What is NPS:आपण सर्वजण निवृत्तीनंतरच्या आपल्या सेकंड ईनिंग साठी अनेक स्वप्न बघत असतो, परंतु मुलांचे शिक्षण, त्यांचे लग्न, घराच्या जबाबदाऱ्या या सर्वांमध्ये आपल्या स्वप्नांसाठी पैसे कसे साठवावे याची चिंता सर्वांनाच असते. बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत परंतु कोणाची हमी नसते तर कोणाचा परतावा कमी असतो, त्यामुळे यापैकी आपल्यासाठी योग्य पर्याय कुठला हे निवडताना अनेकांची धांदल उडते. या सर्व गोष्टींचा विचार करून केंद्र सरकार गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) राबवत आहे. या योजनेत आपल्या गुंतवणुकीची हमी आणि परतावा यांचा समतोल साधला जातो. या योजनेबद्दल सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या लेखात घेणार आहोत.
NPS म्हणजे काय? (What is National Pension Scheme)
राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) ही योजना केंद्र सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी २००४ मध्ये सुरू केली. या योजने अंतर्गत सुरवातीला फक्त केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना पैसे गुंतवता येत होते. नंतर २००९ मध्ये सरकारने PFRDA (Pension Fund Regulatory and Development Authority) ही नियामक संस्था स्थापन केली. PFRDA मार्फत पेन्शन संस्थांचे पर्यवेक्षण आणि नियमन केले जाते. २००९ पासून सरकारने ही पेन्शन योजना सर्वांसाठी खुली केली.
निवृत्तीनंतरही आपल्या सुखकर भविष्यासाठी आणि आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी NPS ही एक योग्य योजना आहे. या योजने अंतर्गत तुम्ही वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत पैसे गुंतवू शकता आणि निवृत्ती नंतर तुम्हाला वेळोवेळी याचा परतावा मिळत राहतो.
NPS योजना कोणासाठी आहे?
वय वर्ष १८ ते ६५ या वयोगटातील कोणतीही व्यक्ती या योजनेमध्ये पैसे गुंतवू शकते. ही गुंतवणूक मासिक त्रैमासिक किंवा वार्षिक कुठल्याही स्वरूपात करू शकता येते. ही योजना सुरू करताना सुरुवातीला किमान पाचशे रुपये भरून अकाउंट सुरू करावे लागते आणि मग दरवर्षी किमान हजार रुपये भरून हे अकाउंट सुरू ठेवावे लागते. जर कोणी सलग तीन वर्ष पैसे भरले नाही तर त्यांचे अकाउंट स्थगित केले जाते. तसेच जसजसे आपले उत्पन्न वाढत जाईल तसतसे आपण NPS मधील योगदान वाढवू शकतो.
NPS मध्ये जसे कर्मचारी आपले कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतात तसेच सरकारी ऑफिसेस आणि बरीचशी प्रायव्हेट ऑफिसेस ही या अकाउंट मध्ये कर्मचाऱ्यांसाठी कॉन्ट्रीब्युशन करतात. त्यामुळे NPS योजना ही एम्प्लॉयर आणि एम्पलोयी या दोघांसाठीही आहे. या योजने मध्ये एम्प्लॉयर आणि एम्प्लॉयी चे काँट्रीब्युशन सारखे असले पाहिजे असा काही नियम नाही आहे. कोणीही कितीही रक्कम काँट्रीब्युट करू शकतो. म्हणूनच याला काँट्रीब्युटरी स्कीम असेही म्हणतात.
हे खाते कसे सुरु करावे? (How to open NPS account)
राष्ट्रीय पेन्शन योजनेसाठी आपण आपल्या जवळच्या कुठल्याही बँकेमध्ये जाऊन अकाउंट उघडू शकतो. फक्त त्यासाठी तुम्हाला आवश्यक ती कागदपत्रे जसं की तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड व फोटो हे बँकेत जमा करावे लागतात. आपण हे अकाउंट ऑनलाइन सुद्धा उघडू शकतो परंतु त्यासाठी तुमचा फोन नंबर हा तुमच्या आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक असते.
एकदा अकाउंट उघडल्यानंतर तुम्हाला PRAN म्हणजेच (Permanent Retirement Account Number) हा १२ आकडी नंबर दिला जातो. NPS मध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा PRAN नंबर तुमच्याकडे असणे अत्यावश्यक असते. हा क्रमांक तुम्हाला एकदाच दिला जातो. तसेच हा नंबर पोर्टेबल असतो म्हणजे जेव्हा तुम्ही नोकरी बदलता तेव्हा नवीन नोकरीच्या ठिकाणी हा नंबर दिला असता तुमचं NPS खाते आपोआप या नंबरच्या आधारे तुमच्या नवीन एम्प्लॉयर बरोबर लिंक होतं.
NPS मधील पैशांचे व्यवस्थापन कोण करते? (Fund Managers of NPS)
आपण NPS मध्ये गुंतवलेल्या पैशांचे व्यवस्थापन खालील फंड मॅनेजर्स करतात. खातेधारकांना आपला फंड मॅनेजर निवडण्याचा अधिकार असतो. तसेच त्यांना वाटल्यास ते मध्येच आपला फंड मॅनेजर बदलू सुद्धा शकतात.
- LIC पेन्शन फंड
- HDFC पेन्शन फंड
- UTI पेन्शन फंड
- SBI पेन्शन फंड
- ICICI Prudential पेन्शन फंड
- आदित्य बिर्ला सन लाईफ पेन्शन फंड
- कोटक महिंद्रा पेन्शन फंड
NPS गुंतवणूक श्रेणी (Types of portfolios)
NPS मधील गुंतवणूक पुढील ४ श्रेणींमध्ये विभागली जाते.
1. कमी जोखीम: (जी क्लास) या मध्ये गुंतवणूक ही गव्हर्नमेंट बॉण्ड्समध्ये केली जाते. यात रिस्क कमी असते परंतु त्याचप्रमाणे परतावाही कमी मिळतो.
२. मध्यम जोखीम: (सी क्लास) या मध्ये गुंतवणूक ही कॉर्पोरेट बॉण्ड्समध्ये केली जाते.
३. जास्त जोखीम: (ई क्लास) या मध्ये गुंतवणूक ही कंपनीच्या शेअर्समध्ये म्हणजेच equity मध्ये केली जाते. यामध्ये रिटर्न्स जास्त असतात आणि रिस्क सुद्धा जास्त असते.
४. खूप जास्त जोखीम: (ए क्लास) या मध्ये गुंतवणूक ही अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट मध्ये केली जाते. उदाहरणार्थ, रियल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (REIT), इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट ट्रस्ट आणि अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड (AIF). या श्रेणीमध्ये सर्वात जास्त रिस्क असल्याने आपल्या पूर्ण गुंतवणुकीच्या फक्त ५% आपण यात गुंतवू शकतो.
NPS मधील निधी वाटप: (Fund Allocation)
NPS मध्ये खाते धारकांकडे आपले पैसे कुठल्या श्रेणीत गुंतवावे हे निवडण्यासाठी दोन पर्याय असतात
१. ऍक्टिव्ह चॉईस: ज्या इन्व्हेस्टर्स ना माहित असते की आपले पैसे कुठे गुंतवावे अशा ऍक्टिव्ह इन्व्हेस्टर्स साठी हा पर्याय आहे. या मध्ये कुठल्या श्रेणीत किती पैसे गुंतवावे हे आपण ठरवू शकतो परंतु त्याच्यावरही काही मर्यादा आहेत. आपण ई क्लास मध्ये म्हणजेच इक्विटी मध्ये आपल्या पूर्ण गुंतवणुकीच्या जास्तीत जास्त ७५% गुंतवू शकतो. तसेच आपल्या वयाच्या ५० वर्षानंतर ही गुंतवणूक दरवर्षी २.५% नी कमी होते व वयाच्या साठाव्या वर्षी ती ५०% वर येऊन स्थिर होते. बाकीच्या श्रेणीमध्ये किती पैसे गुंतवायचे आहेत हे आपण ठरवू शकतो आणि हे वाटप आपल्याला वर्षातून दोनदा बदलता येते.
२. ऑटो चॉईस: जर आपल्याला कुठच्या श्रेणीत किती पैसे गुंतवायचे हे ठरवता येत नसेल तर आपल्याला ऑटो चॉईस हा पर्याय निवडता येतो. या अंतर्गत आपल्याला तीन पर्याय दिले जातात.
- अग्रेसिव्ह लाईफ सायकल: हे जास्त जोखीम घेणाऱ्या व्यक्तींसाठी असते. जर तुमचे वय ३५ वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तुम्ही आपल्या गुंतवणुकीतील ७५% भाग हे इक्विटी मध्ये इन्वेस्ट करू शकता. वयाच्या ३५ वर्षानंतर ही इन्वेस्टमेंट दरवर्षी ४% नी कमी होऊन वयाच्या ५५ व्या वर्षी १५% वर येऊन स्थिर होते.
- मॉडरेट लाईफ सायकल: हे मध्यम जोखीम घेणाऱ्या व्यक्तींसाठी असते. जर तुमचे वय ३५ वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तुम्ही आपल्या गुंतवणुकीतील ५०% भाग हे इक्विटी मध्ये इन्वेस्ट करू शकता. वयाच्या ३५ वर्षानंतर ही इन्वेस्टमेंट दरवर्षी २% नी कमी होऊन वयाच्या ५५ व्या वर्षी १०% वर येऊन स्थिर होते.
- कंजर्वेटिव्ह लाईफ सायकल: हे कमी जोखीम घेणाऱ्या व्यक्तींसाठी असते. जर तुमचे वय ३५ वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तुम्ही आपल्या गुंतवणुकीतील २५% भाग हे इक्विटी मध्ये इन्वेस्ट करू शकता. वयाच्या ३५ वर्षानंतर ही इन्वेस्टमेंट दरवर्षी १% नी कमी होऊन वयाच्या ५५ व्या वर्षी ५% वर येऊन स्थिर होते.
NPS मधील परतावा: (Exit options)
NPS योजनेतील पैसे काढून घेण्याचे तीन मार्ग आहेत:
१. रेग्युलर मनी विड्रॉवल: NPS ही एक पेन्शन योजना असल्याने यात तुम्हाला शक्यतो निवृत्तीच्या आधी पैसे काढता येत नाहीत. या पर्यायात लॉकिंग पिरियड हा ६० वर्षापर्यंत असतो. ही वयोमर्यादा आपण ७० पर्यंत सुद्धा वाढवू शकतो. जिथे आपण ७० वर्षापर्यंत प्रीमियम भरतो आणि त्यानंतर आपल्याला त्याचा परतावा मिळतो. तसेच आपण ६० वर्षापर्यंत लॉकिंग ठेवून पुढची दहा वर्ष ही डिफर्ड म्हणजेच स्थगित करू शकतो जेथे ६० ते ७० या १० वर्षात आपण कॉन्ट्रीब्युशन भरत नाही परंतु आपण आधी भरलेले पैसे इन्वेस्टेड राहतात आणि ७० व्या वर्षानंतर आपल्याला त्याचा परतावा मिळतो.
सर्वसाधारण परिस्थितीत ६० वर्षानंतर आपल्या एकूण कॉन्ट्रीब्युशनच्या ६०% रक्कम आपल्याला एकत्रितपणे काढता येते, यालाच कॉर्पस फंड असेही म्हणतात. उरलेली ४०%न आपल्याला पुढील महिन्यापासून दर महिन्याला एक ठराविक रक्कम पेन्शन म्हणून मिळते याला Annuity असे म्हणतात.
जर काही कारणाने तुमचं पूर्ण कॉन्ट्रीब्युशन हे पाच लाखांपेक्षा कमी असेल तर रिटायरमेंटच्या वेळी तुम्ही १००% गुंतवणूक एकाच वेळी काढून घेऊ शकता.
२. प्रिमॅच्युअर विड्रॉल: (अकाली पैसे काढणे) या पर्यायामध्ये जर तुम्ही सलग तीन वर्ष तुमचं कॉन्ट्रीब्युशन NPS मध्ये भरलं असेल तर तुमच्या भरलेल्या रकमेच्या २५% रक्कम तुम्हाला अकाली काढता येईल. पूर्ण आयुष्यात फक्त तीन वेळा तेही पाच वर्षाच्या अंतराने तुम्हाला ही रक्कम काढता येते. जर तुमचा एम्प्लॉयर सुद्धा NPS खात्यात कॉन्ट्रीब्युट करत असेल तरी तुम्हाला फक्त तुम्ही कॉन्ट्रीब्यूट केलेल्या पैशाच्या 25% काढता येतात. एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन तुम्ही काढू शकत नाही. PRFRDA ने दिलेल्या नियमानुसार काही ठराविक कारणांसाठीच ही रक्कम काढता येते. तुम्हाला किंवा परिवारातील कोणाला जर काही गंभीर आजार असेल तर, मुलांचे उच्च शिक्षण किंवा लग्न करायचे असेल तर, घर घ्यायचं असेल तर, नाहीतर स्वतःचा व्यवसाय चालू करायचा असेल तर, ही रक्कम काढता येते.
३. प्रिमॅच्युअर एक्झिट: (अकाली बाहेर पडणे) जर तुम्ही NPS मध्ये सलग दहा वर्ष गुंतवणूक केली असेल आणि काही कारणाने जर तुम्हाला यापुढे ही गुंतवणूक करणं जमणार नसेल तर तुम्ही ह्या योजने मधून बाहेर पडू शकता. या केस मध्ये तुमच्या गुंतवणुकीच्या फक्त २०% रक्कम तुम्हाला एकत्रितपणे काढता येते आणि उरलेली ८०% रक्कम ही ॲन्यूटी बेसिस वर दर महिन्याला तुम्हाला पेन्शनच्या स्वरूपात मिळते. जर तुमची गुंतवणूक अडीच लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्ही पूर्ण रक्कम एकत्रितपणे काढू शकता परंतु एकदा ही रक्कम काढल्यानंतर तुमचे खाते कायमचे बंद होते. तुम्ही यामध्ये परत गुंतवणूक करू शकत नाही.
NPS मधील कर लाभ: (Tax Benefit of NPS)
१. जर तुम्ही NPS मध्ये इन्वेस्ट करत असाल तर U/S 80CCD (1) तुम्हाला दीड लाखांपर्यंतची सूट मिळू शकते. तसेच U/S 80CCD (1B) तुम्हाला अधिक 50 हजाराची सूट मिळू शकते म्हणजेच तुम्हाला एकत्रितपणे दोन लाखांपर्यंत सूट मिळू शकते.
२. जर तुमचा एम्प्लॉयर सुद्धा तुमच्या NPS खात्यात कॉन्ट्रीब्यूट करत असेल तर U/S 80CCD (2) तुम्हाला आयकरात सूट मिळू शकते. परंतु ही रक्कम तुमच्या (basic + DA) च्या १० टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाही.
३. रिटायरमेंट नंतर तुम्हाला मिळणारी ६०% रक्कम ही टॅक्स फ्री असते, परंतु नंतर दरमहा मिळणारे पेन्शन हे तुमचे उत्पन्न म्हणून दाखवले जाते आणि त्यावर तुम्हाला तुमच्या टॅक्स स्लॅब प्रमाणे टॅक्स भरावा लागतो.
NPS खात्याचे प्रकार: (Types of NPS Accounts)
१. Tier 1: हे खाते पेन्शन खाते म्हणून ओळखले जाते. आपण आतापर्यंत पाहिलेली माहिती ही सर्व टियर 1 खात्याची होती.
२. Tier 2: हे खाते गुंतवणूक खाते म्हणून वापरले जाते. या मध्ये कुठलीही कर बचत मिळत नाही. परंतु या खात्याचे काही फायदे सुद्धा आहेत जसे की या खात्यात तुम्ही कधीही कितीही रक्कम गुंतवू शकता. तसेच या खात्यातून कधीही कितीही रक्कम काढता येते. परंतु टियर २ खाते उघडण्यासाठी तुमच्या कडे टियर १ चे चालू खाते असणे आवश्यक आहे.
NPS चा व्याजदर: (Interest Rate for NPS)
या योजनेअंतर्गत कमीत कमी ९ ते १२ टक्के व्याजदर मिळतो, हा PPF योजनेत मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा जास्त आहे. ह्या योजनेतील परतावा हा आपण कुठच्या श्रेणीत गुंतवणूक केली आहे यावर अवलंबून असल्याने मार्केट लिंक्ड असतो. म्हणून परतावा जाणून घेण्यासाठी आपण ऑनलाइन calculator ची मदत घेऊ शकतो. तिथे आपल्याला आपले वय, आपली मासिक गुंतवणूक आणि अपेक्षित परतावा टाकावा लागतो, त्यावरून ते आपल्याला आपला रिटायरमेंट फंड calculate करून देतात.
आपण एक उदाहरण घेऊ: समजा तुम्ही वयाच्या २४व्या वर्षी दरमहा ५०० रुपये या योजनेत गुंतवलेत आणि तुम्हाला सरासरी जर १०% व्याजदर मिळाला तर वयाच्या साठाव्या वर्षी पर्यंत तुमची गुंतवणूक २,१६,००० रुपये एवढी होईल आणि रिटायरमेंट नंतर तुम्हाला साधारण ३० लाख रुपये एवढा कॉर्पस फंड मिळेल आणि महिन्याला १५,००० रुपयांची पेन्शन मिळेल.
जर आपल्याला आपल्या गुंतवणुकीचा योग्य मोबदला मिळतोय असे वाटत असेल तर आपण या योजनेत नक्कीच सहभागी व्हा आणि आपल्या आयुष्याची सेकंड इनिंग अगदी मनसोक्त जगा. परंतु त्यासाठी साठीची वाट न बघता आजपासूनच गुंतवणूक सुरु करा.
आपल्याला ही NPS योजनेची सविस्तर माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशा अजून कुठल्या नवीन विषयांबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हेही आम्हाला कंमेंट मध्ये जरूर कळवा. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WtsApp ग्रुप हि जॉईन करा.
धन्यवाद !
लेखिका: नेहा करंदीकर – हुनारी, मालवण
👌👌
Thank you🙏