“अरे अरे रडत का आहात असे ? कोणी काही बोलले का ? की मा*र*ले कोणी तुम्हाला ? आणि हा काय अवतार करून घेतला आहे बरं ? ” कधीपासून भोकाड पसरुन रडणाऱ्या काना आणि मात्रा यांना पहिली वेलांटी रडण्याचे कारण विचारत होती पण ; काना आणि मात्रा मात्र रडण्याशिवाय काहीही करत नव्हते. विचारून विचारुन वेलांटी कंटाळली आणि शेवटी न राहवून दोघांवरही चिडली.
” शांत बसा ! काय रडगाणे लावले आहे ? सांगत तर काहीच नाही तुम्ही “. वेलांटीचा हा असा रुद्रावतार पाहून काना आणि मात्रा क्षणात तोंड बंद करून घाबरून वेलांटीकडे पाहू लागले.
” वेलांटी ताई, काय तुला सांगू ? कसे तुला सांगू ? माझी आता बाई मोडणार आहे कंबर आणि या मात्र्याचा जुळा भाऊ होणार आहे छू मंतर ” . काना असे काही बोलताच वेलांटीने डोक्याला हात लावला आणि विचार करु लागली.
” म्हणायचे काय आहे तुला ते समजत नाही मला. नीट जरा सांगशील का प्रसंग कोणता आला ? ” वेलांटीने न समजून विचारताच काना आणि मात्रा एकमेकांकडे पाहू लागले आणि एकसाथ बोलले.
” गोलू निबंध लिहायचा म्हणतोय. हाच बाका प्रसंग उभा राहिला ना ताई. अगं आता हा गोलू निबंध लिहिणार म्हणजे आमची हाडे जागेवर राहणार नाहीत. आम्हाला याच गोष्टीची भिती वाटत आहे “. काना आणि मात्रा बोलत होते पण वेलांटी स्वतःच्याच विचारात हरवली.
” अगं ताई काय म्हणतोय आम्ही ? लक्ष कोठे आहे तुझे ? ” वेलांटीची तंद्री भंग पावली. एव्हाना तिच्या कपाळावर घाम जमा झाला होता.
“अरे माझी तर मान, कंबर, पाय असे सगळेच अवयव मोडणार बहुतेक. हा काना माझ्या पायाशी बांधतो तो गोलू . आता याला रोखायचे कसे ? ” तिघेही विचार करत होते इतक्यात तिथे पूर्णविराम आला आणि त्यालाही या क्षणाची सर्वात मोठी बातमी कानावर पडली. पूर्णविराम सर्वांच्या चेहऱ्यावर दाटून आलेली भिती पाहून मोठमोठ्याने हसू लागला.
” याला हसायला काय झाले ? इथे इतका गहन विषय सुरू आहे आणि याला हसू येत आहे “. काना मात्र्याच्या कानात पुटपुटला.
” अरे मला भिती नाही वाटली. गोलू निबंध लिहिणार आहे तर लिहू दे. मला भिती नाही ” . असे म्हणून पूर्णविराम परत हसू लागला. सगळे त्याच्या कडे रागाने पाहत होते.
“असे रागाने का बघताय ? मला खरच भिती नाही वाटली. का माहिती आहे ? कारण गोलूच्या निबंधात मी नसतोच. गोलूला माझी आठवण येतच नाही. पूर्णपणे विसरुन जातो तो या पूर्णविरामला “. एवढे बोलून पूर्णविराम परत हसू लागला आणि हसत हसत तिथून निघून गेला. काना , मात्रा आणि वेलांटी तो गेला त्या दिशेने पाहतच राहीले.
” आता हा आवाज कोठून येतोय ? कोण असे मुसमुसून रडत आहे बरं ? आणि का रडत आहे ? ” वेलांटी इकडे तिकडे पाहत म्हणाली आणि तिला एका कोपऱ्यात अंगाचे मुटकुळे करून बसलेला अनुस्वार दिसला आणि तिने कपाळावर हात मारला.
“अरे हे दोघे काय कमी होते का जे तू पण रडगाणे लावले. शांत बस ! असे रडून काही होणार नाही. मला माहीत आहे तो गोलू स्वत: तर गोल गोल आहे पण या अनुस्वाराला मात्र कधीच गोलात बसवत नाही आणि याचा अख्खा चेहरा निळ्या शाईत मरकटलेला असतो “. वेलांटीने स्पष्टीकरण देताच काना आणि मात्रा अनुस्वाराचे सांत्वन करु लागले तसा अनुस्वार मोठमोठ्याने रडू लागला आणि त्याच्या सुमधुर आवाजातील संगीताने काना , मात्रा आणि वेलांटी दूर पळाले. पळता पळता मात्रा समोरुन येणाऱ्या उकाराला धडकला आणि धाडकन् जमिनीवर कोसळला .
“आई आई गं ! गोलूच्या निबंधात यायच्या आधीच मोडली की माझी कंबर ! या उकाराला काही म्हणून काही कळत नाही “. मात्रा रागाने बडबडत होता आणि पहिला उकार पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या उकाराकडे पाहत होता तर दुसरा उकार त्याच्या पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या वेलांटी कडे पाहत होता. तिघेही गोलूचे नाव ऐकताच दहशतीने जागीच गोठले होते. भितीने असे थरथर कापू लागले की हाडे मोडल्याचे कडकड आवाज त्यांच्या कानात घुमू लागले. आवंढा गिळत दुसरा उकार बोलू लागला.
“हमममम् गंमत करताय ना सगळे मिळून आमची ? नको रे नको. अशी जीवघेणी चेष्टा नको. सहन नाही होत. कल्पनाच नाही करवत. आम्ही गोलूच्या निबंधात कसे कसे आणि कोठे कोठे बसणार आहोत काय माहित “. अतिशय दुखी स्वरात बोलणाऱ्या उकाराकडे पाहून सर्वांनी नकारार्थी मान हलवली. स्वल्पविराम , उद्गारवाचक आणि अवतरणही अवतरले. सगळे विचारात गुंतले की या गोलूला मराठी निबंध लिहिण्यापासून रोखायचे कसे ?
इतक्यात काही आवाज अगदी तालासुरात ऐकू येऊ लागले आणि आपसूकच सर्वांचे कानही आणि त्यासोबत मानही आवाजाच्या दिशेने वळली. समोरून एकापाठोपाठ एक , सरळ रेषेत , एका ओळीत , गुणगुणत मुळाक्षरे आणि व्यंजने येताना दिसली आणि वेलांटीने जागीच कोलांटी खाल्ली.
अ , आ , इ , ई , क , ख , ग आणि घ तसेच त , थ , द , ध आणि हो ढ सुद्धा आला. प , फ , ब , भ , म सोबत य , र , ल , व , श असे करता करता आज्ञाधारक मुलांप्रमाणे सारी मुळाक्षरे आणि व्यंजने ओळीत उभी राहिली.
वादळापूर्वीच्या शांततेत बसलोय याची जाणीव ठेवत आणि स्वतःच्या अध्यक्ष पदाचा मान ठेवत श्र उभा राहिला आणि बोलायला सुरुवात केली.
” नमस्कार माझ्या बंधू आणि भगिनींनो ! समस्त शब्द , अक्षरे आणि विरामचिन्हांचा मान ठेवत मी इथे चार शब्द बोलू इच्छितो जर शब्दांची परवानगी असेल तर “. श्र असे बोलताच शब्दांनी मान डावीकडून उजवीकडे हलवत परवानगी दिली.
” तर आज आपण सर्वजण इथे जमलो आहोत एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी. विरामचिन्हांची ही अडचण आम्हा अक्षरांच्या आणि पर्यायाने शब्दांच्या लक्षात आली आहे. तर प्रसंग असा आहे की गोलू मराठी भाषेत निबंध लिहिणार आहे आणि विरामचिन्हांचा चेहरा मोहरा बदलणे , त्यांचे स्थान डळमळीत करणे जसे त्याचा हक्क बनला आहे. यावर शोधायचा आहे उपाय ” . श्र बोलतच होता की काना आणि मात्रा एक सुरात ओरडले,
” उपाय एकच ! गोलूला निबंध लिहू द्यायचा नाही. त्याला नाही लिहीता येत. ढ आहे अगदी तो गोलू ! ” . यावर ढ मात्र चमकून पाहू लागला.
” ढ तर मी आहे. तो तर गोलू आहे . मग गोलू ढ कसा असेल “. ढ च्या या स्पष्टीकरणावर सगळे रागात त्याच्याकडे पाहू लागले. तसा ढ हा म शेजारी जाऊन बसला आणि वेलांटीने सुस्कारा सोडला.
” हमम् , बसले आता ढम. म्हणजे ढ आणि म. असे म्हणायचे होते मला ” . वेलांटी ओशाळून म्हणाली.
“हे बघा , मला मान्य आहे की गोलू चुकतो पण ; म्हणून काय त्याला चुका सुधारण्यासाठी आपण मदत करायची नाही का ? त्याला संधी द्यायची नाही का ? “.कळवळीने ज्ञ म्हणाला.
” हे बघा ज्ञान या शब्दाची सुरूवात आहे मी . न सोबत या कानालाही मी माझ्या सोबत घेतले तर बनतो ज्ञान. तसेच या श्र सोबत वेलांटी आणि काना आले असता श्र चा श्री झाला आणि श्री म्हणजे आपले आराध्य दैवत गणेश. बुध्दीची देवता गजानन. विरामचिन्हे , अक्षरे , शब्द आपण सगळे तर साक्षात सरस्वती मातेच्या मुखात विराजमान आहोत आणि भगवान गणेश आणि देवी सरस्वतीची उपासना करणाऱ्या भक्तांवर आपण असे राग धरू नाही शकत. उलट आपण त्यांना मदत करायला हवी. मैत्री करायला हवी त्यांच्याशी. मग बघा चित्र कसे बदलते ” . ज्ञ सर्वांना समजावत म्हणाला.
“पण ; म्हणजे काय करायचे आपण ? हा गोलू तर आपल्याला अगदी तोडून मोडून ठेवतो. कधी कधी तर गायबच करतो “. स्वल्पविराम आणि अवतरणे एकमेकांकडे पाहत बोलले.
” म्हणून काय त्याला निबंध लिहिण्यापासून परावृत्त करायचे ? चुकेल तेव्हाच तर शिकेल पण ; तुम्ही त्याच्यावर असे नाराज झाला तर तो तुमची वाट सोडून देईल. असे होता कामा नये. गोलू निबंध लिहायचा प्रयत्न करतोय तर त्याला यापासून परावृत्त करण्यापेक्षा प्रोत्साहन देणे गरजेचे आहे “. श्रचे म्हणणे सर्वांना पटत होते पण ; तरीही किंतु परंतु मनात होतेच.
” सगळे जरी खरे असले तरी गोलूला आपले महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे. जितके गोलूचे निबंध लिहिणे महत्त्वाचे आहे तितकेच महत्त्वाचे आहे त्याने तो नीटनेटका , सुंदर आणि व्याकरण जाणून लिहिणे. अक्षर आणि शब्दांची योग्य जुळवाजुळव करून लिहिणे ” . उकाराने आपले मत मांडले आणि सर्वांनी त्याला दुजोरा दिला.
“हो , हे मात्र बरोबर आहे. यासाठीच सांगतोय की गोलू वरती रुसू नका. सतत त्याच्या सोबत रहा. गोलू पासून दूर नका जाऊ. सतत लिखाणाच्या सरावाने त्याची आपल्याशी चांगली मैत्री होणार आहे. त्यामुळे लिहू द्या गोलूला निबंध आणि चुकूही द्या. चुकलेली विरामचिन्हे , चुकलेली अक्षरे तो पुन्हा पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न करेल. आता याचा थोडा त्रास होईल तुम्हा सर्वांना पण ; शेवट नक्की गोड असेल “. श्र आणि ज्ञ सर्वांना समजावून सांगत होते आणि सगळे मन लावून ऐकत होते.
धडाम् ! जोरात काही तरी पडल्याचा आवाज आला. आवाजाने गोलूची आई धावत आली आणि पाहते तर काय ? गोलू झोपेत पलंगावरून खाली जमिनीवर पडला होता.
आईला पाहून गोलू उठून बसला आणि मोठ्याने रडायला सुरुवात केली. आईला वाटले गोलू पडल्यामुळे रडत असेल पण गोलूचे पडण्याचे कारण वेगळेच होते.
“आई , मी पडलो म्हणून नाही रडत आहे. मला स्वप्न पडले म्हणून मी रडत आहे. स्वप्नात काय पाहीले माहिती आहे आई ? मी स्वप्नात पाहीले की काना , मात्रा आणि वेलांटी एवढेच नाही तर उकार , स्वल्पविराम आणि अवतरण सुद्धा माझ्या वरती रागावले. रुसलेत माझ्यावर . आता ते माझ्याशी बोलणार नाहीत. माझ्या निबंधात येणार नाहीत. मी त्यांच्या शिवाय निबंध कसा लिहू ? ” गोलू नाराज झाला होता. आईने गोलूला प्रेमाने जवळ घेतले आणि समजावले.
“हे बघ गोलू , एक तर हे स्वप्न आहे म्हणून घाबरून जाऊ नको पण ; शांतपणे विचार कर की तुला हे स्वप्न का पडले ? ” आईने प्रश्न विचारताच गोलू आईकडे चमकून पाहू लागला.
“गोलू , सतत मराठीचा निबंध असो किंवा मराठीचे इतर काहीही लिखाण असो तू नेहमी कंटाळा करतोस आणि लिहायचे म्हणून काहीही लिहून ठेवतोस . मग काना कोठे आहे किंवा मात्रा कसा आहे ? याचा विचार करताना दिसत नाहीस. खाडाखोड करुन अक्षरांचा चेहरा बदलतोस आणि तरीही तुला तुझ्या चुकांची जाणीव होत नाही. कदाचित म्हणूनच आज तुला असे स्वप्न पडले ” . आईने समजावून सांगितले.
“आई पण ; मला नाही जमत गं. किती कठीण आहे वेलांटी समजणे , अक्षरे समजणे. न नळाचा कधी लिहायचा आणि ण बाणाचा कधी लिहायचा कळतच नाही. सांग ना कसे समजणार ? ” गोलूने आपली व्यथा कथन केली आणि आई स्मितहास्य करु लागली.
“गोलू , ‘ प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे ‘ मराठीत अशी एक सुंदर म्हण आहे. याचा अर्थ असा होतो की एखाद्या गोष्टी साठी प्रयत्न करत रहा. सातत्य ठेवा. स्थिरता ठेवा. अपयशाने खचून न जाता प्रयत्न करत रहा. यश तुमचेच आहे. तू लिखाण , वाचन यामध्ये सातत्य ठेव. ज्या गोष्टी कठीण वाटत आहेत त्यांचा अभ्यास कर. चुका होतील पण ; प्रयत्नात सातत्य असेल तर तुला मराठी कठीण वाटणार नाही.
” मराठी आपली मातृभाषा आहे. अतिशय सुंदर अशी भाषा आहे आपली. या भाषेचा लळा लागलेली व्यक्ती कधीही या भाषेपासून दूर जात नाही. मराठी भाषा समृद्ध आहे , प्रगल्भ आहे. अमृताचा कुंभ आहे “. आई बोलत होती आणि गोलू ऐकत होता. गोलूला मराठी भाषेचे महत्त्व पटत होते. मराठी भाषेची महती ऐकून गोलूला अभिमान वाटू लागला आणि त्याने मनाशी ठरवले की आता मराठीचा निबंध व्यवस्थित लिहायचा.
गोलू हातात पेन आणि वही घेऊन बसला होता. अक्षरे वहीवर उतरत होती . विरामचिन्हे त्यांच्या योग्य जागी स्थिर होत होती आणि गोलूचा मराठी निबंध व्याकरणाच्या सर्व नियमांमध्ये काटेकोर बसत चालला होता आणि म्हणूनच गोलूच्या तसेच अक्षर व विरामचिन्हे यांच्याही चेहऱ्यावर समाधानाचे स्मित खुलत होते.
समाप्त .
कथा कशी वाटली आपला बहुमूल्य अभिप्राय देऊन जरुर कळवा. कथा आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा. अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी लेखक मित्र या वेबसाइटला भेट द्या. आमच्या what’s up चॅनेलला फाॅलो करा. धन्यवाद.
सौ. मनिषा उदयसिंह पाटील, पुणे.
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
किती मस्त लिहिलंय… वाचताना खूप मजा आली. मराठी भाषेचे महत्व सर्व लहान मुलांना आत्ता पासूनच कळले पाहिजे.
धन्यवाद
खूप सुंदर कल्पना 👌👌
धन्यवाद
छानच आहे लेख!
धन्यवाद
वा! काना, मात्रा, वेलांटी, उकार आणि विरामचिन्हांच्या गप्पांतून दिलेला संदेश मस्त.
धन्यवाद
वा! काना, मात्रा, वेलांटी आणि विरामचिन्हांच्या गप्पांतून दिलेला संदेश मस्त.
वा! छान लेखन.