीची भक्तीण दारात देवीची प्रतिमा असलेली टोपली ठेवत बसली.
सरीता पीठ घेऊन उठणार तेवढ्यात सारा,‘पीठ मला दे मी देते’, असं म्हणून पीठ घेऊन दारात यायला निघाली. तिला बघताच ती भक्तीण भीतीने दारातून उठली आणि दूर जाऊन गेट पासून जोरजोरात ओरडू लागली, “गे बाय इलयस तू, कश्याक इलंस, तुका तुझ्या ठिकाणावर बांधली व्हती ना , कश्या सुटल्यान तू, जा हैसून, गे माऊले ता घरात इलय, तुका गिळूक, तुझ्या घोवान माती खाल्ल्यान त्याचो तुका भोगूक लागलंय, सावध हो गे माय, ता परत इलय”, असं म्हणून ती भक्तीण पीठ नं घेताच घाबरून निघून गेली.
मालती ताई तिचं बोलणं ऐकून दारातच स्तब्ध उभ्या राहिल्या.सारा त्या दिवशी नीट जेवली नाही, तिच्या डोक्यात सतत त्या भक्तीणचं बोलणं फिरत होतं.
दुसऱ्या दिवशी साराने काकूला विचारलं, “ काकू, घो म्हणजे काय गं?”.
“ बाय मांझे, घो म्हणजे नवरा, तुका कश्याक व्हयो ता !”, सरीताने लाजून उत्तर दिले.
“ घो म्हणजे नवरा, नवऱ्याने माती खाल्ली, म्हणजे काय? आणि कोणाच्या नवऱ्याबद्दल बोलत होती ती? माऊले पण म्हणाली, ती आजीला उद्देशून बोलत होती का? मग असं असेल तर आजीचा नवरा म्हणजे आजोबा, त्यांनी माती खाल्ली म्हणजे काय असेल? ज्याचे फळं आजी भोगतेय?नाही हे सगळं दिसतंय तेवढं वरवर नाही, नक्कीच काहीतरी आहे जे कोणालाच माहिती नाही, जे अर्धसत्य आहे, मला मौवा दिसणं, आजीचं तिच्या नावाने चिडणं आणि आज ही भक्तीण, जी मला बघून घाबरून निघून गेली. काय दिसलं तिला? या सगळ्यांचा एकमेकांशी काहीतरी संबंध आहे, हे काय रहस्य आहे ते शोधून काढलं पाहिजे, पण कसं? कोणाला विचारू?”, असा विचार करत करत सारा वरच्या माळ्यावर आपल्या खोलीत जाताच तिला फरशीवर पाण्याने काही ओळी लिहिलेल्या दिसल्या,
पडक्या ओसाड झोपडीमध्ये
भूगोल पुस्तकाचे कव्हर ,
दिसता वरवर सोपे जरी
कोडे कठीण हे असे खोलवर.
कपटाचा खेळ असे हा
भूतकाळाचे राज्य असे,
इतिहासाच्या खोल डोही
वर्तमानाचे उत्तर दिसें.
निष्पाप जीव हा वाट तुझी
आजवर मी पाहत होते,
तूच देशी मुक्ती मजला
तुझ्याच हातून कोडे सुटे.
“ हे कोणी लिहिलं? ही मौवा आहे का? हो तिच आहे. ती शुद्ध भाषा बोलायची. मला काही सांगू बघतेय का? मौवा तूच आहेस ना! तूच अशी खेळताना कोडे टाकायचीस. मी मदत करेल तुझी, बोल माझ्याशी ”, असं म्हणून सारा विचार करत झोपी गेली.
दुसऱ्या दिवशी सकाळी सारा लवकर उठली, पडक्या तुडक्या झोपडीत म्हणजे तिचं घर तिथेच काहीतरी सापडेल असा विचार करून ती हळूच कोणाला नं सांगता मौवाच्या झोपडीजवळ गेली. एकेकाळी सुंदर दिसणारी झोपडी आज मात्र ओसाड दिसत होती, गवत वाढलेलं, कौलं तुटलेली होती. पण साराने झोपडीच्या दारात पाऊल टाकताच एक मोठ्ठा प्रकाश झोपडीत पडला, त्या लक्ख प्रकाशात तिला जुने प्रसंग दिसू लागले.
“आईsssssss आली बघ मी शाळेतून”, मौवा पाठीवरचं दप्तर काढून पलंगावर बसली.
“मौवा, अगं आधी हातपाय धुवावे मग बसावं पलंगावर, कितीवेळा शिकवलय, बरं ऐक जेवण कर आणि अभ्यासाला बस, मी वाड्यात जाते, मालती ताईंनी लोणचं करायला घेतलय, आज जरा जास्त वेळ थांबावं लागेल, कळलं का?”, आरश्यात बघून वेणी घालत मौवाची आई तिला बोलत होती.
“ हो हो कळलं मातोश्री, बरं बघ ना मी अगदी तुझ्या डायरी सारखं माझ्या भूगोलाच्या पुस्तकाला कव्हर लावलं आहे, शोभते ना तुझी मुलगी! हमम, अगं बघ तरी एकदा”, असं म्हणत आईचं तोंड हाताने वळवत मौवा तिला कव्हर दाखवू लागली.
“हो खूप छान बाळा, तू आणि तुझं भूगोल, अगं पण दोन्हीना सारखं कव्हर आहे, तुझं पुस्तक टेबल वर ठेव नाहीतर भूगोल समजून माझी गोळा बेरीज घेऊन जाशील शाळेत, काय!”, असं म्हणून हसत यशोदा ताई मौवाची आई वाड्यात गेल्या.
मौवा साराला बघत तिच्याकडे येऊ लागली तशीच सारा मागे वळली तर परत तिला झोपडीतून आवाज आला.
“ आई, ए आई माझ्याकडे बघ, माझे बाबा कुठे आहेत, कोण आहेत, ते येत का नाहीत? अगं मला शाळेत काहीही चिडवतात गं मुली, तुला बाबाच नाही, बिन बाबाची, आपण दुसऱ्या गावी होतो मग इथे का आलो? झोपडीत का राहतो, सांग ना आई काहीतरी तर सांग. माझे बाबा कोण हे तरी सांग”,मौवा रडत रडत तिच्या आईला प्रश्न विचारत होती पण तिची आई तिला काहीच उत्तर देत नव्हती.
तसंच अचानक मौवा ने एक फोटो तिच्या आईसमोर धरत,’हेच माझे बाबा ना!’, असा प्रश्न विचारताच तिची आई फार गोंधळली.
“ हा फोटो कुठे मिळाला तुला? सांग मौवा”, तिची आई तिला विचारू लागली. “कुठे का मिळेना, पण हेच बाबा आहेत ना माझे? आई आतातरी सांग गं, तुझ्या डायरीमध्ये हा फोटो मिळाला मला.. भूगोलाचं पुस्तक समजून मी डायरी नेली तुझी आज शाळेत”, मौवा जीव तोडून आईला विचारत होती.
“ नाही गं हे नाहीत बाबा तुझे”, यशोदा ताईंनी मौवाला टाळायचा प्रयत्न केला पण मौवाने ठासून आईला विचारलं, “ मग तुझा आणि माझा फोटो विनायक काकांबरोबर का आहे आई?”, हे ऐकून मात्र यशोदा ताई कोसळल्या आणि रडत मौवाला खरं काय ते सांगू लागल्या, “ हो बाळा हेच तुझे बाबा. आई बाबांच्या अचानक जाण्याने मी आर्थिक संकटात अडकली होती. छोटी मोठी कामे करत मी शिक्षण घेत होते. रत्नागिरीला जेव्हा मला पहिल्यांदा विनायकराव भेटले, त्यावेळी मला ते विवाहित आहेत आणि त्यांना चांगली मोठी मुले आहेत हे काहीच माहित नव्हतं. त्यांची माझी जवळीक वाढू लागली आणि त्यातच मला दिवस गेले, तेव्हा मी त्यांच्याजवळ लग्नाचा हट्ट धरला, त्यांनी तो मान्य ही केला.
लग्नानंतर त्यांनी मला त्यांचं गाव छोटं आहे,त्यांच्या आईला सगळं सांगतो असं म्हणत रत्नागिरी लाच ठेवलं. तुझा जन्म झाला. तू शाळेत जायला लागली तेव्हा मला विनायकरावांचं सत्य त्यांच्या एका स्नेहिकडून समजलं. मी तुटली, स्वतःवर चिडली, स्वतःचीच मला लाज वाटली पण त्यांनी मला समजावलं. त्यांचं प्रेम होतं माझ्यावर आणि माझही म्हणून ते आपल्याला इथे घेऊन आले. पण आमचं नातं हे आम्ही आजपर्यंत कोणालाही कळू दिलं नाही. मला नोकरीं करू दिली नाही.. मालती ताईंना आपली अडचण आहे म्हणून इथे ठेवलं असं सांगून त्यांनी मला वाड्यात प्रवेश दिला जेणेकरून मला त्यांना भेटता येईल. त्यांनी काही कमी पडू दिलं नाही आपल्याला, तू ही कुठे काही बोलू नकोस बाळा ”, असं म्हणून यशोदा ताई मागे वळल्या तर तिथे मालती ताई दारात उभं राहून सर्व ऐकत होत्या. मायलेकीचं बोलणं ऐकून त्यांचा राग अनावर झाला. ज्या पतीला त्या देव मानायच्या त्यांनी विश्वासघात केला होता त्यांचा. त्या तरतर घराकडे जायला निघाल्या तश्या यशोदाताई त्याच्या मागे निघाल्या.
सारा सुद्धा त्यांच्यामागे निघायला वळली,तर ती थेट वाड्यात होती. तिच्यासमोर विनायक राव आणि मालती ताई मध्ये वाद सुरु झाला. नवरा बायकोत खूप मोठं भांडण झालं,ज्याचा परिणाम विनायकराव कोसळले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. विनायकरावांना मृत पाहून यशोदा ताई पण त्या धक्क्याने गेल्या. मरताना मालती ताईंची त्यांनी हात जोडून माफी मागितली आणि मौवा ला सांभाळा असं सांगितलं. पण रागाचा, विश्वासघाताचा अग्नी मालती ताईंमध्ये एवढा भडकला होता की, त्यांच्या लोण्यासारख्या मनात सूडाचे निखारे ज्वाला बनून ढगधगत होते. त्यांनी मौवा ला कधीच घरात येऊ दिलं नाही आणि स्विकारलं तर नाहीच नाही.
त्यांनी हरीला हाताशी धरून काहीतरी भयानक ठरवलं. सारा आजीला अडवणार तेवढ्यात मौवाने पळत येऊन तिचा हात घट्ट धरून विहिरीत उडी मारली. सारा खोल खोल पाण्यात जात होती पण ती बुडत नव्हती तर भूतकाळाच्या डोही वर्तमानाचे उत्तर तिला मिळणार होते. खाली विहिरीत तिला जे दृश्य दिसलं त्यांने ती पूरती हादरून गेली.
विनायकरावांच्या तेरव्याला घरात कोणी नसताना मालती ताईने मौवाला अंगणातल्या खोलविहिरीत ढकलून देऊन बुडवून मारून टाकलं आणि नंतर तिचं प्रे*त हरीला त्या झोपडीतच पुरायला लावलं आणि ती विहिरीत पडून मेली म्हणून तिचं भूत फिरतं असं सांगून त्या भक्तीणीला तिचा बंदोबस्त करायला सांगितले. भक्तीणीला जरा संशय आला होता, पण मालती ताईंनी तिला काही बाही सांगून गप्प केलं .
सारा हे बघून ढसाढसा रडू लागली, तिला विश्वास बसेना तरी हेच सत्य होतं. मौवा च्या मृत्युंच कोडं सुटलं होतं, तिच्या अस्तित्वाच्या प्रश्न चिन्हाला आता पूर्णविराम मिळाला होता. वाड्यात इतकं भयाण घडून गेलं होतं तरी कोणाला याची कल्पना सुद्धा नव्हती. सारा खूप रडत होती, मौवाची तिच्या आईची माफी मागत होती , तेवढ्यात तिच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवल्याचं तिला जाणवलं. तिने मागे वळून पाहिलं तर मालती ताई तिथे उभ्या होत्या आणि ती तिच्या खोलीत होती. एक क्षणात झोपडीत, मग विहीरीत आणि आता वाड्यात असा भूतकाळाचा प्रवास करत सारा वर्तमानात आली होती. एक एक दार उघडत गेलं, तसं एक एक कोडं सुटत गेलं होतं.. मौवा समाधानाने सारा कडे बघत वाड्यातून बाहेर गेली.
“ काय झाल, कश्याक एवढा रडता?”, असं मालती ताईंनी साराला विचारताच, ती हातातला तो भूगोलाच्या पुस्तकाच्या कव्हर मधला फोटो आजीला दाखवत म्हणाली, “कुठलाही गन्हा नं केलेल्या मौवाला तू एवढी कठोर शिक्षा दिलीस! त्या एवढ्याश्या जीवाला पाण्यात बुडवून मार*लं . तिला मुक्ती मिळालीय पण आता तुला मुक्ती नाही, तू केलेल्या गु*न्ह्या*ची शिक्षा आता तुला कायदा देईल मालती ताई उर्फ आजी ”.
( हि कथा संपूर्ण काल्पनिक आहे. अश्याच नवनवीन कथा वाचण्यासाठी आमच्या लेखक मित्र वेबसाईटला भेट द्या )
लेखिका – रश्मी कोळगे,पुणे
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
खुप सुंदर
खुप छान आहे.👌
खूप छान रहस्यमय कथा… 👌
खूप छान👌👌
खूप खूप धन्यवाद सगळ्यांना 🙏
खूप छान रश्मी ताई!
खूप छान रश्मी ताई!