आयुष्यातील चिरंतन मूल्यांची सांगड..!!!
“येतो ग आम्ही.आता काळजी घे खंबीर रहा.”अशा अनेक काळजी युक्त भावना चित्राच्या घरात ऐकत होत्या. चित्रा नुसतीच शांततेने, मुक्याने होकार भरायची.
आकाशला जाऊन पंधरा दिवस होऊन गेले होते . वर्दळ मंदावली होती. नातेवाईक ,पै पाहुणे यांचा गराडा जरा कमी झाला होता. केवळ पंधरा दिवसाच्या आजाराचे निमित्त झालं होतं आणि आकाश -चित्राचा डाव मोडला होता . चित्रा अजूनही त्यातून बाहेर आली नव्हती. घरात कितीही गोतवळा असला तरी तिची नजर आकाशच्या प्रत्येक वस्तू वरून फिरत होती. त्याच्या हालचालींच्या, बोलण्याच्या पद्धतीचा, प्रसंगाचा भास होऊन त्यातच ती गुंतून राहत होती. समोर कितीही जण असले तरी देखील तिची नजर स्थिर होत नव्हती. काय गमावले याचा अंदाज येण्यासाठी ,अजून भानावर येण्यासाठी तिला खूप वेळ हवा होता आणि तो तिला एकांतातच मिळणार होता.
ज्यावेळी चित्रा नेहमीच्या ठिकाणी कॉफीचे घोट घेत बसली होती, तेव्हा आठवणींच्या अनेक गर्दीत तिला खूप कासावीस वाटू लागले .वीस वर्षांचा जसा पट समोरून गेला तसं समोरचा पट मांडायचा कसा याची चिंता सतावू लागली.. सोन्यासारखी दोन मुले पदरात होती .हुशार समंजस होती . पण तिची चालण्या -बोलण्याची जागा जशी रिकामी झाली होती तसेच तिच्या मुलांचेही भक्कम आधार कवच डळमळले होते . आई म्हणून ती सदैव मुलासमोर खंबीर असायची..पण बाप म्हणून उभे राहणे तिला खरंच खूप खूप कठीण वाटू लागलं.
असं काय काय असतं एका बापामध्ये आणि काय काय नसते का बापामध्ये ! ते बापपण आता आपल्याला पेलायच आहे या जाणीवेनेच ती खूप दडपली गेली. दिवसभर दगदग करून घरी आल्यानंतर जो आश्वस्तपणा दिसतो त्या आश्वासकतेचा पाया असतो बाप! संकटाच्या वेळी ,इतक्यात काही व्हायचं नाही म्हणून मिळणारा आधार आणि अमूल्य असं धैर्य असतं बाप ! हळूहळू एक बाप म्हणून ,नवरा म्हणून आकाश कसा वागला होता ते सारं काही सरसर डोळ्यासमोरून गेलं आणि तिला जाणवलं की पत्नी म्हणून आकाशच्या मागे घर सांभाळणे एवढेच शिल्लक राहिले नव्हतं तर मुलांचा एक बाप म्हणून आपल्या आईपणात आकाशात सामावून घेणं, प्रसंगी तो बाप साकारणे हे चित्राला अधिक आव्हानात्मक आणि जबाबदारीचं वाटत होतं.
सगळे सोपस्कार पार पडल्यानंतर काही प्रशासकीय बाबी पूर्ण करण्यासाठी तिला त्यांच्या कारखान्याच्या ऑफिसमध्ये जायचं होतं .तेव्हा मुलाला घेऊन जाऊ असा विचार तिने केला. पण पार्किंग मध्ये आल्यावर त्यांचा ड्रायव्हर नव्हता. आता तू चालव गाडी.. आणि चल ” असे चित्रा म्हणाली. त्यानेही अगदी व्यवस्थित कारखान्यापर्यंत गाडी आणली. कारखान्यातही मॅनेजरने अगदी व्यवस्थित सर्व प्राथमिक माहिती सांगितली . तेथील काम, जबाबदाऱ्या यांची ओळख करून देत कारखाना परिसर अगदी जबाबदारीने फिरले. कारखाना फिरत असताना मुलाबद्दल म्हणजे जय बद्दल कामगारांच्या मनात ही उत्सुकता होती.
जय ही अनाहूतपणे आलेल्या जबाबदारीला सामोरा जात होता . त्याच्यातील आत्मविश्वास निदान त्याच्या डोळ्यात तरी चमकत होता . जयचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत कारखान्याची जबाबदारी चित्रावरच होती .पण निदान भविष्यातील जबाबदाऱ्यांचे भान यावे म्हणून ती जयला सोबत घेऊन कारखान्यावर आली होती .त्यावेळी तिला जाणवले की मुलांना त्रास होऊ नये म्हणून संकटे स्वतःवर घेते ती आईपण. त्या संकटांशी दोन हात करण्यासाठी मुलांना तयार करणे हे बापाचं कर्तव्य .! ती परिस्थितीच चित्राला बापपण शिकवत होती. हळूहळू चित्राला स्वतःला बरीच काम येत असतानाही ती मुलांना काम सांगू लागली . घरातील विविध जबाबदाऱ्यांमध्ये सामावून घेऊ लागली. त्यानिमित्ताने एका कटुप्रसंगाने थांबलेल्या संवाद पुन्हा प्रवाहित झाला.
मुलगा कॉलेजसाठी बाहेर गेला तेव्हा त्याला त्याच्या जबाबदारीची वेगळी जाणीव अशी करून द्यावी लागली नाही. तसे नेहमीच फोन आणि कॉलेजचे अपडेट्स यामध्ये त्यांचा बोलणं होऊ लागलं होतं . त्यातून मुलं सावरत आहेत हे जाणून मनाला समाधान घेऊन गेली. मुलांना पोरकेपणा जाणवेल का अशी काळजी तिला एक आई म्हणून वाटू लागली ; पण मुलगा आता समंजस झाला आहे, तो तिथली परिस्थिती ..प्रसंगी मार्गदर्शन आणि चर्चेने हाताळू शकतो ही जाणीव प्रबळ होत गेली . मग तिला जाणवले की हळूहळू आपल्या आईपणातही एका बापाचा शिरकाव होतोय.
तो प्रवास ही आता त्याला परिचित वाटू लागलाय आणि तो आता आपल्याला जमू लागेल असा विश्वासही तिला वाटू लागला . बाप हा कोणत्याही घरासाठी आभाळा एवढाच असतो .तो पैस व्यापून शकेल असं कोणतच नातं पुन्हा निर्माण करता येऊ शकत नाही आणि तो करण्याचा प्रयत्नही करू नये. नाहीतर त्या व्यक्तीची फसगतच होईल .आभाळ फाटल्यासारखं जगणं आणि हंबरणं ज्यांच्या वाट्याला येतं तेच या कळा जाणवू शकतात . मुलीचे आणि आकाशचं बॉण्डिंग जाणून होती. मुलगी बिथरली नव्हती असे नाही..बापाचं नसणं तिला जाणवत असलं तरी ती ते पचवू पाहत होती ..आईची काळजी घेण्यातून ती तिथे तुटणं सांधू पहात होती .तिच्या वागण्यातून आकाशच प्रतिबिंबित होत होता . पण अकाली वयात बालपणातील निरागसता आणि तारुण्यातील खळखळणं हरवून जाईल की काय अशी चित्राच्या मनाला शंका येत होती. ती वेळ कधीही येऊ नये ,,चार चौघांसारखं त्यांचंही जगणं असावं अशी प्रार्थना ती मनापासून करत होती.
मुलगा जय पदवीचे शिक्षण संपून तो मास्टर्स करायला दोन वर्षे अमेरिकेत राहिला .त्याने इथेच मास्टर्स करावे असा आग्रही धरला. पण एका आईची घुटमळ त्याचा अडथळा ठरवू नये असे तिला वाटत होतं . तोही एक खंबीर पर्याय म्हणूनच विचारत होता . तसेही त्याचे ठरलं होतच; केवळ औपचारिकता म्हणून ते विचारणं होतं, हेही तिला माहीत होतं . ज्यावेळेस तो जाणार त्यावेळेस तिने खूप विचार केला . नंतर तो परत येईल की नाही यावरही बराच काळ खल केला . पण शेवटी आपणच आईबाप या भूमिकेतून पाहिले पाहिजे या विचारांने मनाची समजूत काढली आणि मुलाला अमेरिकेत मास्टर्स करण्यासाठी जाऊ दिलं .मुलगा जसा परत आला तशी ती ही निर्धास्त झाली. पण मुलगा कसल्या तरी गोंधळात वाटला. तिला वाटलं की पुढचं करिअर किंवा आयुष्य याबद्दलचं गोंधळ असेल. तो गोंधळ पुढे यावा काहीतरी चर्चा व्हावी म्हणून तिने बोलायला सुरुवात केली.
“जय, मी आल्यापासून पाहते .तू शांत आणि तरीही गोंधळालेला वाटतोसका रे .?काही अडचण असेल तर बोल की”
“, आई मी बोलणारच होतो पण आता तुला स्पष्टच सांगतो. चार वर्ष मुंबई आणि तिथून अमेरिका .अशी सहा वर्षे बाहेर होतो . अनेक जण भेटले . स्वभावाचे विविध कांगोरे कळले. तरीही तशी प्रत्येक वेळी तुझी आणि बाबांची आठवण यायची..तर कधी कधी तुलनाही व्हायची. पण प्रत्येक वेळी अलिप्त राहता येत नाही .आता बऱ्याच प्रसंगातून ,अनेक गुंत्या मधून सही सलामत बाहेर पडलो . पण आता कोणतीही रिलेशनशिप नको वाटते. तसा मी आयुष्यात सेटल होण्याच्या दृष्टीने कोणाचाच विचार केला नाही; पण नवीन नातं जोडणं, सांभाळणं टिकवून हे सगळं नको वाटतं. त्यातून कदाचित नको तो अपेक्षाभंग वाट्याला आला तर आयुष्याची दिशा बदलते .त्यामुळे मला नक्की काय करावे हे ठरवता येत नाही “
कालच्या जयच्या लग्नासंदर्भातील बोलणे ऐकून त्याचे हे मत झालं असेल ,असं तिला उगाचच वाटून गेलं. पण त्याचे हे बोलणे ऐकून चित्र स्तब्ध झाली . मुलं जे नातं ,सहवास पाहतात तो बहुत करून आई-वडिलांना समोर ठेवूनच त्यांनी पाहिलेला असतो. पण तो आणि आदिती ऐन आयुष्याच्या उंबरठ्यावर असताना एका चाकाची साथ दुरावली होती . त्यामुळे सहवासातील समंजसपणा, ताणेबाणे,आधार .भक्कम साथ या गोष्टींची त्यांना नेमकी गरज असताना त्या गोष्टी सामोरे आल्या नव्हत्या. अनुभवता आल्या नव्हत्या .
आता खरी कसोटी चित्राची होती. तिला खरोखर आकाशची नितांत गरज भासत होती .शेजारी बसलेली आदिती ही अपेक्षेने पाहत होती. कदाचित हाच प्रसंग किंवा वेगळी समस्या तिलाही येऊ शकते हे चित्राच्या लक्षात आले . चित्राचा थोडा गोंधळ झाला पण अगदी दोनच मिनिटात तिने स्वतःला सावरले आणि बोलली,
“ हे बघ जय, हे कोणताही नवीन निर्णय घेण्यापूर्वी द्विदा मनस्थिती असतेच; पण तोच पर्याय किंवा समस्या नेहमीच सर्वत्र असेल असे नाही .तुझं करियर किंवा नाते हे दुसऱ्या कुणाकडे बघून ठरवू नकोस .प्रत्येकाच्या आयुष्यात सारखे पणा असला तरी तोच तोच पॅटर्न असतोच असं नाही . प्रत्येकाची कुवत वेगळी ,दृष्टिकोन वेगळा..आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नियती वेगळी..!! आपण कितीही आखीव रेखीव जगायचे ठरवलं तरी काही निर्णय परिस्थिती व नियतीच घेते आणि ते स्वीकारावेच लागतात. किंबहुना केवळ स्वीकारूनच चालत नाही तर त्याला सामोरे ही जावं लागतं आणि त्यातून त्याच्यावर मात ही करता येते. “
“पण आई,आज तू दोन्ही भूमिका पार पाडत असताना तुला तर आम्ही बघतो . तुझा खंबीरपणाच तुला तारू शकला .पण जेव्हा इतर लोक ही खंबीरता तोलू लागतात तेव्हा ते मला पटतही नाही आणि ते काही गरजेच आहे असं मला वाटत नाही. “
“ जय , लोक आहेत तर तुलना करणारच..पण त्याकडे किती लक्ष द्यायचं हे त्या व्यक्तीने ठरवावे .तुझे बाबा सोबत होते तेव्हा आमचेही उत्तम सुरू होत होतं. तरीही लोक तुलना करत होतेच . पण म्हणून आम्ही ते आमच्या घरापर्यंत, आमच्या दोघांपर्यंत कधीच आणलं नाही”!
“ बाबांची भूमिका निभवताना ,त्या जबाबदारीशी प्रामाणिक राहताना ,तुला आईच्या हळवेपणाची कधीतरी जागा चुकल्यासारखे वाटत नाही काय ? ” त्याने आता बरोबर मुद्दा पकडला होता. क्षणभर आधी तिलाही वाटलं की दोन्ही भूमिका निभावता यावी म्हणून आपण आईतील हळवेपणा कडे किंवा त्या संवेदनशीलतेकडे दुर्लक्ष केलं का ? .आणि कदाचित हीच उणीव भासत असेल का . अशी शंका तिच्या मनात येऊन गेली. पण आता काहीतरी बोलावं लागणारच होतं त्यामुळे ती बोलू लागली,
“हे बघ हे मुळातच आई-वडील ही भूमिका वेगळी करताच येत नाही . वडिलांमध्येही संवेदनशीलता असतेच आणि प्रसंगी आई कठोर होत असते . गरजेनुसार आपल्याला पार पाडाव्या लागतात . जसा प्रसंग येईल तशा त्या भूमिका निभावल्या जातातच ,पण केवळ अपेक्षाभंग होईल किंवा निभावताच येणार नसेल तर ‘सुरुवातच कशाला करा’ हा विचार पूर्णतः चुकीचा आहे . आयुष्य जगताना साथीदाराची सोबत घ्यावीच.मग ती किती मिळाली यापेक्षा ती कशी मिळाली यावर त्याची सुंदरता ठरते आणि असे सकारात्मक विचारच क्षणभंगुर आयुष्याला अर्थपूर्णता देतो”..!
जय आता जरा आश्वस्त झाल्यासारखा वाटत होता . त्याच्या चेहऱ्यावरचा ताणही हलकासा निवळला होता . रात्री चित्राला आकाशची खूप आठवण झाली .बापाची भूमिका करता करता मुलांचे संवेदनांची उणीव काहीशी अपुरी राहिली का अशी तिला शंका येऊ लागली .पण त्याच्याशी बोलणे झाल्यानंतर तिला थोडेसे हलके वाटू लागले. तरीही ती उगाचच आकाशच्या आठवणीत रमत राहीली .त्याच्या वागण्याचा हिशोब लावत गेली. .मुलगा किंवा वडील यांच्यातील मित्रत्वाचं नातं हे अतिशय सुंदर असतं. योग्य त्या वेळी त्याला आकार येत गेला की त्यांच्यात नात्याला परिपूर्णता येते. पण नेमकी ही उणीव जयला भासत असेल का. असे तिला वाटू लागले. पण आपण आपल्या प्रयत्न करतोच आहोत. शेवटी त्याची परिणामकारकता येणारा काळच ठरवेल असे तिने स्वतःचे समाधान करून घेतले.
दुसऱ्या दिवशी मनातील ताण कमी झाल्याने मन जरासे प्रसन्न होते . आपापल्या कामात सारे गुंग होऊन गेले. पण जयला आता कुणाची तरी समंजस सोबत हवी असे तिला वाटून गेले आणि लग्नाचा विचार त्याच्यासमोर ठेवायला हवा असे तिच्या मनात आले . जय ने भारतातच सेटल व्हायचं ठरवलं आणि त्याने त्याचं जगणं सुरळीत सुरूही केलंस केलं . तिघांचेही विश्व सुराला लागलं होतं . आदितीचेही मास्टर्स पूर्ण होत आलं होतं. कॅम्पसचे इंटरव्यू चांगले गेले होते .
एखाद्या चांगल्या कंपनीत संधी मिळेल अशी खात्री होती तिला . आणि अपेक्षाप्रमाणे तसं झालंही. .जर्मनीमध्ये तिला एका कंपनीची संधी चालून आली ..पण घरी आल्यानंतर तिने चित्राला आणि जय ला सांगून साफ नकार द्यायचे ठरवलं .दोघेही अवाक्..!! एवढी चांगली संधी डावलणं तिच्या दृष्टीने चुकीचेच होते . तिच्या करिअरच्या दृष्टीने चांगली संधी होती आणि तिने ती घ्यावी असं कोणीही सांगितलं असतं . पण आदितीला त्याचं काहीही वावगं वाटत नव्हतं . चित्राने खोदून खोदून विचारलं तेव्हा ती उत्तरली,
“हे बघ आई …गेली बाबांनंतर आपण सहा सात वर्ष एकत्र राहत आहोत . त्यांच्यानंतर तुझा संघर्ष मी पाहिला आहे. .तुझी डगमगलेली मानसिकता आणि त्यातून घेतलेली उभारी हे सुद्धा माझ्या नजरेतून सुटले नाही .दोन्ही प्रकारच्या जबाबदाऱ्या पेलताना तुझी झालेली घालमेल मी पाहिली आहे. त्यामुळे मी तुला सोडून कुठेही जाणार नाही हे तेव्हाच ठरवलं होतं आणि आता मी तशीच वागत आहे .त्यात काहीही चुकलेलं नाही असं मला वाटतं “
आदितीचे हे ठाम शब्द ऐकून जय व चित्रा दोघेही एकमेकांकडे पाहू लागले..त्यांना काय सांगावं हेच कळेना “हे बघा आदिती इतर कोणत्याही गोष्टी बरोबर असल्या तरी हे आयुष्य तुझे आहे . तुझ्या आयुष्याचे निर्णय तू घेताना इतर कोणाचे तरी आयुष्य समोर ठेवावे असं मला वाटत नाही.
अगदी आमच्या दोघांचे सुद्धा..! मग समोर कोणीही असले तरीही ! राहता राहिला प्रश्न माझा माझ्यावरच नव्हे तर आपल्यावर जो प्रसंग आलेला होता तो वाईटच नव्हे तर भयंकर ही होता ..पण आता त्यावर काळाचे औषध लागू झाले आहे . माझ्या किंवा आपल्या आयुष्यातील ती जागा भरून येणारच नाही . पण म्हणून ती घटना भूतकाळातील एक वास्तव आहे असं हे स्वीकारून आपण जगतोच आहोत. तुम्ही बाबांची उणीव स्वीकारूनही तुमच्या भविष्याचा विचार करावास असं मला वाटतं.! “
“अगं, पण आता जयही त्याच्या आयुष्यात रमेल.त्याला त्याचे व्याप असतील. मीही परदेशात गेल्यावर तू काय करशील .? बाबा गेल्यानंतर तुला सोबत होईल असं मी ठरवलं होतं आणि आता मी ते करते..त्यात मला काहीही चुकीचं वाटत नाही”आदिती पुन्हा पुन्हा सांगत होती
“ पण आदिती , सोबत असणं हे केवळ शरीराने किंवा भौतिकतेने असावं, असं थोडेच आहे..? ज्यांच्या नुसत्या आठवणीने ही उभारी येते ती सोबत!!आठवणींचा आधार भविष्यात शिरकाव करण्याचं बळ देतो ती सोबत एकमेकांच्या शब्दांनी मन आणि मेंदू आश्वस्त होतो ती सोबत….त्या सगळ्या निकषांची पूर्तता बाबांच्या असण्यानं होते ..ते आताही आपल्या सोबतच आहेत .आणि विचार कर ., बाबा जर असते तर त्यांनी तुला प्रोत्साहनच दिला असतं ना”!!!
“ पण आई तुझं काय..? आम्ही आमच्या व्यापात राहू..पण तू अजून किती दिवस एकटी राहणार..? आमचं करियर काय ते इथेही यशस्वी होऊ शकतं.! ”
“हे बघ बाळा..मुळात तुमचं आयुष्य आता हे तुमचं आहे .आई-बाबांशी आयुष्य बांधून ठेवण्याची तुमची बालपणाची वर्ष केव्हाच निघून गेली आहेत. आता तुम्ही तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा विचार केला तर तुम्ही सर्वसामान्य आयुष्य जगत असताना समोर येणाऱ्या सगळ्या भावनांना, प्रसंगांना योग्य तो न्याय देणे हेच आयुष्याचं गमक आहे .आणि ते त्या त्या वयात व्हायला हवं. केवळ करिअर आणि आईची काळजी यांतच तू सहा वर्षात तुझं सगळं आयुष्य बांधून घेतलं होतंस..!
तुझ्या सगळ्या भावना, सगळी मजा हे सगळं गुंडाळून ठेवलं होतंस. पण असं तोकडेपण किंवा असं दुरावले पण आयुष्याला पुरत नाही बाळा. त्याने जगण्यासाठी उभारी अजिबात येत नाही. आता उरला माझा प्रश्न. माझं प्राक्तन नेहमी स्वीकारलंच आहे . पचवणं खूपच कठीण आहे तरीही मी ते जगतेच आहे आणि कुणीही कोणाच्या नशिबाला बांधून घेऊ शकत नाही. तुमच्या शब्दांचा आधार आणि आकाशच्या आठवणी यावर मी इथूनही पुढे जगू शकते. पण अर्ध आयुष्य जगून झालेल्या माझ्या एकटेपणाचा विचार करून तुम्ही तुमच्या भविष्यातील आयुष्याचा अंधार करून घेऊ नका .आज मी हे स्पष्ट आणि निर्धाराने सांगते आहे कारण तुमचे बाबा जरी असते तर ते असेच वागले असते अशी मला खात्री आहे”!!
बोलता बोलता चित्राला भरून आले.. ते पाहून दोन्ही मुले कासावीस झाली. पण भावना आणि वास्तवाचा व्यवहार यांचा कुठेतरी मेळ घालावा लागणार होता आणि घरातील एक प्रमुख व्यक्ती म्हणून चित्रालाच हे करावं लागणार होतं …अगदी आकाशला गृहीत धरून ! चित्राचा ठाम निर्धार पाहून ते आणि आदिती दोघेही जवळ आले आणि त्यांनी आधी तिचे हात हात हातात घेतले आणि बराच वेळ ते तसे शांत बसले. जवळ येत जय म्हणाला,
“आई बाबांच्या मागे आई पण विसरून जास्तीत जास्त तू एक वडील म्हणूनच आमच्या मागे उभी राहिलीस. .कोणताही निर्णय घेताना कचरली नाहीस . .पण तू तुझ्यातील हळव्या आईला दूर केलेस असे वाटत नाही का ते हळवेपण पुन्हा परत येऊ शकतं का .अशावेळी तू हळवेपणा आमच्यासमोर येऊ दिला नाहीस.. कुटुंब प्रमुख म्हणून तुला कोणीही कसेही जोखू दे . पण वडिलांची उणीव म्हणून तू आम्हाला पण कधीही भासू दिली नाहीस. आई पेक्षा तू उभे केलेले वडील आम्हाला जास्त लक्षात राहतील..! “
आदिती ने ही त्याला होकार भरला आणि तिथेही एकमेकांना मिठीत घेऊन बराच वेळ एकमेकांना आश्वस्त करत राहिले …आणि आकाश ! .तो कुठे होता …तो उरला होता सगळ्या घरात आणि त्या तिघांच्या मध्ये ही ….कायमचा…अविस्मरणीय… .! !!
आज या घटनेला बरोबर पाच वर्षे झाली. चित्रा तिच्या घरात शांत बसली असताना हा सगळा पुढच्या समोर उलगडत होता . उण्यापुऱ्या वीस वर्षांची आकाशची सोबत आयुष्यभर पुरली होती. त्याच्यामागे त्यांने लावलेल्या सवयी.,शिस्त .त्याचे विचार याला कुठेही धक्का लागला नव्हता . मुलेही कालानुसार विचारात बदल करून ते स्वीकारत होती . आकाशचे अस्तित्व जगण्यातून शाबूत ठेवण्याचा प्रयत्न करत होती . मात्र या सगळ्या धावपळीमध्ये चित्राच्या मनातील एका द्वंद्वाचा मात्र अस्त झाला होता . आकाशच्या जाण्याने जो आवकाश निर्माण झाला होता त्याला इलाज नव्हताच .पण आईपण जपत बाप असण्याला अर्थ निर्माण करून देणे, हे सर्वार्थाने कठीण होतं .
तिने ते काही प्रमाणात केलंही होतं. याच समाधानाने तिच्या आयुष्याला एक शांत प्रवाहीपण आलं होतं. आता आकाशच्या नसण्याची पोकळी बोचत नव्हती की कोणतंही द्वंद्व पोखरत नव्हतं. वेळेनुसार त्या त्या प्रसंगांना न्याय दिल्याने द्वंद्व संपलं होतं. आणि एक अनामिक चिरंतन अद्वैत साकारलं होतं तिच्यामध्ये .! नियतीने अकस्मात पदरात टाकलेलं आणि तिने ते सर्व शक्तिनिशी पेरलेले बापपण आणि आईचं आईपणाचे अद्वैततेच ते . सार्थकता आणून देणारं तृप्तीने भरलेले केवळ त्याचं आणि तिचं दोन समांतर जीवांचे अद्वैत. ….!!!!
आदरणीय वाचकहो,कशी वाटली तुम्हाला कथा?अशाच नवनवीन कथा आणि लेखांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि तुमचे अभिप्राय आवर्जून नक्की कळवा. भेट द्या, कमेंट करा आणि शेअर करा.धन्यवाद.!
लेखिका-गौरी संतोष जंगम ,मिरज
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
खूपच छान कथा.
Thank you sir
हृदयस्पर्शी कथा
Thank you mam…!
छान
Thanks mam..