मराठी भाषा गौरव दिन: मराठी भाषा दिन आला की अचानक मराठी भाषेविषयी काळजी दिसू लागते. इंग्रजीला अंगाखांद्यावर घेऊन मिरवणारे लोक याच दिवशी मराठी भाषेविषयी कळकळीने बोलतात. घरात, बाहेर फक्त मराठीत बोलले पाहिजे असे ठरवतात. हा विचार करा, मराठी फक्त व्यवहारात बोलली की टिकेल का ? मराठी ही ज्ञानभाषा कशी होईल याचा विचार करणारी पिढी आज अस्तित्वात आहे का हा प्रश्न पडतो. कारण मराठी ही ज्ञानभाषा म्हणून जोपर्यंत स्वीकारली जात नाही तोपर्यंत मराठीची प्रगती होणार नाही.
‘ज्ञानभाषा’ म्हणजे जी भाषा विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि विशेषतः उच्च शिक्षण, मूलभूत संशोधन, उद्योग, प्रशासन या व्यवहारक्षेत्रांत सर्व समाजाकडून वापरली जाते. आज मराठी भाषा बोलीभाषेत वापरली जाते पण ती ज्ञानभाषा म्हणून विकसित करण्यासाठी विशेष प्रयत्न व्हायला हवेत. हे प्रयत्न मराठी लेखक, संशोधक, विचारवंत, प्राध्यापक, पत्रकार यांनी तर केले पाहिजेतच पण एक सर्वसामान्य माणूस म्हणून आपल्या सर्वांची ही यात मोठी महत्वाची भूमिका आहे. तरच राजकीय इच्छाशक्ती हे प्रयत्न पुढे नेण्यास बांधील असतील.
हे इतके अवघड आहे का? तर नक्कीच नाही . आता ईस्त्राईलचे उदाहरण पाहिल्यास अनेकांना लक्षात येईल की ईस्त्राईलने प्रगती कशी केली? ईस्त्राईलमध्ये मुलांना हिब्रू भाषेतच शिकवले जाते . हिब्रू ही ईस्त्राईलची लोकभाषा आणि ज्ञानभाषा दोन्ही आहे. तिथे सर्वांना स्वतःच्या भाषेचा प्रचंड अभिमान आहे. तिथे सर्वत्र अगदी विमानतगळावरही इंग्रजी बोलू नये असे फलक लावलेले दिसतात. तिथे इंग्रजी येत नसल्यास कोणालाही अज्ञानी समजले जात नाही. मग महाराष्ट्रात हे चित्र का दिसत नाही ? मराठीत बोलायला मराठी माणसालाच लाज वाटते. इंग्रजी बोलणे प्रतिष्ठेचे समजले जाते. ही चुकीची समज इंग्रजांनी आणली की आपण स्वतः ती रुजवली?
मराठी भाषेचे महत्व कसे वाढेल ?
आज मराठी भाषिक जवळजवळ ११ कोटी आहेत. म्हणजे जगातल्या एखाद्या लहान देशापेक्षाही मराठी भाषिकांची संख्या जास्त आहे. फक्त गरज आहे ती विचार बदलण्याची. इंग्रजी म्हणजे ज्ञान आणि ज्ञान म्हणजे इंग्रजी ही केवळ अंधश्रद्धा आहे. महाविद्याल्यातून ती आता शाळांत पोहोचली आहे. त्यामुळे मराठी शाळा आता ओस पडू लागल्या आहेत. इंग्रजी शाळा मराठी अनिर्वाय असल्याने मुलांना मराठी शिकवत आहेत पण तेही एक दुय्यम भाषा म्हणूनच. महाविद्यालयांमध्ये मराठी फक्त कला , वाणिज्य या शाखेपुरते मर्यादीत आहे. विज्ञान तसेच इतर उच्चशिक्षण फक्त इंग्रजी मध्येच उपलब्ध आहे. हे चित्र बदलण्याची गरज आहे. सर्व शिक्षण मराठीतून उपलब्ध होणे महत्वाचे आहे.
आजही शहरांपेक्षा गावात विद्यार्थी जास्त आहेत. तिथले विद्यार्थी इंग्रजीच्या भीतीपायी कित्येकदा शिक्षण अर्धवट सोडतात. पण हेच शिक्षण जर त्यांना मराठीतून मिळाले तर शैक्षणिक गुणवत्ता सुधारेल. विद्यार्थी संख्येमुळे अनेक शाळा बंद पडत आहेत. पण नुकतेच एक उदाहरण वाचनात आले ते म्हणजे जुन्नरचे! तिथे पालकांसमोरच इंग्रजी आणि मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. तेव्हा कळले की मराठी मुले इंग्रजी शाळेतल्या विद्यार्थ्यांपेक्षा जराही कमी नाहीत. किंबहुना त्यांच्यापेक्षा सरसच आहेत. हा प्रयोग शहरातही झाला तर अनेकजण आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालतील . आज मराठी शाळेत शिकवायला पालकांची नाके मुरडली जातात. हेच पालक स्वतः मराठी शाळेतून शिकून उच्च शिक्षण घेऊन , चांगल्या पगाराची नोकरी करत आहेत. पण मुलांना इंग्रजी शाळा शोधत आहेत. किती हा विरोधाभास! यात चूक कोणाची? याचा विचार करताना कोणीही दिसत नाही.
दुसरा मुद्दा हा लक्षात घ्यावा लागेल की मराठीचा वापर लोकभाषा म्हणून व्हावा. शासकीय कार्यालयांमध्ये हिंदी आणि खाजगी ठिकाणी इंग्रजी भाषा वापरली जाते. तिथे मराठीचा आग्रह व्हावा. कार्यालयात जर मराठी बोलले जाते तर मुलाखती इंग्रजीतून का घेतल्या जातात? बँकेत अनेक अर्ज मराठीतून लिहिले गेले पाहिजेत. इंग्रजीचा आग्रह नसावा. अगदी सही सुद्धा मराठीतून केल्यास ती स्वीकारली गेली पाहिजे. आज कोणत्याही मराठी वृत्तवाहिनीवरचे मराठी ऐकल्यास त्यात इंग्रजी आणि हिंदीचे शब्द सर्वात जास्त वापरले जातात. यावर आक्षेप घ्यायला हवा. मराठी लिहिणारे संकेतस्थळ मराठी नावाखाली अगदी चुकीचे मराठी लिहितात. व्याकरण कधीही तपासले जात नाही. यांना लगाम घालणार कोण? यांचे असेच चालवले गेले तर मराठीला कोणीही गांभीर्याने घेणार नाही. या गोष्टी लादल्या न जाता आपण आनंदाने स्वीकारल्या तर येणाऱ्या पिढीलाही मराठीबद्दल नक्कीच अभिमान वाटेल.
जगभरात इंटरनेटचे जाळे वाढले आहे. आज इंग्रजीत आपल्याला हवी ती माहिती मिळते. पण मराठीत ही माहिती सहज उपलब्ध नाही. त्यासाठी युनिकोडिंग होणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आकर्षक मोफत युनिकोड फॉण्टस तयार होणे गरजेचे आहे. गुगलने आज जवळपास ५० आकर्षक युनिकोड फॉण्टस उपलब्ध करून दिले आहेत. हजारो माहितीपर पुस्तके, ग्रंथ धूळ खात पडून आहेत ती सर्व डीजीटल होऊन संकेतस्थळावर आणली पाहिजेत. आज हे काम होत आहे, परंतु खूप मोठ्या प्रमाणात या गोष्टी घडायला हव्यात. यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि निवृत्त मराठी अभ्यासक यांची नक्कीच मदत होऊ शकते. त्यांना योग्य तो मोबदला मिळाल्यास ते हे काम करण्यास पुढाकार घेतील. युनिकोड फॉण्टस मध्ये मराठी लिहिणे सोपे असते, त्यामुळे आपोआपच लोक मराठी लिखाणाकडे वळतील. यामुळे इंटरनेटवर मराठी वाचण्याचे प्रमाण वाढेल.
उच्च शिक्षणात मराठी कसे आणता येईल याचा हळूहळू विचार व्हायला हवा. सगळे विषय मराठी माध्यमातून आणता येतील त्यासाठी प्रत्येक अभ्यासक्रमाची पुस्तके मराठीत अनुवादित होऊन येणे, शासनाच्या शैक्षणिक संकेतस्थळांवर युनिकोड स्वरूपात, गुगल सर्चेबल स्वरूपात ही पुस्तके येणे गरजेचे आहे. गुगलवर शोध करताना मराठीतून केल्यास, ही माहिती उपलब्ध होईल याची जाहिरात मोठ्या प्रमाणात व्हायला हवी. मराठी विश्वकोश किंवा मराठी विकासपिडीयाबाबत अनेकांना काहीच माहिती नाही, ती माहिती करून देणे गरजेचे आहे. मराठी वर्तमानपत्रातून ही माहिती देता येईल. आज काही विद्यापीठांतून मराठी माध्यमातून अभ्यासक्रम घेतले जातात त्यांना नोकरीची संधी कशी मिळेल यासाठीही शासकीय प्रयत्न झाल्यास तरूण वर्ग इकडे नक्कीच वळेल.
इंग्रजी भाषा इतकी लोकप्रिय का झाली असेल? खरेतर इंग्रजी या भाषेत अनेक फ्रेंच-लॅटिन शब्द आहेत. एखादा इंग्रजी शब्द गुगलवर टाकून बघा, अनेक इंग्रजी शब्द तुम्हाला फ्रेंच-लॅटिन शब्द आहेत हे आढळून येतील. इंग्रजीने यातले असंख्य शब्द उचलले, भाषांतरे केली आणि आपली भाषा समृद्ध बनवली. तसेच मराठीलाही करता येईल. आज मराठी साहित्यात अनेक अनुवाद येतात प्रसिद्ध होतात. ते तितकेच आवडीने वाचलेही जातात. मग हाच प्रयोग अभ्यासात करता येईल. त्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास अनेक मराठी लेखक आनंदाने हे काम करतील. त्या क्षेत्रातले अभ्यासक यासाठी नक्कीच पुढाकार घेऊ शकतील.
शासनाने यात पुढाकार घेतल्यास हे काम सोपे होईल. आज शासनाची संकेतस्थळं उपलब्ध आहेत तसेच सोशल मिडीयावर याची जाहिरात केल्यास दूरवर ही माहिती जाईल. मराठीतून ज्ञान-विज्ञानाचा प्रचार-प्रसार करणाऱ्या संकेतस्थळांना विशेष आर्थिक सवलती, मदत, नवीन संकेतस्थळांकरता प्रोत्साहन, उत्कृष्ट संकेतस्थळांना सरकारतर्फे बक्षीस दिल्यास या गोष्टीना चालना मिळेल.
मराठी आजही एक समृद्ध भाषा आहे, केवळ त्यावर अजून काम होणं गरजेचे आहे. यासाठी जबर इच्छाशक्ती हवी. म्हणून कोणी एकाने प्रयत्न करून उपयोग नाही. प्रसारमाध्यमे, राजकीय शक्ती ,अभ्यासक आणि सर्वसामन्यांची एकत्र साथ मराठीला नव संजीवनी देण्यास सक्षम आहे. मराठी पाउल पुढे पडतेच आहे पण वेळ आली आहे, त्यासाठी योग्य मार्गदर्शन करण्याची! आता सुरुवात केल्यास हळूहळू बदल घडतील. शेवटी ज्ञान हे मातृभाषेत घेतले तर चांगले समजते याचा अनुभव अनेकांनी घेतला आहेच.
ज्ञान मराठीतून घेतले किंवा इंग्रजीतून घेतले यावर तुमची बुद्धिमत्ता अवलंबून नसते. मराठीला ज्ञानभाषा करण्याची ही योग्य वेळ आहे. हे काम अपोआप होईल असे समजून चालल्यास एक दिवस असाही येईल की मराठी भाषा केवळ एक आठवण म्हणून राहील. भविष्यात आपल्या मातृभाषेला नक्कीच चांगले दिवस येतील ही आशा बाळगूया आणि मराठीची सक्ती नाही पण प्रेमळ आग्रह जरुर करूया.
मराठी भाषा गौरव दिन कविता
आजच्या निमित्ताने लेखिका मुक्ता कुलकर्णी यांची कविता इथे मांडत आहे.
तलवारीसम धारदार ही माय मराठी माझी..
गर्भरेशमी पैठणीची जरतार मराठी माझी!!!
सह्यगिरीच्या कडेकपारी वसे मराठी माझी…
हिमवंताला रक्षण्यास ही सज्ज मराठी माझी!!!
अमृताते जिंके पैजा माय मराठी माझी..
वारकऱ्यांची विठू माऊली माय मराठी माझी!!!
पोवाड्यातून शिवप्रभूंना स्मरे मराठी माझी..
भीमथडीवर दौडत जाई माय मराठी माझी!!!
झेंडे अटकेपार रोवते माय मराठी माझी..
रान पेटवी स्वातंत्र्यास्तव माय मराठी माझी!!!
ऐक्याचा हा टिळा लावते माय मराठी माझी..
पिला पाखरां घास भरवते माय मराठी माझी!!!
सात समुद्रापार पोहोचली माय मराठी माझी..
तरीही स्वगृही त्रास सोसते माय मराठी माझी!!!
अभंग,गीता, श्लोक सांगते माय मराठी माझी…
चिरंजीव वज्रापरी राहो माय मराठी माझी!!!
तुम्हाला हा लेख मराठी भाषा गौरव दिन कसा वाटला ,ते नक्की कळवा. आपल्य मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhtsApp ग्रुप ही जॉईन करा.
लेखिका -शीतल अजय दरंदळे , पुणे
खूप छान लेख. अगदी बरोबर. मराठीला दुय्यम स्थान न देता, अभिमानाने पहिला मान द्यायलाच हवा. आणि ह्यासाठी मराठी माणसानेच कुठलीही लाज न बाळगता पुढाकार घ्यायलाच हवा. सोपे शब्द मराठीत असतानाही त्याऐवजी इंग्रजीतले शब्द सहजरीत्या वापरले जातात. हाच सहजपणा मराठी साठी का मागे पडतो?
उत्तम विवेचन