Ganesh Jayanti 2024:”प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरुनी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा” 14 विद्या आणि 64 कलेचा स्वामी शंकर पार्वती पुत्र श्रीगणेश सर्वत्र प्रथम पूजनीय आहे. गणपती म्हणजे गणाचा स्वामी. विघ्नहर्ता असलेल्या गणपतीला प्रत्येक मंगलप्रसंगी सर्वप्रथम अक्षदा देऊन मंगल कार्यासाठी आमंत्रित करण्यात येते आणि आमच्याकडे होत असलेले शुभ कार्य निर्विघ्न पार पडु देत म्हणून प्रार्थना देखील करण्यात येते. हिंदू धर्म ग्रंथानुसार पार्वतीने गणपतीची निर्मिती ही आपल्या मळापासून केलेली आहे. ज्या दिवशी गणेशाची निर्मिती झाली तो दिवस माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी हा होता त्यामुळे हा दिवस गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो.माघ शुक्ल चतुर्थीच्या दिवशी जो कोणी गणपतीची मनोभावे प्रार्थना करतो,त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे सांगण्यात येते. माघ शुक्ल चतुर्थीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्व नेहमीपेक्षा एक सहस्त्र पटीने अधिक कार्यरत असते. चला तर मग आज आपण गणेश जयंती आणि तीळकुंद चतुर्थीचे महत्त्व काय आहे ते पाहू.
1. यावर्षीची गणेश जयंती कधी आहे?-
2. गणेश पूजेचा मुहूर्त-
3. गणेश जयंती पूजा कशी करावी?-
4. गणेश जयंतीचा उपवास कसा करतात?-
5.गणेश चतुर्थीचे महात्म्य-
6. तीळकुंद चतुर्थी म्हणजे काय?-
1. यावर्षीची गणेश जयंती कधी आहे?-
माघ शुक्ल चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते. यावर्षीची 2024 ची गणेश जयंती ही 13 फेब्रुवारी रोजी असून,यावर्षी देखील गणेश जयंती सगळीकडे आनंदात आणि उत्साहात साजरी केली जाणार आहे. गणेश जयंतीच्या दिवशी प्रत्येक गणेश मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. गणेश मंदिरात या दिवशी गणेश जन्म साजरा करून प्रसादाचे वाटपही करण्यात येते.
2. गणेश पूजेचा मुहूर्त-
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रत्येक गणेश भक्ताला गणेश जयंतीच्या दिवशी आपल्या आराध्य देवतेची पूजा करायची असेल तर त्यासाठी हा खास शुभमुहूर्त ठरणार आहे.13 फेब्रुवारी 2024 सकाळी 11ः40 पासून दुपारी 2ः 58 पर्यंत या कालावधीत तुम्ही गणेशाची मनोभावे पूजा करून आपली मनोकामना पूर्ण होऊ देत म्हणून त्याच्याकडे प्रार्थना करू शकता.
3. गणेश जयंती पूजा कशी करावी?
गणेश जयंतीच्या दिवशी गणपतीची पूजा ही आपल्या घरात असणाऱ्या धातूच्या गणेश मूर्ती म्हणजेच पितळ,चांदी किंवा तांबे यांची पूजा असते. या दिवशी घरातील गणेशाची मूर्ती घेऊन त्याची एका चौरंगावर एक लाल वस्त्र टाकून विधीवत दह्यादुधाचा अभिषेक करून पूजा करावी. त्यानंतर गणपतीला प्रिय असणारे जास्वंदाचे फूल आणि 21 दूर्वा अर्पण कराव्या, आणि गणपतीला गोडाचा नैवेद्य दाखवावा. या दिवशी अथर्वशीर्षाचे 21 पाठ करणे हे खूप फलदायी असते.या दिवशी तीळगुळाचे विशेष महत्त्व असून गणपतीला नैवेद्य दाखवताना तीळगुळ मिश्रित एखादा पदार्थ दाखवण्याचा मान असतो. महाराष्ट्रात या दिवशी काही ठिकाणी दीड दिवसाच्या गणपतीचे आगमन होते, काही ठिकाणी गणेश मंडळे ही गणपती बाप्पाची दीड दिवसासाठी स्थापना करतात.
4. गणेश जयंतीचा उपवास कसा करतात?-
गणेश जयंती हा गणेश भक्तांसाठी एक मोठा उत्सव असतो. या दिवशी अनेक गणेश भक्त हे दिवसभराचा उपवास करतात म्हणजेच दिवसभर फराळाचे पदार्थ खाऊन एकादशी सारखे हे व्रत करतात. तसेच काही ठिकाणी ही गणेश जयंती विनायक चतुर्थी सारखी केली जाते म्हणजेच संध्याकाळी चंद्रोदयानंतर गणेश जयंती चा उपवास सोडला जातो. या दिवशी तीळ मिश्रित पाण्याने अंघोळ केली जाते
5. गणेश चतुर्थी महात्म्य-
गणेशाने आसुराचा वध करण्यासाठी तीन वेगवेगळे अवतार घेतले.त्यामुळे तीन चतुर्थी साजऱ्या केल्या जातात,जसे की वैशाख पौर्णिमा म्हणजेच पुष्टपती विनायक जयंती.या दिवशी पिठाचा गणपती करून त्याची पूजा करण्यात येते, भाद्रपद चतुर्थी म्हणजेच गणेशोत्सव जो प्रत्येक घरोघरी गणपतीची पार्थिव गणेश मूर्ती स्थापन करून साजरा केला जातो. हा उत्सव महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. प्रत्येक घरोघरी विधीवत मातीच्या गणेश मूर्ती आणून गणपतीची स्थापना करण्यात येते. महाराष्ट्रात विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे हा गणेश उत्सव साजरा करण्यात येतो.या गणेश उत्सवात सार्वजनिक गणेश मंडळे विशिष्ट प्रकारचे देखावे करून गणपतीची स्थापना करतात. निरनिराळ्या प्रकारचे सार्वजनिक उपक्रम ही मंडळे राबविताना दिसून येतात. या उत्सवात स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात येते.दहा दिवसाच्या पूजेनंतर या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात येते. तिसरी चतुर्थी म्हणजे गणेश जन्म म्हणजे गणेश जयंती. गणेश जयंती ही गणेश जन्मोत्सव म्हणून साजरी केली जाते.या दिवशी गणेश जन्माचे व्रत तसेच देवाची विधिवत पूजा केली जाते.
गणपतीने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला होता.म्हणून विनायक चतुर्थी ही जास्त प्रमाणात केली जाते. गणपतीचा जन्मदिवस या विद्येच्या आणि कलेच्या देवतेला प्रसन्न करण्यासाठी भक्तजन व्रत उपासना करून त्याची साधना करताना दिसतात. गणेश चतुर्थी ही गणेश भक्तांसाठी आराधनेचा दिवस असतो.रात्री चंद्रोदयानंतर गणपतीची पूजा आरती करून नैवेद्य दाखवून भक्तजन हा उपवास सोडतात.
गणेश चतुर्थीचे महत्व एक कथा, एकदा गणपती बाप्पा उंदरावर बसून घाईघाईने बाहेर जाण्यासाठी निघाले असता वाटेत पाय घसरून ते उंदरावरून खाली पडतात आणि गणपती बाप्पाला असे खाली पडलेले पाहून चंद्राला हसू आवरत नाही.यावर चंद्र जोरजोरात हसायला लागतो. चंद्राला हसताना पाहून गणपती बाप्पाला भयंकर राग येतो आणि तो चंद्राला शाप देतो. आजपासून तुझे तोंड कोणी पाहणार नाही, जो तुझे कोणी जो तुझे तोंड पाहिल त्यावर खोटा चोरीचा आळ येईल. यानंतर चंद्राने मोठे तप करून गणपतीला प्रसन्न करून घेतले आणि गणपतीने चंद्राला या शापातून मुक्त केले.
एखाद्यावर जर चोरीचा खोटा आळ आला असेल तर त्यानेहे चतुर्थीचे व्रत करावे असे सांगितले जाते.
एकदा श्रीकृष्णाने गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णावर समंयतक मणी चोरल्याचा खोटा आळ आला होता. तो आळ घालवण्यासाठी श्रीकृष्णाने सुद्धा चतुर्थी व्रत केल्याचे सांगण्यात येते.
6) तीळकुंद चतुर्थी म्हणजे काय?
आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सणाचे आणि सणात केलेल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे अनन्य साधारण असे महत्त्व असते. तसेच आपल्या हिंदू शास्त्रानुसार केल्या जाणाऱ्या गोष्टीमागे बरीचशी भौगोलिक आणि वैज्ञानिक कारणे ही आपल्याला आढळून येतात. जसे की पौष महिन्यात तीळ खाणे.पौष महिना म्हणजे थंडी चे दिवस संक्रांतीच्या काळात वातावरण एकदम थंड असते. थंड वातावरणात शरीर गरम राहण्यासाठी आपण काही गरम गोष्टी जर जेवणात वापरल्या तर आपले थंडीपासून संरक्षण होऊ शकते.याच गोष्टीचा विचार करून आपल्या शास्त्रात पौष महिन्यात तीळ खाण्याला महत्त्व दिले आहे.
आपल्याकडे जानेवारीच्या सुरुवातीपासून प्रत्येक घरात तीळाचा वापर चालू होत. पुढे जानेवारी संपल्यानंतर म्हणजेच मराठी पौष महिना संपल्यानंतर माघ महिना चालू होतो. माघ महिन्याच्या शुक्ल चतुर्थीच्या तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. गणेश जयंतीच्या दिवशीही तीळाचे महत्व पुराणात सांगितले आहे.या चतुर्थीला गणेश भक्ताने तीळाच्या पाण्याने अंघोळ करणे तसेच संध्याकाळी गणपतीला नैवेद्य दाखवताना तीळगुळ युक्त गोष्टीचा नैवेद्य दाखविणे. गणेश जयंतीला पुरणाचे मोदक करण्याऐवजी तीळगुळाचे मोदक गणपतीला नैवेद्य म्हणून दाखविण्यात येतात.तसेच तीळगुळाचा वापर या दिवशी उपवासात केला तरी चालतो म्हणून या चतुर्थीला “तीळकुंद चतुर्थी” देखील म्हणतात.
गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या तो दिवस म्हणजे गणेश जयंती विद्येचा दाता असणारा गणपती भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या दिवशी अथर्वशीर्ष पटनाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. सततच्या अथर्वशीर्ष पठणाने उच्चार स्पष्ट होतात तसेच वाणीत गोडवा निर्माण होतो म्हणून अथर्वशीर्ष पटनाचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगण्यात आले आहे.
हिंदूधर्म शास्त्रातील Ganesh Jayanti 2024 विविध माहितीसाठी तसेच लेखन क्षेत्रातील विविध संधी बद्दल माहिती देणाऱ्या लेखांसाठी आमच्या लेखक मित्र या वेबसाईटला भेट देत रहा. माझा लेख कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला या लेखाबद्दल काही सूचना करायच्या असतील तरी तुमच्या सूचनेचे स्वागतच राहील. अशाच नवनवीन गोष्टीसाठी आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.
Adv.विनिता झाडे मोहळकर.
खूपच उपयुक्त माहिती