कथेचे नाव – कांदेपोहे l Valentine Day special Story in Marathi

WhatsApp Group Join Now

              एक खुसखुशीत कौटुंबिक कथा: ” काय ग इतकी चिडचिड करत असतेस हल्ली ? काही बोललं की खेकड्यासारखी वाकड्यात का जातेस ? तो खेकडा पण आपल्या आईवडिलांशी प्रेमाने बोलत असेल.” 

              श्वेताच्या वाक्यावर नेत्राला हसू तर आले होते तरीही ती रागातच बोलली, ” गप ग आई ! माझ्या अजून डोक्यात जाऊ नकोस. तो शोधला आहात ना तुम्ही दोघांनी स्वतःसाठी जावई ? इतका ओल्ड फॅशन्ड असेल असं वाटलं नव्हतं. आता तर म्हणतो, आपले विचार पटले आहेत, आपली मते पटली आहेत तर आता आपल्या पालकांना आपला होकार सांगून लग्नाची बोलणी करायला सांगूया; पण आपण आपल्या लग्नाची बोलणी टिपिकल ‘ कांदेपोहे ‘ टाइप करूया. किती जुनाट आहेत त्याचे विचार. मला तर नाही पटलं. मी सांगून टाकलं त्याला मला हे असलं काही जमणार नाही. मी त्याला म्हटलं की, आपल्या दोघांच्या आईवडिलांना घेऊन आपण एखादया हॉटेलमध्ये भेटू आणि बोलू; पण त्याला ते पटत नाही. तो म्हणतो की, जुन्या परंपरेनुसार एक मज्जा म्हणून हा अनुभव घ्यायला काय हरकत आहे ? हॉटेलमधल्या चर्चेला थोडंच घरातलं स्वरूप प्राप्त होणार का ? आज तर मी त्याला ह्या गोष्टीवरून नकार द्यायचा ठरवते आहे.” 

Valentine Day special Story in Marathi

               ” अच्छा ! असं आहे तर ? ठीक आहे. मी मुलीला बघण्याच्या कार्यक्रमात ‘ कांदेपोहे ‘ का केले जायचे त्याची गंमत सांगते. हं ! पण नीट ऐकून घेणार असशील तरच.” श्वेता म्हणाली. 

               ” काय असायची गंमत ?” नेत्राने तिच्या आईला विचारले.

               ” पूर्वी कोणाकडे फोन नव्हते, नाही चांगली हॉटेल्स, नाही मॉल्स. मग दोन्हीकडच्या मध्यस्थीमार्फत मुलीच्या घरी कांदेपोह्यांचा कार्यक्रम केला जायचा. आपली मुलगी आता दुसऱ्यांच्या घरी जाणार. तिथल्या माणसांच्या स्वभावाशी तिला मिळतेजुळते करून घ्यावे लागणार ह्यासाठी त्या उपवर मुलीच्या आईला काळजी तर वाटतच असणार ना ? तिला आधीच ह्या गोष्टींची जाणीव असावी म्हणून हा कांदेपोह्यांचा खटाटोप. त्या कांदेपोह्यातील जिन्नसामध्ये माणसांच्या स्वभावाची सरमिसळ असते.” श्वेता म्हणाली.

                ” ती कशी काय ?” नेत्राने विचारले.

                 ” तेच तर सांगते आहे ना ? बघ हं ! आता पोहे करायला घ्यायचे म्हणजे त्यात आपण घालतो कांदा, बटाटा, मिरची, कडीपत्ता, शेंगदाणा, राई, जिरे, हळद, हिंग, चवीला साखर, कोथिंबीर, वर पेरायला खोबरे, लिंबू आणि सगळ्यात महत्त्वाचं मीठ. बघ हां आता हे सगळे जिन्नस मानवी मनाच्या स्वभावाची सरमिसळ कसे असतात ते तुला सांगते.मुलगी नवीन लग्न होऊन सासरी जाते. तिथे कोणी तिला काही बोलले की कांदा चिरताना कसा डोळ्यांत पाणी आणतो तसे तिच्या डोळ्यांत टचकन पाणी येते. बटाटा बिचारा सगळ्या पदार्थात ऍडजस्ट होतो एखाद्या स्त्रीसारखा. तिखट मिरचीप्रमाणे झोंबेल असे काहींचे स्वभाव असतात. चवीला मिरची तिखट त्याप्रमाणे काहींचे बोलणे तिखट असते. एखाद्या माणसाची काही किंमत नसते तसेच या कडीपत्त्याचे होते. त्याच्यामुळे एखादया पदार्थाला खमंग फोडणी येऊनसुद्धा खाताना मात्र त्याला बाजूलाच सारले जाते. शेंगदाणा म्हणजे घरातली रुबाबदार व्यक्ती. तडतड करणारी माणसे असतात ना त्याप्रमाणे असते राई.जिरं एकदम शांत. गरम तेलात फुलून स्वाद पसरवणारं.

हळद म्हणजे औषधी. आजीच्या बटव्यामधली. स्वयंपाक घरात सुरीने, विळीने बोट कापले तर पहिली आठवते ती हळद. ती फर्स्ट एडचं काम करते. जखम त्वरित भरते. एखादया अनुभवी नर्ससारखी. हिंग म्हणजे उग्र पण तेवढाच गुणकारी. चवीला साखर म्हणजे संसारातील गोडवा. कोथिंबीर नाजूकसाजुक. स्वाद वाढवणारी. खोबरे म्हणजे सात्त्विक. अगदी मायेचे. एखाद्या आजीआजोबांसारखे. प्रेमाची पाखर घालणारे. पोह्यांवर पिळायला लिंबू लागतेच. संसारात आंबट – गोड घटना घडतचं असतात. त्याप्रमाणे आजूबाजूला आंबट गोड माणसे सभोवताली असतात.

आणि आता शेवटी उरले ते म्हणजे मीठ. मीठ म्हणजे घरातील स्त्री. मीठ नसेल तर जेवण बेचव होते. मिठामुळे सर्व पदार्थांना चव येते. त्याप्रमाणे स्त्री ही मिठाप्रमाणे आंबट, गोड, तिखट, तुरट, कडवट कुठल्याही स्वभावाची माणसे आजूबाजूला असुदेत त्यांच्याशी जमवून घेते, जुळवून घेते. त्यांच्यामध्ये मिसळून संसारातील स्वाद जपते. समजलं का नेत्राबाई कांदेपोह्यांचं महत्त्व ?”

                    ” ओएमजी ! आई तू इतकं भन्नाट समजावून सांगितलंस. मी आजच ऋषीला सांगते की आपल्या लग्नाची बोलणी ‘ कांदेपोहे ‘ टाइप करूया.” खूश होऊन नेत्रा ऋषीला भेटायला गेली. 

                   इतका वेळ मायलेकींचे बोलणे नेत्राचे बाबा सुशीलदादा ऐकत होते. नेत्रा घराबाहेर गेल्यावर त्यांनी त्यांच्या बायकोला विचारले, ” श्वेता ! हे जे कांदेपोह्यांविषयी तू सांगितलंस तर खरंच त्यामागचा उद्देश असाच होता का ? 

                  ” कुठलं काय ?  जे काही सुचलं ते नेत्राला सांगितलं इतकंच.” श्वेता म्हणाली.

                    ” असं का केलंस तू ?” सुशीलदादा म्हणाले. 

                     ” अहो ! एवढ्याश्या क्षुल्लक कारणावरून नेत्रा ऋषीला नकार देणार होती. त्या ऋषीमध्ये नाकारण्यासारखं काहीतरी आहे का ? एकतर तो माझ्या मावशीच्या नणंदेचा मुलगा म्हणजेच नात्यातला आहे. त्यात ती वेल सेटल्ड फॅमिली आणि एकदम सज्जन माणसं. आपल्या लेकीला कुठलीतरी झळ लागणार आहे का पुढच्या आयुष्यात ? मुलगा तर लाखात एक आहे. इतकं सगळं चांगलं असून देखील ही नेत्रा त्याला नकार देऊन बसली असती. आपण पालक म्हणून आपल्या मुलांच्या भविष्याचा खोलवर विचार करतो कारण चांगले वाईट अनुभव घेऊन आपण परिपक्व झालेले असतो. त्यामुळे असे वाटत होते की हे स्थळ हातचे जाऊ नये म्हणून हा सारा खटाटोप केला.” श्वेता सुशीलदादांकडे पाहून मिश्किल हसली.

                 ” खरंच ! ग्रेट आहेस तू. चला आता ‘ कांदेपोह्यांचा ‘ दिवस ठरवूया.” सुशीलदादा म्हणाले.

                  तसाही  ‘ व्हॅलेंटाईन डे ‘ जवळच येऊन ठेपला होता म्हणून तोच दिवस लग्नाची बोलणी करण्यासाठी ठरवला गेला. त्या दिवशी रात्री बारा वाजल्यापासून ते ऋषी आणि त्याची फॅमिली घरी येईपर्यंत नेत्रा ऋषीच्या मेसेजची वाट पाहत होती की, ऋषी आता व्हॅलेन्टाईन डे विश करण्यासाठी आपल्याला मेसेज वगैरे पाठवेल; पण असे न झाल्याने ती थोडी खट्टू झाली होती. ऋषी आणि त्याच्या घरातील लोक बरोबर चार वाजता नेत्राच्या घरी हजर झाली. श्वेताची मावशी देखील मध्यस्थी म्हणून आली होती. 

                नेत्राने जांभळ्या रंगाची साडी नेसली होती. नाजूकसे मोत्यांचे दागिने घातले होते. केसांची वेणी घालून त्यावर गजरे माळले होते. अतिशय सुंदर दिसत होती नेत्रा. ऋषी तिच्याकडे पाहतच राहिला होता. तिच्या गहिऱ्या, घाऱ्या डोळ्यांत डुबून जावे असे एक क्षण ऋषीला वाटून गेले.

                  खूप छान पार पडला कांदेपोह्यांचा औपचारिक कार्यक्रम. सगळ्यांनी खूप एन्जॉय केले. साखरपुडा, लग्न कुठे करायचे वगैरे ठरविण्यात आले. लग्नासाठी चांगला मुहूर्त काढण्यात आला. 

                 ” बरं ! मी नेत्राला फिरायला नेऊ शकतो का ?” ऋषीने नेत्राच्या आईवडिलांना विचारले.

                  ” हो हो ! जरूर.” सुशीलदादांनी होकार भरला.

                 ” ऋषी, तू नेत्राला घेऊन जा. आम्ही इथे थांबतो थोडावेळ. थोडया गप्पा मारून निघू नंतर.” ऋषीचे वडील म्हणाले.

                  पडत्या फळाची आज्ञा पाळून ऋषीने लगेचच नेत्राला गाडीत बसण्यास सांगितले. ” नेत्रा, तुझ्या पाठीमागे बघ तुझ्यासाठी सरप्राईज आहे.” 

               नेत्राने मागच्या सीटवर पाहिले असता एक मोठा टेडी बिअर, गुलाबांच्या फुलांचा मोठा बुके आणि फरेरो रोशर चॉकलेटचा मोठा बॉक्स तिला दिसला. 

                ” अय्या ! हे सगळं माझ्यासाठी ?” नेत्राने उल्हसित होऊन विचारले.

                ” हॅप्पी व्हॅलेन्टाईन्स डे डिअर.” असे म्हणून ऋषीने तिला मिठीत घेतले, तिच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि तो म्हणाला, ” नेत्रा मी तुला प्रॉमिस देतो की, एक नवरा म्हणून मी तुझ्यावर कधीच हक्क गाजवणार नाही. आपले संबंध कायम मैत्रीचे असतील. तुझ्या जीवनात कुठलेही दुःखाचे प्रसंग मी येऊ देणार नाही. तुझ्यापाठी मी कायम भक्कमपणे उभा असेन.” 

                 ऋषीच्या वर्तनाने नेत्रा मोहरली आणि आपल्या आईवडिलांची निवड किती योग्य आहे हे तिला जाणवले. मनातल्या मनात मनापासून तिने तिच्या आईवडिलांना धन्यवाद दिले. आज तिला तिचा सच्चा आणि प्रामाणिक व्हॅलेंटाईन ऋषीच्या रुपात लाभला होता.

समाप्त

कथा (Valentine Day special Story in Marathi) कशी वाटली जरूर अभिप्राय द्या. वाचकांच्या अभिप्रायाने आम्हा लेखकांना हुरूप येतो. अशा अनेक प्रकारचे माहितीपूर्ण लेख आणि सुंदर सुंदर कथा वाचण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि आमचा व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा.

महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)  

19 thoughts on “कथेचे नाव – कांदेपोहे l Valentine Day special Story in Marathi”

  1. Mrs.Prajakta Shriram Padwal

    खूपच छान कथा , खुसखुशीत मनाला भावली. अश्याच सुदंर कथा लिहीत रहा नेहा ( अंजू)

  2. सीमा प्रकाश गंगाधरे

    व्वा आईने मस्त कल्पनेने कांदे पोह्याचे महत्त्व पटवून दिले आणि एक नकार होकारात बदलला. खूप सुंदर

  3. Anupama potphode

    छान.. कांदे पोहे सारखीच खमंग कथा वाटली.. उपमा छान दिल्या आहेस 👌👌

  4. अरुण समेळ

    सौ. नेहा उजाळे या नवीन व होतकरू लेखिकेची “कांदेपोहे” ही अतिशय छान व खुसखुशीत कथा नुकतीच माझ्या वाचनात आली. कांदेपोहे हा कार्यक्रम आपल्याला माहीत असतोच, पण त्या मागील उद्देश लेखांतील आईने अगदी छान स्पष्ट केला आहे. सगळ्या जिन्नसांचा संबंध माणसांच्या स्वभावाशी जुळवून खुप मजा आणली आहे. कांदा, बटाटा, मिरची, कढीपत्ता, मीठ, इत्यादी जिन्नसांची माहिती आवडली. सर्वांत मुख्य गोष्ट म्हणजे मुलीच्या नकाराला होकारात बदलण्याचे आईचे कौशल्य लेखिकेने सुंदर रीतीने दाखविले आहे. 1974 साली झालेल्या माझ्या कांदेपोहे कार्यक्रमाची मला आठवण झाली व माझे मन क्षणभर मोहरले. कथा मला फारच आवडली.

    1. मनःपूर्वक आभार काका, आपण कायम सुंदर प्रतिक्रिया देऊन मला प्रोत्साहित करता. मी तुमच्या प्रतिक्रियेची कायम वाट पाहत असते. धन्यवाद 😊🙏

  5. मनःपूर्वक आभार काका, आपण कायम सुंदर प्रतिक्रिया देऊन मला प्रोत्साहित करता. मी तुमच्या प्रतिक्रियेची कायम वाट पाहत असते. धन्यवाद 😊🙏

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top