थंडीचे दिवस संपून उन्हाळ्याची चाहूल लागली होती. या हंगामातील पिके काढणी चालू होती. काही जण घरची तर काही शेतातली कामे करत होती. सगळेजण आपापल्या कामात व्यस्त होते .गावाच्या मधोमध देशमुखांचे घर होते. गावातील हे मनाने आणि धनाने श्रीमंत घराणे. शामराव हे नामवंत वकील. घरात आई ,वडील,पत्नी लक्ष्मी, दोन मुले राम आणि शिव आणि एक मुलगी राधा असे त्यांचे कुटुंब.
” काय रे दादा, आज एवढ्या लवकर कुठे चालला .”शिव ने विचारले.”.
तू कशाला विचारपूस करतोय ? आणि तुला काय कळतंय? विशेष म्हणजे मी तुला का सांगू ? तू माझ्यापेक्षा लहान. मला आई बाबा विचारत नाही.तू का विचारतोय? ” राम बॅग भरत बोलला.
“अरे ,त्याने फक्त विचारलं .एवढं का बोलतोय.”आई रामच्या हातात डबा देत म्हणाली.
“अगं आई,तुला माहिती आहे ना? आम्ही या वेळेस कुठे जातो ते? शिवजयंती उत्सव जवळ आला आहे. त्याची तयारी करायला.फक्त काही दिवस राहिले आहेत. झांज पथक, बँजो, डिजे,मशाली किती तयारी करायची आहे. याला काय कळणार ? लहान आहे तो. उगाचच बोलण्यात वेळ जातो. मोठा झाला की येईल तो आमच्या ग्रुपमध्ये . बरं चल येतो मी “असं म्हणून राम घाईघाईत निघून गेला.
शिव हा इयत्ता चौथीत शिकत होता . प्रार्थना संपली. वर्ग भरले. मराठी ,गणितं,हिंदी, इंग्रजी,भूगोल इत्यादी विषयांचे तास संपले. आता इतिहासाचा तास चालू झाला. भोसले सर वर्गात आले.सर्व विद्यार्थ्यांनी त्यांना नमस्कार केला. त्यांनी हाताने इशारा करत सर्वांना खाली बसण्यास सांगितले. सर्व विद्यार्थी खाली बसले.
सरांनी इतिहास शिकवण्यास सुरुवात केली. इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माहिती सांगितली. शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला? कोणत्या किल्ल्यावर झाला ?त्यांच्या आईचे नाव काय होते ? वडिलांचे नाव काय होते ? त्याचा जन्माला येण्याचा उद्देश काय होता ?जिजाऊनी त्यांना काय शिकवण दिली ? शिवाजी महाराजांनी किती गड, किल्ले बांधले ?किती जिंकले ? स्वराज्याची स्थापना कशी केली ? स्वराज्याचा विस्तार कसा केला ? त्यांच्यासोबत असलेल्या मावळ्यांची कामगिरी , किती आणि कोणत्या शत्रूंना पराभूत केले ? आणि स्वराज्य टिकून राहावं म्हणून दिलेल्या आदर्श विचारांचा वारसा.
या सर्व गोष्टींची माहिती सरांनी वर्गात दिली. माहिती सांगत असताना सरांची छाती अभिमानाने भरून आली होती. स्वराज्य रक्षणासाठी किती जणांचे जीव पणाला लागले होते. हे सर्व सांगताना सर्वजण जीव एकवटून ऐकत होते. इतिहासाचा तास संपला आणि शाळेची घंटा वाजली . घरी जाताना मुलांमध्ये शिवाजी महाराजांविषयी चर्चा रंगली.
संध्याकाळ झाली. दिवे लागण झाली. शिवच्या आईने सर्वांना जेवणासाठी बोलावले. जेवण उरकले. सर्वजण बैठकीच्या खोलीमध्ये येऊन बसले. राम त्यांची शिवजयंतीची तयारी कशी झाली ? किती झाली? कशी केली ?हे सर्व सांगत होता. परंतु शिव हा वेगळ्याच विचारात हरवला होता.
“काय रे शिव, काय झाले? कोणत्या विचारात हरवला आहेस ?” बाबांनी शिवला विचारले.
“बाबा ,आज आम्हाला शिवाजी महाराजांविषयी माहिती सांगितली. मला खरचं शिवाजी महाराज खूप आवडायला लागले आहेत. मला शिवाजी महाराज कोण होते? काय होते ?हे आज समजले. भोसले सर आम्हाला दरोरोज शिवाजी महाराजांची नव्याने ओळख करून देणारं आहेत.” शिव अभिमानाने सांगत होता.
“कळाले ना शिवाजी महाराज कोण आहे ते ? त्याच शिवाजी महाराजांची जयंती आम्ही धुमधडाक्यात साजरी करतो .” राम वेगळ्याच तोऱ्यात बोलला.
“गावात एवढी लोकं का जमली आहेत .” शिवच्या आईने विचारले.
“अगं गावात पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. दुष्काळाचे संकेत जाणवू लागले आहेत. त्यासाठी म्हणे कोणीतरी पाणी दाखवणारा (पान्हाड्या) बोलवला आहे.त्याला जमिनीत असलेलं पाणी समजतं.” शिवचे बाबा लोकांवर नजर टाकत बोलले. दुसऱ्या दिवशी बोरवेल ची गाडी गावच्या दिशेने आली. त्यांनी जमीन खोदली परंतु कोठेही पाणी लागले नाही. हे सर्व शिव पाहत होता. सगळ्यांची निराशा झाली. पाणी सांगणाऱ्याचा अंदाज चुकला होता .
“असं पाणी लागत नाही.”सर्व गावच्या माणसांमध्ये शिव बोलला. सगळ्यांची नजर शिवकडे वळली.
“काय बोलतयं हे पोर” गावातला एक म्हातारा बाबा बोलला.
” त्या आंब्याच्या झाडापाशी पाणी लागणार ?” शिव निसंकोचपणे बोलला.
“तुला कसं ठावं रं ?” एक गावकरी बोलला.
“माझं ऐका खरंच तिथे पाणी आहे.”पुन्हा एकदा शिव तेच बोलला.
म्हातारा बाबा म्हणाला की “कधीकधी लहान मुलांची वाचा हा देवाचाच आदेश असतो.” घेऊन तर बघा. सर्व गावकऱ्यांनी संमती दिली. बोरवेल ची गाडी आंब्याच्या झाडाच्या दिशेने वळवली. आणि कामात सुरुवात केली. आणि काही फुटांवरतीच पाण्याचा आवाज येऊ लागला. पाण्याची पिचकारी जमिनीतून वर आली. सर्व गावकऱ्यांना आनंद झाला. आता दुष्काळाचा प्रश्न मिटला होता. सर्वांनी शिवला उचलून घेतले.
” तुला कसं रं समजलं तुला बी देवलसपणा येतो म्हणायचं ” म्हातारे बाबा बोलले.
“काय रे शिव तू एवढ्या बिनधास्त कसं सांगितलं.?”शिवचे बाबा म्हणाले.
“अहो बाबा यात अंधश्रद्धा नाहीच मुळी.हे सर्व आपल्या महाराजांना समजलेलं विज्ञान आहे. ” शिव लोकांच्या नजरेला नजर देत बोलत होता. “या सर्व गोष्टी आम्हाला सरांनी समजावून सांगितल्या”. शिवचे मित्र बोलले.
” ते कसे ?” एका गावकऱ्यांनी विचारले.
“जमिनीतील पाणी ओळखण्याची खूप सोपी पद्धत शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगून ठेवली होती.” जमिनीला आपले कान लावायचे . भूगर्भातून गंभीर असा आवाज आला तर समजून जायचं की इथे पाणी आहे. आणि दुसरी पद्धत म्हणजे एखाद्या झाडाची फांदी जमिनीच्या दिशेला कललेली असली तरीही त्यात ठिकाणी पाणी असते . वटवृक्ष पिंपळ यांसारख्या झाडांजवळ पाण्याचा साठा असतो. आणि मी वेगळं काही केलं नाही. महाराज शेतकऱ्यांच्या फायद्याचे भरपूर काही सांगून गेले आहेत .महाराजांनी सांगून ठेवल आहे तेच अमलात आणलं . आणि निकाल तुमच्या पुढे आहे.”हे सांगत शिव शिवाजी महाराजांच्या विचारांची जनजागृती करत होता. खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज कोण होते हे शिवला कळले होते. म्हणून तो लोकांपर्यंत छत्रपतींचे विचार ठामपणे पोहोचवत होता. सर्वांनी शिवचे कौतुक केले.
शिवाजी महाराजांनी प्रजेच्या सुरक्षिततेसाठी ,कल्याणासाठी सर्व योजनांची अंमलबजावणी केली होती. शिवाजीमहाराजांच्या तर्कशक्तीचा अंदाज सर्वानाच आला. सर्वजण घरी गेले.शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या आणि शौर्याच्या कथा रंगू लागल्या.राम आता खाली मान घालून उभा होता.
” राम काय झाले तू उदास का?” बाबा म्हणाले.
“बाबा मलाच माझी लाज वाटते.शिवाजी महाराज यांचे थोर विचार खरं शिव ने आचरणात आणले. त्याला किती लवकर महाराज समजले . आणि आम्ही वेगळ्याच धुंदीत जयंती साजरी करतोय. तशी महाराजांना नको आहे. “राम केविलवाणे बोलत होता.
” बरोबर आहे राम तुझं.मुळात दाढी वाढवली,चंद्रकोर काढली म्हणजे शिवाजी महाराज होतं नाही .तुम्हाला शिवाजी महाराजांचा अभिमान आहे .बरोबर आहे पण आपला अभिमान महाराजांना वाटावा असे आपण काम करतो का? ढोल, ताशा,सजावट,मशाली, पोवाडे या अशा गोष्टींपेक्षा त्यांनी दिलेल्या विचारांचा वारसा कसा पुढे नेता येईल याचा विचार करा. एकमेकांना मदत करा, माणसे जोडून ठेवा,सर्व जतिधर्मातील लोकांनी एकत्र येऊन स्वराज्यासाठी आपली निष्ठा आणि शक्ती पणाला लावा .शिवाजी महाराज गनिमी कावा तंत्राचा वापर करून शत्रूंना नामोहरम करत. भांडण तंटे ,मारामाऱ्या करण्यापेक्षा महाराज शक्ती पेक्षा युक्तीचा वापर जास्त करत होते.” बाबाही मोठ्या अभिमानाने शिवाजी महाराजांचे विचार कसे पुढे नेता येईल हे सांगत होते.
” राधा… आज उशीर झाला यायला.आणि तू अशी घाबलीस का?” आई काळजीने विचारु लागली. परंतु राधा काही बोलेना .ती एकाजगेवरती शांत बसून होती.
“काय झालं बाळा,” बाबा पाठीवरून हात फिरवत बोलले.
” बाबा मी आणि सुमन क्लास वरून येत होतो .तेव्हा चौकात काही टपोरी पोरं शिट्ट्या मारत उभी होती.आम्ही घाबरलो आणि पुढे चालू लागलो तर ते आमचा पाठलाग करू लागले.कसे बसे आम्ही येथपर्यंत पोहचलो.”ती घाबरून बोलत होती.
“हे बघ ताई घाबरण्याचे काही कारण नाही .आम्ही आहोत ना ? मी माझ्या मित्रांना घेऊन येतो .तू बिनधास्त रहा.आता कोणत्याही समस्येला गनिमी काव्यानेच उत्तर द्यायचं. मी बघतो काय करायचं ते ?” असा आधार रामने राधाला दिला.
आता दररोज संध्याकाळी राम आणि त्याचे मित्र चौकात उभे राहू लागले. उशीरा येणाऱ्या प्रत्येक मुलीला आता आधार वाटू लागला. मुली आता संध्याकाळी निर्धास्तपणे जाऊ येऊ लागल्या . काही दिवसातच त्या टपोरी मुलांनी तिथे येणे बंद केले. रामला केलेल्या कामाचे समाधान वाटू लागले. त्यांच्यासोबत छोटा शिवही सहभागी होऊ लागला. सरांनी सांगितलेल्या शिवाजी महाराजांच्या प्रत्येक विचाराची अंमलबजावणी तो दादा सोबत राहून करू लागला.
गावात चो*रांनी धुमाकूळ घातला. कधी इकडे चो*री तर कधी तिकडे चोरी करू लागले. रामने रात्रभर मित्रांसोबत मशाली पेटवल्या, झांज वाजवले. या युक्ती मुळे चोरांचे प्रमाण कमी होऊ लागले .लोकांच्या मनातली भीती हळूहळू नाहीशी होऊ लागली. राम आणि त्याचे मित्र चार-पाच जणच परंतू त्यांची कामगिरी ही कौतुकास्पद होती.अचूक पध्दतीने गनिमी काव्याचा वापर करत होते. यामध्ये कोणत्याही प्रकारची मारहाणी, कोणाचे नुकसान होत नव्हते. मुलींनाही स्वरक्षण करण्याचे प्रशिक्षण तो देऊ लागला.
“खरंच राम मला तुझा अभिमान वाटतो. यावर्षी खरी शिवजयंती साजरी होत आहे असे वाटत आहे. गावातील लोकही तुझ्या या कामाला चांगला प्रतिसाद देत आहेत.” बाबा मोठ्या कौतुकाने म्हणाले.
“हो बाबा आम्ही सर्व मुलांनी ठरवलं आहे येथून पुढे याच दिवशी नाही तर दररोज शिवजयंती साजरी झाली पाहिजे . तीही महाराजांनी दाखवलेल्या विचारांच्या मार्गाने अमलात आणत. गावाचा विकास केला तरच देशाचा विकास होईल. योग्य पद्धतीने लोकांना मदत केली तर स्वराज्य टिकून राहील. समाज भरकटला जाणार नाही. बाबा वाट कष्टाची असली तरी चालेल परंतु याचं अंतिम टोक सुखाचं असलं पाहिजे. आता एकच ध्येय! महाराजांच्या विचारांचा वारसा जोपासने आणि तो आचरणात आणणे.आणि समाजातील लोकांना त्याचा फायदा करून देणे. गोरगरिबांची मदत करणे, शेतकऱ्यांना फसवणाऱ्या व्यापाऱ्यांपासून योग्य तो मार्ग दाखवणे. शिवजयंती साजरी करायची परंतु ती देखाव्याने नाही तर योग्य पद्धतीने.”हे सांगताना रामचे उर भरून येत होते.
” वकील साहेब हाय का घरात.” जवळच्याचं मळ्यात राहणाऱ्या भीमाने आवाज दिला.
“काय रे भीमा काय झाले”. दरवाजा जवळ जाऊन वकील म्हणाले.
“आवं यंदा कारखाना काही दर वाढवून देईना झाल्यात.मजुरी फिटत नाय एवढ्या पैशातून. आनं आठरा महिने ऊस ठयावायचा परवडत नाय . माणसांची मजुरी, खतं , औषधे ,ट्रॅक्टरची मजुरी काय म्हणून नाय लागत. आनं त्या कारखान्याशिवाय आपला ऊस कोणाला द्यायचा. व्यापाऱ्याला द्यावा त …व्यापारी बी त्याचाच बाप हाय. काय डोस्क चालना झालया. तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा”. पोटतिडकीने भीमा बोलत होता.
“मला वाटतं काका आपण एक काम करूया कारखाना साहेबांच्या हाता पाया पडण्यापेक्षा आपण सर्व शेतकऱ्यांनी मिळून गुऱ्हाळ चालू केले तर….” कल्पना सुचवत राम बोलला.
“कल्पना चांगली आहे. जर कारखान्याला आपल्याला चांगला दर वाढवून द्यायचा नसेल तर आपण आपला नवीन उपक्रम चालू करू शकतो. आणि त्याचे निर्यातही करू शकतो .तेवढा मुबलक ऊसाचा पुरवठा आपल्या गावामध्ये आहे. आणि यातही शिवाजी महाराजांची विचारसरणीच कामाला येते. जर घेणारा आपला माल व्यवस्थित घेत नसेल तर आपल्या मालाची योग्य पद्धतीने विक्री करणे आपल्याला जमलेच पाहिजे.
कमी दरात शेतकऱ्यांचा माल घ्यायचा आणि जास्त दरात त्याची विक्री करायची हा कुठला न्याय आहे. ही सरळ सरळ लुटमार आहे. कष्ट आपण करायचे मात्र फायदा त्यांचा करून द्यायचा.हे शिवाजी महाराजांच्या निती नियमात कधीच बसले नाही. महाराजांनी शेतकऱ्यांना जमिनी दिल्या, शेतीसाठी लागणारा खर्चही दिला. आणि त्याचा फायदा जर झाला तरच शेतकऱ्याकडून महाराज स्वराज्यासाठी कर आकारत तोही कमीच. आणि आपणही तेच केले पाहिजे. आपल्यामुळे कोणाला त्रासही होणार नाही आणि आपल्या मालाची विक्री आपण स्वतः करू शकतो. हा एक प्रकारचा गनिमी कावाच आहे.चला तर आपण शिवजयंतीच्या मुहूर्तावर हा नवीन उपक्रम हाती घेऊ या.” वकील साहेब उत्साहाने बोलले. सर्व गावात ही बातमी पोहोचवली आणि सर्वांनी त्याला होकारही दिला.
बघता बघता शिवजयंतीचा दिवस उजाडला. मोठ्या संख्येने गावकरी जमा झाले सर्वांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. वकील साहेब ,राम आणि रामचे मित्र सर्वांनी गावकऱ्यांपर्यंत शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार केला. आणि त्यांच्यासोबत छोटासा शिव ही सहभागी झाला होता. आणि शिवला अनमोल ज्ञान देणारे त्यांचे भोसले सर ही तेथे उपस्थित होते .आज त्यांचीही छाती अभिमानाने भरून आली होती. खऱ्या शिवजयंतीची सुरुवात ही शिव पासूनच झाली होती. गनिमी कावा करून आपण कसे विरोधकांना मात करू शकतो हे सर्व कार्यक्रमात समजावून सांगितले . शिवजयंती उत्सव मोठ्या थाटामाटाने पार पाडण्यात आला.
आणि सर्व जनसमुदायातून एकच घोषवाक्य कानी पडले.
“शिवाजी महाराज की जय…….”
“जय जिजाऊ….. जय शिवराय……”
तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की कळवा. आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या “लेखक मित्र” या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा “WhatsApp” ग्रुपही जॉईन करा .
धन्यवाद!
लेखिका – शितल औटी, जुन्नर
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
खुप सुंदर कथा, अप्रतिम लेखन आणि विचार तर खरंच शिवराय चे छान मांडलेले आहेत. कौतुक करावे ठेवढं कमी आहेत. 👍
Thank you
Thank you
Khup chhan
Thank you
महाराजांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे…
👍