International mother language day Marathi २०२४ :दर वर्षी मातृभाषा दिवस साजरा केला जातो. प्रेत्येकाला आपल्या मातृभाषेचे महत्व असतेच म्हणून या दिवसाला एक महत्व असते.
या लेखात जाणून घेऊ या
- मातृभाषा दिवसासाठी बांगला देशाला संघर्ष का करावा लागला.
- युनेस्कोची अंतर राष्ट्रीय भाषा दिवस ठरवण्यामागील उद्दीष्टे आणि धोरणे.
- देशात एक किंवा अधिक मातृभाषेचा वापर कसा होतो.
- मातृभाषेचे अनन्य साधारण महत्व.
- डिजिटल युग आणि मातृभाषा.
- मातृभाषा दिवस कसा साजरा केला जातो.
मातृभाषेसाठी बांगला देशाचा संघर्ष
जेव्हा पाकिस्तान सरकारने १९४८ साली ,उर्दू भाषा संपूर्ण पाकिस्तानची राष्ट्रभाषा म्हणून जाहीर केली तेव्हा जास्त संख्येने पूर्व पाकिस्तान येथे राहणाऱ्या बंगाली भाषिक नागरिकांनी या गोष्टीचा निषेध केला.
त्यावेळी राजकीय आणि समाजकार्यात सक्रिय असलेले धिरेंद्रनाथ दत्त यांनी पाकिस्तानच्या संविधान सभेत, फेब्रुवारी १९४८ ला उर्दू शिवाय बंगाली भाषेला देखील राष्ट्रीय भाषा म्हणून मान्यता देण्यात यावी अशी मागणी केली. बंगाली भाषा ही पूर्व पाकिस्तानची मातृभाषा असावी या मागणीला मोठ्या चळवळीचे स्वरूप आले. या वेळी झालेल्या पोलिसांच्या गोळीबारात शेकडो जण जखमी झाले आणि अनेकजण मृत्यू पावले.
आपल्या मातृभाषेसाठी लोकांनी बलिदान दिले ही एक मोठी ऐतिहासिक घटना झाली.
तेव्हापासून बांगला मध्ये हा दिवस अंतर राष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तेथील नागरिक शहिदांच्या प्रती आपले दुःख आणि कृतज्ञता व्यक्त करतात. बांगला देशात हा दिवस आंतरराष्ट्रीय सुट्टीचा दिवस आहे.
मातृभाषा दिवस का साजरा केला जातो ?
शिक्षण, विज्ञान आणि संस्कृती द्वारा जगातील विविध देशांमध्ये परस्पर सामंजस्य, सौहार्द आणि सुरक्षा टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने १६ नोव्हेंबर १९४५ रोजी युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन म्हणजेच युनेस्को ( UNESCO) ची स्थापना झाली.
भाषा आंदोलनादरम्यान झालेल्या शहिदांच्या स्मरणार्थ २१ फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय भाषा दिवस म्हणून ओळखण्यात यावा असा प्रस्ताव कॅनडा येथील बांगलादेशी भाषा कार्यकर्ता रफिकुल इस्लाम यांनी युनेस्कोच्या सर्वसाधारण परिषदेत मांडला.त्याला युनेस्को कडून मान्यता मिळाली.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सांस्कृतिक आणि भाषिक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी, दरवर्षी २१ फेब्रुवारीला संयुक्तराष्ट्रसंघटनेतर्फे(युनेस्को)जागतिक मातृभाषा दिवस साजरा करण्यात येतो. भारतीय राज्य घटनेचाही तोच हेतू आहे. राज्य घटनेच्या परिशिष्ट ८ मध्ये सुरूवातीला चौदा भारतीय भाषा आणि आता बावीस भारतीय भाषांना विशेष दर्जा दिलेला आहे. त्यात महाराष्ट्राची मराठी भाषा ही पंधरावी राष्ट्रीय भाषा आहे.
संपूर्ण जगात जवळ जवळ ७००० मातृभाषा बोलल्या जातात .भारतात अंदाजे १३०० मातृभाषा आहेत. त्यात प्रामुख्याने २२ भाषा बोलल्या जातात.
शिक्षणाचा मूलभूत हक्क – नॅशनल करिक्युलम् फ्रेमवर्क ( आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस २१ फेब्रुवारी २०२४) नुसार शिक्षण हा मुलांचा मूलभूत अधिकार आहे.(right to education act 2009) मातृभाषेमुळे सर्वांगीण व्यक्तीविकास होत असल्याने किमान इयत्ता आठवी पर्यंत त्यांना मातृभाषेत शिक्षण द्यावे आणि त्या नंतर हळू हळू विद्यार्थ्यांना वेगळ्या भाषा परिचित करून द्याव्यात असे हा कायदा सांगतो.
विविध देश आणि त्यांचा मातृभाषेचा वापर (आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस २१ फेब्रुवारी २०२४)
१९४७ चा स्वातंत्र्य लढा ही भारत देशाच्या ऐतिहासिक घटनापैकी एक आहे. मात्र या कालखंडाच्या आसपास जगातील इतर जवळ जवळ ७२ देश सुद्धा परकीय सत्तेतून मुक्त झाले. या नव स्वतंत्र देशांनी गुलामीची सारी बंधने झुगारून देऊन स्वदेशाची नव्याने उभारणी केली.
स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेम बाळगलेल्या बऱ्याच राष्ट्रांनी प्रगतीची नवी नवी शिखरे अल्पावधीतच गाठली.चीन, मलेशिया,जपान,डेन्मार्क,स्वीडन, नॉर्वे,अगदी अलीकडील युक्रेन देश अशी कितीतरी नावे उदाहरणादाखल घेता येतील.या आणि जगातील बहुतेक सर्व राष्ट्रात शिक्षण आणि व्यवहाराचे मध्यम हे त्या त्या प्रदेशातील मातृभाषाच आहेत.
एकापेक्षा अधिक राष्ट्रभाषा असणारे देश आणि राष्ट्रभाषेचा वापर
- जगात एकापेक्षा अधिक राष्ट्रभाषा असणारे देश देखील आहेत. जर्मनी मध्ये चार, कॅनडामध्ये दोन,तर रशियात डझनाहून अधिक राष्ट्रभाषा आहेत. या प्रादेशिक भाषा आपापल्या प्रांतापुरत्या प्रमुख भाषा म्हणून वापरल्या जातात. इतर भाषा दुय्यम भाषा म्हणून वापरल्या जातात. अनेक राष्ट्रभाषा असणारे इतरही देश आहेत.
- अनेक देशातील शासनकर्ते देशात व देशाबाहेरही फक्त स्वत:च्याच भाषेत बोलतात.चीन,जपान,जर्मनी,कोरिया,रशिया,इस्त्राईल, मलेशिया इत्यादी देशातील शासनकर्ते देशात आणि इतरत्र त्यांची मातृभाषाच बोलतात.सोबत दुभाषी ठेवतात.
- सर्व विकसित देश मातृभाषे सोबत स्वाभिमानाने आणि ताठ मानेने जगासमोर उभे आहेत. त्यांच्या सर्वांगीण विकासास कुठेही बाधा आलेली नाही. या देशांची समाजव्यवस्था,न्याय व्यवस्था, शिक्षणव्यवस्था, राज्यव्यवस्था त्यांच्या त्यांच्या राष्ट्रभाषेतून, मातृभाषेतून संचलीत केल्या जातात.
- चीन, जपान सारख्या प्रगत देशांनी केलेल्या शास्त्रीय संशोधनाचे मसुदे देखील त्यांच्या चित्रलिपी मध्येच लिहिलेले आहेत. जगासमोर ते इंग्रजीमधून येतात त्या मुळे इंग्रजी ही जागतिक भाषा आहे असे समजले जाते.
मातृभाषा आणि मातृभाषेचे अनन्य साधारण महत्व
- अस्तित्व – स्थानिक भाषेचे अस्तित्व हे सर्वसाधारणपणे त्या त्या प्रभागाच्या संस्कृती आणि परंपरेच्या प्रभावाने चालत आलेले असते.
- मातृभूमी – आपण ज्या मातीत जन्म घेतो तेथील भाषा आपल्या जन्मासोबतच आपली मातृभाषा म्हणून आपल्याला मिळते.
- समाज -विशिष्ठ समाजाला जोडून ठेवण्यात मातृभाषेचा फार मोठा वाटा आहे.
- वैशिष्ठ्य – देशाचे, राष्ट्राचे, शहराचे, गावाचे वैशिष्ठ्य तेथील स्थानिक भाषेवरून ओळखले जाते.
- शिक्षण – शिक्षण मातृभाषेत केल्याने सहज सुकर आणि आत्मविश्वासपूर्ण रीतीने करता येते हे संशोधनातून सिद्ध झाले आहे.
- युनेस्को अहवाल – मातृभाषेतुन शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची आकलन शक्ती व गुणवत्ता ही इतर भाषेच्या माध्यमातुन शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा किती तरी चांगली व सरस असते असे युनेस्कोच्या अहवालात आढळुन आले आहे
- अवांतर वाचन – शिक्षणाच्या आणि व्यक्तीमत्व विकासाच्या दृष्टीने अवांतर वाचन अगदी अत्यावश्यक बाब आहे आणि ही सवय मातृभाषा माध्यम असल्यास सहजी विकसित होते.
- अभिव्यक्ती- मातृभाषा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कणा आहे.मूलतः विकसित पावण्याच्या माणसाच्या इच्छेला व्यक्त होण्यासाठी मातृभाषे इतका दुसरा चांगला पर्याय नाही.विचार, वृत्ती, भावना, कल्पना मातृभाषेत लिहिताना, बोलताना मेंदूवर कुठलाही भाषिक ताण पडत नाही.
- नव्या संकल्पना – कुठल्याही नव्या संकल्पना शिकताना आपल्या मातृभाषेतून स उदाहरण शिकवल्या तर त्या कायम स्वरुपी आत्मसात केल्या जातात आणि मुळापासून समजतात.
डिजिटल युग आणि मातृभाषा
जागतिकीकरण (globalization) आणि तंत्रज्ञान यांच्या मुळे राष्ट्र विकास, देशाचा विकास आणि पर्यायाने जागतिक विकास होतो हे मान्य करावयास हवे. मात्र याच बरोबर अनेक मातृभाषा लोप पावत चालल्या आहेत हे देखील मान्य करायला हवे. अनेक तंत्रज्ञान पद्धती विकसित होत असताना त्यात अनेक मुख्य राष्ट्रीय भाषांचा वापर केलेला आढळतो. कोणतीही एक किंवा दोन च भाषा यांचे वर्चस्व नसून सर्व राष्ट्रांनी सर्व राष्ट्रांच्या मातृभाषांचा आदर राखला पाहिजे या युनेस्कोच्या तत्त्वाचे अनुसरण केलेले दिसते. प्रत्यक्ष दुभाषाचे काम देखील आता तंत्रज्ञानात होताना आढळते आहे. मात्र विकासाच्या या गतिमान टप्प्यावर भविष्यात एकंदरच संस्कृती, परंपरा आणि शिक्षण पद्धती सर्वांमध्ये अमुलाग्र बदल होत जातील यात शंका नाही. या प्रवासात प्रादेशिक मातृभाषेचे संरक्षण होणे हे महत्वाचे आवाहन साऱ्या जगापुढे असणार आहे.
मातृभाषा दिवस कसा साजरा केला जातो
बहुभाषावादाच्या संकल्पनेचा मुद्दा प्रमुख धरून या वर्षी युनेस्को तर्फे जगभरात २१फेब्रुवारी ला हा दिवस साजरा केला जातो.या दिवशी पुढील कार्यक्रम आयोजित केले जातात :
- जगभरात भाषांच्या विविधतेच्या आणि बहुभाषावादाच्या प्रसारासाठी जागरूकता करणे.
- शैक्षणिक, सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रातील विविध मान्यवर लोकांच्या भाषणाद्वारे बहुभाषिक शिक्षणाचे महत्व जाणणे.
- साहित्यिकांच्या व्यासपीठावर खुल्या चर्चा ठरवणे.
या चर्चेचे विषय साधारणत असे असतात:
अ)भाषेतील वैविध्याचा आदर करणे,
ब)लोप पावत चाललेल्या भाषेवर ती टिकून ठेवण्यासाठी काय करता येईल यावर चिंतन करणे,
क)नवीन प्रस्ताव तयार करणे,
ड) मातृभाषेचे संवर्धन,प्रचार आणि प्रसार करणे या बाबत आवश्यक ती धोरणे ठरवणे.
मातृभाषेचे महत्त्व हे निर्विवाद पणे श्रेष्ठ आहे. (International mother language day Marathi २०२४ ) मातृभाषेच्या माध्यमातून आपल्याला आपल्या भाषेतील विचार आणि भावना स्पष्टपणे व्यक्त करण्याची क्षमता मिळते. आपल्या संस्कृती,इतिहास,आणि विचारांच्या विकासात मातृभाषेची महत्त्वाची भूमिका आहे. राष्ट्राच्या,देशाच्या आणि विश्वाच्या उन्नती मध्ये प्रत्येक मातृभाषेचा फार मोठा वाटा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
पुढील आठवड्यात म्हणजे २७ फेब्रुवारी ला आपला महाराष्ट्राचा मातृभाषा दिवस,आपल्या माय मराठी भाषेचा दिवस आहे आणि कवी कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस देखिल!
संत ज्ञानेश्वरांनी मराठीची पाया भरणी केली आणि संत तुकाराम महाराजांनी अभंग रचले आणि मराठीची भरभराट केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीला वैभव दिले. साहित्यकार आणि कवी कुसुमाग्रजांनी माय मराठी ला सन्मान दिला.
जागतिक मातृभाषा दिनानिमित्त आपण सारे कवी कुसुमाग्रज यांच्या ओळींचे स्मरण करूया आणि मातृभूमी, मातृभाषेला वंदन करूया !
भाषा मरता देशही मरतो / संस्कृतीचा अन् दिवा विझे !गुलाम भाषिक होऊन, आपुल्या प्रगतीचे शीर कापू नका .. वाट वाकडी धरू नका !
धन्यवाद!
लेखिका : सौ.ज्योती आनंद एकबोटे, पुणे