अनोखी प्रेम कथा -या डोळ्यांची दोन पाखरे

WhatsApp Group Join Now

आदित्य ऑपरेशन थिएटर च्या बाहेर चिंतेत बसला होता.  तोंडाने सतत नामस्मरण चालू होते.  त्याची व्याकुळ अवस्था पाहून आई बाबाही हवालदिल झाले.  मधूनच आदि पुन्हा पुन्हा घड्याळात पाहात होता.  उठत होता.  बसत होता.  सतत मागे पुढे फेऱ्याही मारणे चालू होते.  घड्याळाचा काटा जसजसा पुढे जात होता त्याची अस्वस्थता वाढत होती.  त्याला कारणही तसेच होते.  रोशनीचे, त्याच्या प्रिय पत्नीचे डोळ्यांचे ऑपरेशन सुरू होते.  गेली चौदा वर्षे अंधत्व आलेल्या रोशनीला नवी दृष्टी मिळणार होती. 

रोशनीवर आदित्यचे जिवापाड प्रेम होते.  कॉलेजच्या पहिल्या वर्षीच तीने त्याचे हृदय चोरले होते.  पण कितीतरी वर्षे त्याने ते हृदयाच्या कप्प्यात दडवून ठेवले होते.  शेवटच्या वर्षी मात्र रोशनीला प्रपोज करायचेच या ध्यासाने त्याने वर्षभराचा सगळा पॉकेट मनी एकदाच खर्च करून तिला ‘रोज क्वीन’ बनवले आणि त्या दिवसापासून ती त्याच्या हृदयाचीही राणी झाली ती आजतागायत. 

पुढचे शिक्षण घेऊन नोकरीला लागेपर्यन्त दोघांनीही आपापल्या घरी काही कळू दिले नाही.  परंतु एकदा सेटल झाल्यावर मात्र घरच्यांना विश्वासात घेऊन त्याने रोशनीबद्दल सांगितले.  आई बाबांनाही रोशनी आवडली.  तिच्या घरी रीतसर मागणी घालून त्यांनी आदित्य आणि रोशनीचे लग्न लावून दिले. खूप सुखात सुरू होता दोघांचा संसार.  अगदी स्वप्नवत, कुठल्याही अडचणी न येता त्यांचे लग्न झाले होते.  परीचा जन्म होऊन संसार फुललाही होता आणि अचानक एक दिवस दृष्ट लागली.

होळीसाठी आदि कुटुंबासह गावी गेला होता.  तिथे होळी खेळताना उत्साहाच्या भरात आदिने रंग उडवला तो रोशनीच्या डोळ्यांत गेला.  तिचे डोळे अतिशय झोंबू लागले.  तिने तसे आदिला बोलूनही दाखवले.  पण आदि होळीच्या खेळात इतका दंगला होता कि त्याने रोशनीला रसभंग केल्याबद्दल थोडे झापलेही.  बिचारी रोशनी डोळे चोळत निमूट बसली.   संध्याकाळी उशिरा पर्यन्त डोळे अतिशय लाल झाले.  डोळ्यांतून सतत पाणी वाहू लागले.  रोशनीला अगदीच साहेनसे झाले.  पण आता इतक्या उशिरा गावंढया गावात डॉक्टर कुठून असायला? घरातली जूनी आय ड्रॉपस् आणि थातुर मातुर औषधे डोळ्यांत घालून वेळ निभावली. परंतु डोळ्यांची लाली काही कमी होईना. 

रोशनीला दृष्टीतही दोष जाणवू लागला.  दोघेही लगेचच घरी परतले.  आय स्पेशलिस्ट कडे गेले.  परंतु उशीर झाला होता.  इन्फेक्शन बरेच वाढले होते. होळीच्या रसायन मिश्रित रंगांनी डोळ्यांचा कॉर्निया बाधित झाला होता.  पुढे बरेच औषधोपचार झाले. डॉक्टर्स बदलले.  परंतु इन्फेक्शन वाढतच गेले. परिणामत: रोशनीच्या डोळ्यांची रोशनी पूर्णपणे विझली.  आता ‘कॉर्नियल ट्रान्सप्लांट’ हाच एक शेवटचा उपाय होता.  मृत व्यक्तीने नेत्रदान केले असल्यास त्या व्यक्तीचा कॉर्निया प्रत्यारोपण केल्यास रोशनीला दृष्टी प्राप्त होऊ शकणार होती.  परंतु त्यासाठी खूप मोठी वेटिंगलिस्ट असते.  आता वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नाही.  

आदित्य आणि रोशनीवर हा प्रचंड आघात होता.  त्यातून सावरायला बराच काळ जावा लागला.  त्यांचे जीवन आमूलाग्र बदलले.  तरीही दोघांच्याही आई बाबांनी भरपूर सामंजस्य दाखवून दोघांच्या संसाराची बरीच जबाबदारी उचलली.  दोन्हीकडचे आजी आजोबा परीला छान सांभाळत होते. परंतु  आदिला हा आघात सहन होईना.  रोशनीच्या या अवस्थेला संपूर्णपणे आपणच जबाबदार आहोत या जाणिवेने तो दिवसेंदिवस पोखरत होता.  तरीही परीसाठी तो स्वत:ला सावरत होता.  रोशनीवर त्याचे मनापासून प्रेम होते.  काळाच्या ओघातही ते टिकून होते.  किंबहुना दिवसेंदिवस फुलत होते.  आता तर आदि रोशनीला अजूनच जिवापाड जपू लागला. 

हळू हळू रोशनीच्या अंधत्वाची आदि आणि परीला सवय झाली.  रोशनीनेही आपल्या अपूर्णतेचा कुठलाही बाऊ न करता आलेल्या परिस्थितीला धीराने सामोरी गेली.  वेळ लागला. परंतु आता रोशनी घरात सराईतपणे वावरत होती.  स्वयंपाक पाणी, साफ सफाई, परी आणि आदिची काळजी घेणे सर्व निगुतीने करीत होती.  बंधने येत होती.  पण त्यांना स्विकारायला शिकत होती. 

काळ कुणासाठी थांबत नाही. परी सुद्धा मोठी झाली.  आता ती, आई आणि बाबा असे तिघांचे एक जग झाले.  तिघेही एकमेकांची काळजी घेत होते. धडपडत होते. पण सावरत होते.  अशातच एक दिवस आदिला हॉस्पिटल मधून फोन आला.  रोशनीसाठी कॉर्निया उपलब्ध झाल्याचा.  आदिला आश्चर्याचा धक्का बसला.  कुणीतरी आशेचा किरण बनून त्याच्या आयुष्यात डोकावले होते.  त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही.  त्याने घरात ही बातमी सांगताच दोघांचेही आई बाबा अतिशय खुश झाले.  आता आपली रोशनी पूर्ववत होऊ दे म्हणून त्यांनी नवसही बोलायला सुरुवात केली.  परी तर आनंदाने नुसती बागडत होती. 

आणि आज तो दिवस उगवला.  आज रोशनीला नवीन दृष्टी मिळणार होती.  दुसऱ्या कुणाच्या तरी डोळ्यांतून विझलेली रोशनी आज तिच्या डोळ्यांत पुन्हा प्रकाशणार होती. 

डॉक्टरांनी ऑपरेशन यशस्वी झाल्याचे सांगितले.  आणि सर्वांच्याच डोळ्यांतून पाणी वाहू लागले.  रोशूच्या आई बाबांनी डॉक्टरांपूढे हात जोडले.  परंतु डॉक्टर म्हणाले, “हातच जोडायचे असतील तर त्या विधात्या पुढे जोडा.  कर्ता करावीत तोच आहे.  आणि दुसरे हात त्यांना जोडा ज्यांनी आपल्या सुहृदाचे नेत्रदान करण्याचा योग्य निर्णय घेतला.  बस्स आता फक्त एक आठवडा वाट पाहायची आहे.  डोळ्यांवरची पट्टी काढली कि रोशनी पूर्ववत पाहू शकेल.”

आदि पेढे आणायला खाली उतरला.  तिथे त्याला त्याचा जुना मित्र नरेश भेटला. 

“नरेश, तू इथे?” आदिने विचारले.

“हो डॉक्टरांना भेटायला आलो होतो.”

“कुणासाठी?”

“विशेष काही नाही रे, सहजच!”

नरेशच्या उत्तराने आदीचे समाधान नाही झाले.  त्याने नरेशला चहाचा आग्रह केला.  चहा पिता पिता आदिने नरेशची चौकशी केली.  काका काकू कसे आहेत? तू कसा आहे?  बायको? मुले? त्याच्या प्रश्नांची उत्तरे देताना नरेशला भरून आले.  सर्वांची चौकशी करतोय परंतु किरण बद्दल काहीच विचारत नाहीये.  किरण खरं तर आदिचा लहानपणीचा जानी दोस्त! पण…! नरेश गहिवरला! त्याने एक घोटात चहा संपवून आदिचा हात दाबला.  ‘किरण गेला अपघातात’ असे म्हणून निघून गेला.  आदि सुन्न झाला.  एका जुन्या जखमे वरची खपली निघाली.  जखम परत एकदा भळभळू लागली. 

आठवड्याने डॉक्टरांनी रोशनीच्या डोळ्यांवरची पट्टी काढली.  रोशूने हळू हळू डोळे उघडले.  समोर पाहिले.  सुरवातीला थोडे धुरकट दिसले म्हणून बावचळली.  पण थोड्याच वेळात स्वच्छ दिसू लागले.  आदि, परी, आई बाबा, सासू सासरे.. सगळे समोर उभे होते.  सगळ्यांच्याच आनंदाला पारावार उरला नाही.  संसारावरची काळी छाया आता दूर झाली होती.  पण आदि.. !  तो रोशूच्या डोळ्यांकडे एकटक पाहतच राहिला.  हे बदामी डोळे! आपण पाहिलेत! ओळखीचे वाटत आहेत. नक्कीच! काहीतरी सांगायचा प्रयत्न करताहेत असे वाटतेय.  काय असेल? तिच्या डोळ्यांत एक अनामिक ओढ दिसून येतेय.  का? खरंच असेल का असे? कि भास होतोय?

एक दिवस नरेश ऑफिस मध्ये आला.  त्याला पाहून आदिच्या हृदयात कालवा कालव झाली.  त्याने पुढे होऊन नरेशला मिठी मारली.  “त्या दिवशी लगेच निघून गेलास.  आज तरी थांबशील?”

“नाही. नको. तुला काहीतरी द्यायचेय. म्हणून आलो होतो.” असे म्हणत नरेशने बॅगेतून एक लिफाफा काढला.   आदीच्या हातात देत म्हणाला, “शांतपणे वाच.” “काय आहे यात?” आदिने विचारले.  “किरणच्या कपाटात होते.  मला वाटते तू एकदा वाचावेस.  त्याच्या आत्म्याला शांती मिळेल.” एव्हढे बोलून नरेश लगेचच निघून गेला.  आदिच्या चेहऱ्यावर विषण्णता पसरली. कठोर प्रयत्नांनी आदिने किरणला विस्मृतीत ढकलले होते. परंतु नियतीला हे मान्य नव्हते.  जखम पुन्हा पुन्हा भळभळत होती.

बाहेर आकाशात ढग भरून आले होते.  जणू काही त्यांनाही धरतीला कवेत घ्यायची अनावर ओढ लागली होती.  आज बहुधा रात्रभर पाऊस कोसळणार होता.  एव्हढया दिवसांची तृषार्त जमीन आपली तृष्णा भागवणार होती.  आदि आज लवकर घरी आला.  रोशनीला पाहून त्याची दिवसभराची विमनस्कता दूर झाली.  तिला कवेत घेऊन त्याने तिचे दीर्घ चुंबन घेतले. अजूनही तिच्या डोळ्यांत तीच आर्तता ओसंडून वाहत होती.  इतक्यात त्याला किरणची आठवण आली.   त्याने उत्सुकतेने लिफाफा उघडला. 

एक जूने पत्र होते. फार पूर्वी लिहिले असावे.  हस्ताक्षर ओळखीचे होते. पत्रावर तारीख नव्हती. पोस्ट करायचे नव्हते बहुधा.

प्रिय आदि,

खरंच तू मला आजही खूप प्रिय आहे.  तू मला विसरलास तरी मी मात्र हृदयाच्या खोल कप्प्यात तुला जपून ठेवले आहे.  तुला आठवतंय? आपण लहानपणी शेजारीच राहायचो.  एकाच शाळेत, एकाच वर्गात, एकाच बेंच वर.  एकत्र शाळेत जायचो, एकत्र यायचो, एकत्र जेवायचो, खेळायचो. माझे बदामी डोळे, पिंगट केस तुला आवडायचे तर तुझे कुरळे केस, काळ्याभोर डोळ्यांचा मी फॅन होतो.  किती घट्ट निरागस मैत्री होती आपली!   पण आठवी पर्यंतच! फार थोडा काळ मिळाला आपल्याला एकत्र घालवायला.  जस जसे मोठे होऊ लागलो, आपल्यातला किंबहुना माझ्यातला आणि इतरांमधला फरक हळूहळू अधोरेखित होऊ लागला. 

मला कळेचना, एके काळचे माझे जिवलग मित्र माझ्याशी असे का वागताहेत?  सुरुवातीला पाठीमागे टिंगल करणारे दोस्त हळूहळू समोरसमोर माझी रेवडी उडवू लागले.  माझ्या हावभावांवरून, चालण्याच्या, बोलण्याच्या स्टाइल वरुन चिडवू लागले.  ते सगळे मला पावणे आठ म्हणायचे.  अर्थही नाही कळायचा त्या वयात त्यांच्या बोलण्याचा! तू मात्र खंबीर होतास.  माझी पाठराखण करत होतास. दोस्ती निभावत होतास.  मलाही तुझ्या आधाराची सवय झाली.  माझ्यावर काहीही संकट आले कि माझे डोळे आधी तुला शोधायचे.  इथेच माझी गल्लत झाली.  माझ्या तुझ्याविषयीच्या भावना बदलू लागल्या.  

खरेतर माझ्यातला बदल मलाच समजेनासा झाला होता.  मलाच कळत नव्हते मी कोण आहे? सगळे टीचर्स फक्त नीट बोल, नीट वाग, नीट चाल असे म्हणून ओरडत असत.  पी. टी. चे सर तर  बायलट चालतोस, बायलट वागतोस असे हिणवून अर्धा अर्धा तास मैदानावर राऊंड मारायला लावायचे. माझी चाल सुधारण्यासाठी.  हातात लोखंडी पट्टी घेऊन उभे असत ते तेव्हा.  रडत रडत तेव्हाही मी तुला शोधायचो.  तुझ्या शिवाय मला कुणीच समजून घेत नव्हते.  मी असा का वागतोय हे कुणाला जाणूनच नाही घ्यावेसे वाटले.  बाबांनी अनेक डॉक्टर्स, स्पेशलिस्ट, वैद्य, सायकॉलॉजिस्ट अगदी मांत्रिकांपर्यंत फिरवले.  पण बाबांच्या दृष्टीकोनातून कुणीच मला ठीक करू शकले नाही.  खरंतर कुठलाच आजार नव्हता मला.  तर निसर्गाची चूक भोवली होती. मी स्त्रैण होतो.  माझे शरीर मुलाचे होते पण मन मात्र उमलत्या मुलीचे होते.  मला सतत मुलींचे कपडे घालावेसे वाटत. 

घरी मी बहिणीचे कपडे, दागिने घालून तासन् तास स्वत:ला आरशात पाहत असे.  कुणाच्या लक्षात आले कि सपाटून मार खाई.  पण माझी ती सवय जातच नव्हती.  मला आतून, खोल खोल मनातून वाटत असे कि मी मुलगीच आहे.  मुलगा नाही.  बहिणींना पाहून मी तसेच कंबर लचकावत चालायचा प्रयत्न करायचो.  हातापायावर संपूर्ण वॅक्सिंग करू लागलो.  दाढी मिशी अगदी गुळगुळीत करून टाकी.  समाजाने कुत्सित पणे हसायला आणि हळू हळू कुटुंबानेही मला झिडकारायला सुरुवात केली. डॉक्टरांनी स्पष्ट समजावून सांगितल्यानंतरही माझा मुलगा यातून बाहेर पडेल ही आईची वेडी आशा मला पोखरत होती.  अशावेळेस तू मात्र मैत्री टिकवून होतास.

  मला समजून घेत होतास. मी जसा आहे तसा मित्र म्हणून मला स्विकारले होते.  आता मैत्रीण म्हणूनही स्विकारायला तयार होतास.  पण नाही! मला तुझी जिवलग मैत्रीण बनायचे होते.  तू मला सर्वांच्या टिंगल टवाळी पासून दूर ठेवायचा प्रयत्न करायचास.  मला जपायचास.  तुझ्या या समजूतदारपणाच्याच मी प्रेमात पडले.  माझे तुझ्यावर मनापासून प्रेम जडले.  तू हवा हवासा वाटत होतास.  पण तुला सांगणार कसे?  तू अजूनही मला मित्र मानत होतास.  तुझ्या माझ्याविषयीच्या भावना पूर्णपणे वेगळ्या होत्या.  तुला लहानपणीची मैत्री निभावायची होती पण मला मात्र निव्वळ मैत्रीच्याही खूप पुढे जावेसे वाटत होते.  तुझ्यावर अधिकार हवासा वाटत होते.  मी तुझ्यावर प्रेम करू लागले होते.  प्रेम ही एक दैवी भावना आहे. ती माणसाला अपूर्णतेची जाणीव करून देत परिपूर्ण बनवते.

मला कधीचे तुझ्यासमोर व्यक्त व्हायचे होते.  माझ्या भावना तुझ्यापर्यंत पोचवायच्या होत्या.  कदाचित एव्हाना त्या तुला कळल्याही असतील. कारण हल्ली मला जाणवतेय, तू माझ्यापासून दूर दूर चालला आहेस. मला टाळतोस.  तरीही वेडे मन ऐकत नव्हते.  तुला रिझवण्यासाठी, मनवण्यासाठी वाट्टेल त्या थराला जायची माझी तयारी होती.   

लहानपणी तुला माझ्या डोळ्यांचा बदामी रंग आवडायचा.  त्याचाच फायदा घेऊन तुझ्यावर नजरेचे बाण मारायचा वेडेपणा मी करत असे.  त्यासाठी मोबाईलची कॉलर ट्यून ही अशीच ठेवली होती.  “या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवति, पाठलाग ही सदैव करतील असा कुठेही भवति.” खरे तर माझी भावनाच मी व्यक्त करत होते. पण तू भडकायचास.  तुला मिळवण्याचा जितका प्रयत्न मी करत होते तितकेच तुला गमावत होते.

त्या दिवशी कॉलेजमध्ये रोज डेला गुलाबाची फुले घेऊन आले तुला भेटायला. पण मला बघून तुझ्या मित्रांनी तुझी यथेच्छ टर उडवली.  तू रागाने तिथून निघून गेलास.  तिथेच मी रोशनीला पाहिले.  तुझ्या अगदी जवळ तुला खेटून उभी होती फोटो काढताना.  सर्वात जास्त गुलाबाची फुले देऊन तूच तिला रोज क्विन केले होते. त्यासाठी मी तुझ्यासाठी आणलेली फुले सुद्धा तू तिलाच दिली होती.

मला माझे उत्तर मिळाले.  देवशप्पथ सांगते, त्यानंतर तुला कधीही भेटायचा किंवा तुझ्या आयुष्यात यायचा प्रयत्न नाही केला.  तुझ्यापासून कटाक्षाने दूर, खूप दूर गेले मी.  अखेर मी जशी आहे तशी आईने स्विकारले मला.  बाबा गेल्या नंतर नरेशनेही स्विकारले. पण त्याच्या कुटुंबापासून दूरच राहिले मी.  उगाच त्यांना माझ्यामुळे त्रास नको.  यापुढे प्रत्येक दिवस तुझ्या आठवणीत जगतेय.  या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी तरी माझे प्रेम सफल व्हावे म्हणून देवाची आराधना करत दिवस ढकलतेय.  गैरसमज नको करून घेऊस.  रोशनीचा हेवा नक्कीच वाटतो पण दु:स्वास कधीच नाही. परवा तुला आणि रोशनीला मॉल मध्ये शॉपिंग करताना पाहिले तेव्हा धक्काच बसला.  रोशनीवर हा आघात नको व्हायला हवा होता.  मला तू कायम सुखात, आनंदातच राहायला हवे आहेस. माझ्यासाठी! म्हणून मी निर्णय घेतलाय.  मृत्यूनंतर नेत्रदान करायचा. 

या जन्मात माझे प्रेम तू स्विकारणार नाहीस हे मान्य आहे मला.  पण एकदा तरी तुला ते कळावे, तुझ्या पर्यन्त पोचावे एव्हढीच इच्छा आहे.

तुझा आणि फक्त तुझाच,

किरण

पत्र वाचून आदी स्तिमित झाला.   त्याला रोशनीच्या डोळ्यांतली उत्कटता समजली.  पावसाबरोबरच  त्याच्याही अश्रुधारा बरसत होत्या.पहाटे आकाश निरभ्र झाले.  सारे मळभ दूर झाले होते.  धरतीही पावसाने भिजून तृप्त झाली होती. तीच तृप्तता रोशनीच्याही डोळ्यांतून वाहात होती…

तुम्हाला  ही कथा कशी वाटली ते नक्की कळवा.  आपल्या मित्र परिवारा सोबत शेअर करायला विसरु नका.  अशाच नवनवीन कथा आम्ही तुमच्या पर्यन्त पोहचवत राहू.  याचा  लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाइटला नक्की भेट द्या.  तसेच आमचा WhatsApp ग्रुप ही जॉइन करा.  धन्यवाद! 

महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)  

1 thought on “अनोखी प्रेम कथा -या डोळ्यांची दोन पाखरे”

  1. रश्मी कोळगे

    खूप सुंदर… एक एक पदर उलगडत जावा अशी कथा 👌🏻

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top