राष्ट्रीय विज्ञान दिवस (National Science Day) कधी आणि का साजरा केला जातो?
२८ फेब्रुवारी १९२८ हा दिवस भारताच्या वैज्ञानिक इतिहासात फार मोलाचा आहे. याच दिवशी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ, सर चंद्रशेखर वेंकट रमण यांनी रमण परिणामाचा (Raman Effect) शोध लावला. या शोधासाठी त्यांना १९३० मध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एखाद्या भारतीयाला तसेच एखाद्या आशियाई व्यक्तीला नोबेल पारितोषिक मिळण्याची ही पहिलीच वेळ होती. या महत्त्वपूर्ण दिवसाचे स्मरण म्हणून भारतात सन १९८६ पासून दरवर्षी २८ फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन‘ (National Science Day) म्हणून साजरा केला जातो.
लेखातील सामग्री –
- सी. व्ही रमण यांचे कार्य
- रमण परिणाम (Raman Effect)
- विज्ञान दिवस थीम
- विज्ञान दिवस कसा साजरा केला जातो?
- विज्ञान दिवस साजरा करण्यामागील उद्देश
सर चंद्रशेखर वेंकट रमण यांचा अल्प परिचय आणि कार्य –
ज्यांनी लावलेल्या शोधाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो त्या सी. व्ही. रमण यांच्याबद्दल थोडक्यात माहिती करुन घेऊ.
चंद्रशेखर वेंकट रमण यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८८८ मध्ये तमिळनाडू मधील तिरुचिरापल्ली येथे झाला. गणित आणि भौतिक शास्त्र या विषयांत त्यांना लहानपणापासूनच रुची होती. ते अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. विशाखापट्टणम येथे वयाच्या अकराव्या वर्षीच शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी चेन्नई येथे महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथे ते वयाच्या पंधराव्या वर्षी प्रथम श्रेणीत बी.ए. पास झाले. त्यांना भौतिकशास्त्र या विषयात सुवर्णपदक देखील मिळाले. पुढे १९०७ मध्ये त्यांनी उत्तम गुणांसह प्रथम श्रेणीत गणित विषयात एम.ए. केले. त्यावेळी ते १८ वर्षांचे होते.
विद्यार्थी म्हणून शिकत असताना त्यांनी विज्ञानातील अनेक विषयांवर संशोधन केले होते. त्यांनी लिहिलेला ‘प्रकाश विवर्तन’ हा निबंध लंडनच्या फिलॉसॉफिकल पेपर मध्ये 1906 मध्ये प्रकाशित झाला होता. त्यापुढील काळातही त्यांचे अनेक शोध निबंध प्रसिद्ध झाले. त्या काळात वैज्ञानिक म्हणून काम करण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध नव्हत्या. म्हणून ते भारत सरकारच्या वित्त विभागात असिस्टंट अकाउंट जनरल म्हणून कलकत्ता येथे रुजू झाले.
नोकरी करत असतानाच कलकत्ता येथील ‘द इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिवेशन ऑफ सायन्स’ (IACS) या संस्थेच्या प्रयोगशाळेत जाऊन ते ‘ध्वनी लहरींचे कंपन आणि कार्य’ या विषयावर आपले संशोधन करत असत. शेवटी विज्ञानाच्या आणि संशोधनाच्या प्रचंड आवडीमुळे ते १९१७ मध्ये चांगली नोकरी सोडून कलकत्ता विश्वविद्यालयात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून अत्यंत कमी पगारावर रुजू झाले. अनेक वर्षाच्या अभ्यासानंतर त्यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी रामन परिणाम हे संशोधन पूर्ण केले. याच शोधाबद्दल त्यांना १९३० मध्ये नोबेल पारितोषिक दिले गेले.
१९३३ मध्ये ते जे. एन. टाटा यांनी सुरू केलेल्या भारतीय विज्ञान संस्थेचे (Indian Institute of Science) संचालक झाले. एखाद्या भारतीय व्यक्तीची संचालक पदी आरूढ होण्याची ही पहिलीच वेळ होती.
भारत स्वतंत्र झाल्यावर अनेक नवीन संशोधन संस्था आणि विद्यापीठांच्या उभारणीस सुरुवात झाली. रमण यांचा या उभारणीत मोलाचा वाटा होता.
भारत स्वतंत्र झाल्यावर १९४८ मधे त्यांनी रमण संशोधन संस्थेची स्थापना केली. तेथे ते अखेरपर्यंत कार्यरत होते.
सी. व्ही. रमण यांनी भारताला वैज्ञानिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. त्यांना आपल्या जीवनात अनेक पुरस्कार मिळाले. १९५४ मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला. १९५७ मध्ये त्यांना लेनिन शांती पुरस्काराने गौरविण्यात आले. २१ नोव्हेंबर १९७० रोजी ते अनंतात विलीन झाले.
रमण परिणाम (Raman Effect) म्हणजे काय ?
प्रत्येक पदार्थ हा अणू आणि रेणूंचा बनलेला असतो हे आपल्याला माहित आहे. पदार्थावर प्रकाश पडला की त्यातील अणु-रेणू कंप पावतात. तो प्रकाश ती वस्तू काही काळ (अत्यंत सूक्ष्म काळ) धरून ठेवते. वस्तुतील अणू-रेणूंवर आदळून तो प्रकाश विखुरला जातो. आणि मग तो प्रकाश त्या वस्तूतून बाहेर येतो. पण या प्रकाशाची दिशा तसेच त्याचे गुणधर्म (तरंग लांबी, तीव्रता, रंग इ.) मूळ प्रकाशापेक्षा वेगळे असतात.
या बाहेर पडलेल्या प्रकाशचा जर फोटो काढला तर आपल्याला त्या वस्तूची रचना कळू शकेल अशी कल्पना रमण यांनी मांडली. गणिताच्या साहाय्याने ती त्यांनी सिद्धही केली. पण त्या काळातील कॅमेरे आजच्या सारखे प्रगत नव्हते. त्यामुळे त्या बाहेर पडणाऱ्या अत्यंत सूक्ष्म प्रकाशाचा फोटो काढणे शक्य नव्हते. तरीही रमण यांनी अनेक प्रयत्न करुन तसा फोटो काढला आणि जगापुढे मांडला. हाच तो प्रसिद्ध रमण परिणाम! हा शोध भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या क्षेत्रांत फार मोठा आणि महत्त्वाचा होता. हाताशी अत्यंत अल्प संसाधने उपलब्ध असताना त्यांनी तो लावला, ही गोष्ट त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेचे द्योतक आहे. National Science Day २०२४
आज अत्याधुनिक कॅमेरे, संगणक उपलब्ध आहेत. त्यामुळे लेसर किरणांच्या सहाय्याने असे फोटो काढणे सहज शक्य आहे. यामुळे वस्तूची चिरफाड न करता आपल्याला त्या वस्तूची भौतिक रचना किंवा त्या वस्तूतील रासायनिक द्रव्ये यांची माहिती मिळू शकते. पिकांवर फवारलेली कीटकनाशके, विविध पदार्थांमधील भेसळ आपल्याला या पद्धतीने कळू शकते. कृषी, वैद्यकीय, अभियांत्रिकी अशा अनेक क्षेत्रांत या शोधाचा उपयोग केला जातो.
राष्ट्रीय विज्ञान दिवस (National Science day) थीम-
राष्ट्रीय विज्ञान दिवसासाठी (National Science Day) दरवर्षी एक थीम निवडली जाते. ही थीम विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील कुठल्याही एका महत्त्वाच्या विषयावर लक्ष केंद्रित करते. उदाहरणार्थ, २०२३ मधे विज्ञान दिवसाची थीम ‘जागतिक कल्याणासाठी जागतिक विज्ञान’ अशी होती. २०२४ साठी राष्ट्रीय विज्ञान दिवसाची थीम आहे ‘विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान.’ भारत सरकारने ही थीम निवडण्याची अनेक कारणे आहेत.
- भारत सरकार ‘आत्मनिर्भर भारत’ या अभियानावर विशेष जोर देत आहे. सर्व क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करुन त्याचं वापर करणे यावर सरकारचा भर आहे.
- स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ‘विकसित भारताची’ निर्मिती करता येणे शक्य आहे.
- उद्योग व रोजगार निर्मिती, जागतिक पाटलावरील मोठ्या कंपन्यांकडून स्वदेशी तंत्रज्ञानात विदेशी गुंतवणूक व त्यायोगे भांडवल निर्मिती होण्यास मदत होईल.
- भारताची आर्थिक व्यवस्था दृढ होईल.
- राष्ट्रीय सुरक्षितता मजबूत होण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय विज्ञान दिवस (National Science Day 24) कसा साजरा केला जातो?
विज्ञान दिवस साजरा करण्यामागे उद्दिष्ट ध्यानात घेऊन देशभरात विविध पद्धतीने हा दिवस साजरा केला जातो.
- भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे वैज्ञानिक ज्ञान, संकल्पना आणि संशोधन हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या, तसेच ते लोकप्रिय करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना पुरस्कार प्रदान केले जातात.
- देशभरातील विद्यालये, विद्यापीठे तसेच संशोधन संस्था यांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
- प्रश्नोत्तर स्पर्धा, विज्ञान प्रदर्शने, वैज्ञानिक विषयांवर आधारित कार्यशाळा, चर्चासत्रे, प्रख्यात शास्त्रज्ञ व तज्ज्ञांची भाषणे इत्यादी आयोजित केल्या जातात.
- वैज्ञानिक तसेच संशोधक यांना विज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार देऊन गौरवांकित केले जाते.
- देशाची विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातात.
- रेडिओ, टीव्ही तसेच इतर समाजमाध्यमांवरही वैज्ञानिक विषयांसंबंधी माहिती देण्यासाठी, जागृती निर्माण करण्यासाठी व लोकशिक्षणासाठी कार्यक्रम आयोजिले जातात.
या वैविध्यपूर्ण उपक्रमांमुळे देशभर चैतन्यपूर्ण वैज्ञानिक वातावरणाची निर्मिती होते.
राष्ट्रीय विज्ञान दिवस (National Science Day 24) साजरा करण्यामागील उद्देश-
१) भारताची वैज्ञानिक क्षेत्रातील प्रगती आणि यश साजरे करणे आणि वैज्ञानिकांना प्रोत्साहन देणे.
- विज्ञान आणि तंत्रज्ञाच्या क्षेत्रातील नवनवीन शोध जनसमान्यांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांचे महत्त्व अधोरेखित करणे.
- वैज्ञानिकांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त कारणे.
- वैज्ञानिक आणि संशोधक यांना काम करण्यास प्रोत्साहन देणे.
- वैज्ञानिक संशोधन संस्था, आस्थापने, विद्यापीठे या संशोधनासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देणे व आर्थिक मदत पुरवणे.
२) वैज्ञानिक प्रगती जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे
- भारतीयांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे.
- विज्ञानाचे महत्त्व लोकांना पटवून देणे.
- दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे स्थान अधोरेखित करणे व ते सर्वांना समजावून सांगणे.
- समाजातील अनेक सामाजिक, आर्थिक तसेच इतरही अनेक क्षेत्रातील समस्यांवर विज्ञानाचा माध्यमांतून कसा तोडगा काढता येईल, तसेच आपले जीवनमान कसे उंचावता येईल हे लोकांना पटवून देणे.
- देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी विज्ञानाचे काय योगदान आहे हे लोकांना समजावणे.
३) वैज्ञानिक संशोधनास उत्तेजन देणे
- तरुण पिढीमधे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्राबद्दल आवड उत्पन्न करणे, तसेच या क्षेत्रात करियर करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन व प्रेरणा देणे .
- तरुणांमध्ये संशोधक वृत्तीस चालना मिळावी म्हणून प्रयत्न करणे.
- तरुण शास्त्रज्ञांना योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळावे, त्यांना योग्य त्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांचा विकास व्हावा यासाठी योजना आखणे आणि त्या योग्य प्रकारे राबवणे.
४) आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा उंचावणे-
- विज्ञान आणि तंत्रज्ञानातील भारताचा प्रगती संपूर्ण जगाला दाखवून भारताची जागतिक प्रतिमा व प्रतिष्ठा उंचावणे.
- जगातील इतर देशांसोबत वैज्ञानिक व तांत्रिक क्षेत्रात सहकार्य करून त्याचा भारताच्या विकासासाठी उपयोग करून घेणे.
- विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय संबंध दृढ करणे.
मानवी इतिहासाच्या विविध टप्प्यांतील माणसाच्या प्रगतीमधे विज्ञानाने नेहमीच मोलाची भूमिका बजावली आहे. आताही, आत्मनिर्भर विकसित भारताच्या निर्मितीसाठी, राष्ट्राच्या प्रगतीसाठी, मानवाच्या शाश्वत विकासासाठी, दैनंदिन जीवनातील समस्या सोडविण्यासाठी विज्ञानाची भूमिका बजावत आहे. त्यासाठीच विज्ञान दिवस साजरा केला पाहिजे. २८ फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या (National science Day 24) सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
तुम्हाला भारताच्या राष्ट्रीय विज्ञान दिवसाबद्दलची (National Science Day 24) ही माहिती कशी वाटली, ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप ही जॉईन करा.
धन्यवाद !
क्षितिजा कापरे
Good article 👍 on National Science day 28/2 👏
Thank you
Very informative Article
Thank you