आंतरराष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धा २०२४ l Letter writing competition Marathi

WhatsApp Group Join Now

पत्रलेखन कौशल्य वाढवा टपाल विभागातर्फे आयोजित पत्रलेखन स्पर्धेत भाग घ्या !

पत्रलेखन स्पर्धा २०२४: मित्र हो तुम्हांला पत्रलेखन करायला आवडतं? तुमच्या घरी ९ ते १५ वयोगटातील मुलं आहेत? तर त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. ९ ते १५ वयोगटातल्या मुलांसाठी भारतीय टपाल विभागाने आंतरराष्ट्रीय पातळीवर पत्रलेखन स्पर्धा आयोजित केली आहे. ९ ते १५ वर्षे वयोगटातील विद्याथ्यांसाठी ही स्पर्धा खुली आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषेतून पत्रलेखन करता येणार आहे. 

या स्पर्धेत विषय असा आहे की ‘भविष्यातील पिढ्यांना त्या जगाबद्दल एक पत्र लिहा, ज्याची तुम्हाला आशा आहे की त्यांना वारसा मिळेल.

स्पर्धेत भाग घेतल्यानंतर ही पत्रं ‘निदेशक मुंबई जनरल पोस्ट ऑफिस ४००००१’ या पत्त्यावर २० मार्च २०२४ पर्यंत पाठवावी  अशी माहिती पुणे ग्रामीण विभागाचे डाक अधीक्षक बी. पी. एरंडे यांनी दिली आहे.

यानिमित्ताने आज आपण पत्रलेखन म्हणजे काय? पत्रलेखन कौशल्य कसं वाढवता येईल? या विषयी थोडक्यात चर्चा करुया.

पत्रलेखन म्हणजे काय?

       पत्र म्हणजे काय? पत्रलेखन म्हणजे काय ?हे प्रश्न आज कुणाला पडले तर फारसं नवल नाही. पुर्वीच्या काळी लांब अंतरावर असणा-या व्यक्तींना एखादी गोष्ट सांगायची असेल तर ती लिहून एखाद्या व्यक्तीच्या हातून त्यांच्यापर्यंत संदेश पाठवला जाईल.

ज्याने आपला संदेश पत्राच्या माध्यमातून लिहिला ती व्यक्ती,  ज्याला संदेश देण्यासाठी पत्र  लिहिले ती व्यक्ती, पत्र घेऊन जाणारी व्यक्ती आणि पत्राचा मजकूर असे अनेक घटक या पत्रामागे असतात. इतिहास कालात काही ठिकाणी  शिकवलेल्या कबुतरांच्या मार्फत पत्रांची देवाणघेवाण व्हायची. काहीवेळा दूत ही पत्र घेऊन जायचे. कागदांचा वापर मोठ्या प्रमाणात भारतात सुरू झाल्यानंतर राजकीय पत्रव्यवहार मोठा प्रमाणात वाढला. इतिहास सामान्य जनतेसमोर मांडताना अनेक अभ्यासकांनी त्याकाळातील पत्रांचा बारकाईने अभ्यास केला. त्यापुढे जाऊन एक सुव्यवस्थित शासकीय टपालयंत्रणा भारतात उभी राहिली आणि पत्रव्यवहार जनसामान्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनला. दिवाळी, वाढदिवसाच्या शुभेच्छा, संक्रांतीचे तिळगूळ यांची पत्राबरोबर देवाणघेवाण होऊ लागली. आपुलकीच्या शब्दाने दूरवरची नाती ही सांभाळता येऊ लागली. या पत्राचा पगडा समाजावर एव्हढा मोठा होता की कथा कांदबरीत पत्रांची वर्णन असायची. थोरामोठ्यांची पत्रं पुस्तक रुपाने वाचकांपर्यंत पोचू लागली.हिंदी मराठी चित्रपट संगीतात ही अगदी ९० च्या दशकापर्यंत पत्रांचा उल्लेख असायचा.

              पत्र आणि पत्रलेखन कित्येकांचा जिव्हाळ्याचा आणि आठवणींचा ठेवा बनला. असं हे पत्रलेखन काळाच्या आधुनिक बदलात जुनं झालं मागं पडलं.

पत्रलेखनातील बदल

       पत्रलेखन हे आता काळाच्या ओघात खूप मागे पडलं आहे. खरंतर भारतीय टपाल संस्था ही १५० वर्षं जुनी संस्था आहे. साधे टेलीफोन सुद्धा जेंव्हा अस्तित्वात नव्हते त्याकाळात परगावी असणा-या नातेवाईकाची ख्याली खुशाली जाणून घेण्याचं एकमेव साधन म्हणजे पत्र असायचं. ठरलेल्या वेळी दारात येणा-या पोस्टमन दादांची आतुरतेने वाट पाहिली जाई हे आज सांगूनही खरं वाटणार नाही, कारण आज क्षणार्धात एखादा संदेश जगाच्या दुसऱ्या टोकाला पोचू शकतो. पण पत्र पोचायला चार, आठ दिवस ते महिनाभर लागू शकायचा.आज ईमेल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हा वेळ अवघ्या काही मिनिटांवर पोहचला आहे. दूरवर राहून आनंद आणि दुःख वाटून घेण्याची पध्दत बदलली,प्रतीक्षेचा काळ कमी झाला.

    जोपर्यंत पत्र लिहून  लिफाफ्यात घालून पत्र पाठवायचे तोपर्यंत ज्याला पत्र लिहले त्याचं  नाव आणि पत्ता, ज्याने पत्र लिहले त्याचं नाव आणि पत्ता लिहिला जायचा. आधुनिक तंत्रज्ञानात ई-मेल पत्र आता सुटसुटीत ठरतात. आता लिफाफ्याची गरज नाही. लिहिलेलं पत्र मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून पाठवणं सहज सोपं ठरतं. आता बदलत्या काळानुसार ई-मेल कसा पाठवायचा हे शिकावं लागतं . तसच ई-मेलच्या नव्या स्वरूपानुसार पत्रलेखनाची नवी पद्धत शिकावी लागते.

पत्रलेखन कौशल्य कसं वाढवता येईल?

        पत्र लिहिणे हे एक कौशल्यच आहे, पुर्वी पोस्टकार्ड, आंतर्देशीय पत्र किंवा लिफाफ्यातून पत्र पाठवली जायची,तेंव्हा उपलब्ध जागेत जास्तीत जास्त मजकूर लिहिणं ही एक तारेवरची कसरत असायची. जेंव्हा पासून फोन सुरू झाले , तेंव्हा आपल्या जिवलग व्यक्तीचा आवाज ऐकायला मिळू लागला. मोबाईलने तर क्रांतीच केली. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन आहे, प्रत्येक जण हव्या त्या व्यक्तीशी हवं तेंव्हा संपर्क साधू शकतो. मग अशा या काळात पत्र लेखनाची कला, कौशल्य लोप पावेल का ?

        अजिबात नाही पत्र म्हटलं की अजून आपण पारिवारिक अनौपचारिक पत्रांचाच विचार करतो, पण आजही आपल्याला कितीतरी औपचारिक पत्र लिहावी लागतात, नोकरीसाठी ,रजेसाठी ईमेल करावी लागते, आपल्या भागातील गैरसोयीविषयी महानगरपालिकेत कळवावं लागतं, त्यासाठी पत्र लिहावं लागतं.त्यामुळे पत्रलेखनाची कला अवगत असणं कधीही चांगल. चला तर आज पत्रलेखन (पत्रलेखन स्पर्धा २०२४) कसं असावं याविषयी थोडक्यात माहिती घेऊया.

मराठी पत्रलेखन कसे करावे?

मराठी पत्रलेखनात दोन प्रमुख प्रकार आहेत. 

१) औपचारिक पत्रलेखन

 २) अनौपचारिक पत्रलेखन

  या दोन्ही मध्ये नेमका काय फरक आहे ते आपण पाहूया.

औपचारिक पत्रलेखन कसे लिहावे?

एखाद्या औपचारीक, व्यावसायिक कामासाठी एखाद्या व्यक्तीशी,संस्थेशी किंवा एखाद्या कार्यालयाशी लेखी स्वरूपामध्ये पत्रव्यवहार केला जातो, तेंव्हा त्याला औपचारीक पत्रलेखन म्हणतात. आज ईमेलच्या माध्यमातूनसुद्धा औपचारिक पत्रलेखन केलं जातं.

       औपचारिक पत्रात ही काही उपप्रकार आहेत.

१)कार्यालयीन कामकाज पत्रव्यवहार 

२)व्यवसायिक कामासाठी पत्रव्यवहार 

३)नोकरीत अर्ज करण्यासाठी पत्रव्यवहार 

४)तक्रार /अर्ज करण्यासाठी पत्रव्यवहार 

५) विनंती करण्यासाठी पत्रव्यवहार 

६)आमंत्रण देण्यासाठी पत्रव्यवहार 

७)चौकशी करण्यासाठी पत्रव्यवहार 

औपचारिक पत्र लिहिताना काय काळजी घ्यावी

  • पत्रातला  मजकुर हा विषयाला अनुसरून हवा.
  •  पत्राची भाषा  साधी, सोपी नेमकी असावी.
  • अनावश्यक  गोष्टींचा उल्लेख करू नये.
  •   पत्राच्या उजव्या बाजूला आपलं नाव,पत्ता  तारीख लिहावी.
  • ज्यांना पत्र लिहायचे आहे त्यांचं नाव, त्याखाली त्यांचं पद लिहावं.
  • पत्राचा विषय लिहावा.
  • काही संदर्भ असतील तर त्याचा उल्लेख करावा.
  • पत्रातील मजकूर मोजक्या शब्दात लिहावा.
  • उजव्या बाजूला खाली आपला विश्वासू असं लिहून नाव लिहाव़ आणि स्वाक्षरी करावी.

 असं लिहावं औपचारिक पत्र

                                               नाव

                                               पत्ता

                                               तारीख 

प्रती,

ज्यांना पत्र लिहायचं त्यांचं नाव

पद

विषय

संदर्भ

        पत्राचा मजकूर

                                           आपला विश्वासू

                                            नाव

                                           सही

२) अनौपचारिक पत्रलेखन कसे करावे?

  •  यामध्ये भावनांना महत्व असतं. यातली भाषा रूक्ष, कोरडी नसते.
  • आईवडील,भावंडं, मित्र मैत्रीणी, नातेवाईक यांना हे अनौपचारिक पत्र लिहिलं जातं.
  • सुखदुःखाची देवाणघेवाण असते.
  • ठराविक प्रकारची मांडणी अपेक्षित नसते.
  • भावभावना़ंचा चढ उतार यात अनुभवायला मिळतो.

अनौपचारिक पत्रलेखनाला ठराविक मांडणी नसते तरीही परीक्षेसाठी किंवा एखाद्या स्पर्धेसाठी पत्रलेखन करणार असाल तर अशा पद्धतीने लिहिता येईल.

                                    नाव

                                    तारीख

प्रिय (व्यक्तीचे नाव)

मजकूर

              पत्र लिहिणा-या व्यक्तीचे नाव 

१० वीच्या परीक्षेत पत्रलेखनाचा प्रश्न असतोच. विद्यार्थ्यांचं लेखन कौशल्य विकसित व्हावं हा त्या मागचा हेतू असतो.

विद्यार्थ्यांनी पत्रलेखनासाठी भाषाकौशल्यं कशी विकसित करावी?

  • परीक्षेसाठी किंवा स्पर्धेसाठी हाताने पत्रलेखन करत असाल तर अक्षर सुवाच्य असावं.
  • पत्रं टाईप करणार असाल तर फॉन्ट योग्य पद्धतीने निवडावा. गरज असेल तशी फॉन्टची साईज कमी जास्त करावी.
  • कोणत्याही पद्धतीच्या लेखनासाठी वाचनाचा पाया पक्का हवा.
  • आजूबाजूला काय चालू आहे याचं भान हवं.
  •  पत्राची मांडणी आकर्षक असावी.
  • शुद्धलेखनाचे नियम काळजी पूर्वक पाळावेत.
  • ऱ्हस्व-दीर्घांचा अचूक वापर आणि विरामचिन्हांचा सुयोग्य वापर यामुळे
  • वाचणा-या व्यक्तीवर चांगला प्रभाव पडतो.
  • विषयाला पूरक अशा कवितेच्या ओळी सुविचार यामुळे लेखन मनोरंजक आणि वाचकप्रिय ठरतं.

परीक्षेसाठी जेंव्हा पत्रलेखन करायचं असतं तेंव्हा प्रश्नपत्रीकेमध्ये पत्र कुणी कुणाला लिहायचे आहे याबाबत स्पष्ट उल्लेख  असतो. प्रश्नातच पत्ते सुद्धा दिलेले असतात.  प्रश्नांमध्ये दिलेल्ं नाव आणि पत्त्यांचाच वापर करुनच पत्रलेखन करावे. समजा प्रश्नांमध्ये  नाव आणि पत्ते दिले नसतील तर काल्पनिक नाव ,पत्ता लिहावा स्वतःचे नाव लिहू नये . त्या ठिकाणी ‘अ.ब.क’ अशा पद्धतीनेच नाव लिहावं.

तर परिक्षेसाठी, स्पर्धेसाठी पत्र लिहिताना काही गोष्टी लक्षात ठेवल्यात तर तुम्ही सुद्धा उत्तम पत्र लिहू शकता. चला तर मग उचला पेन लिहा एक छानसं पत्रं, आणि हो आम्हांला कमेंट करुन सांगा की तुमच्या आयुष्यातलं अविस्मरणीय पत्रं कोणतं आणि का आहे?

तुम्हांला पत्रलेखनाविषयी (पत्रलेखन स्पर्धा २०२४) ही  माहिती कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत ही माहिती शेअर करायला विसरू नका. अशीच नवनवीन माहिती आणि छान छान कथा सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.

      धन्यवाद !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top