अंतरातील प्रेम l Valentines day Love story 2024

WhatsApp Group Join Now

Marathi Love story 2024: सुर्यास्त होण्याची वेळ जवळ आली आणि नभांगणात आदित्य ने आपल्या लालकेशरी किरणांना पसरत अविस्मरणीय विलोभनीय निरोपाची तयारी सुरू केली. तो लाल केशरी रंग त्या अवखळ लाटांवर पसरत होता. त्यांना ही बहुधा जाणीव झाली असावी त्याच्या निरोपाची आणि म्हणूनच त्या लाटा अवखळपणा सोडून देत किनाऱ्यावर थांबू पाहत होत्या.

त्याच्या अस्तित्वाचे सुख मानावे की त्याच्या निरोपाचे दुःख लपवावे ही घालमेल पुजाला बैचेन करत होती. तिने आज आनंदला तिच्या आणि त्याच्या आवडत्या जागी समुद्रावर बोलावले होते. त्यांचं ते शांत होण्याचं ठिकाण, गुपित सांगण्याचं ठिकाण आणि त्याच ठिकाणी तिच्यामध्ये आणि तिच्या आनंदामध्ये विरह येणार होता. तिला कळत होतं ही घालमेल सूर्यास्ताची नाही तर तिच्या आनंदाच्या विरहाची आहे. तिने स्वतःला समजावत मनाला सावरले.

“अजून कसा आला नाही हा. सांगितलं होतं लवकर ये. वेळ कमी आहे. ” असं पुजा बोलत असतानाच तिला मागून आनंदचा आवाज आला. ” हे बघ मी आलो आहे.” 

“आला आहेस पण ऊशीरा. कधी वेळेवर येणार तू? नेहमीच ऊशीर करतोस. सांगितलं होतं ना वेळ कमी आहे माझ्याकडे  म्हणून. ” पुजा जरा वैतागून बोलत होती. 

“अग अशी चिडतेस काय? बरं चल बोल काय म्हणतेस? थांब थांब. त्याआधी इथे बसून सुंदर सुर्यास्त एकत्र बघूया. ही वेळ बोलण्यात नको घालवायला. ये बस.” असं म्हणत आनंदने तिला त्याच्याजवळ बसवले. ” सुर्य जाताना किती सुंदर दिसतो ना” आनंद म्हणाला आणि पुजा ने “हं” म्हणत आपला हुंदका लपवला. आनंदच्या हातावर हात ठेवून त्याच्या खांद्यावर डोक ठेवून पुजा त्याच्या सोबतचा शेवटचा सुर्यास्त डोळ्यात आणि मनात साठवत असते. 

“सुर्य उदयास येताना ह्या पेक्षा सुंदर असतो. तो आपले तेज सर्वत्र पसरतो आणि त्या तेजाने सृष्टीला आपल्यात सामावून घेतो. सगळं कसं प्रसन्न आणि हवहवसं वाटतं. पण तो जेव्हा जातो तेव्हा सृष्टी तेजहीन होते. भकास वाटते. अर्थहीन वाटते. असं वाटतं त्या तेज देणार्‍याला घट्ट पकडून ठेवावं. कधीच जाऊ देऊ नये.” पुजाला नेहमीच सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही आवडायचे. पण मग आज ती असं का बोलत आहे ह्याचे आनंदला आश्चर्य वाटले. 

“अगं असं काय बोलतेस आज तू. आणि तू आज पोस्ट केलेली कविता सुद्धा काय बरं होती. हो आठवली. 

रंग आठवणीचा, रंग ओढीचा

रंग आतुरतेचा, रंग बैचेनीचा

रंग सत्याचा, रंग जाणीवेचा

रंग गुढतेचा, रंग निरोपाचा

आता काही मिनीटांआधीची आजची ही तुझी पोस्ट, आज इथे बोलावणं, वेळ कमी आहे असं तुझं बोलणं सगळंच मला बैचेन करत आहे. काय झालं आहे पुजा. सांगशील का मला?” अगदी बैचेन होऊन आनंद तिला विचारत होता. 

” अरे असं काहीच नाही. तू आधी शांत हो. समजेल तुला सगळंच. पण शांत होऊन बोलूयात का आपण? तुला आठवते आहे का रे आपली ओळख कशी झाली? मी सोशल साईटवर नवीन अकांऊट बनवलं होतं. आणि मला तिथे तुझे अकांऊट दिसले. तुझे सह्याद्रीतील गडकोट, किल्ल्यावर फिरतानाचे फोटोज पाहिले आणि सहज तुला मेसेज केला होता. तुला विचारलं होतं. तुम्हाला भिती नाही का वाटतं इतक्या ऊंचीची. नंतर हे सुद्धा विचारलं मी तुला ट्रेकिंग साठी काय तयारी करावी लागते.” पुजा सुर्यास्त बघता बघता जुन्या आठवणीत रमून जाते. 

” हो आठवते तर. तुला मी सांगितलं सह्याद्रीत जाऊन माझं मन आणि मी शांत होतो. म्हणून मला आवडतं पर्वतांवर आणि सह्याद्रीत फिरणं. तुला सांगितल्याप्रमाणे तू चालण्याचा सराव केलास . पण तू ऊंचीच्या भीतीने ट्रेकिंगच्या आनंदाला नाही मिळवू शकलीस. बघ अजूनही तुझी तयारी असेल तर चल माझ्याबरोबर आनंदासाठी.” आनंद हसत तिला म्हणाला. 

“माझी ऊंचीची भिती कधी जाईल असं वाटत नाही. भितीवर मात नाही करता येत मला. त्यापेक्षा जिथे आहे तिथून आनंद मिळवायचा. आणि ट्रेकिंगचा आनंद गमावला तरी हा आनंद मला मिळाला आहेच ना.” पुजाच्या चेहर्‍यावर ऊमटलेले ते हास्य बघून आनंदला बरं वाटले. पुजा पुढे बोलू लागली,“अहो अहो करता करता अग आणि अरे वर गप्पा आल्या. आपल्याला रोज एकमेकांशी बोलण्याची सवय लागली. कामांमधून वेळात वेळ काढून चॅटिंग, व्हीडिओ कॉल, फोन कॉल्स सुरू झाले. आणि मग थट्टा, मस्करी करता करता आपल्या आयुष्याला नवीन वळण लागले होते. मी नेहमीच व्हीडिओ कॉल करून बोलायला लागले होते. तुला बघण्याची वेडी आशा होती. तू तुझं ऑफिसचे काम करता करता बोलयचास आणि मी मात्र माझं सगळंच काम सोडून तुला बघण्याचं एकच काम करत होते. किती वेडी होती ना मी.”

 “अजिबात नाही. येडू आहेस तू माझी. घरी नीट पोहोचलास का? जेवलास का? आता का झोपलास बरं वाटतयं ना? आवाज का असा येतोय?  किती खोकतो आहेस डॉक्टर कडे जाऊन ये आधी आणि जाऊन आलास की कॉल करुन सांग डॉक्टर काय म्हणाले ते. काळजी घे, शांत झोप. नको टेंशन घेऊ.अशी सारखी मेसेज करत होतीस तू. किती काळजी करायचीस माझी. माझा मेसेज आल्याशिवाय तू झोपत नव्हतीस. ह्या सगळ्या मेसेजेस मध्ये तुझी काळजी आपुलकी दिसतं होतीच पण प्रेमाची एक तळमळ दिसत होती. ह्या सगळ्याचा अर्थ मला कळत होता. मस्तमोला जीवन जगणारा, प्रेमबीम सब झुठ म्हणणारा, त्या लफड्यात पडायचे नाही म्हणणारा मी प्रेमात पडलो तुझ्या.

मला सुद्धा तुझ्यासारखं वेडं लावलंस. मी बैचेन असलो, रागात असलो किंवा एकटेपणा जाणवला की तुझा एक मेसेज माझ्या चेहर्‍यावर हसू आणतो आणि मला खूप छान वाटतं. असं वाटतं ह्या अख्ख्या जगात एक तूच आहेस जी मला समजून घेऊ शकतेस. माझा राग शांत करू शकतेस.” आनंद सुद्धा खूप भरभरून बोलत होता. “बरं मला इथे बोलावण्याचे विशेष कारण काय. नाही वेळ काढून ये म्हणालीस म्हणून विचारतो आहे. नाहीतर तू विचारशील का सहज नाही का भेटणार? कारणच हवे का? वगैरे वगैरे.” आनंद म्हणाला.

“अरे व्हॅलेंटाइन डे साजरा करायला नाही मिळणार ना. म्हणून आज बोलावलं. आज आलिंगन दिवस आहे. म्हणजे मिठीचा दिवस. आता ऑनलाईन व्हीडीओ कॉल करून तुला मिठी नाही ना मारू शकत म्हणून इथे बोलावले आहे.” पुजा असं म्हणत आनंदच्या मिठीत शिरली आणि आपल्या कंप पावलेल्या स्वरांना थोपवण्यात प्रयत्न करत होती. काही वेळ त्याच्या मिठीत राहून पुजा ने स्वतःला सावरले. मग मिठीतून बाजूला होत आनंदचा हात हातात घेतला आणि बोलायला सुरुवात केली. 

” हे बघा रावसाहेब. आपली ओळख एका सोशल साईटवर झाली. अनोळखी ते ओळख, मैत्री मग प्रेम इथपर्यंतचा प्रवास खूप आठवणी देऊन गेला. खूप अविस्मरणीय, हवेहवेसे क्षण आपण जगलो आणि ते जपत आहोत ह्या सुर्यास्तासारखे. पण सुर्यास्तानंतर असते ती रात्र. ती रात्र भयावह करायची, दुःखद करायची की सुंदर करायची हे त्या तारेतारकांवर आणि चंद्रावर अवलंबून असते हो ना. रात्रीचे दृश्य आणि क्षण विहंगम असतात. रातराणीच्या सुगंधाप्रमाणे सुगंधित असतात.

आपल्यालाही आपल्या नात्याची रात्र सुगंधित, सुंदर आणि अविस्मरणीय करायची आहे. आठवणींचे तारे रोज रात्री नव्याने चमकतील आणि आपल्या प्रेमाच्या तेजाने चंद्रही तेजोमय होऊन जाईल. त्या चंद्रामध्ये आणि त्या ताऱ्यांमध्ये आपण एकमेकांना ह्यापुढे भेटायचं. आपली भेट आता अशीच असेल.” पुजा हे काय बोलते आहे असा प्रश्न आनंदला पडला. तो तिला काही विचारण्याआधीच पुजा ने पुढे बोलायला सुरूवात केली. 

” तू तुझ्या आयुष्यात पुढे निघून जा. मला विसरून जा असं नाही सांगणार. कारण आपण आपलं प्रेम कधीच विसरू शकणार नाही. फक्त समाजाच्या चौकटीत आपलं प्रेम बसत नाही आणि ती चौकट मोडून काढणं शक्य नाही म्हणून हा शरीराने दुरावा आपल्यात येणार आहे. मनाने आपण कायमच एकमेकांजवळ असणार आहोत. तुझ्या मिठीतील माझी जागा कायमच असणार आहे. कारण ती माझी आवडती जागा आहे. तुझ्या हृदयाच्या स्पंदनात मला मी सापडते. तुला ही सापडते ना मी तिथे? नेहमी तिथेच तर असणार आहे मी. आता खरंच निरोपाची वेळ जवळ आली आहे. “

आनंदला हे सर्व ऐकून धक्काच बसला होता. त्याला माहीत होत नातं पूर्णत्वास येणार नाही. पण आज पुजा निरोप देईल हे त्याला अपेक्षितच नव्हतं. तो ह्या निरोपासाठी मनाने तयार नव्हता. आनंद पुजा ला म्हणाला. “आज तू जे लिहीले आहेस पोस्ट वर त्याचा अर्थ मला आता कळला. मला सांग तुला का निरोप घ्यायचा आहे?  का हे सगळं संपवायचं आहे? तुला आवडतं नाही का आपलं नातं? बोल ना पुजा. असंच सुरू ठेवूया ना.”

“आवडतं ना. खूप आवडतंय आणि निरोप म्हणाले म्हणजे नातं संपलं असं तर नाही ना. तू तुझ्या आयुष्यात पुढे जा.  तुझ्या जबाबदाऱ्या पूर्ण कर. तुझी स्वप्न पूर्ण कर. कारण ती फक्त तुझी स्वप्न नाहीत. माझी सुद्धा आहेत. मी तुझ्या प्रत्येक स्वप्नपूर्तीमध्ये तुझ्याबरोबर नेहमीच असेन. मी तुला बघत असेनच.

आपण जिथे भेटलो तिथे आपण भेटू, बोलू, बघू एकमेकांना. माझ्या कवितांमधून, तुझ्या रिल्स मधून, काही पोस्ट्स मधून, फोटो मधून व्यक्त होऊ. बोलत राहू आणि पाहत राहू. राधाकृष्णाचं प्रेम कुठे पूर्ण झालं. पण आज प्रेम म्हटलं की राधाकृष्णच म्हणतात ना. तसंच आपलं प्रेम आहे. अपूर्ण तरीही आपल्याला पूर्ण करणारं आहे हो ना.”  पुजा आनंदला समजावता समजावता स्वतःलाही समजावून सांगत होती. 

आनंदने पुजाच्या हाताला अजून घट्ट पकडले आणि गदगदलेल्या आवाजात म्हणाला, “पुजा मी खरंच नाही राहू शकत तुझ्याशिवाय. तुला नाही विसरू शकत. पण तू म्हणतेस ते बरोबर आहे. सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ ठरलेली असते. आणि रात्र ही विहंगम असते. आपण आपल्या नात्याची रात्र सुंदर बनवू. पण मला एक वचन दे. तू जसं सांगितलंस ना तसं आपल्या सोशल साईटवरून प्रत्यक्ष न बोलता ही आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट बोलायची, बघायची, सांगायची. दूर अंतरावर राहून हे नातं जपूया.

निदान हे तरी माझ्या आयुष्यात राहू दे. त्याला तरी निदान निरोप नको देऊया कधीच. मी तुला नेहमीच येडू म्हणणार आहे आणि तू मला रावसाहेब. अजून एक वचन दे. कधीही तुला माझ्याशी बोलावं वाटलं , मनातलं सांगावं वाटलं, कधी काही मदत हवी असेल तरी काहीही विचार न करता मला मेसेज करशील. स्वतःला अडवणार नाहीस.  वचन दे मला. “

पुजा होकार देत आनंदच्या मिठीत शिरते आणि दोघेही अश्रूंना वाट देत अस्ताला गेलेल्या सूर्याला आणि येणाऱ्या रात्रीला अनुभवत असतात. ह्यापुढे प्रत्येक दिवस हा त्यांच्यासाठी मिठीचा असणार आहे, आठवणींच्या मिठीचा. 

आपल्यात अंतर मैलांचे, आपल्यात अंतर शरीराचे

आपल्यात अंतर फक्त ह्या जन्माचे

आपल्यात नसे अंतर मनाचे, घेतलेल्या श्वासाचे, आठवणींच्या क्षणांचे.

नसेल अंतर नंतर तुझ्या माझ्यात पुढच्या जन्मीचे.

त्यानंतर दररोज ठरवल्याप्रमाणे ते सोशल साईटवर भेटत,बोलत राहिले. कधी गाण्यातून, कधी फोटोतून, कधी कवितांमधून आणि व्यक्त करत राहिले अंतरातील अंतरीचे प्रेम.  

ही कथा आहे आजच्या डिजीटल काळातील. ह्या सोशल मिडीयावर जसे यार दोस्त बनतात तसंच एक नातं सुद्धा तयार होतं मनाचं. प्रेमाचं. कधी ही न बघितलेली व्यक्ती जीवापाड प्रेमाचा सोबती बनतो. अशीच एक प्रेमकहाणी घेऊन आले आहे तुमच्यासाठी.  तुम्हाला ही कथा कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.

महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)  

      धन्यवाद !

2 thoughts on “अंतरातील प्रेम l Valentines day Love story 2024”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top