मराठी कथा -गुरुदक्षिणा l Marathi Story

WhatsApp Group Join Now

    ‘ लागा चुनरी में दाग, छुपाऊं कैसे ‘ किरकोळ शरीरयष्टीच्या सर्वेशने मोठ्या रंगमंचावर गाणे गाण्यास सुरुवात केली. गाण्यातील शेवटच्या कडव्यातील  ‘ धीन ताना रे ‘ त्याने अशी काही तान लावली, असे काही आलाप घेतले, हरकती घेतल्या की त्याचे गाणे संपले तरी दोन मिनिटांपर्यंत सभागृहात स्तब्धता होती. प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. जणू काही खुद्द मन्ना डे साहेब आपल्यासमोर गात आहेत की काय असा भास प्रेक्षकांना झाला होता. जवळपास दोन मिनिटांनंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. प्रेक्षकांनी उभे राहून सर्वेशला दाद दिली. 

                  सर्वेशच्या गुरु सृष्टीताई धावतच स्टेजवर गेल्या. सृष्टीताईंच्या डोळ्यांत पाणी आले होते. सर्वेशचे गाणे ऐकून त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. सृष्टीताईंनी सर्वेशच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. सर्वेश आपल्या गुरुंसमोर नतमस्तक झाला. तब्बल दोन वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर आज सर्वेशच्या मेहनतीला यश मिळाले होते आणि याचे पूर्ण श्रेय सृष्टीताईंना जात होते. सर्वेशच्या सुप्त गुणांना त्यांनी पारखले होते. 

                प्रेक्षकवर्गातून जो तो सर्वेशला भेटून त्याचे मनापासून कौतुक करत होता. प्रेक्षकांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलेली एक नावाजलेली व्यक्ती होती ती म्हणजे हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ संगीतकार मदनकुमारजी. मदनकुमारांनी सर्वेशचा मंत्रमुग्ध आवाज ऐकून त्यांच्या येणाऱ्या चित्रपटासाठी पार्श्वगायक म्हणून सर्वेशसमोर प्रस्ताव ठेवला. सर्वेशने त्यांचा प्रस्ताव सृष्टीताईंच्या सांगण्यावरून स्वीकारला. सर्वेशच्या जीवनातील आज अतिशय मह्त्वपूर्ण दिवस ठरला होता. 

                 कार्यक्रम आटोपला. सृष्टीताई त्यांच्या गाडीत बसून घरी जाण्यास निघाल्या. आज त्या अतिशय समाधानी होत्या कारण पैलू पाडून एक हिरा त्यांनी घडवला होता. साहजिकच त्यांना तो दिवस आठवला ज्या दिवशी त्यांची भेट सर्वेशशी झाली होती. 

                  सृष्टीताई आपल्या आईला तिच्या वाढदिवसासाठी म्हणून साडी घ्यायला एका दुकानात शिरल्या. एक मुलगा साड्या तर दाखवत होता त्याचंबरोबर गाणीही गुणगुणत होता. तो देहभान हरपून गाणे गुणगुणत एका बाजूला साड्या दाखवत होता. त्याचा आवाज ऐकून सृष्टीताई भारावल्या. ह्याला जर योग्य प्रशिक्षण मिळाले तर हा मुलगा कुठच्या कुठे जाऊ शकतो असा विचार त्यांच्या मनात आला. त्यांनी लगेच त्या मुलाशी संवाद साधला, ” तुझं नाव काय आहे रे ?”

               ” माझं नाव सर्वेश आहे.” 

                ” तू इतकं छान गातो आहेस तर तुला गाणे शिकायला आवडेल का ?” सृष्टीताईंनी विचारले.

                ” मॅम, मला आवडेल गाणे शिकायला; पण मला फी परवडणार नाही आणि मला कोण गाणं शिकवणार ?” सर्वेशने सृष्टीताईंना विचारले.

                ” जर मी तुला तुझ्याकडून कुठलीही फी न घेता गाणे शिकवले तर गाणे शिकशील ?” सृष्टीताई म्हणाल्या. 

                 ” मॅम ! कशाला गरीबाची थट्टा करता आहात ?” सर्वेश म्हणाला. 

                   ” अरे ! मी थट्टा नाही करत. मी खरंच तुला गाणे शिकवेन; पण तू देखील तितकेच प्रामाणिकपणे गाणे शिकले पाहिजे. त्यासाठी तुला प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. जर तुझी मेहनत करण्याची तयारी असेल तर खरंच माझ्याकडे गाणे शिकायला ये.” सृष्टीताई म्हणाल्या.

                   ” मॅम ! तुम्ही खरंच बोलत आहात ? मी खरंच गाणं शिकू शकतो ? मला लहानपणापासून इच्छा आहे गाणे शिकण्याची; पण कधी संधी नाही मिळाली. तुम्ही मला खरंच गाणं शिकवाल का ?” सर्वेशने आनंदाने विचारले.

                   ” अरे ! हो. मी खरंच सांगते आहे. हे घे माझं कार्ड. ह्यावर माझ्या संगीत अकॅडमीचा पत्ता आणि माझा फोन नंबर आहे. बरं ! तुझ्या घरी कोणकोण असतं ?” सृष्टीताई म्हणाल्या. 

                  ” मॅम ! मी अनाथ आहे. मला माझे आईवडील कोण होते हे देखील माहीत नाहीत. एका अनाथाश्रमात मी वाढलो. तिथेच मला सर्वेश हे नाव मिळाले. आश्रमातच बारावीपर्यंत शिक्षण घेतले आणि आता एका नाईट कॉलेजमध्ये पुढचे शिक्षण घेतो आहे. इथे ह्या दुकानाच्या मालकांनी मला नोकरी दिली म्हणून चार पैसे हातात येतात. मॅम, एक विनंती आहे. मला सोमवारी सुट्टी असते तेव्हा मी आलो तर चालेल का ? मला दुकानात सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत थांबावे लागते. ह्या मालकांनी मला काम दिले, माझ्यावर विश्वास ठेवला तर त्यांचा विश्वास मी मोडू शकत नाही.” सर्वेशने नम्रपणे विचारले.

                 सर्वेशची कहाणी ऐकून सृष्टीताईंचे हृदय द्रवले आणि त्या म्हणाल्या, ” हो नक्कीच. तुला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तू ये. फक्त इतकंच लक्षात ठेव की, तुला खूप मेहनत घ्यायची आहे. मला माझ्या शिष्यांकडून कुठल्याच बाबतीत दिरंगाई झालेली आवडत नाही. तुला स्वतःला सिद्ध करायचे असेल तर मेहनत करण्याची तयारी ठेव.” इतके बोलून तीन साड्या पॅक करून सृष्टीताई दुकानातून बाहेर पडल्या. 

                पुढच्याच सोमवारी सर्वेश क्लासमध्ये दाखल झाला. सृष्टीताईंनी इतर शिष्यांची त्याच्याशी ओळख करून दिली आणि त्याच्या शिकवणीचा श्रीगणेशा केला. सर्वेश दर सोमवारी न चुकता क्लासमध्ये येऊ लागला. अतिशय मेहनतीने, जिद्दीने संगीतातील बारकावे समजावून घेऊ लागला. संगीतातील अलंकार त्याने त्वरित मुखोद्गत केले. सुरुवातीला लाजरा बुजरा असणारा सर्वेश थोडा धीट झाला होता. त्याच्यात आता नवीन आत्मविश्वास आला होता. सृष्टीताईंनी त्याच्याकडून कधीच पैशांची अपेक्षा ठेवली नव्हती; पण त्यामुळे सर्वेशला खजील झाल्यासारखे वाटायचे म्हणून सृष्टीताई सर्वेशकडून माफक फी घेऊ लागल्या. 

                संगीतातील शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन सर्वेश पारंगत झाला होता. सृष्टीताई वर्षातून एकदा मोठ्या सभागृहात आपल्या शिष्यांचा कार्यक्रम आयोजित करत असत आणि एखाद्या दिग्गज कलाकारांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावत असत जेणेकरून त्या अतिथींमुळे आपला एखादा शिष्य नावारूपाला यावा. सर्वेशने आदल्या वर्षीच्या कार्यक्रमात स्वतःहून भाग घेतला नव्हता कारण त्याला आठवड्यातून एकदाच क्लासमध्ये यायला जमत असे त्यामुळे त्याचा जास्त सराव होत नसे आणि दुसरीकडे त्याचा ग्रॅज्युएशनचा अभ्यास चालू होता. 

               आज सर्वेशच्या मेहनतीचे चीज झाले होते आणि त्यामुळेच सृष्टीताई भरून पावल्या होत्या. सर्वेशने संगीतकार मदनकुमार यांच्याकडे काम सुरू केले. आता सर्वेशला प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही भरभरून मिळू लागले होते. त्याच्या व्यक्तिमत्त्वात भर पडली होती. त्याला वरचेवर आता क्लासमध्ये येणे जरी जमत नसले तरी तो आपल्या गुरूंना विसरला नाही. वेळात वेळ काढून गुरुपौर्णिमेला तो सृष्टीताईंना भेटायला गेला असता त्याने ताईंना विचारले, ” ताई, मी तुम्हाला काय गुरुदक्षिणा देऊ ?”

                   त्यावर सृष्टीताई म्हणाल्या, ” जी मुले मेहनती आहेत, ज्यांना खरंच संगीत शिकण्याची ऊर्मी आहे पण पैशाअभावी ते शिकू शकत नाहीत अशांना तू संगीतातील शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दे हीच माझी गुरुदक्षिणा समज.” 

                    सर्वेश गुरूंच्या पाया पडला. त्याने एक सुंदर कांजीवरम साडी सृष्टीताईंना दिली आणि म्हणाला, ” ताई ! मी नक्कीच माझ्यासारख्या मुलांना घडवेन. आपली इच्छा मी नक्कीच पूर्ण करेन. ही साडी माझ्याकडून तुम्हाला मी भेट देतो आहे त्याचा स्वीकार करा. ताई आज तुमच्यामुळे मी नावारूपाला आलो. एका कोळशाला तुम्ही हिऱ्याचे स्वरूप दिलेत. ताई तुमचे उपकार मी कसे विसरू ?” 

                  ” सर्वेश ! मी कोणी नाही रे. सगळं काही त्या परमेश्वराने घडवून आणले आहे. मी एक नाममात्र आहे आणि तुझ्या यशाच्या मागे तुझी प्रचंड मेहनत, तुझी संगीतावरील भक्ती हे सारे आहेच ना ? असाच खूप मोठा हो.” सृष्टीताई भावनाविवश झाल्या होत्या.

                  गुरूंचा आशीर्वाद घेऊन सर्वेश क्लासच्या बाहेर पडणार इतक्यात त्याच्या क्लासमधील विधी कोणाची तरी वाट पाहत बसलेली दिसली. सर्वेश दिसताच तिने त्याच्याशी खाजगी बोलायचे आहे असे त्याला सांगून ती त्याला जवळच्या एका हॉटेलमध्ये घेऊन गेली. तिने तिचे प्रेम त्याच्याकडे व्यक्त केले. तसं बघायला गेलं तर सर्वेशला देखील विधी आवडत होती; पण विधी उच्च घराण्यातील, खानदानी मुलगी आणि आपण असे अनाथ त्यामुळे त्याने तिचा विचार मनात आणला नव्हता. सर्वेश विधीला म्हणाला, ” विधी ! माझा विचार सोडून दे. मी तुझ्या पात्रतेचा नाही. तू प्रतिष्ठित घरातली मुलगी आहेस. तुला माझ्यापेक्षा चांगला मुलगा मिळेल. मला तर माझे आईवडील देखील माहीत नाहीत.” 

                  ” सर्वेश ! मी माझ्या आईबाबांना सगळी कल्पना दिली आहे. तुझ्याबद्दल सारे काही सांगितले आहे. माझ्या आईबाबांना कुठलाच आक्षेप नाही. त्यांना तुला भेटायचे आहे.” विधी म्हणाली.

                   विधीला सर्वतोपरीने समजावून देखील ती तिचा हेका सोडत नव्हती त्यामुळे विधीला भेटल्यावर सर्वेश पुन्हा सृष्टीताईंकडे आला. त्याने विधीचे मत सृष्टीताईंच्या कानावर घातले. सृष्टीताई म्हणाल्या, ” कोण म्हणतं तू अनाथ आहेस ? तू तर माझा मुलगा आहेस. विधीच्या घरी बोलणी करायला मी तुझ्याबरोबर येईन.” 

                   सृष्टीताई सर्वेशबरोबर लग्नाची बोलणी करायला विधीच्या घरी गेल्या आणि त्यांच्या मानसपुत्राचे विधिवत लग्न लावून दिले. आता सर्वेशकडे नुसतीच प्रसिद्धी पैसा आणि मानमरातब नव्हता तर एक प्रेमळ कुटुंब देखील त्याला लाभले होते. 

                  सर्वेशने विधीच्या सोबतीने एक संगीत अकॅडमी उघडली. त्याच्या अकॅडमी मध्ये होतकरू, मेहनती मुलांना विनामूल्य प्रशिक्षण दिले जाऊ लागले. सर्वेशने त्याच्या अकॅडमीचे नाव त्याच्या गुरूंचे म्हणजेच सृष्टीताईंचे ठेवले ‘ सृष्टी संगीत विद्यालय.’  सर्वेशने संगीत विद्यालयाच्या रूपाने त्याच्या गुरूंना गुरुदक्षिणा दिली होती. 

समाप्त

तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुपही जॉईन करा.

      धन्यवाद !

महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)  

8 thoughts on “मराठी कथा -गुरुदक्षिणा l Marathi Story”

  1. अरुण समेळ

    सौ. नेहा उजाळे यांची गुरुदक्षिणा ही कथा आताच वाचली. कथा खुपच आवडली, ती त्यांतील संगीत व गायन याबद्दलची सुंदर माहिती व कथेचा नायक सर्वेश याची मेहनती वृत्ती व सृष्टीताईंच्या सारखी माणसे समाजात असतात ही जाणीव करुन दिल्यामुळेच! कथा मनाला फारच भावली व त्यावरील हा अभिप्राय अगदी मनापासून लिहावासा वाटला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top