“आये, मला पैंजण घे ना!”, म्हणताच जोरदार धपाटा राधेच्या पाठीत बसला. राधा कळवळली. एव्हढीशी सहा वर्षांची पोर! राकट आईचा दणकट हात पाठीवर बसताच भोकाड पसरून रडायला लागली. आधीच कावलेली रखमा पोरीच्या रडण्याने अजूनच संतापली. जराशी तेल, मिरची नी पिठं घ्यायला बाजारात आली होती ती! कुठून या अव*दसेला सोबत घेतले असे झाले तिला! रडणाऱ्या पोरीला रुपयाचे शेव गांठे देऊन थोबाड बंद करायला सांगितले. पण राधा काही ऐकचना! “पैंजण पायजेतच”, म्हणून रडत बसली.
कशी बशी हाताला धरून खेचतच रखमा राधेला घेऊन घरी आली. दिवसभराच्या कामाने आधीच शीणली होती ती! त्यात हा पोरीचा त्रास! अजून जेवण बनवायचे बाकी होते. त्या आधी पाणी भरायला लागणार होते. विहीर कोसभर दूर. घरातली झाडलोट करून देवापुढे दिवा लावून रखमा हंडा आणि बादली घेऊन पाणी आणायला निघाली! तशी राधा ही मागे चालू लागली. “आये, मला पैंजण पायजेत. दे की गं!”, राधेचे रडगाणे चालूच.
आज शाळेत मास्तरांच्या पोरीचा वाढदिवस होता. मास्तरांनी पोरीला नवे पैंजण घेतले होते. तेच ती वर्गात घालून आली होती. छम् छम् वाजणारे पैंजण पाहून मैत्रिणींचा तिच्यापुढे गराडा पडला. चांदीचे घुंगरूवाले पैंजण राधेला फार आवडले. तिला ते अगदीच हवेसे वाटू लागले. अस्सेच पैंजण आपल्यालाही हवेत. आपणही असेच छान छान पैंजण घालून छम् छम् करत घरभर नाचू या कल्पनेने राधा वेडी झाली. त्यासाठीच हा घोषा आईच्या मागे तिने लावला होता.
पण राधाची आई गरीब शेतमजूर. वडील पीठ गिरणीवर कामाला. घरात खाणारी तोंडेही बरीच. म्हातारे सासू सासरे आणि चार पोरे. त्यात राधा शेंडेफळ. तीन मुलग्यांच्या पाठीवर जन्मली म्हणून थोडी लाडकी इतकेच! गरिबाची पोर! लाडावून किती लाडावणार? तरी सगळ्यांच्या गळ्यातला ताईत होती ती! सगळेच आपल्या घासातला घास तिला भरवून माया लावत होते. असे असले तरी पैशाचे लाड कोण कसे पुरवणार? चांदीचे पैंजण म्हणजे महिन्याच्या उत्पन्नात केवढा मोठा खड्डा? पोरीला पैंजण घेतले तर महिनाभर साऱ्यांच्याच पोटाला चिमटा बसेल. रखमाचा जीव कल्पनेनेच कळवळला.
महिना होत आला तरी ‘मला छम् छम् वाजणारे पैंजण पायजेत’, म्हणून राधेचा जप चालूच. आजीला काय राधेचे हे लक्षण ठीक दिसेना! तिच्या मनात वेगळ्याच शंकेने घर केले. तिने लगेच राधेवरुन मीठ मोहरी ओवाळून टाकली. पण राधेच्या डोक्यातून पैंजणचे भूत काही उतरेना झाले.
अखेर राधेच्या बापाने कबूल केले कि या दिवाळीला तुला आपण पैंजण घेऊ. तशी राधा हरखली. आणि दिवसरात्र पैंजणाच्या स्वप्नात रमून गेली.
अशातच एक दिवस तिला शाळेतून येताना रस्त्यात एक घुंगरू सापडले. राधाने ते पटकन उचलून खिशात घातले. आणि छन् छन् वाजवत घरी आली. घुंगराचा आवाज फारच आवडला तिला. जरी दुधाची तहान ताकावर भागवण्या सारखे होते ते! पण चिमूरड्या राधेला काय त्याचे! उठता बसता खाता पिता राधा खिशातले घुंगरू वाजवत दिवसभर फिरत होती. कधीतरी कुठेतरी रेकॉर्ड वर ऐकलेले “ढोलकीच्या तालावर.. घुंगराच्या बोलावर.. मी नाचते मी डोलते.. ईश्काच्या दरबारात..” गाणं म्हणत राधा स्वत:च्याच धुंदीत नाचत होती.
गाण्याचे बोल ऐकताच आजीच्या तळापायाची आग मस्तकात गेली. तिने लगेच रखमेचे कान भरले. आधीच मेटाकुटिला आलेल्या रखमेने मागचा पुढचा विचार न करता राधेला फटकावले आणि ताबडतोब ते घुंगरू फेकून दिले. तशी राधा वेडीपिशी झाली. त्या घुंगरासाठी धाय मोकलून रडायला लागली. “माझं घुंगरू, माझं घुंगरू” म्हणून किंचाळत हातपाय झाडू लागली. हे बघून आजीची पा*चावर धारण बसली. ती पुन्हा पुन्हा राधेवरुन मीठ मोहरी ओवाळू लागली. थोड्या वेळाने राधा शांत झाली आणि बाबा आला कि बाबाला नाव सांगू या कल्पनेने गप्प बसली.
आज रविवार! त्यात दिवाळ सण जवळ आला होता. गिरणीत तोबा गर्दी उडाली होती. रात्री उशीरानेच राधेचा बाप कामावरून परतला. दिवसभराच्या कष्टाला उतारा म्हणून दा*रू पिऊनच घरी आला. बापाला बघताच राधा धावत जाऊन बिलगली. आणि “अण्णा, माझं घुंगरू आयेनं फेकलं, मला तुमी घुंगरुवालं नवं पैंजण कवा आणणार?” म्हणून विचारू लागली. बापाच्या मस्तकात दा*रू चढली होती. आधीच महिन्याची तंगी. त्यात पोरीची भूण भूण! त्याने खाड्कन् राधेच्या मु*स्कटात ठेवून दिली. आणि जोरजोरात ओरडू लागला. “काय वात आणलाय कार्टीने! जरा शांतीने जगू देईना झालीय!” म्हणत ला*था बुक्कयाने बडवू लागला. सगळेच मदतीला धावले. आईने आणि भावांनी राधेला बापाच्या तावडीतून सोडवले. अर्धमेली झालेली राधा बापाच्या रु*द्रावतारापुढे पार कोलमडून गेली. पण एव्हढा मार खाहूनही तिच्या मनातून पैंजण काही जाईनात.
अखेर दिप्याने, राधेच्या भावाने ठरवले कि आपण राधेला पैंजण घेऊन द्यायचेच. त्यासाठी शाळा सुटल्यावर त्याने शेतात मजुरीला जायला सुरुवात केली. एक दिवस मालकाने दीप्याला काही सामान आणायला बाजारात पाठवले. बाजारात फिरत असताना दीप्याला नकली पैंजणचे दुकान दिसले. दीप्याचे डोळे चमकले. लगेच जाऊन त्याने चौकशी केली. “हात्तीच्या! १०० रुपयांत पैंजण मिळताहेत! चांदीचेच कशाला हवेत! हे ही चालतीलच की!” दिप्या जाम खुष झाला. घरी येऊन हळूच राधेच्या कानात कुजबुजला. “पुढच्याच आठवड्यात तुला पैंजण घेऊन देतो बघ!” बापाचा मा*र खाऊन कोसळलेली राधा तापाने फणफणली होती. अशक्तपणामुळे अंथरुणावर निजून होती. पण भावाच्या तोंडून पैंजण शब्द ऐकताच राधेच्या कुडीत परत जीव आला. पुन्हा पैंजणाचा जप तीने सुरू केला. राधेच्या ध्यानी मनी पैंजण भरले होते. ती काही त्यातून बाहेर पडायला तयार नव्हती. पुन्हा तिचे मन गिरक्या घेऊ लागले. “घुंगराच्या बोलावर .. मी नाचते मी डोलते..” राधा निजल्या निजल्या गाऊ लागली.
आजीच्या मनात पाल चुकचुकली! इतकं कुणी कधी कशासाठी रडतं का? आणि हा कसला ध्यास! त्यात ते गाणे! ते ही एवढ्याशा पोरीच्या तोंडी. तिची खात्रीच पटली. तिने राधेच्या बापाला पटवले. ‘ही नक्कीच बाहेरची बाधा आहे. पोर झपाटलीय!’ राधेचा बाप हादरला. त्याने आईच्या सांगण्यावरून तातडीने मां*त्रिक गाठला.
दुसऱ्याच दिवशी मां*त्रिक म्हणवणारा इसम आपल्या सरंजामासह दारात अवतरला. केसांच्या मोठ्या मोठ्या जटा खांद्यावर रुळलेल्या, बटबटीत लालसर डोळे, अंगभर विभूति फासलेली, काळाकभिन्न, अर्धा उघडा, खांद्यावर झोळी, हातात त्रिशूळ असा तो मांत्रिक बघून राधेने भेदरून डोळेच मिटले. चट्कन् डोक्यावरून पांघरून ओढून कोपऱ्यातून राधा हळूच बाहेर बघायचा प्रयत्न करत होती.
झाड घाबरलेले बघून मां*त्रिकाला चेव आला. त्याने घुमत घुमत पोतडीतून अबीर, बुक्का, अंगारा, धुपारा, लिंबू, मिरच्या, कोळसे काढून मांडामांड सुरू केली. राखेचे रिंगण आखायला घेतले. तोवर आजूबाजूच्या घरातली माणसेही गोळा होऊ लागली. रखमा आणि पोरे भेदरून चिडिचूप कोपऱ्यात मुटकुळे करून बसली. घरात पुरेशी गर्दी झालेली बघून त्याने हळू हळू घुमायला सुरुवात केली. आता वातावरण निर्मितीचा कळस साधायचा होता. अगम्य मंत्रोच्चारण करत त्याने झोळीतून मानवी कवटी आणि काही हाडके बाहेर काढली. तशी गर्दी लगेच दचकून मागे सरली. राधेकडे बघत मां*त्रिकाने कवटी एक हातात नाचवत दुसऱ्या हातातील हा*डूक त्यावरून फिरवायला सुरुवात केली आणि तिला रिंगणात बसायची आज्ञा केली.
राधा बिचारी आधीच घाबरून बेशुद्ध पडली. परंतु मांत्रिकाने जराही दया माया न दाखवता तिला उचलून रिंगणात बसवले. लिंबू कापून राधेवर फेकले. फुंकरीने खूप सारी विभूति उडवली आणि तत्क्षणीच सपकन् चाबकाचा फटका राधेवर बसला. “बोल, बोल, कोण आहेस तू? का आलीस इथे? पोरीत का घुसलीस? बोल लवकर? त्याने सपासप राधेला फोडायला सुरुवात केली. “काय पायजे तुला? बोल?” चाबकाच्या फटक्यांनी शुद्धित आलेली राधा कसे बसे म्हणाली, “नको, मला काही नको. मला मारू नका.”
पण आता मांत्रिक इतक्यात थांबणार नव्हता. अखेर त्याच्याही रोजी रोटीचा सवाल होता. त्याने मिरच्यांचा जाळ करून राधेला धुरी दिली. आता राधा टाहो फोडायला सुद्धा विसरली. मांत्रिक पुन्हा पुन्हा विचारात राहिला, “ बोल, का पाहिजेत पैंजण तुला?” राधा फटक्यांनी बेशुद्ध होत होती. पुन्हा फटक्यांनी शुद्धित येत होती. अखेर राधा बोलली, “मला काही नको. पैंजण सुद्धा नको.” तसा मांत्रिक थांबला. त्याने शेवटचे मंत्रोच्चारण करीत जाहीर केले, “भूत उतरले. निघून गेले.” आजीकडे बघत म्हणाला, “म्हातारे, तूजा अंदाज बरोबर होता. शेजारच्या गावातली तमासगिरीण गेल्या महिन्यात मेली. तिचंच भूत होतं ते. तिच्या पैंजणाच्या घुंगरातूनच पोरीमध्ये घुसलं. पण आता भीती नाही. मी तिला हुसकावून लावलंय.”
एव्हढा वेळ भेदरून बघणाऱ्या आजीने आणि बापाने निश्वास टाकला. मांत्रिक त्याची बिदागी घेऊन निघून गेला. पोरीची अवस्था बघून रखमाचे काळीज पार फाटले. तिने राधेला छातीशी कवटाळले. अर्धवट शुद्धित राधा म्हणाली, “आये, मला पैंजण नको.” रखमा हादरली. तिच्या मनाची चलबिचल सुरू झाली. खरंच का भु*ताचे पैंजण पोरीला बाधले कि पैंजणाचे भू*त बाधलं!
रात्री दीप्या घरी आला. घराची अवस्था बघून घाबरला. आईला विचारले, “आये, काय गं? काय झालं? कोण आलं होतं?” रखमाने सगळं वृत्तान्त दिप्याला सांगितला. दीप्या कळवळला. “अगं, काय हे आये! असं भू*त बित असतंय का? राधाला पैंजणच हवं होतं ना? हे बघ! आणलेत पैंजण! अगं, बाजारात नकली पैंजण पण मिळतात की! नुसत्या शंभर रुपयांत मिळाल्यात. आणि राधाला कुठे कळतंय, असली आणि नकली?” चमचमते पैंजण बघून रखमा गहिवरली. तिने पट्कन् पैंजण राधे जवळ आणले. तिला दाखवले, “राधे, हे बघ काय! दादूने पैंजण आणलेत. बघ की राधे! उघड डोळे!” पण आता राधाला पैंजण नको होते. तो चाबकाचा मा*रही नको होता. नी ती मिरच्यांची धु*री सुद्धा नको होती. कशीबशी थरथरत शेवटचे बोलली, “नको पैंजण, मला नको पैंजण.” दीप्याने पैंजणाचे घुंगरू छम् छम् वाजवले. पुन्हा पुन्हा राधे जवळ नेऊन तिला तो वाजवून दाखवू लागला. पण राधा शांत निपचित पडली होती. आता ती छम् छम् राधेच्या कानात शिरतच नव्हती….!
जिज्ञासा म्हात्रे,मुंबई
तुम्हाला ही कथा कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्य मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप ही जॉईन करा.
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
खरंच डोळ्यात पाणी आले
खूप छान 👌
भावस्पर्शी लिखाण सुरेख
हृदयस्पर्शी👌👌