“विद्या… तू अजून तयार झाली नाहीस?” मीनाक्षी वहिनी
“का? आज काय खास आहे?”
“अगं तुला माहीत नाही? अर्चनाच्या पार्लरचे ओपनिंग आहे. तिने घेतलेल्या नवीन जागेत.” मीनाक्षी वहिनी बोलून निघाल्या आणि विद्या भूतकाळात हरवली.
“आई….” अर्चना आपल्या आईला हाका मारत घरात येते. पण आईचा काहीच आवाज येत नाही. आई समोर असून ही तिच्या हाकेला प्रतिसाद देत नाही.
“आई…” ती परत हाक मारते. आई तिच्यावर एक रागीट कटाक्ष टाकून आत जाते. समोर असणारी आजी हताश होवून आपल्या नातीला बघू लागते.
“हातपाय धुवून ये. आताच आलेस शाळेतून. मी तुला दूध गरम करून देते.” अर्चना तोंड पाडूनच आवरायला जाते.
“विद्या….” आजी हाक मारते.
“आई हाक मारलीत तुम्ही?” विद्या म्हणजे अर्चना ची आई.
“हो. मला थोडे बोलायचे आहे तुझ्यासोबत.” आजी काहीशा जरबेने बोलते.
“बोला ना…”
“अजून किती दिवस तुझी ही नाटकं सुरू राहणार आहेत. अजून किती दिवस तिला शिक्षा देणार आहेस तू?”
“ती जे वागली आहे ते तुम्ही विसरला असाल आई, मी विसरले नाही.”
“मान्य आहे ती फक्त दहावीला आहे. प्रेम म्हणजे काय हे समजण्याचे तिचे वय नाही. म्हणून तू तिला मारणार? आज तिच्याबद्दल कळून जवळजवळ महिना होत आला. तू साधी तिच्यासोबत एक शब्द नीट बोलत नाहीस. तिला यातून बाहेर काढायचे, प्रेम- आकर्षण यातील फरक समजावून सांगायचा सोडून तिच्यावर हात उचलला? ती मुलगी तुझ्या एका शब्दासाठी रोज झुरत आहे. तुला काहीच वाटत नाही?” आजी आवाज वाढवून बोलते.
“ह्या सगळ्याचा विचार तिने करायला नको? आपली दहावी आहे, अभ्यास करून पुढे जावे हे तिला समजत नाही. प्रेमात पडण्याची अक्कल आहे तिला. मग प्रेम आणि आकर्षण समजत नाही. आईबाबांना फसवून गप्पा मारायची, अभ्यासाच्या नावाखाली भेटण्याची अक्कल आहे तिला. त्या दिवशी तिला घरी यायला उशीर झाला म्हणून मी शाळेत गेले. म्हणून निदान तिचे काय सुरू आहे ते कळले तरी. ते चौघे निवांत गप्पा मारत होते. शाळेत हे करायला पाठवतो का आपण?”आई ही चिडली.
“हे वयच असं असतं. ह्या वयात पाय घसरतो विद्या. म्हणून आपण सावध राहून त्यांना योग्य मार्ग दाखवायचा असतो. मारून, शिक्षा करून मुले- मुली दूर जातात. आज ती आपली आई आपल्यासोबतबोलावी म्हणून आटापिटा करते. पण तू अशीच वागत राहिलीस ना ती हाक मारणं ही सोडून देईल. तुझ्यासोबत तिला जेव्हा काही बोलायचे असते त्यावेळी तू कामात तरी असते नाहीतर टी.व्ही. बघत असते.
कधी तिच्यासोबत बसून तिच्या मनात काय सुरू आहे, तिला काय वाटतं याबद्दल बोलली आहेस? तिने केलेली कविता, लिहिलेले लेख कधी वाचले आहेस? नाही! कारण तुला कंटाळा येतो. नाहीतर काम असते.
मी ही एक गृहिणीच होते पण कधीच ह्या दोघांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केलं नाही. कामातून वेळ काढून त्यांनी जे काही नवीन केले असेल ते बघितले आहे, कौतुकाची थाप दिली आहे आणि वेळ पडली तर समज ही दिली आहे.
तू नुसती चिडचिड करत असते त्या दोघींवर. कधी एक शब्द शांततेत बोलली आहेस? शाळेतून आल्यावर अर्चना तुला हाक तरी मारते. अरुणा ने तुला आल्या आल्या शेवटची हाक कधी मारली आहे आठवतं तुला? ‘कशाला दारातून ओरडत असते, आई घरातच असते, कुठे जात नाही. हे माहीत असलं तरी आपलं घरात पाऊल टाकलं की आई आई सुरू असते. ओ देई पर्यंत हाका सुरूच.’ असं तू तिला म्हणालीस त्या दिवसापासून तिने तुला आल्या आल्या हाक मारली नाही. पण त्याचा तुला फरक पडला नाहीच.
शाळेतल्या काही गोष्टी सांगायच्या असतात त्या दोघींना पण तू ऐकून कुठे घेतेस? ऐकले तरी त्यात लक्ष नसते तुझे. विद्या अजून ही वेळ गेलेली नाही. दोघी मुली दुरावायच्या आत सावध हो.” आजी बोलून बाहेर निघून जाते.
“विद्या…” अतुल म्हणजे अर्चना चे बाबा हाक मारतात.
“काही म्हणाला का?”
“कसला विचार करत आहेस तू?”
“काही नाही. आज जुने दिवस आठवले.”
“विद्या…”
“अर्चनाच्या नवीन पार्लरचे आज उद्घाटन आहे. इथेच असून ही मला बाहेरून समजले. अरुणा गेली चार वर्षे इकडे आलीच नाही. तुम्हाला फोन करते पण मला कधीच करत नाही. मी फोन केला तर चार शब्द बोलते आणि ठेवून देते. तुमच्यासोबत भरभरून बोलते. पण आईसोबत बोलण्यासाठी तिच्याकडे वेळ नसतो.”
“कारण ती कामात असते. ती एक प्रोफेसर आहे. तिचा संसार सुरू आहे. तू त्यावेळी जे काही वागलीस त्यामुळे ती अशी दूर आहे. अर्चना काय किंवा अरुणा काय दोघीही तुझ्या वागण्यामुळे दूर गेल्यात. तुला अर्चना भाषण करते, तिने आर्ट्स साईड घेतली, लिखाण करते हेच कधी मान्य नव्हते. अरुणाला तिच्या मनाविरुद्ध तू लॉ करायला लावले. तिची आवड नव्हती ती. फक्त तुझ्यासाठी तिने लॉ केले.”
“ती प्रॅक्टीस कुठे करते. कॉलेज मध्ये शिकवते.”
“हेच… तुझ्या अशा बोलण्यामुळेच तुझ्या दोन्ही मुली तुझ्यापसून दूर आहेत. त्यांना आईसोबत काय बोलावे हा प्रश्न पडतो. त्यांना डॉक्टर, इंजिनीअर व्हायचे नव्हते. अरुणाला स्पर्धा परीक्षा द्यायच्या होत्या. आय. पी. एस. हे तिचे ध्येय होते. पण तुझ्यासाठी तिने लॉ घेतले. नुसते घेतले नाही तर ती पहिली आली. तरी तू कौतुक कधीच केले नाहीस.”
“तुम्हाला माझीच चूक दिसणार. आईही हेच म्हणायच्या. तुझ्या वागण्यामुळे तुझ्यापासून मुली दूर जातील. आणि दोघीही माझ्यापासून दूर झाल्यात. दहावीत असताना अर्चनाने गुण उधळले म्हणून मी तिला बाहेर पाठवू दिले नाही. आपल्या नजरेसमोर ठेवले. तरी तिने सेकेंड इयरला जे करायचे तेच केले. शिक्षण सोडून तिने काय केले. आता न सांगता लग्न करून तिने स्वत:चे पार्लर सुरू केले. जर त्यावेळी नीट शिकली असती तर…. पण नाही. पार्लर, मेहेंदीमुळे किती मिळवणार आहे ती?”
“तू तिला एक संधी ही दिली नाहीस. सेकेंड इयरला असताना तिला बँकेत नोकरी मिळत होती. ती ही तिला करू दिली नाहीस. आणि आज त्याच जागेसाठी पाच लाख रुपये मागत आहेत. तू तिच्यावर परत कधीच विश्वास ठेवला नाहीस. तू घेतलेला निर्णय हाच अंतिम निर्णय. तू तुझेच खरे म्हणून त्या दोघींनी चांगल्या संधी गमावल्या.”
“तुम्हाला ही त्यावेळी मी सांगितलेलं पटलेलं होतं म्हणूनच तुम्ही मला साथ दिलीत.”
“तू तुझे म्हणणे खरे करत आली. वाद घातलेस, माहेरी जायची धमकी देऊन तुझे ऐकायला लावले. हे विसरू नकोस.” अतुल चिडून म्हणाले.
“मी त्या दोघींच्या भल्यासाठीच….”
“काय भले झाले ह्यात? आज अर्चना ने स्वत:ची ओळख निर्माण केली. छोट्या जागेत तिने तिचे पार्लर सुरू केले होते. तिने आता तिच्या कमाईतून गाळा घेतला. स्वत:ची जागा घेतली. बाहेरून तिला मेकअप करायला, सेमिनार घ्यायला बोलावतात. ते का उगीच? त्याबरोबर तिचे लेखनही सुरूच आहे. ऑनलाइन लिहिते ती. तिचा वाचक वर्ग खूप आहे. तिने दोन्ही आवडी जपल्या. पण तुला कौतुक नाही. मग तिने कशाला तुला उद्घाटन करायला बोलवायला पाहिजे? फक्त आई आहे म्हणून? ज्या वयात दोन्ही मुलींना तू जवळ असावीस असं वाटत होतं त्या वयात तू घरात असून ही त्यांच्या जवळ नव्हती. समोर असून त्या दोघी कधीच तुझ्यासोबत मन मोकळं बोलल्या नाहीत. आई होती तेव्हा तिच्यासोबत नंतर माझ्यासोबत. अगदी त्यांना मासिक पाळीच्या वेळी जास्त त्रास झाला तरी तो मला सांगत होत्या. ‘हे नेहमी दुखते. त्यात काय सांगायचे? त्याच्यावर कशाला बोलायचे?’ ही तुझी वाक्यं!
आता तुला अरुणा फोनवर बोलत नाही म्हणून त्रास होतो. पण त्यावेळी तिची बडबड ऐकून वैतागून जात होतीस. शाळेत काय केलं, कॉलेजमध्ये काय केले हे तिला बोलायचे असायचे पण तू…. कधी ऐकून घेतले नाही. कोणी कौतुक केले तरी तू कौतुक करत नव्हती. आता चूक कळली आहे पण ती कबूल करत नाहीस.
मुलींना आईसोबत बोलायचे असते. अर्चनाने लव्ह मॅरेज केले. तू तिच्या लग्नाला खूप विरोध केलास. त्यावरून तू अजूनही तिला टोमणे मारतेस. ज्यावेळी तिने पहिल्यांदा तिचे छोटेसे पार्लर सुरू केले त्यावेळी तू तिला काय म्हणाली होतीस? ‘चांगली शिकली असती तर हे पार्लर सुरू करायची वेळ आली नसती.’ पण तूच तिला कॉलेजला बाहेर पाठवायला तयार नव्हतीस. अर्चनाला मेहेंदी, मेकअप, रांगोळी याची आवड खूप आधी पासून होती. तिला त्यात शिकायचे होते. पण त्याचा कोर्स इथे नव्हता. म्हणून तिला ते शिकू दिले नाहीस. आज काय झालं? तिने लग्नानंतर ते शिकून घेतले. अपडाउन करून, लहान मुलाला सांभाळून ती शिकली. तरी कौतुक नाहीच….” अतुल उठून आत गेले.
“मी काय चुकीचे वागले?” विद्याच्या डोक्यात अजून प्रकाश पडलाच नाही.
आपल्यामध्ये ही अशी विद्या, अर्चना, अरुणा आहेत. नात्यात संवाद हा पाहिजेच. गेलेली वेळ परत येत नाही. शिकण्याच्या वयात प्रेमात पडणे हे चूक आहे किंवा बरोबर हा मुद्दा इथे नाही. ज्यावेळी आईवडिलांना ह्या बद्दल समजते त्यावेळी ते कोणती भूमिका घेतात ह्यावर सगळं अवलंबून असतं. विद्याने योग्य संवाद साधला असता, अर्चनावर विश्वास ठेवून तिला संधी दिली असती तर कदाचित तिचा मार्ग पुन्हा चुकला नसता. अर्चनाबद्दल समजल्यावर विद्याने धरलेला अबोला त्या दोघींच्या नात्यात तेढ निर्माण करून गेला. अरुणाला आईसोबत बोलायचे असताना, आईच्या चिडचिड करण्यामुळे, आईने प्रेमाने संवाद न साधल्यामुळे अरुणा दुरावली. आईच्या आनंदासाठी तिने तिची आवड बाजूला ठेवली. पण आईकडून कौतुकाचे शब्द तिला कधी ऐकायला मिळालेच नाहीत.
विद्यासारखं वागून आपल्या मुलींपासून दूर होऊ नका.कारण कटुता वाढत गेली की सख्खी नाती ही दुरावतात! आणि निघून गेलेली वेळ कधीच परत येत नाही. जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत संवाद साधा, आठवणी निर्माण करा. एकदा व्यक्ती दूर गेली की ना संवाद होतो ना भेट होते. होतो तो फक्त त्रास. त्यावेळी कितीही वाटले तरी आपण जुने दिवस परत आणू शकत नाही ना भूतकाळ बदलू शकत! गेलेली वेळ परत येत नसते म्हणून आनंदाने जगा, हेवेदावे विसरून पुढे जात रहा.
लेखिका -सौ. वेदिका केळकर वाटवे.
तुम्हाला ही कथा कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्य मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप ही जॉईन करा.
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
खूपच सुंदर
खरच खूप छान आहे कथा.