भारताच्या हरितक्रांतीचे जनक -भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामीनाथन l Bharat Ratna Dr. M. S. Swaminathan information in Marathi

WhatsApp Group Join Now

(Father of Green Revolution- )

“अशक्य हा शब्द प्रामुख्याने फक्त आपल्या मनात असतो. पण जर तुमच्या कृतीत इच्छाशक्ती आणि मेहनत करायची तयारी असेल तर तुम्हाला मोठी कामे पूर्ण करता येतात.” हे वाक्य आहे भारताच्या हरितक्रांतीचे जनक (Father of Green Revolution) म्हणून ओळखले जाणारे डॉ. एम.एस.स्वामीनाथन यांचे. आपली दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रचंड मेहनत यांच्या बळावर त्यांनी आपल्या आयुष्यात डोंगराएवढे काम केले.

भारतात हरितक्रांती घडवून आणण्यात मोलाचा वाटा असलेले आणि भारताच्या हरित क्रांतीचे जनक (Father of Green Revolution) म्हणून ओळखले जाणारे डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना नुकताच  भारतातील सर्वोच्च असा भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. कृषिक्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल हा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले. 

कोण होते डॉ. स्वामीनाथन? त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कृषिक्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल आपण या लेखात थोडक्यात माहिती करून घेणार आहोत. 

डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे जन्म आणि शिक्षण-

तामिळनाडूमधील तंजावर जिल्ह्यात कुंभकोणम येथे ७ ऑगस्ट १९२५ रोजी एम. एस. स्वामिनाथन यांचा जन्म झाला. त्यांचे संपूर्ण नाव मोणकोंबू सांबशिवन स्वामिनाथन असे होते. डॉ. स्वामीनाथन यांचे वडील डॉक्टर होते. त्यांच्यावर गांधीवादी विचारसरणीचा प्रभाव होता. ते स्वदेशीचे कट्टर पुरस्कर्ते होते. त्यांच्या विचारसरणीचा डॉ. स्वामीनाथन यांच्यावर खूप प्रभाव होता. परंतु दुर्दैवाने त्यांचे पितृछत्र वयाच्या अकराव्या वर्षीच हरपले. 

सन १९४० मधे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर ते पुढील शिक्षणासाठी त्यांच्या काकांकडे तिरुअनंतपुरम येथे आले. स्वामीनाथन यांनी वडिलांप्रमाणेच डॉक्टर होण्याचे ठरवले. मेडिकलला प्रवेशही घेतला. पण इ.स. १९४३ मधे बंगाल येथे भीषण दुष्काळ पडला. लाखो लोकांचा मृत्यू झाला. त्या काळात भारताला स्वातंत्र्य मिळाले नव्हते. सिंचनाच्या फारशा सोयी त्यावेळी नव्हत्या. त्यामुळे आणि पावसाच्या लहरीपणामुळे भारतात सतत दुष्काळ पडत असे. अन्नधान्याची टंचाई तर पाचवीलाच पुजली होती. त्याच वेळी दुसरे महायुद्धही सुरु झाले. तांदूळ तसेच इतर अन्नधान्याची प्रचंड टंचाई उद्भवली. हे सर्व जवळून पाहणारे स्वामिनाथन अतिशय अस्वस्थ झाले. त्यांनी कृषिक्षेत्रात संशोधन करण्याचा निश्चय केला. मेडिकलचे शिक्षण त्यांनी सोडले आणि प्राणीशास्त्रात पदवी प्राप्त केली. जगातील भूक निर्मूलन करण्यासाठी तसेच भारताला कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्या दिशेने त्यांचे  मार्गक्रमण सुरू झाले.  १९४७ मधे त्यांनी कोईमतूरच्या  कृषी विद्यापीठातून  कृषी विषयक पदवी प्रथम क्रमांकासह प्राप्त केली. 

इ.स. १९४७ मधे ते दिल्ली येथे भारतीय कृषी संशोधन संस्थेत (Indian Agricultural Research Institute) जनुकशास्त्र आणि वनस्पती प्रजनन या विषयांत पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी गेले.  इ.स. १९४९ मधे त्यांचे ‘अनुवंशशास्त्र आणि रोपपैदास’ या विषयातील पदव्युत्तर शिक्षण विशेष प्राविण्यासह पूर्ण झाले. त्यावेळी ते यूपीएससीचीही परीक्षा उत्तीर्ण झाले. भारतीय पोलिस सेवेची नोकरी त्यांच्या हातात होती. पण त्यांनी ती नाकारली. कृषी क्षेत्रात संशोधन हेच त्यांनी आपले कार्यक्षेत्र मानले.

त्यावेळी त्यांना नेदरलँड येथे बटाट्याच्या अनुवंशिकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी UNESCO तर्फे स्कॉलरशिप मिळाली. तेथे एक वर्ष काम केल्यानंतर ते इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठात ‘वनस्पती व रोपपैदास’ या विषयाचा विशेष अभ्यास करण्यासाठी दाखल झाले. त्यांनी तेथे जाऊन इ. स. १९५२ मधे Ph.D. प्राप्त केली. या काळात त्यांनी बटाटा, गहू, तांदूळ आणि ज्यूटच्या अनुवंशास्त्राचा अभ्यास केला.  पुढे त्यांनी विस्कॉन्सिन-मॅडिसिन विद्यापीठात पोस्ट-डॉक्टरल संशोधन केले.  परदेशात नोकरीच्या अनेक संधी असतानाही ते भारतात परतले. सन १९५४ पासून ते भारतीय कृषी संशोधन संस्थेत (AIRI) वनस्पतीशास्त्र विभागात संशोधक म्हणून काम करू लागले. 

डॉ. स्वामीनाथन यांचे विश्वव्यापी बहुमूल्य कार्य-

भारताच्या हरित क्रांतीचे जनक (Father of Green Revolution) म्हणून ओळखले जाणारे डॉ. स्वामीनाथन यांचे कृषिक्षेत्रामध्ये फार मोठे योगदान आहे. आणि ते फक्त भारतापुरते मर्यादित नाही, तर विश्वव्यापी आहे. 

  • १९५४ मधे त्यांची नेमणूक ओरिसा येथील केंद्रीय भातसंशोधन संस्थेत झाली. तेथे अथक परिश्रम आणि मुलभूत संशोधन करून त्यांनी सर्व प्रदेशात आणि विविध परिस्थितीत टिकू शकणारे कणखर आणि भरपूर उत्पादन देऊ शकणारे भाताचे विविध वाण तयार केले. हेच मुलभूत संशोधन वापरून पुढे त्यांनी गव्हाच्याही अनेक जाती निर्माण केल्या. 
  • १९६० मधे त्यांना डॉ. बोरलॉग यांनी विकसित केलेल्या ‘मेक्सिकन ड्वॉर्फ’ या गव्हाच्या नवीन प्रजातीविषयी माहिती मिळाली. त्या बोरलॉग यांच्याशी संवाद साधला. त्यांना भारतात आमंत्रित केले. त्याच्याशी चर्चा करून, भारतातही उच्च प्रतीच्या गव्हाचे उत्पादन कसे घेता येईल, त्यासाठी कुठली खते वापरली पाहिजे यावर विचार विनिमय केला. त्यानंतर याबाबतीतले आवश्यक प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिले. डॉ. स्वामीनाथन यांच्या अथक मेहनतीमुळे एका वर्षातच गव्हाचे उत्पादन १.२ कोटींवरुन, २.३ कोटी टन झाले. 
  • १९६६ मधे ते भारतीय कृषी संशोधन संस्थेचे संचालक झाले. 
  • ते उत्तम प्राध्यापक आणि संशोधन मार्गदर्शक होते. त्यांनी अनेक लेख, संशोधन निबंध, पुस्तके लिहिली.
  • सन १९६५ मधे लाल बहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान, जय किसान’ असा नारा देत, हरितक्रांतीला सुरुवात केली. त्याची मुख्य धुरा डॉ. स्वामीनाथन यांच्या खांद्यावरच होती.
  • १९७२ ते १९७९ दरम्यान ते भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (ICAR) महासंचालक झाले. ६ विभाग असणाऱ्या ICAR मधे स्वामीनाथन यांच्या आगमनानंतर २३ विभाग सुरू झाले. तेथे त्यांनी नॅशनल ब्युरो ऑफ प्लॅंट, एनिमल अँड फिश जेनेटिक रिसोर्सेस ऑफ इंडिया ही संस्था स्थापन केली. भारतीय वन सर्वेक्षण (FSI) मधे संपूर्ण परिवर्तन घडवून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. सन १९७९ मधे भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाचे मुख्य सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
  • सन १९८२ मधे त्यांची आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेच्या महासंचालकपदी फिलिपाईन्स येथे नेमणूक झाली. तेथे सुमारे सहाशे कृषिवैज्ञानिकांच्या गटाचे नेतृत्व त्यांनी यशस्वीरीत्या केले. त्यांच्या संशोधनाचा फायदा केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील अनेक विकसनशील देशांना झालं. 
  • सन १९८१ ते ८५ या काळात ते अन्न व कृषी संघटनेचे (FAO) स्वतंत्र अध्यक्ष होते.
  • इ.स. २००१ मधे ते ’सुंदरबन जागतिक वारसास्थळातील जैवविविधता’ या बांगलादेशसोबत असलेल्या संयुक्त प्रकल्पाच्या सुकाणू समितीचे अध्यक्ष होते.
  • भारतीय शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सन २००४ मधे राष्ट्रीय कृषी आयोगाची स्थापना झाली. या आयोगाचे डॉ. स्वामीनाथन अध्यक्ष होते. या आयोगाने आपला अहवाल २००६ मधे प्रस्तुत केला. २००७ मधे आयोगाने राष्ट्रीय शेतकरी धोरण मसूदा सादर केला. शेतीक्षेत्रातील प्रगतीचे मोजमाप फक्त उत्पादनाच्या आकड्यात न करता शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या वाढीच्या आकड्यात करावे असे आयोगाने नमूद केले. तसेच शेतकऱ्याची व्याख्या करताना त्यात शेतमजुरांचाही समावेश करावा आणि शेतमालाला हमीभाव देताना त्या ५०% नफा मिळेल इतका हमीभाव दिला पाहिजे अश्या शिफारशी या आयोगाने केल्या. 

डॉ. स्वामीनाथन यांना मिळालेले पुरस्कार ( Bharat Ratna Dr. M. S. Swaminathan information in Marathi)

आपल्या कार्यकर्तृत्वामुळे डॉ. स्वामीनाथन यांना असंख्य सन्मान प्राप्त झाले. त्यात राष्ट्रीय स्तरावरील ३० पेक्षा अधिक तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील २४ हून अधिक पुरस्कारांचा समावेश आहे. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. अनेक राष्ट्रीय मंडळांचे ते अध्यक्ष  तर आंतरराष्ट्रीय मंडळांचे सदस्य आहेत. 

  • कृषिक्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना अनेक राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरील सन्मान प्राप्त झाले. भारत सरकारकडून त्यांना पद्मश्री (१९६७), पद्मभूषण (१९७२), पद्मविभूषण(१९८९) हे तीनही पद्म पुरस्कार प्राप्त झाले. नुकताच त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मानही देण्यात आला. 
  • शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार (१९६१), रॅमन मॅगसेसे पुरस्कार, जागतिक अन्न पुरस्कार (world food prize-1987) हा कृषी क्षेत्रातील पहिला सर्वोच्च सन्मान इत्यादी पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले. 
  • १९८७ मधे फिलिपाइन्सचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘प्रेसिडेंशिअल गोल्डन हार्ट’ त्या मिळाला.
  • अल्बर्ट आईन्स्टाइन जागतिक विज्ञान पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले.
  • जगप्रसिद्ध TIME मासिकाने इ.स. १९९९ मधे ‘आशियातील विसाव्या शतकातील प्रभावशाली व्यक्ती’ अशी यादी प्रसिद्ध केली. त्यात भारतातील तीन नावांचा समावेश होता. १) महात्मा गांधी, २) रवींद्रनाथ टागोर आणि ३) एम. एस. स्वामीनाथन.

चतुरस्त्र कृषी वैज्ञानिक डॉ. स्वामीनाथन

कृषी विज्ञानातील त्यांचे योगदान तर अतुलनीय आहेच. पण शेती संशोधनाबरोबरच डॉ. स्वामीनाथन यांनी खारफुटीचे पर्यावरण (मँग्रोव्ह इकोसिस्टम), जैविक विविधता संगोपन, अनुवांशिक संगोपन, पर्यावरण संशोधन व विकास, निसर्ग व नैसर्गिक स्रोतांचे संगोपन इत्यादी अनेक विषयांवर सुद्धा संशोधन आणि मार्गदर्शन केले आहे. जगभरांतील कृषी विद्यार्थ्यांबरोबर त्यांनी कृषिसंशोधन, वनस्पतींची पैदास आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन आणि संवर्धन इत्यादी विषयांवर काम केले.

भारतीय गरीब शेतकऱ्यांना शेतांत गव्हाचे व तांदळाचे उच्च उत्‍पन्‍न देणारे वाण पेरण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यासाठी धान्याचे उच्च उत्पादनक्षम प्रकार त्यांनी विकसित केले. एवढ्यावरच न थांबता शेतकऱ्यांना खते आणि कीटकनाशके वापरण्यासाठी मार्गदर्शन केले व प्रोत्साहन दिले. सुरुवातीला शेतकरी त्यांनी विकसित केलेले नवीन बियाणे वापरायला तयार नव्हते. तेव्हा स्वामीनाथन हे थेट शेताच्या बांधावर गेले आणि त्यांची शेतकऱ्यांना कमी जागेत जास्त उत्पादन घेऊन दाखवले. त्यानंतर शेतकऱ्यांचा त्या बियाणांवर विश्वास बसला.  कीटक प्रतिरोधक पिके विकसित करणे, संकरित बियाणे वापरणे असे सर्व बाजूंनी प्रयत्न केल्यामुळे गहू आणि तांदूळ यांच्या उत्पादनांत भारत स्वयंपूर्ण होऊ शकला. त्यामुळे भारतात हरितक्रांती घडवून आणण्याचे श्रेय स्वामीनाथन यांनाच जाते. म्हणूनच त्यांना भारताच्या हरितक्रांतीचे जनक म्हणतात. (Father of Green Revolution Bharat Ratna Dr. M. S. Swaminathan). त्यामुळे एके काळी अन्नधान्याच्या टंचाईशी झुंजणारा आणि अमेरिकेहून आयात होणाऱ्या गव्हावर अवलंबून असणारा हा देश आता अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे आणि आपल्या गरजेपेक्षा जास्त धान्य उत्पादन करत आहे. 

आज देशातील सर्व कृषी विद्यापीठाच्या स्थापनेमागे एम.एस. स्वामीनाथन यांचे योगदान आहे.

केवळ अन्न उत्पादनात वाढ झाली म्हणजे लोकांचे जीवनमान सुधारत नाही हे त्यांच्या लक्षात आले. त्यासाठी प्रयत्न करण्यासाठी त्यांनी १९८८ मधे ‘एम.एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन’ची स्थापना केली. निसर्गात ढवळाढवळ न करता, पर्यावरणाचा तोल सांभाळत, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून विकास करणे आणि त्याचा लाभ गरीब तसेच महिलांना मिळवून देणे यासाठी ही संस्था कार्यरत आहे. आजवर लाखो  जणांना या संस्थेच्या कार्याचा लाभ मिळाला आहे. शेती संशोधनात या संस्थेने अत्यंत भरीव कार्य केले आहे. 

महात्मा गांधी आणि रमण महर्षी यांच्या विचारांचा स्वामीनाथन यांच्यावर फार प्रभाव होता. विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत त्या आपल्या २००० एकर जमिनी पैकी एक तृतीयांश जमीन दान करून टाकली.  

भूकमुक्तीचा ध्यास घेतलेले हे उत्तुंग व्यक्तिमत्व, २८ सप्टेंबर २०२३ रोजी वयाच्या ९८ व्या वर्षी काळच्या पडद्याआड गेले. भारत त्यांचा सदैव ऋणी राहील.

भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामीनाथन (Bharat Ratna Dr. M. S. Swaminathan information in Marathi ) यांच्याबद्दलची ही माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली, ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुपही जॉईन करा.

      धन्यवाद !

2 thoughts on “भारताच्या हरितक्रांतीचे जनक -भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामीनाथन l Bharat Ratna Dr. M. S. Swaminathan information in Marathi”

  1. या लेखामुळे डॉ स्वामीनाथन यांनी केलेल्या महान कार्याची माहिती होतीय. सर्व मानवजातीसाठी करायच्या या कार्याचं ध्येय आज भारताला स्वयंपूर्ण करुन गेलं… या ख-या अन्नदात्याला विनम्र नमन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top