उर्मिला मातोंडकर : बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आज आपला ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. उर्मिलाचे नाव ९० च्या दशकातील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. जुदाई, रंगीला, सत्या, भूत, कौन अशा अनेक उत्तम चित्रपटांमध्ये तिने काम केले. त्या काळातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये तिचे नाव घेतले जात होते. अनेकदा तिला चित्रपटातील नायकांपेक्षा जास्त फीस मिळत असे.
उर्मिला मातोंडकर यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९७४ रोजी मुंबईत झाला. उर्मिला मध्यमवर्गीय कुटुंबामधून आहे. जेव्हा ती लहान होती, तेव्हा तिने तिचा वाढदिवस कधीच साजरा केला नाही कारण आई-वडिलांकडे मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पुरेसे पैसे नसायचे.
उर्मिलाने स्वत: एका मुलाखतीत याचा उल्लेख केला होता, ‘लहानपणी कमी पैसे असूनही आई-वडिलांनी मला सर्व सुखसोयी देण्याचा नेहमीच प्रयत्न केला, पण आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने मी आणि माझ्या भावाने लहानपणी कधीच वाढदिवस साजरा केला नाही. वाढदिवस साजरा करण्याऐवजी माझ्या आई-वडिलांनी मला या दिवशी गरजूंना काहीतरी दान करायला शिकवले. एवढ्या चांगल्या कुटुंबात जन्माला आल्याचा मला नेहमीच अभिमान वाटतो.’
उर्मिलाचे शालेय शिक्षण मुंबईत झाले. त्यानंतर तिने मुंबईच्या डीजी रुपारेल कॉलेजमधून पुढील शिक्षण घेतले. उर्मिला लहान असताना ती आपल्या बाबांसोबत नाटक पाहायला जायची. इथूनच तिला अभिनयाची आवड निर्माण झाली.
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने कलयुग (१९८०) या चित्रपटातून बालकलाकार म्हणून रुपेरी पडद्यावर कारकिर्दीला सुरुवात केली. बॉक्स ऑफिसवर हा एक अॅवरेज चित्रपट असला तरी तिचा पुढचा चित्रपट मासूम (१९८३) प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. ज्यात तिच्या अभिनयाची चुणूक दिसून आली आणि लहान वयातच तिला समीक्षकांची प्रशंसा मिळाली. त्यानंतर ती डकैत (१९८७) सह अनेक चित्रपटांमध्ये दिसली, जिथे तिने सनी देओलच्या अल्पवयीन बहिणीची भूमिका साकारली होती. मल्याळम चित्रपट चाणक्यान (१९८९) आणि एन. चंद्रा यांच्या नरसिम्हा (१९९१) या चित्रपटातून नायिका म्हणून पदार्पण केले. हे दोन्ही चित्रपट व्यावसायिकरित्या यशस्वी ठरले. त्यानंतर आलेले काही चित्रपट फारसे चालले नाहीत. तिने शाहरुख खानसोबत चमत्कार (१९९२), अनुपम खेर आणि ऋषी कपूर यांच्यासोबत श्रीमान आशिक (१९९३) यासारख्या काही विनोदी आणि द्रोही (१९९२) या क्राइम चित्रपटात काम केले. अंथम (१९९२), गायम (१९९३), इंडियन (१९९६) आणि अननागा ओका रोजू (१९९७) यांसारख्या तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये प्रमुख अभिनेत्रीची भूमिका साकारली. पण यावेळेपर्यंत तिला म्हणावे तसे यश काही मिळत नव्हते. तिच्या सहकारी अभिनेत्री मनीषा कोईराला आणि रवीना टंडन यांनी लागोपाठ हिट चित्रपट देऊन लोकप्रियता मिळवली होती.
त्यानंतर तिने राम गोपाल वर्मा यांचा रंगीला (१९९५) हा चित्रपट केला, ज्यात एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीचा चित्रपटसृष्टीतील प्रवास दाखवला होता. अभिनेता आमिर खान आणि जॅकी श्रॉफ यांच्यासोबत उर्मिलाने उत्तम परफॉर्मन्स दिला, पण ए. आर. रेहमान यांचे संगीत, आशा भोसले यांच्या आवाजातील गाणी गाजली. डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी उर्मिलाला एका मध्यमवर्गीय मुलीला ग्लॅमरस अभिनेत्री बनवले. या चित्रपटाद्वारे उर्मिलाने भारतीय पडद्यावर कामुकता निर्माण केली. डझनभर हिट चित्रपटांनंतरही बहुतेक अभिनेत्रींना जे जमले नाही, ते उर्मिलाने केवळ या एका चित्रपटातून साध्य केले होते. आणि तेव्हापासून ती आशा भोसलेंच्या आवाजाशी आणि अर्थातच सिझलिंग प्रतिमेशी जोडली गेली आहे – खरं तर, ती आजही तिच्या सिझलिंग आणि मोहक लूकसाठी ओळखली जाते.
मात्र, उर्मिलाला फक्त तिच्या दिसण्यावरून कधीच जज केले गेले नाही. ती एक उत्तम अभिनेत्री म्हणूनच ओळखली जाते. कौटुंबिक ड्रामा जुदाई (१९९७), सत्या (१९९८) या चित्रपटात ती एका सामान्य मुलीच्या भूमिकेत होती जिचा प्रियकर, मुंबई अंडरवर्ल्डमध्ये अडकतो. रोमँटिक कॉमेडी खूबसूरत (१९९९) आणि थ्रिलर जंगल (२०००) या चित्रपटांमध्येदेखील तिला चांगले यश मिळाले.
जुदाई हा चित्रपट १ फेब्रुवारी १९९७ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात उर्मिला, श्रीदेवी आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट हिट झाला होता. पण या चित्रपटातील जान्हवी साहनीच्या भूमिकेसाठी उर्मिला पहिली पसंती नव्हती. यापूर्वी ही भूमिका जुही चावला आणि करिश्मा कपूरयांना ऑफर करण्यात आली होती, पण दोघीनींही ती भूमिका नाकारली होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन्ही अभिनेत्रींना श्रीदेवीसोबत या चित्रपटात सेकंड लीड व्हायचं नव्हतं, म्हणून त्यांनी ही भूमिका नाकारली. त्यांच्या नकारानंतर उर्मिलाला ही भूमिका मिळाली आणि या भूमिकेसाठी तिचं खूप कौतुकही झालं. फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या श्रेणीत नामांकनही मिळाले होते.
२००० सालापासून तिने वेगळ्या धाटणीच्या सिनेमात काम करायला सुरुवात केली, ज्यात विशेषतः प्यार तूने क्या किया… (२००१), ओम जय जगदीश (२००२), तहजीब (२००३), पिंजर (२००३), भारताच्या फाळणीवर आधारित पिंजर (२००३), मैंने गांधी को नहीं मारा (२००५), बस एक पल (२००६) आणि बनारस (२००६) या चित्रपटांचा समावेश आहे. त्यानंतर तिने अजोबा (२०१४) या मराठी चित्रपटात काम केले.
रंगीला (१९९५), जुदाई आणि सत्या (१९९८) या चित्रपटांमधील भूमिकांद्वारे तिने मुख्य प्रवाहातील हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून स्वतःला प्रस्थापित केले. तिच्या अनेक परफॉर्मन्ससाठी समीक्षकांनी नेहमीच कौतुक केले. तिने तीन वेगवेगळ्या नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत: ‘कौन’मध्ये ती एक सायकोपॅथ होती, ‘प्यार तुने क्या किया’मधल्या भूमिकेत ती तिला हवे ते मिळवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत हार मानत नाही आणि ‘ओम जय जगदीश’मध्ये ती अहंकारी आणि उद्धट पत्नी आणि सुनेच्या भूमिकेत आहे. ‘भूत’ या चित्रपटात तिने सेमी-निगेटिव्ह भूमिका साकारली आहे, ज्यात ती एका नवविवाहित गृहिणीच्या भूमिकेत असून तिला एका भूताने पछाडले आहे असे दर्शविले होते. याच चित्रपटासाठी तिला त्यावर्षी सर्वोत्कृष्ट नायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
इस प्यार से मेरी तरफ, रंगीला रे, छम्मा छम्मा, आईए आजाईये, कम्भख्त इश्क हि तिची काही गाजलेली गाणी आहेत. या गाण्यातून तिला चांगली प्रसिद्धी मिळाली.
चित्रपटांमध्ये काम करण्याबरोबरच उर्मिलाने अनेक सामाजिक कार्यात सहभाग घेतला आहे. तसेच महिला आणि मुलांच्या समस्यांवरदेखील अनेकदा आवाज उठवला आहे. अनेक कॉन्सर्ट टूर्स आणि स्टेज शोमध्ये भाग घेतला आहे. झलक दिखला जा (२००७) आणि डीआयडी सुपर मॉम्स (२०२२) यासह विविध डान्स रिअॅलिटी शोसाठी परीक्षक म्हणून तिने काम केले आहे.
उर्मिलाने ३ मार्च २०१६ रोजी काश्मीरमधील अभिनेता-मॉडेल-बिझनेसमन मोहसिन अख्तरसोबत एका छोट्याशा खाजगी समारंभात लग्न केले.
उर्मिला मातोंडकर आपल्या अभिनय कौशल्य, स्टाईल स्टेटमेंट आणि नृत्य कौशल्यासाठी ओळखली जाते.
उर्मिला मातोंडकर हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तसेच अलीकडे राजकारणात देखील ती सक्रिय आहे. २७ मार्च २०१९ रोजी उर्मिलाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तिने उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवली, पण तिथे तिचा पराभव झाला. १० सप्टेंबर २०१९ रोजी, अंतर्गत राजकारणाचे कारण देत तिने पक्षाचा राजीनामा दिला. १ डिसेंबर २०२० रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत तिने शिवसेनेत प्रवेश केला.
हिंदी, तेलुगू, मल्याळम, मराठी, तमिळ चित्रपटांमध्ये तिने अभिनय केला आहे. परंतु हिंदी चित्रपटांसाठी प्रामुख्याने तिला ओळखले जाते. तिला फिल्मफेअर पुरस्कार, नंदी पुरस्कारांसह असंख्य पुरस्कार मिळाले आहेत. आज उर्मिला बॉलिवूडच्या अष्टपैलू अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. श्रीदेवी, तब्बू या अभिनेत्रींनंतर सर्वात वैविध्यपूर्ण व्यक्तिरेखा साकारण्याचा मान तिच्याकडे जातो.
नायिका म्हणून उर्मिलाचा शेवटचा चित्रपट २००८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘ईएमआय’ हा होता. या चित्रपटानंतर तिने चित्रपटांमध्ये अनेक लहानसहान भूमिका केल्या, पण नायिका म्हणून तिला एकही चित्रपट मिळाला नाही. आता १६ वर्षांनंतर उर्मिलाला ओटीटीच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात पुनरागमन करण्याची संधी मिळाली आहे. २०२४ मध्ये ती तिवारी या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, उर्मिलाची ही सिरीज आई-मुलीच्या भावनिक नात्यावर बेतलेली आहे. चित्रपटाची कथा एका छोट्या शहराची आहे, ज्यात उर्मिलाचा अॅक्शन अवतारही पाहायला मिळणार आहे.
तर आज या सुंदर आणि गुणी अभिनेत्रीला तिच्या वाढदिवसानिमित्त आणि तसेच तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया.
तुम्हाला उर्मिला मातोंडकर ही माहिती कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.
धन्यवाद !
लेखिकाः श्रुती गपाटे, पुणे