लखपती दीदी योजना संपूर्ण माहिती l Lakhpati Didi Yojana in Marathi

WhatsApp Group Join Now

Lakhpati Didi Yojana:फेब्रुवारी महिना सुरू झाला की सर्वांनाच नवीन अर्थसंकल्पाचे वेध लागायला सुरू होतात. १ फेब्रुवारी २०२४ ला आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी त्यांनी फार कमी वेळात म्हणजे केवळ ५६ मिनिटांत अत्यंत प्रभावी असे भाषण केले. 

यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये सरकारने महिला, तरुण, गरीब आणि शेतकरी या चार घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी बऱ्याच नवनवीन योजनांची तरतूद केली आहे. विशेषतः महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सरकारने लखपती दीदी या योजनेची घोषणा केली आहे. योजनेच्या शीर्षकाप्रमाणे महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने ही योजना जाहीर केली आहे.  

Lakhpati Didi Yojana in Marathi
Lakhpati Didi Yojana in Marathi

महिलांच्या विकासासाठी आजपर्यंत सरकारने अनेक योजना राबवल्या त्यातील ही लखपती दीदी योजना म्हणजे नेमकं काय? या योजनेअंतर्गत महिलांना कोणकोणत्या सुविधा मिळणार आहेत? या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो? त्यासाठीची पात्रता काय आहे? त्यासाठी कोणती कागदपत्र द्यायची आहेत? या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

लखपती दीदी योजना नक्की काय आहे ?

महिलांचा आणि मुलींचा एकंदर विकास व्हावा याकरिता सरकारने आजपर्यंत ‘शक्ती अभियान’ ‘नारीशक्ती अभिवंदन कायदा’ तसेच महिला समृद्धी कर्ज योजना, विधवा पेन्शन योजना, जननी सुरक्षा, बेटी बचाओ बेटी पढाओ, सुकन्या समृद्धी योजना, माझी कन्या भाग्यश्री, प्रधानमंत्री मातृ वंदन योजना, लेक लाडकी अशा अनेक योजना राबविल्या आहेत. 

१५ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर भाषण करताना लखपती दीदी या योजनेचा उल्लेख केला होता. महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारावी, त्यांच्या कला कौशल्यांना वाव मिळावा, त्यांना आर्थिक कमाईचा भक्कम स्त्रोत उपलब्ध व्हावा यासाठी या योजनेची तरतूद करण्यात आली आहे.  

गेल्या वर्षीच्या आर्थिक घडामोडींचा अहवाल सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आतापर्यंत नऊ करोड महिला लखपती दीदी या योजनेचा लाभ घेत आहेत, तर त्यातील एक कोटी महिला या योजनेअंतर्गत लखपती बनल्या आहेत अशी महिती दिली. येत्या नवीन आर्थिक वर्षात तीन कोटी महिलांना लखपती बनविण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. 

या योजनेअंतर्गत महिला बचत गटांना सरकारकडून विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. शिवाय सरकार अशा कौशल्यपूर्ण महिलांना आर्थिक मदत देखील करणार आहे त्यामुळे त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवून त्या लवकरात लवकर लखपती बनू शकतील. 

लखपती दीदी योजनेमार्फत महिलांना खालील सुविधा पुरवण्यात येणार आहेत…

१) आर्थिक साक्षरता कार्यशाळा : 

लखपती दीदी या योजनेचा मुख्य उद्देश्य महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी आणि सक्षम करणे हा आहे. बरेचदा महिलांना काम करून देखील आर्थिक व्यवहारांबाबत तितकी माहिती नसते.  म्हणुनच या योजनेत राबवल्या जाणाऱ्या कार्यशाळेमार्फत महिलांना अर्थसंकल्प, महिलांच्या कल्याणासाठी असणाऱ्या योजना, प्रादेशिक आर्थिक परिस्थिती, बाजारपेठ, देशातील इतर घडामोडींचा उद्योगधंद्यांवर होणार परिणाम इत्यादी बाबत माहिती पुरवली जाणार आहे.    

२) बचत प्रोत्साहन : 

आजची बचत ही उद्याची गुंतवणूक असते.

आर्थिक मिळकत वाढली; परंतु जर तिची बचत न करता ती सर्व खर्च केली तर पुढे उद्योगासाठी लागणारे भांडवल कमी पडू शकते. 

म्हणुन या योजनेअंतर्गत महिलांना  बचतीचे महत्त्व पटवून देण्यासोबतच त्यांना महिला सन्मान योजना, नॅशनल सेविंग सर्टिफिकेट, टर्म डिपॉझिट अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या पर्यायांची माहिती देखील दिली जाणार आहे. तसेच त्यांना विविध कार्यक्रमांतून अधिकाधिक बचत करण्यासाठी प्रोत्साहित करणार आहेत. 

३) कौशल्य विकास आणि व्यवसायिक प्रशिक्षण :

विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात सतत नवनवीन बदल होत असतात. या बदलांचा आपल्या उद्योगांमध्ये कसा वापर करायचा, उत्पादन प्रक्रिया अधिकाधिक सोपी कशी बनवायची, वेळेची आणि श्रमाची बचत कशी करायची, तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या उत्पादन व सेवा यांची गुणवत्ता कशी वाढवायची याबद्दलचे संपूर्ण प्रशिक्षण महिलांना या योजने अंतर्गत मिळणार आहे.

तसेच महिला बचत गटांना एलईडी बल्प बनवण, प्लंबिंग, ड्रोन रिपेरिंग तसेच शेतामध्ये कीटकनाशक्यांच्या फवारणीसाठी ड्रोनचा वापर कसा करणे इत्यादी तांत्रिक कौशल्य देखील शिकवली जाणार आहेत.

४) उद्योगाचा प्रचार आणि प्रसार :

जोपर्यंत उत्पादित केलेल्या वस्तू अथवा सेवा यांना बाजारात योग्य ती मागणी मिळत नाही तोपर्यंत त्यातुन नफा कमवता येत नाही. बाजारातील मागणी आणि पुरवठा याचा योग्य तो समन्वय साधला तर नुकसान होत नाही. 

या योजनेअंतर्गत बाजारात नक्की कोणत्या गोष्टींना मागणी आहे, आपल्या उत्पादनाची गुणवत्ता कशी वाढवायची, बिझनेस प्लॅन्स कसे आखायचे, आपल्या उद्योगातून तयार होणाऱ्या वस्तू व सेवा या लोकांपर्यंत कशा पोहोचवायच्या याबद्दलचे मार्केटिंग विषयक प्रशिक्षण महिलांना दिले जाणार आहे. तसेच मार्केटिंग साठी विविध डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर कसा करायचा हेही शिकवले जाणार आहे.

५) मायक्रो क्रेडिट सुविधा : 

एखादा उद्योग सुरू करणे ते त्याचा प्रसार वाढवणे या प्रक्रियेत वेगवेगळ्या टप्प्यांवर आर्थिक मदतीची गरज असते. 

या योजनेअंतर्गत बचत गटांना त्यांचा व्यवसाय सुरळीत चालवा म्हणुन वेळोवेळी लागणारी अल्प मुदतीची लघु कर्जे ही सवलतीच्या दरात दिली जातील.  

६) डिजिटल आर्थिक साक्षरता : 

सध्याच्या काळात इतर क्षेत्रांप्रमाणे बँकिंग क्षेत्रातही सर्व व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच डिजिटली केले जातात.

या योजनेअंतर्गत ऑनलाइन बँक ट्रान्सफर, मोबाईल वॉलेट, यूपीआय पेमेंट आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्म हे आर्थिक व्यवहारांसाठी कसे वापरायचे हे देखील शिकवले जातील. तसेच डिजिटल व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी, नुकसान होऊ नये याकरता कायकरता काय करावे याबद्दलही त्यांना सतर्क केले जाते.  

अश्या प्रकारे ऑनलाइन पद्धतीने व्यवहार करून आपला वेळ वाचवून तो वेळ उद्योगाच्या वाढीसाठी सत्कारणी लावण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले जाईल.

६) आर्थिक सक्षमीकरणासोबत आत्मविश्वास निर्माण करणे : 

केवळ आर्थिक साक्षरता आणि सक्षमता या व्यतिरिक्त या योजनेअंतर्गत महिलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी अत्यावश्यक असणारा आत्मविश्वास वाढवण्यासाठी देखील वेगवेगळे उपक्रम राबविले जाणार आहेत. 

एकंदरीतच महिलांचे वैयक्तिक आणि व्यवसायिक जीवनमान उंचावून त्यांच्या जीवनात अनेक चांगले सकारात्मक बदल घडवून आणणे हा या योजनेमागचा मूळ हेतू आहे

लखपती दीदी योजनेचा लाभ घेण्यासाठीची पात्रता : 

१) नावाप्रमाणेच या योजनेचा लाभ केवळ महिलांनाच मिळू शकतो. केवळ महिलाच या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

२) अर्जदार महिला बचत गटाची सदस्या असली पाहिजे.

३) अर्जदार महिलेचे वार्षिक उत्पन्न हे एक लाखापेक्षा कमी असले पाहिजे.

४) ज्या महिलांचे या योजनेत नाव रजिस्टर केले जाईल. त्यांची या योजनेदरम्यान दिले जाणारे प्रशिक्षण घेण्याची तयारी असायला हवी. 

५) रजिस्टर झालेल्या महिलांनी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणासाठी पुरेसा वेळ द्यायला हवा.

लखपती दीदी योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे सादर करावीत ? 

१) आधार कार्ड

२) पत्त्याचा पुरावा 

३) पॅन कार्ड 

४) बचत खात्याचा तपशील

५) उत्पन्नाचे प्रमाणपत्र 

६) मोबाईल क्रमांक 

७) ई-मेल आयडी

वर नमूद केल्याप्रमाणे ज्या महिलांना आपले उत्पन्न वाढवून लखपती बनायचे आहे; त्या महिलांनी त्वरितच तुमच्या जवळच्या बचत गटामध्ये सामील होऊन आपले नाव लवकरात लवकर लखपती योजनेअंतर्गत नोंदवावे. 

लखपती दीदी योजनेअंतर्गत प्रत्येक राज्यातील किती महिलांना याचा लाभ मिळाला आहे याचा अहवाल पाहण्यासाठी तुम्ही इथे क्लीक करा   या संकेत स्थळाला भेट देऊ शकता.

तुम्हाला ही माहिती कशी वाटली? यंदाच्या अर्थसंकल्पातील सरकारच्या कोणत्या नवीन योजनांबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल? यासंदर्भात तुम्ही खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मधून नक्की कळवा. तसेच अशा नव नवीन माहितीसाठी आमच्या लेखकमित्र (https://lekhakmitra.com/ ) या वेबसाईटला भेट देत रहा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top