मराठी कथा डोंगर वाट

WhatsApp Group Join Now

दुःखाने भरलेल्या जीवाची हृदय पिळवटून टाकणारी मराठी कथा: रात्र वाढत होती. गर्द रानानं व्यापलेल्या त्या रानात रातकिड्यांचा अखंड नाद उमटत होता . हवेतला गारवा जाणवत होता . पारू घाई घाई डोंगर उतरू लागली.  आज कुरणात जाऊन गवताचा भारा आणायला पारुला चांगलाच उशीर झाला होता . पण तिची आणि डोंगर दऱ्याची घनिष्ठ मैत्री .पाऊलवाट पायाखालची होती त्यामुळे ती इकडं तिकडं न पाहता झप – झप चालली होती. अंगाला दरारून घाम आला  होता.

              आता पारू डोंगरउतार झाली . तिच्या पायात गोळे आले होते . डोक्यावरच्या भाऱ्याने मान अवघडली होती. पायात चप्पल नव्हती.परकरचा एक सोगा तिने पाठीमागच्या बाजूला खोचला होता . पायावर काट्या – कुट्यांनी ओरखडे काढले होते. पण पारूला या सगळ्याची सवय झाली होती .

               पारू ही जेमतेम तेरा वर्षाची . आई – वडीलांचे  लहानपणीच निधन झाले. छोट्या भावाची जबाबदारी पारुवर येऊन पडली होती .तिचा भाऊ सोमु हा सहा वर्षांचा होता. पारू ही शाळेत जात नव्हती. घर खर्च चालवण्यासाठी आणि सोमुला शाळा शिकवण्यासाठी पारू ही डोंगरांच्या कुरणांमध्ये जाऊन गवतांचा भारा  घेऊन येत होती. आणि वस्तीत असलेल्या जनावरांसाठी ती भारा विकत होती . आता वस्तीवरच्या लोकांनाही पारूच्या कामाची सवय झाली होती . कमी वयातच आलेली समज आणि मेहनत हे तिच्या अंगी ठासून भरले होते.  पारूच्या शेजारी राहणाऱ्या फुलाआजी त्या फक्त म्हणायला शेजारी परंतु त्या पारूकडेच राहत असत . आजीलाही स्वतःचं असं कोणीही नव्हतं . पारू  कुरणांमध्ये गेल्यावर  फुलाआजीही  सोमुची चांगली काळजी घेत असे . ती त्यांच्यावर नातवंडाप्रमाणे प्रेम करत होती . सकाळची कामे आटोपून पारू दिवसभर डोंगराच्या कुरणांमध्ये गवत कापत. सर्व डोंगर माळ आता तिच्या परिचयाचा झाला होता.तीस – चाळीस घरांची वस्ती .ती ही डोंगराच्या कुशीत वसलेली .वस्तीतले लोक दुधाचा व्यवसाय करत. ज्या घरामध्ये माणूसबळ जास्त ते लोकं कुरणात जाऊन गवत घेऊन येत.परंतु ज्या लोकांना शक्य नाही त्यांना पारू आणून देत असे . आज पारू कड्यावर गवत आणायला गेल्यामुळे तिला दिवस तेथेच मावळला . पारू आता वस्तीत आली.

” नाना…. आवं…. नाना…. गवत टाकलयं  ” असं म्हणत पारूने परकरचा सोगा सोडला .आणि त्याने तोंडाचा घाम टिपू लागली.

” काय गं पोरी  यायला लई गडात पाडलं?” नाना हातातलं दावं विणत बाहेर आले आणि बोलले.

आवं नाना आज पार कड्यावं   गेलेते .” तिकडं गवात चांगलं वाढलं व्हतं.” पारू कपडे झटकत म्हणाली.

    “आरं लेकरा ,अंधार लईच दाटलाय.जनाराचं भ्या वाटातं . आनं तुझा जीव लई बारीक .किती तरास कढीती पोरी .” नाना केविलवाणे पारुकडे पाहत बोलले.

“काय करता नाना सोमु लई बारीक हाय त्याला जपाया नगं का ? त्याची काळजी घ्यायला नगं का ? त्याच्यासाठी कराया पाहिजे .” पारू म्हणाली. “आता यु का? सोम्या वाट बघत आसल ” परकर खोचत पारू  म्हणाली.

” व्हय व्हय लेकरा जा भूक लागली आसल ना ? आनं फुलाआजी बी वाट बघत आसल.”  “व्हय”असं म्हणून  पारू पटापट तेथून निघून गेली.

         पारू घरी पोहचली. घर कसलं . मोडकळीस आलेलं झोपडं … पालापाचोल्याने छप्पर शेकारलेलं,दहा ठिकाणी  भगदाड पडलेल्या मातीच्या भिंती .पावसाळा आला तर रात्र बऱ्यापैकी ही जागुनच काढावी लागत असे. घराची डागडुजी करण्यासाठी पुरेसे पैसेही जवळ नव्हते . एवढसं ते लेकरू करून करून काम करणार तरी किती? फुलाआजी पार थकलेली. पारु घरात गेली . आजीने कसंबसं जेवण बनवून ठेवले.

  ”   आज्जें कशापायी जेवान  बनवून ठेवलं .” मी आल्यावं केला आस्तां की सयपाक ”  . पारू म्हणाली.

” आगं  पारू जीव पार टांगणीला लागला व्हता गं .किती येळ लावला यायला.तू दुसरं काम बघ बया.मला त कापरचं भरलय अंधार बघून “.आजी पारुला पाणी देत म्हणाली.

“आगं आज्जे याच्यातच जरा बरं पैसं मिळत्यात.आण सोपाना बी आसतो की बरोबर. आज त्याला बरं नव्हतं वाटत म्हणून नाय आला तो.” तांब्या फळीला लावत पारू बोलली.

“जा पण बाई दिवस जायच्या आत ये घरला.डोंगरावर लई जनारं वाढल्यात “.ताटात भाजी वाढत आज्जी बोलली.

“नग काळजी करू  “पारू म्हणाली .   पारू वयामानाने  भरपूर काम करत होती. दिवस पाहत नव्हती का रात्र ..
           एक दिवस पारू आणि सोपाना डोंगर चढत होते. सोपाना पारुपेक्षा वयाने लहान.तो आईसोबत राहत होता .त्याला वडील नव्हते. आईला आर्थिक मदत म्हणून तो पारू सोबत कधीतरी  डोंगरांच्या कानाकोपऱ्यात गवत आणायला जाई .उन्ह चांगली तापली होती.पाखरांचा चिवचिवाट सगळ्या रानात घुमत होता. रानमेव्याचा वास हा सर्वत्र दरवळत होता. कोवळे लुसलुशीत गवत  वाऱ्याच्या दिशेने असे सळसळत होते. जणू त्या पाण्यावर उठणाऱ्या लाटांप्रमाणे भासत होते. पारूला सर्व डोंगराच्या पायथ्यापासुन  सुळक्यापर्यंतचा कानाकोपऱ्यातला भाग न भाग महितीतला होता.तिला त्या कामाची एवढी सवय झाली होती की ती घरी कमी आणि डोंगराच्या रानातच जास्त असायची . आणि ती डोंगरवाट तिला जिथे जायचं तिथे घेऊन जात होती.

        सोपाना पुढे आणि पारू त्याच्या मागे डोंगराची चढन चढताना अचानक पारूच्या तोंडून  “आई गं  ” शब्द निघाले.सोपानाने मागे पाहिले तर पारू पाय धरुन खाली बसली.
“काय गं ताई? काय झालं.” सोपानाने विचारलं.

“काटा भरला रं!”  चेहऱ्याचे भाव बदलून पाय हातात धरत पारू बोलली. सोपाना मागे आला तर पारूच्या पायातून भळाभळा रक्त वाहू लागले. पायाला पडलेल्या भेगांमध्ये नेमका काटा भरला  होता. सोपानाने पाय हातात घेतला.पारू विव्हळत होती.टाचच्या जाड कातडी फाटून आतल्या पातळ झालेल्या चामडीत तो काटा रुतून बसला होता. सोपाना हळूच तो काटा काढू लागला.पारू मात्र तडफडत होती. गरिबीला लागलेल्या आगेमुळे पायतानाचे सुखही पारूच्या नशीबात नव्हतं. लहान जीवाला  खूप मोठी कामगिरी पार पाडायची होती. तिला कसलीही भीती वाटत नव्हती.   दोघेही पाहिजे त्या ठिकाणी पोहचले .भाराभर  गवत घेऊन झाले.दोघांच्याही घशाला कोरड पडली. जवळच डोंगराच्या कुशीत झरा वाहत होता .त्या झऱ्याचे गोड पाणी पिऊन मन तृप्त झाले. थोडा शिनभाग  उतरला. गवताचे भारे आवळले. आणि दोघेही खालच्या दिशेने चालू लागले. डोंगरावरून खाली उतरताना जणू कोणी  मागुन ढकलत होते. डोंगर चढताना वेगळ्या वाटा आणि उतरताना वेगळ्या वाटा . पारूने जणू सगळ्या डोंगरवाटांचा खोल अभ्यास केला होता.लहान वयात बऱ्याच गोष्टी अवगत झाल्या होत्या.सर्व काही जणू डोंगरदऱ्याचं  शिकवत होत्या.

       पारू फक्त  झोपण्यासाठीच घरी येत असे. दिवसभर गवतासाठी तिची  वणवण चाले .सर्वकाही छोट्या भावासाठी जीवाचा आटापिटा! “सुख” हा शब्दच जणू तिच्या आयुष्यातून वगळला होता. पारूची झोपडी एकदम डोंगराच्या कुशीत होती. त्या वस्तीला तिन्ही बाजूंनी डोंगरांनी घेरलेले होते. दरोरोजच्या कामांनी पारू शिणून गेली होती. तसे तर तिचे खेळण्या – बागडण्याचे दिवस ! पण तिला कामाने घेरले होते.बरोबरच्या मुली  आईला घरकामात मदत करत , शाळेत जात .परंतु पारूचे जीवन वेगळेच वळण घेत होते. तिच्या भावाने सोमुने तिला ताई नाही तर आईच मानले होते .

            आता उन्हाळा संपून  वळीवाची चिन्हे दिसू लागली.पारूने लगबगीने सगळी कामे आवरली. छोटंसं झोपडे सारवून घेतलं .पारू सगळ्यांची मदत करी म्हणून तिला सर्वजण काहीना काही देत . “आगं पारू बाळा आज जरा लवकर जा गवतांसी ,वळीव कधी बी ढसळण “भांडी घासत आज्जी बोलली.
“व्हय आज्जे तू सोमुला लांब कुढं पाठू नगं  म्या येते लगीच”गवताची चऱ्हाटे गुंडाळीत पारू म्हणाली.

  “सोपाना…..ये …सोपाना.. सोपनाच्या  घराबाहेर उभे राहून पारू आवाज देऊ लागली.

“पारू आज सोपाना नाही येणार तो तापाने फणफणलाय “सोपनाची आई म्हणाली .

पारू आत गेली तिने त्याची चौकशी केली आणि ती तिच्या कामाला निघाली.सोपनाला त्याच्या आईचा आधार होता.तो कधी जायचा तर कधी जातही नसे. परंतु पारूला यातून सुटका नव्हती . तिला ते नित्यनियमाने करावेच लागे.

“लेकरा लवकरच माघारी फिर दिस फिरलत आता” सोपनाची आई काळजीनं म्हणाली.”व्हय काकू” म्हणत पारू झपा – झप निघाली.

         आज सूर्यनारायण चांगलीच आग ओकत होता. झाडे झुडपे पार कोमेजून गेले होते. आज गवताच्या काड्या न काड्या सुखल्या होत्या.चढण चढताना आज पारुला लईच दमछाक झाली.तिचा श्वास कोंडू  लागला. ती दाट झाडाच्या सावलीत थोडी  विसव्याला बसली.बोरीच्या झाडाखाली बोरांचा सडा पडलेला होता. लाल, पिवळ्या बोरांचा वास सगळीकडे दरवळत होता.दोन चार बोरे घेऊन पारूने खाल्ली. आणि पुन्हा चढायला सुरुवात केली. आज चिन्हे काही वेगळीच होती. दुपारच्या दोनच्या सुमारास ढगांनी जमायला सुरुवात केली .एकदम वातावरण बदलून गेलं.ढग कालवायला सुरुवात झाली.

              दुपारपर्यंत उन्हाचा तडाखा आणि आता भयाण शांतता. पारुचा जीव आता घाबरा झाला. आज तिला कोणाचीही सोबत नव्हती.पारू सरा – सर गवत कापत होती.घामाने डबडबलेल्या चेहऱ्यावरचे चिटकलेले केस हाताने बाजूला करत होती.राहून राहून घशाला कोरड पडत होती. ढगांचा एकच आवाज झाला.तसे पारूने दचकून वर पाहिले. काळया ढगांनी गर्दी केली.आता मात्र पारू उठून उभी राहिली.एक नजर तिने सगळीकडे फिरवली.एका दिशेला पावसाने फळी धरली होती .पारू बरच अंतर कापून डोंगराच्या माथ्यावर आली होती.आज पुरेस गवतही कापून झाले नव्हते.जशी ढगांची कालवाकालवी झाली तशी पारूच्या मनात विचारांची कालवाकालवी झाली.

          सर्व निसर्ग जणू तहानलेला .आज त्याची तृष्णा मिटणार होती. सगळी जीवसृष्टी पावसाच्या प्रतीक्षेत होती. पारूला घरची ओढ लागली होती.तिला डोंगर उतरणीला दोन ते तीन तास लागणार होते.तेवढ्यात पानवारा सुटला .ढगांचा गडगडाट चालू झाला.पारुने घाईघाई जमा झालेल्या गवताचा भारा बांधला.वाऱ्याच्या वेगामुळे डोक्यापर्यंत भारा काही केल्या जाईना.कसाबसा तिने तो डोक्यावर घेतला. पण वाऱ्याचा वेग एवढा वाढला की पारुला काही केल्या चालवेना.आता तुंबलेल्या मेघा बरसू लागल्या.पारूची तारांबळ उडाली.कधी डोंगर रानाला न घाबरणारी पारू आज भेदरून गेली. आक्राळविक्राळ रूप घेतलेल्या त्या आस्मानी संकटात पारू अडकली. तिला चिंता लागली ती घरी असलेल्या तिच्या भावाची . तीनच्या सुमारासही चहूकडे अंधार दाटला होता.पावसाचा वेग वाढू लागला.काही अंतरापर्यंत पारुने गवताचा भारा नेला. पण आता काही केल्या तिला पुढे जाता येईना.

              विजांचा लखलखाट होऊ लागला. ढगं जोरजोरात एकमेकांवर आदळू लागली. पारूला धडकी भरली.विजांच्या कडकडाटासह वाराही सुसाट वाहू लागला. तशी पारूची घालमेल वाढू लागली. डोक्यावरचा भारा कधीच पडून गेला होता.पारुला मोकळेच चालत येईना.ती घडपडू लागली.आज  तिच्या सोबतीलाही कोणी नव्हते.पावसाने रुद्र रूप धारण केले होते.पारूचे चित्त काही थाऱ्यावर नव्हते .ती पाऊस उघडण्याची वाट पाहू लागली.पण पाऊसाचा  जोर वाढतच होता.धडपडत पारू डोंगराच्या कपारीपाशी आली.रात्रभर ती कपारीच्या आडोश्याला थांबली. आता ती जोरजोरात रडू लागली. परंतु ती तिचा आवाज दाबत होती. ती मनात म्हणू लागली. “सोमु आनं फुलाज्जी वाट बघत आसल,आता काय करू म्या ?” तिची अवस्था बिकट होती .पाऊस काही उघडण्याचं नावचं घेत नव्हता.त्या कपारीत ती अंगाचं मुटकं करून बसली .किती दिवसाच्या शिनभागाने पारुला तिथेच झोप लागली.विजांच्या लखलखाटाने पारूचा  चेहरा उजळून जात होता. धो धो पावसाने पारुला पूर्ण भिजून टाकलं होतं.

               तांबड फुटलं. पारुला जाग आली. सगळं वातावरण आता शांत झालं. झरे वाहू लागले.पारुला  घरी जायची ओढ लागली.तिने तोंडावर आलेली केस मागे केली .ती पटापट डोंगर उतार  झाली .भावाची ओढ तिला खाली खेचत होती.आता वस्ती जवळ आली होती .पारूच्या पायात गोळे आले.सर सर डोंगर उतरून ती खाली आली.आणि समोरचं दृश्य बघून  पारूने मोठी किंकाळी फोडली. दरड कोसळून सगळी वस्ती डोंगराने आपल्या कुशीत सामावून घेतली होती. कायमची…………

       तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की कळवा.आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका.अशाच नवनवीन कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू . याचा लाभ घेण्यासाठी आमच्या “लेखक मित्र “या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा ” WhatsApp “ग्रुपही जॉईन करा.
         धन्यवाद !

महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)  

6 thoughts on “मराठी कथा डोंगर वाट”

  1. खुप सुंदर कथा, डोळ्यातून पाणी आले खरंच खुप खुप सुंदर अप्रतिम लेखन केल आहे, शब्द कमी पडत आहे, काय बोललं पाहिजे.

  2. सौ. राधिका जोशी

    सगळा प्रसंग डोळ्यांपुढे उभा राहिला👌👌

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top