“या खेपेला जाऊ नकोस ग मला एकट्याला सोडून” बाबांच्या या वाक्याने मुक्तानी एकदम चमकून मागे वळून पाहिले.
जेजुरीच्या शरदचंद्रजी पवार कॉलेजमधून Msc Agriculture केलेली मुक्ता तिथेच लेक्चरर म्हणून काम करत होती.चाळीस वर्षाची ही तरुणी ज्येष्ठ कृष्ण आष्टमी ते आषाढ एकादशी तब्बल २१ दिवसांची वारी व ११ दिवसांची परतवारी करून तब्बल ३२ दिवसांची पायपीट करून परत घरी येत असे.
मुक्ता स्वभावाने खूपच बोलकी होती पण आजी गेल्यावर ती एकदमच शांत अबोल झाली.तिचा दिवस पहाटेच सुरू व्हायचा सर्व गोष्टी आवरून ती सकाळी कॉलेजला जायची.गणेशराव थोडी शेतीची कामे पाहून व हाताखालच्या मंडळींना सूचना देऊन साधारण अकरा सव्वाअकरा पर्यंत दुकान गाठायचे. दुपारी दोन सव्वादोनच्या सुमारास बाबांना जेवायला वाढवून मुक्ता थोडी विश्रांती घ्यायची.गणेशराव परत दुकानावर जायचे ते थेट दहा साडेदहाला परतायचे. पूर्वी आजी असल्यामुळे त्यांना एवढी चिंता नव्हती पण आताशा त्यांना मुक्ताची काळजी वाटायची.
मुक्ता दिसायला एकदम देखणी, उच्चशिक्षित, कमावती,एकुलती एक,दुमजली प्रशस्त घर, आठ दहा एकर शेत जमीन, पशुखाद्याचे मोठे दुकान एवढे बडे प्रस्त असून सुद्धा अजून तिचे लग्न का जमत नाही हे गावकऱ्यांना पडलेले मोठे कोडेच होते. गावात अनेक वावड्या उठायच्या कोणी म्हणायचे तिचे प्रेम संबंध होते पण लग्न होऊ शकले नाही, तर कोणी म्हणायचे पत्रिकेत कडक मंगळ असेल, तर काहींचे तर्क हुशार असल्यामुळे थोडी विक्षिप्त आहे आईसारखी.
तसे बघायला गेले तर जेजुरी जागृत देवस्थान.महाराष्ट्रातून नाही तर संपूर्ण देशातून लग्न जमावे म्हणून अनेक इच्छुक भाविक खंडेरायाला बाशिंग बांधून नवस करतात हे सर्व गणेशरावांना माहीत असूनही त्यांनी हा तोडगा कसा केला नाही असे अनेकांचे मत पडायचे. मुक्ताला कधीच कोणी गडावरच्या उत्सवात पाहिले नव्हते. पण मुक्ताची दरवर्षीची वारी हा एक चर्चेचा विषय होता.
मुक्ता साधारण Bsc झाली व तिने वारी सुरू केली. सुरुवातीला आजी व बाबांचा खूपच विरोध होता पण मुक्ता काही केल्या ऐकायला तयार नव्हती. सुरुवातीची दोन-चार वर्षे बाबा तिच्याबरोबर वारीला गेले होते पण दुकान, म्हातारी आई या सगळ्या गोष्टी सोडून त्यांनी येऊ नये असा मुक्ताचा हट्ट होता.आजीने चिडून, समजावून सांगून व अखेर रडूनभेकून मुक्ताची मनधरणी करायचा प्रयत्न केला पण तिचे सगळे प्रयत्न असफल झाले.मुक्ता पाच वर्षाची असताना एक दिवस अचानक तिची आई घर सोडून निघून गेली.
आईचे अचानक जाणे मुक्ताच्या जिव्हारी लागले. पाच वर्षाच्या मुक्ताला कसे समजावून सांगायचे हा प्रश्न गणेशरावांना होता. गणेशरावांची आई एकदम खमक्या स्वभावाची असल्यामुळे या घटनेविषयी गावात कोणीही चर्चा केली नाही. मुक्ताच्या मनात आई विषयी कुठलाही राग, द्वेष येऊ नये म्हणून आजीने मुक्ताला तिची आई पंढरपूरच्या वारीला गेली आहे अशी बतावणी केली.छोट्या मुक्ताने आजी वर पटकन विश्वास ठेवला व आई परत कधी येईल याची वाट बघू लागली. वर्ष उलटत गेली व मुक्ताच्या मनात अनेक प्रश्नांनी फेर धरले. शाळेमध्ये व पुढे कॉलेजमध्ये प्रत्येकाच्या नजरेतला तोच प्रश्न तिला सतावू लागला.
मुक्ता जसजशी मोठी होऊ लागली तसतसे तिने आजीला व बाबांना आई विषयी प्रश्न विचारून भंडावून सोडले. सुरुवातीला थातूरमातूर काहीतरी सांगून आजी वेळ मारून नेत होती पण पुढे पुढे बालसुलभ प्रश्न संपून आता सत्य जाणून घेण्याच्या उद्देशाने विचारलेल्या मुक्ताच्या प्रश्नांना उत्तर देताना त्या दोघांची धांदल उडू लागली.मोहिनी, मुक्ताची आई जेव्हा घर सोडून निघून गेली तेव्हा रागावलेल्या आजीने मोहिनीचे सर्व फोटो जाळून टाकले होते.
गणेशराव व मोहिनी यांची प्रथम भेट मुंबईला झाली. मोहिनी अनाथ आश्रमातच लहानाची मोठी झाली होती. पहिल्या भेटीतच प्रेम जुळले व पुढे गणेशरावांनी तिला मागणी घालून रीतसर लग्न केले. अर्थात या लग्नाला घरच्यांचा विरोध असल्यामुळे सुरुवातीला मोहिनीला घरात त्रास झाला.मोहिनी खूपच चुणचुणीत मुलगी होती. तिने Bachelor of Social work केले होते. तिला पुढे खूप शिकायचे होते व स्वतःच्या पायावर उभे राहायची इच्छा होती. जेजुरी सारख्या छोट्या गावात तिचे मन रमेना. आपण मुंबईला जाऊ व तिथेच काहीतरी करू असे ती अनेकदा म्हणायची पण गणेशरावांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. मुक्ताच्या जन्मानंतर त्यांना वाटू लागले होते की आता मोहिनी थोडी घरात रमेल पण असे काही झाले नाही व एक दिवस कोणालाही काही न सांगता मोहिनी घर सोडून निघून गेली. सगळीकडे शोधाशोध केली ती ज्या अनाथाश्रमात राहत होती तिथेही जाऊन चौकशी केली पण कोणालाच तिचा पत्ता माहीत नव्हता. अखेर काही दिवसानंतर आहे ही परिस्थिती मान्य करून गणेशराव व त्यांच्या आईने या विषयावर न बोलायचे ठरवले.
बालसुलभ वयात मुक्ताला आई वारीला गेल्याचे सांगितल्यामुळे आता परत हे सत्य सांगायचे धाडस आजीने केले नाही व याचा परिणाम म्हणून विसाव्या वर्षी मुक्ताने आईचा शोध घेण्याचे मनोमन ठरवले. एकदा तरी आईला भेटून तिला खडसावून प्रश्न विचारायचे हा निश्चय तिने मनोमन केला होता.गेली वीस वर्षे मुक्ता वारी बरोबर जायची प्रत्येक पडावात ती आईचा शोध घ्यायची.
मुक्कामाच्या ठिकाणी वारकरी महिलांबरोबर गप्पा मारून स्वयंपाकात मदत करून ती त्यांच्याविषयी माहिती गोळा करायचा प्रयत्न करायची. आताशा वारी मधल्या काही महिलांची तिची खूपच छान ओळख झाली होती. कुणाला काही दुखले खुपले तर काही त्रास झाला तर ही धावून-धावून मदत करायची. गावात जाऊन, दुकानात जाऊन, म्हाताऱ्या कोताऱ्या सर्व लोकांशी ती आपणहून बोलायची व ती आई विषयी चौकशी करायची
“तुझी आई कशी दिसायची काही फोटो आहे का ?”या प्रश्नावर ती गडबडून जायची व तिचे ठरलेले उत्तर असायचे की ती अगदी माझ्यासारखीच दिसत असेल.
बऱ्याच वेळा लोकांना ती वेडी आहे असेच वाटायचे. आळंदी ते पंढरपूर तिने सगळा भाग अगदी पिंजून काढला होता.पंढरपूरला पोहोचल्यावर चंद्रभागेच्या तीरावर जाऊन अनेक वेळा ती ढसाढसा रडली पण होती. वारी संपल्यावर सर्व वारकरी भराभरा आपल्या गावाकडे जायचे पण काही निवडक लोकांबरोबर ती परत वारी पण करायची .परतीच्या प्रवासात कुठल्याही सोयी नसायच्या. जाताना जेवढा पाहुणचार आदरातिथ्य व्हायचे पण परत पालख्या फिरल्यावर त्याच्याकडे कोणीही ढुंकून पहायचे नाही. प्रत्येक खेपेला पदरी पडलेली निराशा व खडतर प्रवास त्यामुळे मुक्ता अजूनच खचून जात होती.
आजींनी सत्य सांगायचा प्रयत्न केला पण आता मुक्ताचे मन काही केल्या ही गोष्ट मानायला तयारच नव्हते. दिवसेंदिवस मुक्ताचे हे वेड बघून गणेशराव सुद्धा काळजीत पडले होते. बऱ्याच वेळा वारीच्या दरम्यान कोणीतरी गावकरी मुक्ताला तुझ्यासारखी दिसणारी बाई दिसली असे सांगायचे व ती वेड्यासारखी आईच्या शोधात दाही दिशा पळत सुटायची.या खेपेला ती जेव्हा वारीला निघाली तेव्हा मला एकट्याला सोडून जाऊ नकोस मला पण येऊ दे तुझ्याबरोबर असे म्हणत बाबांनी हट्ट धरला. “वारीचा प्रवास व परत वारी या दोन्ही गोष्टी खूप अवघड आहेत व आता तुमचे वय झाले आहे तुम्हाला त्रास होईल” मुक्ताचे काही न ऐकता बाबा तिच्याबरोबर या खेपेला निघाले.आता त्याने विठ्ठलाला साकडे घातले होते “नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सर्वथा जाऊ पाहे”
मनाने व शरीराने खचलेल्या गणेशरावांची तब्येत बिघडली व ऐका मुक्कामाच्या गावीच त्यांना छातीत दुखू लागले. काही स्वयंसेवक मदतीला धावले. मुक्ता बाबांना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली उपचार सुरू होण्याच्या आधी काही कागदपत्रांची तरतूद करायची होती. तिथे बसलेल्या एका महिलेकडे मुक्ताने फॉर्म भरून दिला. वडिलांच्या काळजीने वेडीपिशी झालेली मुक्ता भीतीने थरथरू लागली.
अचानक कोणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवून,”घाबरू नकोस बाळा, तुझ्या वडिलांना काहीही होणार नाही” मुक्ताने गर्कन मागे वळून पाहिले. “मोहिनी मॅडम या पेशंटची सर्जरी लगेच करावी लागणार आहे ही कागदपत्रे आहेत”
मोहिनीने कागदपत्रे बघितली व ती एकदम थबकली.ती धावतच गणेशरावांकडे गेली.गेली ३५ वर्षे मोहिनी अखंड समाज सेवा करत होती व काही वर्षांपासून ती नियमित वारीला येऊन इथल्या वारकऱ्यांची सेवा करत होती.गणेशरावांची अंजिओग्रफी केली. दोन दिवस विश्रांती घेऊन आषाढी एकादशीला मुक्ताला व मोहिनीला घेऊन त्यांनी पांडुरंगाचे पाय धरले. मुक्ताची खडतरवारी व तिने सोसलेले अनेक कष्ट आज भरून पावले होते.
आज प्रथमच मुक्ता विठुरायाच्या मंदिरात प्रवेशली होती.मुक्ता चे मन अजिबात थार्यावर नव्हते. आई मिळाल्याचा आनंद मानायचा का ती आपल्याला व पूर्ण कुटुंबाला काहीही न सांगता सोडून गेली याबद्दल जाब मागायचा हेच तिला समजत नव्हते.तिच्या मनातली घालमेल समजून मोहिनीनेच विषयाला तोंड फोडले.
मोहिनी सांगू लागली एकंदर अनाथ आश्रमात राहिल्यामुळे नातेसंबंध व घरची तिला अजिबात सवय नव्हती. नव्याचे नऊ दिवस संसार झाल्यावर तिला त्यात रस वाटेनासा झाला, मुक्ताला पण आजीचा जास्त लळा होता व ती पण आजीच्या भोवती जास्त रमायची. मायलेकी मधले नाते मोहिनीने कधीच अनुभवले नसल्यामुळे त्या नात्यात ती समरस होऊ शकलीच नाही.
पुढे नांदेडला तिने Master in Social Work केले व नक्षलग्रस्त भागात काम करायला गोंदियाला गेली. तिथे गेल्यावर परतीचे सगळे मार्ग बंद झाले. तिने तिच्या खासगी आयुष्याविषयी कोणाला काहीच माहिती सांगितली नाही कारण तिला मुक्ता, गणेशराव व सासूबाईंची काळजी व त्यांची सुरक्षितता हाच तिचा मुख्य उद्देश होता. नक्षलवाद्यांना कुठल्याही परिस्थितीत आपली कमजोरी कळता कामा नये या निव्वळ कारणामुळे अनेक वेळा मनात असूनही तीनी घरच्यांशी संपर्क करायचे टाळले होते. कामामध्ये तिने स्वतःला इतके झोकुन दिले की आयुष्यातली वीस वर्षे अगदीच भुर्रकन उडून गेली.
हळू हळू शासनाने व तिच्यासारख्या समाजसेवी संस्थांनी नक्षलग्रस्त भागात खूप काम करून त्या लोकांचा विश्वास संपादन केला व भरकटलेल्या लोकांना परत नवी संजीवनी दिली आणि मुख्य प्रवाहात आणून त्यांचे आयुष्य मार्गी लावले.
आयुष्याच्या सांजसंध्याकाळी अनेक वेळा मुक्ता, गणेशरावांच्या आठवणीने तिचा जीव गलबलला होता. पश्चाताप,अपराधी भावना व भरकटलेल्या मनाला शांतता लाभावी म्हणून मोहिनी अनेक वर्ष वारीत येऊ लागली. जेजुरीला पालखी जेव्हा यायची तेव्हा अनेक वेळा तिची पावले घराकडे वळत होती पण परत यायचे तिला धारिष्ट्य होत नव्हते. मोहिनीनी तिची बाजू मुक्ता व गणेशरावांसमोर मांडली.त्या दोघांची मनापासून माफी मागितली. आज मोहिनीच्या मनावरचे मोठे ओझे उतरले होते.सासूबाईंच्या निधनाची वार्ता तिला समजली होती व तिच्या मनात त्यांची माफी मागायची राहून गेली याविषयी रुखरुख लागून राहिली होती.
मुक्ताने मोठा उसासा सोडला ज्या गोष्टीसाठी आपण गेले ३५ वर्षे धावत होतो ती समोर बघितल्यावर व हाती मिळाल्यावर पुढे काय याविषयी तिने काहीच विचार केला नव्हता.गणेशरावांचे अजूनही मोहिनीवर खरे प्रेम होते.विठ्ठलाच्या गाभाऱ्यात व मुक्ताच्या मनात विचारांची गर्दी उसळली होती.अनेक वर्ष एकमेकांना न भेटणारी मंडळी पांडुरंग कृपेने भेटतात या व याच भावनेने मुक्ताने सुरू केलेली वारी आज सुफळ संपन्न झाली होती.
अनपेक्षित घडलेल्या या घटनेमुळे तिघेही जण एकदम भांबावून गेले होते. कुठलाही ठोस निर्णय घेण्याच्या परिस्थितीमध्ये ही मंडळी नव्हती. मुक्ताने श्रद्धेने डोळे मिटले व तिच्या डोळ्यासमोर विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीच्या ऐवजी वेगळेच चेहरे तरळुन गेले.
एकदमच मागून गलका झाला,”माऊली माऊली पुढे चला माऊली आपल्या लोकांचा हात सोडू नका माऊली….”
सौ. वृषाली पुराणिक.पुणे.
एका मुलीच्या आयुष्यातले विविध पैलू व नात्यांवर गुंफलेली ही कथा तुम्हाला कशी वाटली,ते नक्की कळवा. पल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप ही जॉईन करा.
धन्यवाद !
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
मुक्ताने श्रद्धेने डोळे मिटले व तिच्या डोळ्यासमोर विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीच्या ऐवजी वेगळेच चेहरे तरळुन गेले.
खूप छान वेगळ्या धाटणीची कथा👌👌
छानच कथा 👌
खूप खूप धन्यवाद
खूप खूप धन्यवाद
अप्रतिम कथा आहे.
धन्यवाद ताई..
खूप खूप धन्यवाद
खूप छान कथा आहे , नात्यांची गुंफण अतिशय सुंदर उलगडली आहे ,शेवट पर्यंत उत्सुकता ताणुन राहीली , ,वाचायला मजा आली ..