मराठी कथा – दान जीवनाचे

WhatsApp Group Join Now

शरद जाऊन दोन महिने उलटून गेले होते. सुमित्रा अतिशय उदास होऊन बाल्कनीतल्या झोपाळ्यावर बसली होती. शरद आणि तिची आवडती जागा होती. रिटायरमेंटनंतर खूप वेळ मिळत होता दोघांना. आवडत्या जागी बसून कितीतरी गप्पा करत चहाचे कित्येक कप रिकामे केले होते दोघांनी. आता एकटीलाच इथे बसून आयुष्य जगत रहावं लागणार ह्या विचाराने ती अजून दुःखी झाली. परंतु शरद चे शब्द आठवले तिला. आता स्वतःसाठी नाही त्याच्यासाठी जगायचे. आणि तिने स्वतःला सावरले. 

आज होणाऱ्या तिच्या सत्कार सोहोळ्यासाठी तयारी करावी म्हणून ती आत आली. शरद ला आवडायची तशी तयार झाली. त्याच्या आवडीची हलक्या गुलाबी रंगाची साडी नेसली आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचली. सोहळ्यात बरीच मोठी व्यक्तिमत्त्व आली होती. सुमित्राचा सत्कार करण्यासाठी तिला व्यासपीठावर बोलवण्यात आले. त्यावेळेस एका क्षणासाठी तिला शरद ची खूप ऊणीव भासली. व्यासपीठावर तिचा सत्कार मोठे सर्जन म्हणून नावाजलेल्या डॉक्टर जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. मग डॉक्टरांना दोन शब्द बोलण्याची विनंती करण्यात आली. 

“नमस्कार. मी डॉक्टर जोशी. मला तुम्ही एक हृदयरोग तज्ञ म्हणून ओळखता. एक चांगला सर्जन असलो तरी प्रत्येक वेळेस ऑपरेशन करण्याआधी मी सुद्धा देवासमोर हात जोडतो. कारण एक आयुष्य वाचवण्यासाठी मला त्याच्या आशिर्वादाची गरज असतेच. माझ्या शिक्षणाचा आणि अनुभवाचा ऊपयोग हा आयुष्य वाचवण्यासाठी व्हावा असं मला नेहमीच वाटतं असतं. कधी त्यात यश मिळतं तर कधी नाही. असाच एक अनुभव मला आला. 

एक दिवस पंचवीस वर्षांचा तरुण हॉस्पिटलमध्ये आला होता. त्याचे हृदय खूप कमकुवत झाले होते. त्याला हा त्रास लहानपणापासूनच होता. पण त्याकडे दुर्लक्ष केले गेले आणि नंतर त्याचा त्रास वाढत गेला. त्यावेळेस आता सारखे खूप प्रगत तंत्रज्ञान नव्हते आणि हृदय प्रत्यारोपण करण्यासाठी अवयवदानाचे महत्त्वही कुणालाही माहित नव्हते. त्यामुळेच आम्ही त्याला वाचवू शकलो नाही. त्या दिवसापासून मी स्वतः अवयवदाना विषयी समाजाला जागृत करण्यासाठी व्याख्याने देण्यास सुरुवात केली आणि त्यातच स्वतःला झोकून दिले. 

आज मला सुमित्रा ताईंचा सत्कार करायला मिळतो आहे ह्याचा मला आनंद वाटतो. मी सुमित्रा ताईंना गेले दहा वर्ष ओळखत आहे. त्यांच्या घरातील एक सदस्य झालो आहे मी. काही जणांबरोबर आपले नातं जुळून येतं तसंच काहीसं झालं आहे . माझे आणि सुमित्राताईंच्या कुटुंबाचे काही ऋणानुबंध असावेत म्हणून मी त्यांच्या कुटुंबाचा सदस्य झालो. सुमित्रा ताईंनी समाजासाठी केलेलं कार्य सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. अवयवदानाविषयी जनजागृती करण्याचं कार्य त्या गेली सात वर्ष करत आहेत आणि त्यामुळे कित्येक जणांची कुटुंब आनंदात आहेत.

 सुमित्रा ताईंनी आणि त्यांचे यजमान कैलासवासी श्री शरद साठ्ये ह्यांनी अवयवदान करून आणि त्याविषयी जनजागृती करून एक नवीन सामाजिक क्रांती करण्याचे कार्य केले आहे आणि त्यामुळेच आज समाज काही प्रमाणात अवयवदानाबद्दल सजग होत आहेत. गेल्या तीन ते चार वर्षांत अवयवदान करण्यासाठी कित्येक लोक पुढे येत आहेत. ही खरंच समाधानाची अणि आनंदाची गोष्ट आहे. सुमित्राताईंनी हे कार्य असेच पुढे सुरू ठेवावे आणि त्यांच्यासारखे स्वयंसेवक तयार करावेत. सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी त्यांची गरज आहे. त्यांना मी निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचे अभिनंदन करतो. मी त्यांना विनंती करतो की हे समाजप्रबोधनाचे कार्य कसे करावे ह्याविषयी इथे उपस्थित असलेल्यांना त्यांनी मार्गदर्शन करावे..” 

डॉक्टरांनी कौतुकास्पद केलेल्या भाषणाने सुमित्रा अवघडली होती. तसेच भाषण करण्याचे दडपण ही आले होते. तिने अनेक जणांना मार्गदर्शन करताना संवाद साधला होता. परंतू भाषण पहिल्यांदाच करत होती. “व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांना माझा नमस्कार.” असं म्हणत सुमित्राने बोलण्यास सुरूवात केली. 

” खरंतर भाषण, मार्गदर्शन करण्याएवढी मी काही तज्ञ किंवा मोठी नाही. मी एक सामान्य स्त्री आहे. मी केलेले कार्य काहीच नाही. मी फक्त लोकांशी संवाद साधते. अवयवदानाचे महत्त्व पटवून देते. अवयवदानासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया, आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांविषयी माहिती सांगते. मी इतकचं करते. अवयवदान करणाऱ्यांचे कार्य मोठे. मी फक्त त्यांना ते कार्य करण्यासाठी प्रवृत्त करते. 

खरतरं हा पुरस्कार माझा नाहीच. हा पुरस्कार माझ्या मुलाचा शौनकचा आहे. तसंच ह्या पुरस्कारामध्ये माझ्या सूनेचा शेफालीचा सुद्धा वाटा आहे. कारण ह्या दोघांनी अवयवदानाच्या जनजागृतीची चळवळ सुरू केली. जे क्षण आपल्याला मिळाले आहेत ते सत्कारणी लावून जगून घ्यायचे. कल किसने देखा है, कल हम हो ना हो म्हणून जे करायचे ते आत्ताच असं शौनक म्हणायचा. त्याच्या ह्या आत्ताचा क्षण जगण्याच्या विचाराने तो झपाटून काम करायचा. खूप काही करायचं होतं त्याला. शेफाली समाजासाठी काही करू पाहत होती. कित्येक समाजसेवी संस्थांमध्ये जाऊन समाजकार्य करत होती. आपल्यानंतर आपली ओळख ह्या जगात चांगल्या रूपाने रहावी असे शेफालीला वाटतं होते. 

दहा वर्षांपूर्वी डॉक्टर जोशी ह्यांच्या एका कार्यक्रमासाठी शौनक गेला होता. त्या कार्यक्रमात डॉक्टर जोशींनी अवयवदानाची किती निकड आहे ह्यावर तळमळीने व्याख्यान दिले होते. इथेच शौनकची आणि शेफालीची भेट झाली. दोघेही डॉक्टर जोशींच्या भाषणाने भारावून गेले होते. ह्या समाजाचे आपण देणं लागतो ह्या भावनेने त्यांनी तिथेच अवयवदानासाठी फॉर्म भरला. सगळी प्रक्रिया करून डॉक्टर जोशींना आमच्या घरी घेऊन आले होते. त्यावेळेस डॉक्टरांची आणि शेफालीची आमच्याशी ओळख झाली. 

जोशी डॉक्टरांनी स्वतः अवयवदानाबद्दल जनजागृती करण्याचे कारण सांगितले. त्यांचा अनुभव सांगितला. लोकांची अवयवदानाविषयीची उदासीनता आणि अज्ञानाबद्दल ते तळमळीने बोलत होते. डॉक्टरांनी आम्हाला शौनक आणि शेफाली ने केलेल्या अवयवदानाबद्दल सविस्तर सांगितले आणि त्यांना अवयवदान चळवळीचे स्वयंसेवक होण्याचे सुचविले. त्याप्रमाणे ते दोघे स्वयंसेवक झाले. कित्येक ठिकाणी जाऊन ते अवयवदानाबद्दल माहिती देऊन लोकांना उद्युक्त करत होते. आमच्या घरी कित्येक वेळेस ह्याविषयीचे चर्चासत्र भरत असे. त्यामुळेच मला आणि माझे पती शरद ह्यांना ह्या अवयवदानाबद्दल सगळी माहिती झाली. 

दरम्यान शौनक आणि शेफाली ह्या चळवळीनिमित्त भेटत राहिले. एकमेकांची मते, विचार, आवड जुळून आल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला व आमचा ही होकार होता ह्या लग्नासाठी. हसतंखेळतं कुटुंब आमचं; पण एका घटनेने आम्ही दुःखाच्या दरीत कोसळलो. शौनक आणि शेफालीच्या कारला भरधाव वेगाने येणाऱ्या मोठ्या वाहनाची टक्कर झाली आणि त्यातच ते आम्हाला सोडून गेले. 

मी तर पार कोसळून गेले होते. पोटच्या पोराचं आणि मुलीसारख्या सुनेचं जाणं मला सहन झालं नाही. पण शरद मात्र आपल्या दुःखातही शौनक आणि शेफालीची शेवटची इच्छा विसरला नाही. त्याने तत्काळ डॉक्टर जोशींना बोलवून अवयवदानाची सगळी प्रोसेस करून घेतली. गेलेल्यांचे दुःख करत बसण्यापेक्षा तत्काळ निर्णय घेऊन इतर चार जणांचे जीव कसे वाचवता येतील हे शरदने बघितले. 

माझ्या दुःखातून बाहेर येण्यास मला वेळ लागत होता. त्यावेळेस शरदने मला सांगितले,” दुःख आवरतं घे. आता जगायचे ते त्याच्यासाठीच. त्याने सुरू केलेली अवयवदानाची चळवळ आपण सुरू ठेवायची. आपल्या घरी चर्चासत्र सुरू करायची. अगं दोन लोकांना जरी आपण अवयवदानासाठी तयार करू शकलो तरी आपले शौनक आणि शेफाली त्यामध्ये आपल्याला भेटतील. 

ऊठ शोक आवर आणि हो तयार. आपण आजपासूनच सुरूवात करत आहोत. मी अवयवदान करण्यासाठीचा फॉर्म भरायला जात आहे. मी गेल्यानंतर माझ्या मागे माझ्या एखाद्या अवयवामुळे एकाला जरी जीवदान मिळाले तर मी सुद्धा परत जीवंत राहीन त्या माणसामध्ये. आपला शौनक आणि शेफाली सुद्धा  जिवंत आहेत त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये, त्यांच्या डोळ्यांमध्ये, त्यांच्या यकृतामध्ये. चल ऊठ आपण सुद्धा स्वतःला जीवंत ठेवू आपण ह्या जगातून गेल्यानंतर सुद्धा.”

आम्हीसुद्धा अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन संवादसभा घेऊन अवयवदानाबद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न करू लागलो. आता दोन महिन्यांपूर्वीच शरद गेला त्यावेळेस त्याच्या इच्छेनुसार अवयवदान केले. ह्या सगळ्यात मला डॉक्टर जोशींनी मदत आणि मार्गदर्शन केले. मी त्यांची खूप खूप आभारी आहे. 

आता शरद गेल्यानंतर मी एकटीच आहे. माझे नातेवाईक आता तुम्हीच. म्हणून तुमच्या साक्षीने आजच्या ह्या कार्यक्रमात हा पुरस्कार स्वीकारताना मी डॉक्टर जोशींना विनंती करते कि मी ह्या जगाचा निरोप घेतल्यानंतर मला जिवंत ठेवण्याचे कार्य तुम्ही करा. अर्थात मी ही माझे अवयवदान करत आहे. माझी ही शेवटची इच्छा तुम्ही आठवणीने पूर्ण करा. त्यासाठीची सगळी प्रोसेस मी करून ठेवली आहे. 

परत एकदा तुमच्या सर्वांचे आभार हा पुरस्कार दिल्याबद्दल. प्रत्येकाने जरूर अवयवदान करावे. कारण आपल्या एखाद्या अवयवामुळे एका कुटुंबाला त्यांचा मुलगा किंवा मुलगी, कुणालातरी आयुष्यभराचा जोडीदार, छोट्या बछड्यांना त्यांचे आईबाबा परत मिळू शकतात. म्हणूनच अवयवदानासारखं पुण्य नाही. हे पुण्य पदरात पाडून घ्या आणि जिवंत रहा जीव गेल्यानंतर ही.”

इतकं बोलून सुमित्राने आपलं भाषण संपवलं. सभागृहात शांतता पसरली होती. सगळेच अंतर्मुख होऊन विचार करत होते. इतकं मोठं पुण्य पदरात पाडून घ्यायचे असेल तर त्याविषयी संवाद साधायला हवा हे त्यांना पटले. टाळ्यांच्या कडकडाटाने सभागृह दणदणला. त्या कडकडाटात दोन तरूण मंचावर आले आणि त्यांनी डॉक्टर जोशींकडे अवयवदान करण्याची आणि जनजागृती चळवळीमध्ये सहभागी होण्याची ईच्छा बोलून दाखविली. त्या तरूणांमध्ये सुमित्राला शौनक आणि शरद दिसला. आणि तिने स्वतःमध्ये शेफालीला  बघितले. 

आता सुमित्राला एकटेपणा जाणवत नव्हता. कारण आता ती रोज चर्चासत्र आणि परिसंवाद आयोजित करणार होती आणि त्यात असंख्य शौनक, शरद आणि शेफाली तिला भेटणार होते. 

 जगण्याची कला म्हणजे दान. अवयवदान;  जीवनाच्या अंतानंतरही जीवन देऊन जीवंत राहण्याचं दान. 

      धन्यवाद !

तुम्हाला ही कथा कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WatsApp ग्रुप हि जॉईन करा.

महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)  

6 thoughts on “मराठी कथा – दान जीवनाचे”

  1. सुरेख मांडणी आणि महत्वाच्या विषयाची केलेली जागृती…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top