हृदयद्रावक कथा..ए आई..

WhatsApp Group Join Now

स्ट्रेचर वर नेत असताना आकांक्षा ला आजूबाजूच्या लोकांचा आवाज ऐकू येत होता. “ऍम्ब्युलन्स मध्ये घ्या रे. कोण आहे रे ही ?आधार कार्ड, लायसन्स काहीतरी सापडलं का? नावं आणि नंबर मिळाला बघ पर्समध्ये ,फोन लावला पण कोणी फोन उचलत नाहीये ,आता काय करायचं? काही नाही दवाखान्यात घेऊन चाललेत, पोलीस येतीलच चल निघुत आपण, नसत्या चौकश्या मागे लागतील, बघत बसतील त्यांचं ते चल आपण जाऊ”, असं म्हणत ऍक्सीडेन्ट बघणारे आणि मदत म्हणून ऍम्ब्युलन्स बोलावणारे दोन मित्र आकांक्षा ला स्ट्रेचर वर सोडून निघून गेले..

ऍम्ब्युलन्स जोरजोरात आवाज करत रस्त्यावरून निघाली, तसच आकांक्षा ला जाणवलं की, रोज अश्या कितीतरी ऍम्ब्युलन्स फिरताना तिने आवाज ऐकलाय, पण स्वतःसाठी ऐकताना आज तिला जाणवलं की, त्या का फास्ट जातात म्हणून. एखाद्याचा जीव वाचवणं किती मोठं आणि महत्वाचं काम आहे, हे तिला आज कळत होतं.

“क्रिटिकल आहे, चांगलंच लागलंय, वाचणं कठीण आहे”, डॉक्टरांचं हे वाक्य ऐकू येत होतं आकांक्षाला, तसंच ती जोरात ओरडायचा प्रयत्न करत होती , “मला जगायचंय हो, माझी मुलं घरी वाट बघतायत . इथे पुण्यात माझ्याशिवाय कोणी नाही त्यांचं, मला वाचवा. माझा मोठा मुलगा शाळेत गेलाय छोटा मुलगा शाळेतून घरी येईल त्याला कोण कलेक्ट करेल? अरे देवा काय वेळ आणली रे माझ्यावर. अरे नुसती भाजी आणायला तर निघाली होती घरातून आणि हे काय होऊन बसलं?मला वाचव रे देवा. माझा जीव वाचवा, माझ्या नवऱ्याला फोन करा”, असं म्हणून ती जीवाच्या आकांताने ओरडायचा प्रयत्न करत होती. पण काही उपयोग नव्हता. तिचे ओठ घट्ट मिटले होते. तिचा आवाज कोणालाच जात नव्हता कारण,हा सर्व आकांतं तिच्या आत चालला होता, बाहेरून तिचा र*क्ताच्या थारो*ळ्यातील देह शांत होता.

डोळे बंद होते, वेदना थोड्याफार जाणवत होत्या, काहीतरी घडलय एवढं तिला कळत होतं. दुरून अस्पष्ट काहीतरी तिला ऐकू येत होतं.मनात विचार मात्र सतत चालू होते.

“तरी नवरा सारखा म्हणायचा, कुठेही जाताना हेल्मेट घालून जात जा,पण मी नाही ऐकलं. आज हेल्मेट असतं तर ही वेळ आली नसती.वेळ! वेळ काय झालीय? साडेबारा वाजलेत का हो? अबीर येईल शाळेतून. त्याला कोण घेणार? मोठ्या मुलाला कोण सांगणार मी दवाखान्यात आहे?”, तिचं स्वतःशीच द्व`द्व चालू होतं.

तेवढ्यात डॉक्टर येऊन म्हणतात, “यांच्या घरच्यांना कळवलय?”.

“हो सर यांच्या नवऱ्याशीं कॉन्टॅक्ट झालाय ते येतात आहेत”, अट्टेण्डन्ट बोलला.

“अहो डॉक्टर, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होऊन काही उपयोग नाही, त्यांना यायला 4 तास लागतात, माझ्या मुलाला कोण कलेक्ट करणारं हो? ऐका रे माझं कोणीतरी”, आकांक्षाचं मन काही शांत होत नव्हतं.

“ऍनेस्थेशिया द्या लवकर, सर्जरी सुरु करायचीय. बापरे! खूप क्रिटिकल आहे, पण प्रयत्न करू, वाचल्या पाहिजे,पोलीस आलेत?”, डॉक्टरांनी विचारलं.

“ हो सर, बाहेर आहेत”, अट्टेण्डन्ट बोलला.

“ वाचल्या पाहिजे? नाही डॉक्टर वाचलीच पाहिजे. तुम्हाला हा जीवन म*रणाचा खेळ रोजचा असेल, पण मला नाही, मला म*रून नाही चालणार डॉक्टर.

मोठ्या धाडसाने निर्णय घेऊन पुण्यात आणलय मुलांना शिकायला. नवरा गावी राहतो, पैसा पुरवतो आणि माझ्यावर संपूर्ण घराची, मुलांची जबाबदारी आहे, मला म*रून नाही चालणार, मांडलेला खेळ अर्धवट कसा सोडून जाऊ? अबीर चं प्रोजेक्ट द्यायचय उद्याच शाळेत, कोण देणार? तुम्ही? नाही ना! मग मलाच जिवंत राहावं लागेल नं. मी लढेल डॉक्टर मृ*त्युंशी, फक्त तुम्ही प्रयत्न सोडू नका, मी झुंजणार, मी लढणार, सवित्री मातेने तिच्या पतीचे प्राण सोडवून आणले होते नं यमराजांकडून, आज मी त्या यमराजांच्या तावडीतून माझं आयुष्य सोडवून आणणार, डॉक्टर फक्त माझ्या मुलांसाठी मला जगवा ”, आकांक्षा ची इच्छाशक्ती बळावत होती तस तशी ती बेशुद्ध होत होती.

“या बेशुद्ध का होत नाहीयेत पूर्णपणे?”, डॉक्टरांची काळजी वाढत होती.

“माहित नाही सर डोझ तर व्यवस्थित दिलाय”, भुल देणारे डॉक्टर म्हणाले.

“लेट्स वेट फॉर सम टाइम”, असं म्हणून डॉक्टर ऑपेरेशन च्या तयारीला लागले.

“टाइम ? टाइम काय झालाय सर? माझा मुलगा येईल हो शाळेतून”, असं आकांक्षा ने म्हणतच हळू हळू सर्व शांत होत गेलं.

 शांतता, सगळीकडून येणारे आवाज पूर्णपणे बंद झाले, काळाकुट्ट अंधार. डोळे बंद असूनही, अंधारात उजेडाच्या वाटेने चाचपडत होते, हात, पाय, शरीर सगळी संवेदना नाहीशी झाली होती. जाणवत होते ते फक्त बंद डोळे आणि विचार करणारं मन, जे मुलांच्या काळजीने सैरभैर धावत होतं. हे सगळं चालू होतं आकांक्षा च्या विश्वात पण बाहेरच्या जगात वेगळंच सुरु होतं.

ऑपेरेशन होईपर्यंत आकांक्षा चा नवरा दवाखान्यात पोहोचला होता. आकांक्षा मुलाला घ्यायला बस जवळ आली नाही म्हणून बस मधल्या मावशी अबीर ला सोबत घेऊन गेल्या.

4 वाजता मोठा मुलगा घरी आला. त्याला शेजार्यांकडून झालेला प्रसंग कळताच त्याने हॉस्पिटल ला धाव घेतली. तो खूप रडत होता. त्याचा खूप जीव होता आईवर. सारखा बाबान्ना विचारायचा, “आईला काही होणार नाही ना!”.

त्याचे बाबा पण सुन्न बसले होते. तेवढ्यात पोलीस त्यांच्याजवळ आले.

“मी.आकाश का?”, पोलिसांनी विचारलं.

“हो सर”, आकाश आकांक्षा चा नवरा.

“कुठे असता?”, 

“सर कराड ला”,

“ सो सॉरी, पण हे बघा तुमच्या पत्नीची कंडिशन फार क्रिटिकल आहे असं डॉक्टर म्हणाले. आता ऑपेरेशन झाल्यावर बघू डॉक्टर काय म्हणतात ते, हम, काळजी करू नका”, पोलीस आकाश ला समजावत होते.

“सर ऍक्सीडेन्ट कुठे आणि कसा झाला? नाही म्हणजे ही गाडी तर सावकाश आणि व्यवस्थित चालवते म्हणून विचारतोय”, आकाश ने अडखळत पोलिसांना विचारलं.

“ अहो, आपण कितीही चांगली आणि सावकाश गाडी चालवली तरी समोरचा चालवेलच हे कशावरून! एका बाईक वाल्याने फास्ट स्पीड मध्ये यांच्या गाडीला कट मारला, ज्यामुळे त्या गाडीवरून पडल्या आणि डीव्हायडर वर त्यांचं डोकं आदळलं. गाडीचा स्पीड जास्त असल्यामुळे त्याचा कट खूप जोरात बसला यांना आणि हेल्मेट नव्हतं त्यामुळे डोक्याला तर जबर मार बसलाच पण हाताला आणि पायाला ही जखम झालीय.. हातापायाचं काय हो नीट होईल, पण डोक्याचं कठीण असतं नं. सुशिक्षित लोकं तुम्ही, तुम्हीच असे वागले तर बाकीच्यांना काय म्हणावं? बरं एवढं होऊनही तो बाईक वाला थांबला नाही पळून गेला. त्याचं काय गेलं? तो सापडेल ही नंतर पण तुमच्या नुकसानाचं काय? तुमच्या पत्नीला हेल्मेट असतं तर कदाचित हा प्रसंग एवढा सिरीयस झाला नसता”, पोलिसांनी असं म्हणताच मोठा मुलगा जोरजोरात रडून सांगायला लागला, “ तरी रोज म्हणायचो आईला, गाडीवर हेल्मेट घालत जा. आम्हाला गाडीवर हेल्मेट घालायला लावते पण स्वतः नाही घालत”. 

त्याच्या बाबांनी त्याला जवळ घेऊन त्याला शांत केलं.

“हेल्मेट वापरा आणि स्पीड कमी ठेवा म्हणून कितीही जनजागृती केली तरी काही उपयोग होत नाही हो. बिनधास्त सिग्नल तोडतात, त्यामुळे किती अ*पघात होतात. कोण सांगणार यांना? आता यांचच बघाना दुसऱ्याच्या चुकीची केवढी मोठी शिक्षा भोगावी लागतेय यांना”, पोलीस एकमेकांशी बोलत होते.

तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले.

“डॉक्टर कशी आहे आकांक्षा?”, असं आकाश ने विचारताच डॉक्टर शांतपणे म्हणाले, “आय एम सॉरी, नाही वाचवू शकलो आम्ही”. डॉक्टरांचं बोलणं ऐकून आकाश जागीच कोसळला. मुलाची तर अवस्था आधीच वाईट झाली होती आता तर त्याला अतिदुःखाने रडता पण येईना.

संपलं होतं सगळं, सगळंच. मुलांसाठी पाहिलेली स्वप्नं, ठरवलेली प्लांनिंग्स, केलेली तडजोड, फक्त मुलांसाठी पतकरलेला दुरावा, असं काहीसं आणि बरंच काही.आकांक्षा डोळे मिटून बेड वर पडली होती. तिला आता कसलेच आवाज येत नव्हते.ती फक्त डोळे मिटून होती. एक प्रे*तच.

एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं होतं, तिला त्या प्रे*तावस्थेत सगळं पुढचं दिसू लागलं.

आता परत कराड ला मुलं नेण्याखेरीज पर्याय नव्हता , छोटा मुलगा तर सारखा ‘आई कुठाय?’ म्हणून घरभर रडत फिरत होता, याच्या तोंडाकडे त्याच्या तोंडाकडे बघत आपली आई शोधत बसायचा. परिस्थिती बिकट होती.

“पापा सांगा नं, आई कधी येणार आहे?

कुठे गेली आई?”, सारखा वडिलांना अबीर विचारत होता. दार वाजलं की, पळत यायचा आई आली म्हणत.

त्याची अवस्था बघून सर्व जण गहिवरले होते.मोठा मुलगा तर सारखा आईला बोल लावत होता, का गेलीस?कुठे गेलीस? म्हणून. 

“ऐक ना आई, परत ये,मी तुला डब्बा चांगला नाही केला म्हणून कधीच नाही बोलणार, चुपचाप खाईन, अभ्यास पण खूप करील, मोबाईल तर अजिबात मागणार नाही, उलटं अजिबात कधीच बोलणार नाही, तू म्हणाली होती पुण्यात आहोत तर आपण नाटक बघायला जाऊ, चल नं जाऊ आपण, आई सिनेमा बघायला जाऊ गं. तुझ्याशिवाय सिनेमा बघायला मजा येत नाही, हे पप्पा अजिबातच हसत नाहीत, ये गं तू प्लीज.

मला पुण्याला का आणलं? मी असं पण म्हणणार नाही गं, सगळ्या भाज्या खाईन, पण ये तू.. तुझ्याशिवाय मी कसं जगू गं? खूप त्रास देतो तुला, म्हणून मला सोडून गेलीस का? नाही देणार गं . देवाशप्पथ कधीच त्रास नाही देणार पण प्लिज ये ना गं”,

असं म्हणत मोठा मुलगा कबीर जोरजोरात रडत होता.अबीर च्या जेवायच्या वेळा, त्याची औषधं , त्याचा अभ्यास, होमवर्क याची कोणाला काहीच महिती नव्हती.आकांक्षा च्या एका चुकीची शिक्षा संपूर्ण कुटुंब भोगत होतं.

एक जीव गेल्याने किती जीवांचं नुकसान झालं होतं? मोठ्या मुलाचं 10 वी होतं मधातूनच कसं परत न्यायचं, म्हणून त्याला नाईलाजाने हॉस्टेल मध्ये घालाव लागणार होतं , छोट्याला चांगलं शिक्षण मिळत असताना त्याची ऍडमिशन गावी घ्यावी लागेल , त्याची आजी त्याला सांभाळत होती पण ती ही थकलेली होती, तो घरभर आईला शोधत फिरताना सर्वांचं काळीज कालवून निघायचं, पण काय करणार!.

झोपताना उठताना बसताना अबीर चं आई गाणं सुरूच होतं. आकाश ला काहीच कळेना काय करावं? दिवस रात्र त्याने स्वतःला धंद्यात झोकून दिलं होतं, जेणेकरून पुण्यात या तिघान्ना काही कमी पडू नये म्हणून, पुण्या बाबतीत तो निश्चिन्त होता, कारण आकांक्षा सर्व सांभाळत होती, तेही एकटीने.

डोळ्यात फक्त एकच स्वप्न होतं, मुलांना चांगलं शिकवायचं, आपण कुठे आयुष्यभर त्यांना पुरणार आहोत! त्यांचे ते पायावर उभे राहिले पाहिजे या विचाराने तिला पछाडलं होतं, पण चांगलं सुरु असताना अचानक हा प्रसंग ओढवला आणि सगळं होत्याचं नव्हतं झालं.अबीर रुळत होता पण अभ्यास करताना जेवताना झोपताना त्याला आईची जाणीव प्रखर व्हायची.

तोच त्रास मोठयाला देखील होत होता, त्याचं अभ्यासात मन लागत नव्हतं, त्याला सारखी आईची आठवण यायची. आपली आई होती तेव्हा आपण तिची कदर केली नाही पण आता जाणवतं तिला आपण किती त्रास दिला. त्याला आईची खूप सवय होती. आईचं जाणं त्याला सहनच होत नव्हतं, त्यामुळे तो वाईट संगतीकडे वळू लागला आणि 10 वी गमवायची वेळ त्यावर येणार हे निश्चित होतं.

कमी मार्क्स मिळाले तर, ऍडमिशन कुठेच मिळणार नाही , पर्यायाने डॉक्टर इंजिनीरिंग च स्वप्न पाहिलेला मुलगा गावातल्या कॉलेज मध्ये ऍडमिशन घ्यावी लागेल.

हे तर झालं कबीर चं मोठ्याचं, पण लहानाचे काय? एक दिवस शाळेतून घरी आल्यावर आजी स्वयंपाक घरात असताना अबीर खेळत खेळत वरच्या मजल्यावर गच्चीवर गेला. साधारण त्याची आज्जी त्याला तिथे जाऊ देत नसे, आकांक्षा पण जाऊ देत नसायची. कारण गच्चीला थोड्या थोडया अंतराने काही खाचा होत्या, ज्यामधून लहान मूल अगदी सहजपणे जाऊ शकेल. जाईल म्हणजे वरून खालीच पडेल. पण आज हा नजर चुकीने तिथे गेला आणि खाचे जवळ च खेळू लागला. तेवढ्यात वरून त्याचा बॉल खाली पडला तर तो त्याच खाचेतून वाकून बघायला लागला आणि खालच्या लोकांना आवाज देऊ लागला. थोडा पुढे वाकला आणि आणि क्षणात त्याचा तोल गेला आणि तो जोरात आईssssssss ओरडून खाली पडला.

तसाच आकांक्षा ने जोरात श्वास घेतला आणि अचानक तिच्या हार्ट बीट्स सुरु झाल्या. सिस्टर जोरात ओरडली,’डॉक्टर लवकर या’ .डॉक्टर धावतच आत आले आणि बघतात तर काय प्राण निघून गेलेल्या आकांक्षा च्या देहात पुन्हा जीव स्फूरला होता. “हे कसं शक्य आहे? हा चमत्कार आहे. आताच सर्र्जरी च्या दरम्यान यांच्या हार्ट बीट्स पूर्ण गेल्या होत्या.डे*ड चं होत्या. म्हणून तर यांच्या कुटुंबाला मी या गेल्या म्हणून सांगितलं आणि हे कसं. बापरे! अविश्वसनीय. कुठली तरी ताकद यांना परत घेऊन आलीय हे खरं”, असं म्हणत डॉक्टरांनी लगेच सर्व ट्रीटमेंट सुरु केली आणि आता आकांक्षा स्टेबल होती.

बाहेरच्या जगात आकांक्षा जरी गेली असली तरी तिच्या विश्वात ती या पुढील घडणाऱ्या सर्व गोष्टी बघत होती. जणू काही ती मोठा प्रवास करून पुढे घडणाऱ्या गोष्टींचा अंदाज घेऊन परत आली होती. आपण गेल्यानंतर काय काय घडू शकतं हे ती बंद डोळ्यांच्या आड अनुभवत होती. तिची मुलांसाठी जगण्याची इच्छाशक्ती इतकी प्रबळ होती कि तीच तिला म*रणाच्या दारातून परत घेऊन आली होती.

“हा चमत्कार म्हणायचा की काय माहित नाही पण एवढ्या क्रिटिकल केस मध्ये पेशंट वाचणं ही खूप मोठी किमया आहे, जीव जाऊन परत जिवंत होणे हे अविश्वसनीय आहे, काळजी घ्या आकाश त्यांची, मृ*त्युंला मात देऊन परत आल्या आहेत तुमच्या पत्नी”, असं म्हणून डॉक्टर निघून गेले.

जीवन मरणाच्या या चक्रातून आकांक्षा एखाद्या रणरागिणी सारखी लढून बाहेर आली होती. तिला सुखरूप बघून बाप लेकाचे चेहरे आनंदून गेले होते.

“ ए आई, पुन्हा नको गं कधी सोडून जाऊ. या फक्त 30 मिनिटांमध्ये तु नसल्याची भावना मनाला पोरकं करून गेली गं,ही वेळ आयुष्याचा धडा शिकवून गेली मला. आजचा दिवस मी कधीच नाही विसरणार”, असं म्हणत कबीर आईच्या कुशीत धाय मोकलून रडतो.

ही तर झाली कथा. पण आपण सुद्धा गाडी चालवताना हेल्मेट घातलंच पाहिजे. आताच जाऊन येते,इथेच तर जायचंय ही कारणं स्वतःला देण्याआधी आकांक्षा ला डोळ्यासमोर ठेवा. तरुण वयातली मंडळी तर हातात बाईक मिळाली की कशी आणि किती ताणू हे बघतात. पण तुमच्या एका चूकीमूळे एखाद्याचं आयुष्य कसं उध्वस्त होऊ शकतं याचं उदाहरण आकांक्षा आहे.

ही कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा.. अश्याच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या लेखकमित्र या वेबसाईट ला भेट द्या.

महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)  

8 thoughts on “हृदयद्रावक कथा..ए आई..”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top