आजी आणि नात यांच्या नात्याला उजाळा देणारी मनोरंजक कथा.
भर दुपारी जेवणाची सुट्टी संपून गणिताचा तास चालू झाला. जेवून सुस्तावलेल्या मंजुळाला गणिताचा तास नको नकोसा वाटत होता. तसाही गणित हा विषय तिला कधीच आवडत नसे . कधी एकदा पाच वाजतात आणि घरी जाते असं तिला वाटतं होतं. तेवढ्यात शाळेचा एक कर्मचारी हातात कसलीतरी जाहिरात घेऊन आला. गुरुजींचं आणि त्यांचं काहीतरी दरवाजा मध्येच बोलणं झालं . गुरुजींनी गणितं सोडून जहिरात वाचायला सुरुवात केली. नेमकं काय सांगणार आहे गुरुजी याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं .
“जाधववाडी गावात सर्कस आली आहे.आपल्या शाळेला आमंत्रण दिले आहे.सर्वांनी दहा रु. भरायचे.” जहिरात वाचत ते बोलले. त्यानंतर पुन्हा तोच कर्मचारी येऊन काहीतरी सांगुन गेला. पुन्हा गुरुजींनी मोठ्या मुलांना आणि मुलींना उभे केले. “तुम्ही उद्या ८ वाजता आवरून शाळेच्या पटांगणात येऊन थांबायचं.आपल्याला सर्कस पहायला जायचं आहे.”
मंजुळाला आता काही कळेना. गुरुजींनी सगळ्यांना यायला सांगितले .आणि फक्त आम्ही दोघे, तिघेजणच का नाही. चर्चेसाठी गुरुजी निघून गेले. आणि शाळेत एकच गोंधळ उडाला. मंजुळाच्या मैत्रिणींनी एकमेकांसोबत बोलायला सुरुवात केली.
एक म्हणाली “अगं ! तुला माहिती आहे का ? तिथं लई बघायासारखं असतय. वाघ , सिंह, हत्ती अस्वल…लई मज्जा येईल बघ .”
दुसरी म्हणाली , “अगं !लई मोठं तंबू असतय.लाईटची रोषणाई बी असती. ” त्यांचं ऐकून मंजुळा आता त्यांना विचारु लागली. “मी बी येऊ का?काय नगं ”
“गुरुजींनी सांगितलय ना यायचं नाय म्हणून.” आघाऊ सुप्री म्हणाली.
सुप्री ही वर्गातली लई आघाऊ पोर . तीन वेळा नापास झालेली. पण शाळेत तिचा भलताच दरारा ! उंच ,रंगाने काळी,पायापर्यंत झगा आणि कायम डोळे वटारून बोलायची. त्यामुळे शाळेतल्या बऱ्यापैकी पोरी तिला घाबरून राहायच्या. मंजुळा त्यातलीच एक होती. त्यामुळे तिने गुरूजींना काहीही विचारले नाही. पण तिच्या जीवाची घालमेल चालू झाली.
सगळे जाणार,लई मज्जा येणार आणि मी नाय…असं का केलं गुरुजींन ? चौथीच्याच वर्गात शिकणारी मंजुळाची चुलत बहीण चिंगी पण जाणार होती.
घंटा वाजली ,शाळा सुटली. सगळे घरी निघाले. सगळ्या पोरांमध्ये सर्कसचाच विषय ! मंजुळाला ऐकायला खूप आवडायचं .पण सगळी जाणार आणि मी नाही जाणार.. ती उदास मनाने घरी गेली. दप्तर टाकून बसली अभ्यासाला ; पण मन काही लागेना. उद्या सर्कशीला लय मज्जा येणार.. आनं दाद्या,आक्की बी जाणार …
“मंजुळे… काय गं ? काय झालं ? तोंड का पडलय. मी साळतून आल्यापासनं पाहते. आ ? बोल की?” डोळ्यात पाणी आणून मंजुळा म्हणाली ; “आई,मला पण जायचंय सर्कशीला. मी सर्कस कशी आस्ती पाहिलं बी नाय. फक्त ऐकलंय.”
” आगं मग जा की.” हातातली भाकर तव्यावर टाकत मंजुळाची आई म्हणाली. ” आमचे गुरुजी म्हटलं की तू नको येऊ. पण मला जायचयं. मी जाणारं.”
मंजुळाची आज्जी वाती करत होती. तिने सर्व ऐकले. ती म्हणाली, “मंजुळे किती जीव खाती गं ! जायचं हाय ना तुला .म्या नेते चाल तुला” आज्जीचं बोलणे ऐकुन मंजुळा आज्जीकडे पाहू लागली. आज्जे ! तु बी येणार ? ये….. ये….. करत मंजुळा आनंदाने नाचू लागली. “पण आज्जे ,आमचं गुरुजी वरडत्याल.”
” काय नाय म्हणत तुव्ह गुरजी .काय म्हणलं त मला सांग मी येते तुज्या मास्तराकं नको काळजी करू .म्या सांगते तुह्या मास्तरांला .काय नाय करायचा त्यो. आता झोप आनंदाने यडी नको व्हऊ.” दिवा लावत आज्जी बोलली. अंधार झाला .सगळे झोपले. पण मंजुळा जागेपणीचं सर्कसच स्वप्न पाहू लागली. ती मनातच सर्कसच चित्र रेखाटू लागली.
दररोज एका हाकेत न उठणारी मंजुळा आज मात्र आईच्या आधीच अंथरुणावर उठून बसली. उठल्या बरोबरच सर्कसचा आनंद तिला आतून ढुसण्या देऊ लागला . आज्जी ये आज्जे ऊठ की….हळू आवाजात मंजुळा आज्जीला उठवू लागली. आज्जी पण एका आवाजात लगेच उठली.दोघींनी पण अंघोळ्या उरकवल्या. आता सगळेजण उठले होते. “मंजुळे काय गं ह्य.. दररोज मी तुझ्या अंगावरची गोधडी वढल्याशिवाय तू काय उठायचं नावं घेत नाय.आज सर्कस म्हणल्यावं तू पार आवरून तयार”… मगं त रोंच्यालाच सर्कस पाहिजे बघ ! आई गोधड्यांच्या घड्या घालत बोलली.
” आम्ही सांगणार हाय तुझं नाव गुरूजीला” दाद्या चिडवत म्हणाला.
“ये बाबा आधीच त्या सुप्रीनं लई घाबरवलयं तू डोक्याला ताण नको देऊ माझ्या .”मी आता आज्जी बरोबर चालले हाय . मी नाय घाबरत कोणाला.
आक्की आणि दाद्या शाळेत निघून गेले. मंजुळा तयार झाली.तिची आज्जी पण तयार झाली. आज्जीनी पिवळ्या रंगाची तांबूस काठाची साडी घातली होती . तिच्या त्या गोऱ्या रंगावर अगदी शोभून दिसत होती .सर्कस पाच ,सहा किलोमीटर अंतरावर.दोघीही पायी निघाल्या .जाताना मंजुळाच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या .
“आगं मंजुळे किती पटापटा चालली मला येऊ दे. ” त्या चालतानी त्यांच्या दोन्ही बाजूला अस्टरची शेती होती.जांभळ्या,पिवळ्या,सफेद, गुलाबी रंगाची फुले शिवारात मन मोहून टाकत होती. मंजुळाने तिच्या आवडत्या रंगाची फुले तोडून घेतली.आणि उड्या मारतच चालू लागली .तेवढ्यात तिला खालच्या बाजूला बऱ्याच लांब अंतरावर डांबरी रस्त्यावर चालणाऱ्या मुलांची ओळ दिसली. “आज्जे, ते बघं आमच्या शाळेतली मुलं.” मुलांकडे बोट दाखवत मंजुळा बोलली. “व्हय गं .. आपल्याबरोबरचं हाय की” आज्जी हातातली पिशवी सावरत बोलली.
“आज्जे ते बघ! आली सर्कस.”
पावसाळ्यात आळंबी उगवावी तसा तो बाजार तळावर सर्कसवाल्यांनी तंबू ठोकलेला दिसत होता . मंजुळा आणि आज्जी तंबुबाहेर उभ्या राहिल्या. एक माणूस जवळ आला. सर्कस पहायची आहे ना ? दोघींकडे पाहत तो माणूस बोलला .व्हय आज्जी म्हणाली. द्या की दहा, दहा रु.आणि जा आत. आज्जी ने तिच्या कंबरेला खोचलेल्या छोट्या कापडी पिशवीतून दोघींचे वीस रु.दिले .मंजुळा आणि आज्जी आत गेल्या. समोर भलंमोठं रिंगण होतं .बसण्यासाठी गोलाकार उतरत्या पायऱ्या केलेल्या.दोघीजणी सर्कसच्या समोरच बसल्या. त्यांच्या वरच्या बाजूला शाळेतली मुलं बसली होती .आणि बरोबर दोन पायऱ्या सोडून मंजुळाच्या मागच्या बाजूला सुप्री बसली होती . मंजुळाची आणि सुप्रीची नजरानजर झाली. तसा मंजुळाच्या अंगावर काटा आला.कारण ती मंजुळाकडे डोळे वटारून पाहत होती.आणि एक बोट करून तुझं गुरूजींनाच नाव सांगणार आहे असं खुणवत होती. मंजुळाने पुढे नजर केली. तिने आज्जीला सांगितले .तिच्याकडे पाहू नको असं आज्जीने सांगितले. मंजुळाने एक नजर रिंगगणावर फिरवली. काय बघू आणि काय नाही असं तिला झालं.
काळया कोटातला एक माणूस समोर आला. त्याने आपली टोपी काढून खाली मान करून सगळ्यांना नमस्कार केला . सर्वांनी टाळ्या वाजवल्या. सर्कसमधला तो भव्य देखावा मंजुळाला दुसऱ्या दुनियेत घेऊन गेला . तिला आता कसलेच भान राहिले नाही. सूर्यसारखा उजेड सगळ्या तंबुभर पसरला होता . वळीवाच्या पावसात ढग वाजावे तसे बँड वाल्यांचा बँड वाजत होता. मध्येच वीज कोसळल्यासारखी झांज वाजत होती.
आता काही माकडे तीन चाकाच्या सायकलवर बसलेली आणि पाठीमागून दोन अस्वले त्यांना धक्का मारत आले. तशी मंजुळाने टाळी वाजवली. त्यांचे सायकलचे दोन तीन गरके झाले. आता पुढे कोण येईल याची तिला उत्सुकता लागली. आज्जी सुद्धा खूप मजेने सर्कस पाहत होती . आता काही हत्तींचा कळप आला त्यांनी सोंडेने गणपतीला दुर्वा चढवल्या. नंतर एक घोडा आला त्यावर एक माणूस उलट्या पालट्या उड्या मारत होता . ‘आगं बया !’ आजीच्या तोंडून नकळत शब्द निघाले . मंजुळानेही तोंडाला हात लावला.
जरीना नावाची एक मुलगी रिंगणात उतरली .तिच्या मागोमाग एक वाघ चालू लागला. वाघ चांगला धष्टपुष्ट होता. तिने त्याला खुणावले.तसा तो खाली बसला नंतर जरीना त्याच्यापुढे बसली. ती त्याच्या जबड्यात डोकं घालायची आणि परत बाहेर काढायची. ‘बयोव ….खाईन ना तो ! ‘आज्जी परत बोलली. “बघं आज्जे म्हणलं होतं ना तुला लई भारी हाय सर्कस . खरंच की.”..” दोघी बोलत होत्या पण नजर मात्र सर्कशीवरून हटत नव्हती.
जोराचा झांज वाजला तशी मंजुळा भानावर आली. आणि न राहून तिने मागे पाहिले तर सुप्री तिच्याकडेच बघत होती. पुन्हा मंजुळा पुढे पाहू लागली. सुप्री मंजुळाच्या आनंदावर विरजण घालत होती. आता हत्ती ,घोड्यांचे खेळ चालू झाले . त्यांच्यपाठोपाठ विदुषकही आले.ते मुद्दाम खाली पडायचे की सगळेजण मोठ्याने हसायचे .सगळ्या तंबुतली लोकं मंत्रमुग्ध होऊन पाहत होते. आज्जी आणि मंजुळाही मनसोक्त हसल्या. आता एक मुलगी दोरीवर चालू लागली. ती नुसती चालत नव्हती तर खाली उभ्या असलेल्या माणसाकडून पायाने एक बशी घेऊन डोक्यावर ठेऊन त्यावर कप ठेवत होती. असे तिने चार थर लावले होते.तिचा हा अविष्कार पाहून सर्वांनी टाळ्या वाजवल्या . बघ आज्जे ! कशी भारी हाय ना सर्कस . मंजुळा डोळे मोठे करून आज्जीला सांगत होती.पण आज्जी सुद्धा एवढी भारावून गेली होती की तिने मंजुळाकडे लक्ष दिले नाही .
आता एक माणूस काही काचेच्या वस्तू घेऊन आला.याच काय करतोय याकडे सगळ्यांचं लक्ष ! तो एक एक वस्तू घेऊन त्या अंगावर फोडू लागला. सगळ्यांचं तोंड मात्र आ.. वासूनच राहिले.खाली काचेचा खच पडला होता.एवढ्या काचा त्याने अंगावर फोडल्या होत्या. मधूनच माकड,अस्वल,विदूषक आपल्या करामती करून दाखवत. की सगळेजण नव्या उमेदीने पाहत.दोन तासांची सर्कस पण ती जणू अर्ध्या तासाची वाटू लागली. सर्कशीचा शेवट तेवढा आता बाकी होता. एवढ्या वेळात पण कोणाला तहान लागली नाही की भूक .
सात – आठ बाया रिंगणात आल्या. सोडलेल्या झोपाळ्याच्या दांड्या हेलकावे घेत होत्या.त्या झोपाळ्यावरून सोडलेल्या चिंचोळ्या दोरी शिडीवरून त्या पटापट वर चढू लागल्या. वर जाताच शिड्या सोडण्यात आल्या. एकीने झोपाळ्याची दांडी धरली आणि ती हेलकावे घेऊ लागली. खाली जाळे धरण्यात आले. जाळ्याभोवती विदूषक माकड चेष्टा करत होते. बँड वर टिपरी पडताच झांजेचा मोठा आवाज झाला. आणि त्या बाईने स्वतःला झोकुन दिले. सगळ्यांनी श्वास रोखून धरले. दुसऱ्या एका झुल्यावरून एक माणूस आला. त्याने त्या बाईचे हात धरले. ते दोघेही हेलकावे घेऊ लागले. आता रिकाम्या झालेली दांडी दुसऱ्या एका इसमाने पायाच्या आधाराने पकडली. आणि तो झोके घेऊ लागला. आता दोन्हीही झोक्यांचा वेग वाढू लागला होता. दोन्हीही झोके जवळ जवळ येत होते. तेवढ्यात त्या बाईने पुन्हा हात सोडले आणि ती दुसऱ्या झोक्याला जाऊन लोंबकळू लागली. टाळ्यांचा मोठा आवाज झाला. रिंगमास्तरच्या इशारा वरून सर्व हत्तींनी सोंडेने प्रेक्षकांना सलामी ठोकली . रोखून धरलेला श्वास आता हळूहळू सर्वांनी मोकळा केला. आणि सर्कस कधी संपली ते कळाले देखील नाही. बघता बघता सर्व रिंगण मोकळे झाले. मंजुळाने मागे वळून पाहिले तर सर्व शाळेतील मुलं निघून गेले होते.
आता आज्जी आणि मंजुळा ही घरी जाण्यासाठी निघाले. सर्कशीतली सर्व दृश्य मंजुळाने मनात साठवून ती घरी निघाली. पुन्हा सर्कस आली की मी तुला घेऊन येईन असा आजीने शब्द दिला. मंजुळा खुश झाली. घरी आल्यावर मात्र तिला शाळेत जायची भीती वाटू लागली . तिने ती भीती आज्जीला बोलूनही दाखवली. आजीने तिला धीर दिला.
शाळेचा दिवस उजाडला. मंजुळा आवरून शाळेत निघाली. पण तिच्या मनातील भीती काही केल्या कमी होईना. गुरुजी काय म्हणतील ? सुप्री आपलं नाव सांगल का गुरुजींना ? मंजुळा वर्गात गेल्या गेल्या सुप्रीने तिला दम भरला . मंजुळा रडू लागली. गुरुजी आले. त्यांनी तिला विचारले काय झालं मंजुळा ?
“गुरुजी तुम्ही येऊ नको म्हटले होते तरी मंजुळा सर्कस पाहायला आली .” सुप्री रुबाबात बोलली.
हो का मंजुळा ? गुरुजी म्हणाले. मंजुळाने घाबरत मान हलवली.
“अगं बरं झालं की , तुझे पाय नाही दुखले ना ?” गुरुजींनी आपुलकीने विचारले. मंजुळाने चमकून वर पाहिले. आणि नाही म्हणून मान हलवली. “मगं रडत का होती ?” “गुरुजींनी विचारले. मंजुळाने सुप्रीकडे नजर फिरवली.आणि गुरुजींकडे पाहिले.अगं घाबरू नको काही करत नाही ती ! सांग मला.
‘गुरुजी सुप्री म्हणत व्हती का गुरुजींनी यायला नाय सांगितलं तरी तु आली. तुझं गुरुजींनाच नाव सांगणारे ” मंजुळा घाबरतच सांगत होती. “अगं मी का असं म्हणालो ; कारण तुम्ही दोघं , तिघं मुलं कुडीने लहान आहात. पाच – सहा किलोमीटरचा प्रवास करताना तुम्ही दमले असता म्हणून .” सुप्रिया, .उभी रहा गुरुजी म्हणाले. सगळी मुले तुझ्यापेक्षा लहान आहेत त्यांना त्रास देऊ नको. समजलं का ? आता सुप्रीने घाबरत नाही म्हणून मान हलवली.
आता खऱ्या अर्थाने मंजुळा मनातील भीती घालवून सर्कशीचा आनंद साजरा करत होती .पुन्हा पुन्हा बघितलेली सर्कस मनात साठवून ठेवत होती . आणि पुन्हा येणाऱ्या सर्कशीची डोळे भरून वाट पहात होती…..
तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की कळवा.आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका.अशाच नवनवीन कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू .याचा लाभ घेण्यासाठी आमच्या “लेखकमित्र” या वेबसाईटला नक्की भेट द्या.तसेच आमचा “WhatsApp”ग्रुपही जॉईन करा.
लेखिका – शितल औटी, जुन्नर
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
धन्यवाद !
मस्त कथा
Thank you
छान
Thank you
वा!! पूर्ण सर्कस डोळ्यांसमोर उभी राहिली.
लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या
Thank you
छान कथा.
Thank you